|| डॉ. दीपा दिनेश जोशी

पावसाळा संपत आला तरी त्याच्याशी निगडित आजारांचा धोका या काळातही असतोच. विशेषत: बालकांच्या बाबतीत हा धोका अधिक असतो. या लेखात पावसाळ्याशी निगडित विविध आजारांची माहिती घेऊ.

किरकोळ सर्दी, खोकला, ताप यापासून डासांमार्फत डेंग्यू आणि हिवताप (मलेरिया) यांचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण या काळात अधिक असते. वातावरणातील बदलामुळे फ्लू, दमा, न्यूमोनिया, विषांणूमुळे श्वसननलिकेला येणारी सूज हे आजारही डोके वर काढतात. दूषित अन्न व पाणी यातून अतिसार व कावीळ यांसारखे आजारांचे प्रमाणही वाढते.

अतिसार

जगभरात दरवर्षी पाच वर्षांखालील १५ लाख बालकांचा मृत्यू अतिसाराने होतो. अतिसार हा विषाणू, जिवाणू किंवा परजीवींमुळे होऊ शकतो.प्रमुख लक्षणे

सर्दी, खोकला, ताप, मळमळ, उलटय़ा त्यानंतर पाण्यासारखे पातळ जुलाब. जुलाबाचे प्रमाण जसे वाढते तसे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. प्राथमिक अवस्थेत यामध्ये खूप तहान लागते, लघवीचे प्रमाण हळूहळू कमी होते. तोंड, जीभ कोरडी पडते, डोळे, टाळू खोल जाते, अश्रूंचे प्रमाण कमी होते, त्वचेला सुरकुत्या पडतात. धोक्याच्या पातळीत बाळ मलूल-निस्तेज होते, अन्न पाण्यास नकार देते. कधी कधी बाळ बेशुद्ध होते. यावर उपाय म्हणून जलसंजीवनी, उत्तम पोषक आहार, जस्त-झिंक देण्यात यावे. कावीळ अ व ई हे दूषित अन्न व पाण्यातून होतात. यामध्ये ताप, मळमळ, भूक एकदम कमी होणे, थकवा येतो तर काही वेळा उलटय़ा होतात. नंतर डोळे, त्वचा, लघवी पिवळी होते, पोटात दुखते. कावीळवर विशिष्ट असे औषध उपलब्ध नसले तरी सर्व परीने आणि तातडीने उपचार करणे महत्त्वाचे आहे. यावेळी संपूर्ण विश्रांती घेणे गरजेचे असून ताजा व सकस आहार घेणे गरजेचे आहे. खाण्यामध्ये कबरेदकाचे प्रमाण जास्त ठेवावे. पाणी उकळून पिणे, ताजा सकस शिजवलेला आहार घेणे. उघडय़ावरील अन्न खाणे टाळणे सर्वात महत्त्वाचे आहे. कावीळमध्ये कधी कधी कावीळ जास्त प्रमाणात असल्यास रुग्ण बेशुद्ध अवस्थेत जाऊ शकतो. मेंदूला सूज येऊ शकते. अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. याला हिपॉटिक इनकॅफॅलोपथी असे म्हणतात. हा घातक आजार असून यात रुग्ण दगावू शकतो.

अधूनमधून पडणाऱ्या पावसानंतर डासांची पैदास मोठय़ा प्रमाणावर वाढते, त्यामुळे या काळात हिवताप, डेंग्यूचे प्रमाणही वाढते.

हिवताप (मलेरिया)

हा आजार खाण्यातून, पाण्यावाटे किंवा संपर्कातून होत नाही. या रोगाचे संक्रमण डासांमार्फत होते. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. प्लाझमोडियम व्हायव्ॉक्स या जंतूमुळे असल्यास तो सौम्य असतो. परंतु प्ला, फालासिपेरम मात्र घातक मलेरिया असतो. यामुळे रुग्णांच्या महत्त्वाच्या अवयांवर ताण येऊन रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. या आजारावर अजून तरी लस उपलब्ध नाही.

डेंग्यू :

डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून ‘एडिस इजिप्ती’ नावाच्या डासामुळे हा आजार पसरतो. यामध्ये तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखी, खोकला, डोळ्यांमागे दुखणे, मळमळ, उलटय़ा, अशक्तपणा, पोटात दुखणे, अंगदुखी, पाठदुखी तीव्र असते. यात शरीरात ठिकठिकाणी रक्तस्राव होऊ शकतो. जसे की नाकातून, हिरडय़ांतून, आतडय़ांतून काहींना दम लागणे, अंगावर सूज येणे, शरीरातील प्लेटलेट्स कमी होणे असा त्रास होऊ शकतो. या अवस्थेत योग्य उपचार न मिळाल्यास ‘डेंग्यू शॉक सिंड्रोम’मध्ये जाऊ शकतो. यात लघवीचे प्रमाण कमी होणे, रक्तदाब कमी होणे, श्वसनास त्रास होणे आदी त्रास होतो. रुग्ण दगावण्याची शक्यता असते. आजार होऊ नये यासाठी आवारातील टायरमधील कुंडीमधील, टेरेसमधील पाण्याचा निचरा करणे, पाणी झाकून ठेवणे, आठवडय़ातून एकदा कोरडा दिवस पाळावा, गप्पी मासे पाळावेत. तसेच डास चावू न देण्यासाठी खिडक्यांना जाळ्या बसवणे, लांब बाह्य़ांचे कपडे मुलांना घालणे, मच्छरदाणीचा वापर करणे, निलगिरी तेल, कडुनिंबाचे तेल, लेमनग्रास तेल अंगाला लावणे यामुळे डास चावण्यापासून प्रतिबंध होईल.

drdeepadjoshi@gmail.com