|| डॉ. संजीवनी राजवाडे

सध्या मधुमेहींची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. यामध्ये लहान मुले, पुरुष, स्त्रिया या सर्वाचाच समावेश आहे. स्त्रियांमध्ये विशेषकरून गर्भवती महिलांमध्ये निर्माण होणारा मधुमेह, आईसाठी आणि बाळासाठी धोक्याचा ठरू शकतो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांची मूल होण्याची स्वप्ने पाहताना अगोदरपासूनच याची काळजी घेतली आणि तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेतला तर असा मधुमेह काही प्रमाणात नक्कीच टाळता येऊ  शकतो.

जेस्टेशनल डायबेटिस

गर्भारपणापूर्वी कधीही रक्तातील साखरेची पातळी वाढलेली नसणे; परंतु गर्भारपणात ही पातळी वाढलेली आढळून येणे, याला गर्भारपणातील मधुमेह (जेस्टेशनल डायबेटिस) असे म्हणतात. सहसा बाळाच्या जन्मानंतर हा मधुमेह कायमस्वरूपी राहत नाही; परंतु आईच्या पुढील आयुष्यात तिला मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

कारणे

सहसा गर्भारपणात वारेद्वारे (प्लासेंटा) निरनिराळी संप्रेरके तयार केली जातात (कॉर्टिसोल, प्रोजेस्ट्रॉन, प्लासेंटल लॅक्टोजन, प्रोलॅक्टिन) यांमुळे साखरेच्या वापरावर नियंत्रण ठेवणारे इन्सुलीन पेशीमध्ये पोहचण्यास अडथळा (रेझिस्टंन्स) निर्माण होतो. ज्यायोगे साखरेचे नियमित ज्वलन न होता ती रक्तात साठू लागते आणि रक्तातील शर्करा पातळी वाढते. खरं तर ही  नैसर्गिक प्रक्रिया असून अशा अवस्थेत दीड ते अडीच पट अधिक प्रमाणात इन्सुलीनची गरज भासते. जेव्हा हे स्रवण्याचे प्रमाण गर्भवतींमध्ये कमी असते किंवा अडथळा अधिक प्रमाणात असतो, तेव्हा साखरेचे ज्वलन न होता ती मधुमेहास जबाबदार ठरते.

संभाव्य धोका

  • गर्भधारणेपूर्वी स्थूल असणाऱ्या महिला
  • मधुमेहाच्या अलीकडच्या टप्प्यावर (प्री डायबेटिक) तसेच मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असणाऱ्या स्त्रिया
  • आधीच्या गर्भारपणात मधुमेहाची बाधा होणे
  • उच्च रक्तदाब किंवा इतर आजार असणे
  • पूर्वीच्या प्रसूतीमध्ये विकलांग किंवा मृत मुलास जन्म झाल्यास
  • पॉलिसिस्टिक ओवरियन सिन्ड्रोम (पीसीओएस)
  • धूम्रपानाची अधिक सवय असणे
  • गर्भारपणी योग्य आहार व व्यायाम न करणे
  • गर्भधारणेचे वय ३५ किंवा त्याहून अधिक असणे
  • जुळे किंवा तिळे होणाऱ्या स्त्रिया

लक्षणे

  • सतत तहान लागणे
  • सतत लघवी किंवा शौचास होत असल्याची भावना येणे
  • अकारण चिडचिड होणे,
  • घामाचे प्रमाण अधिक स्वरूपात असणे
  • योनीच्या भागात जंतुसंसर्ग किंवा बुरशीचा संसर्ग वारंवार होणे.

