पावसाळ्यात सखल भागांत पाण्याचा निचरा न झाल्याने शहरात विविध ठिकाणी पाणी साचले. अनेक ठिकाणी ढोपरांपर्यंत पाणी साचले होते. अशा परिस्थितीत काही जण नाइलाजास्तव पाण्यातून गाडी घेऊन जात होते. अशा प्रकारे पाण्यातून गाडी नेल्यास गाडीच्या अंतर्गत भागांमध्ये पाणी शिरून इंजिन बंद पडण्याची शक्यता असते. गाडी पाण्यातून घेऊन गेल्याने किंवा जास्त पाऊस झाल्यामुळे गाडीत आणि गाडीच्या अंतर्गत भागांत पाणी जाण्याची शक्यता असते.

पावसाळय़ात रस्त्यांवरील खड्डय़ांची समस्या अधिक प्रकर्षांने जाणवते. तर वाहतूक कोंडी, सखल भागांत साचणारे पाणी, या समस्यांचीदेखील त्यात भर पडते. रस्त्यात अशाप्रकारे पाणी साचले असताना काही जण धाडस म्हणून पाण्यातूनच मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशाप्रकारे साचलेल्या पाण्यात गाडी कधीच घेऊन जाऊ  नये. हे पाणी गाडीच्या सायलेन्सर, इंजिनमध्ये जाण्याची शक्यता असते. यामुळे गाडीमध्ये बिघाड होतो. गाडीत पाणी शिरल्याने गाडीच्या केबिनला देखील नुकसान होते. त्याव्यतिरिक्त ओलाव्यामुळे गाडीतून दुर्गंधी येण्याची शक्यता असते. गाडीत पाणी शिरल्यानंतर लगेचच त्याबाबत योग्य उपाययोजना केल्यास त्याच्या दुरुस्तीच्या खर्चाचा भरुदड भरावा लागणार नाही.

बऱ्याच वेळा पाण्याची पातळी वाढली असून देखील काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पटकन गाडी पाण्यातून नेता येईल असा विचार करून गाडी पाणी साचलेल्या रस्त्यातून नेण्यात येते. आणि अशाप्रसंगी तुमच्या गाडीत पटकन पाणी शिरू शकते. यावर उपाय म्हणजे साचलेल्या पाण्यातून कधीच गाडी घेऊन जाऊ  नका. हे तुमच्या आणि तुमच्या गाडीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

गाडीचे सीलिंग योग्य प्रकारे झाले नसेल तर तुमची गाडी पावसात केवळ उभी असल्यासही गाडीत पाणी शिरू शकते. परंतु बऱ्याच वेळा साचलेल्या पाण्यातून गाडी नेल्यामुळेच गाडीत पाणी शिरते. या पाण्यामुळे गाडीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते, तर अस्वच्छताही निर्माण होते. गाडीच्या सीटवर बुरशी लागणे, गाडीच्या केबिनमधून दुर्गंधी येणे अशाप्रकारच्या समस्यादेखील उद्भवतात.

गाडीच्या अंतर्गत भागात ओलावा राहिल्याने गाडीच्या डॅशबोर्ड किंवा सीट्सवर बुरशी धरण्याची शक्यता असते. निकृष्ट दर्जाच्या सीलिंगमुळे देखील पावसाचे पाणी गाडीत जाऊ शकते. हे पाणी जर गाडीच्या इंजिनमध्ये शिरले, तर तुमची गाडी दुरुस्ती पलीकडे गेलीच म्हणून समजा. यामुळे तुमच्या गाडीतील अंतर्गत भागांमध्ये बिघाड होतो. अशा प्रकारे गाडी नादुरुस्त होण्याला ‘हॅड्रो-लॉक’ असे म्हटले जाते.

गाडीच्या इंजिनकडे हवा जाण्याच्या मार्गात गाडीत पाणी शिरल्याने ‘हॅड्रो-लॉक’चा त्रास होतो. हे पाणी गाडीचे इंजिन आणि इतर भागांचे नुकसान करते. जास्त पातळी असलेल्या पाण्यातून गाडी चालविल्याने हैड्रो लॉकची समस्या उद्भवू शकते. याव्यतिरिक्तदेखील अनेक बिघाड गाडीमध्ये उद्भवू शकतात.

गाडी स्वच्छ करायला सुरुवात करण्याआधी गाडीच्या कुठल्या भागाला सर्वाधिक नुकसान झाले आहे हे तपासून घ्या. गाडीचे कार्पेट, सीट आणि केबिनमधील सर्व भाग तपासून घ्या. पाण्याचा एकही थेंब गाडीत राहणार नाही याची काळजी घ्या.

किती नुकसान झाले आहे हे एकदा समजले, की तुम्ही त्यानुसार काम करण्यास सुरुवात करू शकता. तुमच्याकडे अशाप्रकारच्या स्वच्छतेसाठी जर उपकरणे नसतील तर गाडी थेट सव्‍‌र्हिसिंगला देणेच योग्य. गाडीत साचलेले पाणी काढण्यासाठी ड्रायव्यॅक्युम क्लीनरचा वापर करा. असे करताना सीट, आर्मरेस्ट आणि सेंटर कन्सोलच्या भागाची स्वच्छता करणे विसरू नका. काही गाडय़ांमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र किंवा प्लग असतात. याचा वापर करून तुम्ही गाडीतील पाणी बाहेर सोडू शकता. कार्पेटमधील पाणी काढण्यासाठी टॉवेलचा किंवा कपडय़ाचा वापर करा. हे करून झाल्यावर तुमची गाडी स्वच्छ झाली म्हणून लगेच निश्चिंत होऊ  नका. गाडीच्या कार्पेटमध्ये किंवा फ्लॉवर कॉव्हरमध्ये पाणी साचले असू शकते. गाडी कोरडी करण्यासाठी गाडीची दारे उघडून गाडीतील फॅन सुरू करा. अशाप्रकारे खेळती हवा ठेवल्यास तुमची गाडी सुकण्याची प्रक्रिया जलद गतीने होऊन, गाडीत बुरशीदेखील धरणार नाही.

गाडीतील पाणी एकदा निघून गेल्यानंतर गाडी शाम्पूने धुऊन पुन्हा स्वच्छ करा. गाडी एकदा सुकल्यावर परत त्या गाडीला ओले करणे कदाचित विसंगत वाटू शकेल परंतु गाडी शाम्पूने स्वच्छ केल्याने गाडीतील बॅक्टेरिया आणि दुर्गंधी निघून जाण्यास मदत होते. केवळ यानंतर गाडी पूर्णपणे कोरडी करून कुठेही पाणी किंवा ओलावा राहणार नाही याची काळजी घ्या.

यानंतरदेखील गाडीतील काही भागांत तुम्हाला पाणी असल्याचे जाणवत असेल तर हेअर ड्रायरने त्या ठिकाणांना कोरडे करा. यासाठी तुम्ही ओलावा शोषून घेणारी उत्पादने वापरू शकता. स्वच्छ करण्यास कठीण भागांमध्येच बुरशी धरण्याचा धोका सर्वाधिक असतो. फ्लोअरिंग पॅडमध्ये बुरशी धरू शकते मात्र फ्लोअरिंग पॅड जास्त महाग नसल्याने याचे जास्त नुकसान झाले असल्यास ते बदलून घ्या. समस्येची लवकरात लवकर आणि योग्यप्रकारे काळजी घेतल्यास गाडीला होणारे दीर्घकालीन नुकसान तुम्ही टाळू शकता.

विद्युत बिघाड

वायरिंग जोडणीमध्ये बिघाड, गाडीतील संगणकप्रणाली, स्वयंचलित सीट, पॉवर विंडो-ब्रेक, स्टार्टर्स यासह इतर भागांमध्ये पाण्यामुळे यांत्रिक बिघाड होतात. सीट ट्रॅकला किंवा गाडीच्या इतर भागांना पकडणारा गंज. बुरशी, ओलावा यामुळे होणारी दरुगधी, इंजिन ऑइल किंवा इतर महत्त्वाच्या ऑइलमध्ये पाणी शिरणे अशा अनेक समस्यांचा सामना गाडीत पाणी शिरल्याने करावा लागतो. गाडीत शिरलेल्या पाण्याला बाहेर जाण्यासाठी मार्ग नसल्याने ते पाणी गाडीतच साचून राहते. यामुळे गाडीत बॅक्टेरिया- बुरशीची वाढ होते.

गाडीची सफाई

गाडीत एकदा पाणी शिरले की लगेच बुरशी, जंग धरायला सुरुवात होते. त्यामुळे दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी लगेचच प्रतिबंधात्मक उपाय सुरू करावे. जर तुमच्या गाडीत जास्तच पाणी शिरले असेल तर गाडी सुरू करण्याचा प्रय करू नका. गाडीचे इंजिन, इंधन यंत्रणा किंवा ट्रान्समिशनमध्ये पाणी असतानाच गाडी सुरू केल्यास तुमची समस्या अधिकच बिकट होऊ  शकते.