निदान

  • साधारण २४ ते २८ व्या आठवडय़ात याची चाचणी केली जाते. ग्लुकोजची साखर देऊन रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले जाते. (ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट) यात उपाशीपोटी तसेच १ ते २ व ३ तासांनी ७५ ग्राम ग्लुकोज देऊन तपासणी केली जाते.
  • उपाशी पोटी- १०५ मिलीग्रॅम/ डी.एल
  • ग्लुकोज देऊन १ तासानंतर- १९० मिलीगॅ्रम/ डी.एल
  • ग्लुकोज देऊन २ तासानंतर- १६५ मिलीगॅ्रम/ डी.एल
  • ग्लुकोज देऊन ३ तासानंतर- १४५ मिलीगॅ्रम/ डी.एल
  • वरील प्रमाणे किंवा याहून अधिक शर्करा पातळी आढळून आल्यास गर्भारपणातील मधुमेहाचे निदान केले जाते.
  • लघवीतील साखरेचीदेखील तपासणी केली जाते.

उपचार

  • डॉक्टरांच्या सल्लय़ाने तोंडावाटे किंवा इन्सुलीनच्या इंजेक्शनच्या माध्यामातून औषधे घेणे आवश्यक आहे.
  • पुरेसा व्यायाम आणि दिवसातून चालण्याचा व्यायाम करणे फायदेशीर असते.
  • आहारातील कर्बोदकांचे प्रमाण एकाच वेळी अधिक ठेवू नये. प्रत्येक खाण्याच्या वेळी थोडी कबरेदके घ्यावीत, जेणेकरून साखरेची पातळी एकदम वाढत नाही. हळूहळू शर्करा निर्माण करणारे पदार्थ (प्रथिने) घ्यावेत. गरजेनुसार आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • पदार्थामध्ये दालचिनीची भुकटीचा वापर करावा.
  • ग्रीन टी, थोडय़ा प्रमाणात मेथी व कारले यांचा आहारात समावेश करावा.
  • ताणतणाव अधिक निर्माण होऊ न होऊ देता शक्य तितके आनंदी राहावे.

पूर्वनियोजित काळजी

  • उंची आणि वजनाचा आलेख योग्य पातळीत राखावा (बीएमआय)
  • दैनंदिन व्यायाम तसेच चालणे किंवा भराभर चालणे नियमित करावे.
  • वजन अधिक असेल तर त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ते नियंत्रणात आणावे. विशेष व्यायाम, तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करता येतात, ज्यायोगे वजन लवकर कमी होण्यास मदत होते.
  • आहारात सालीसकट कडधान्ये, मोड आलेली कडधान्ये, पुरेशा भाज्या, फळे यांचा नियमित समावेश असावा. जितके किलो वजन साधारण तेवढे ग्रॅम प्रथिने दिवसभरातून घ्यावीत. डाळी, उसळी, दही-ताक, दूध, पनीर यातून ही पूर्तता करता येते. फळांचे रस घेण्यापेक्षा फळे चावून खावीत.
  • कौटुंबिक इतिहास असेल तर गर्भधारणेच्या ६ महिने ते १ वर्ष अगोदर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तपासणी आणि उपचार सुरू करणे गरजेचे आहे.
  • कबरेदकांचा वापर करताना (भात, बटाटा, ब्रेड इ. ) एकाच वेळी अधिक प्रमाणात वापर करणे टाळावे.
  • गोड, तेलकट, तुपकट पदार्थ तसेच जंकफूड वजनवाढीस सकारात्मक मदत करतात, तेव्हा असे पदार्थ शक्यतो टाळावेत.
  • रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक आहे. मेदसंचय टाळावा. कारण अतिरिक्त साखर व मेद यांचा अनोन्यसंबंध आहे.
  • धूम्रपान, मद्यपान, तंबाखू सेवन यावर ताबा मिळवणे गरजेचे आहे.
  • स्त्रीरोगतज्ज्ञ व मधुमेहतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने गर्भारपणातील धोके, त्रास व ताणतणाव आटोक्यात ठेवण्यासाठी मदत होते.

आईवर होणारे दुष्परिणाम

  • उच्च रक्तदाबाचा त्रास
  • वारंवार गर्भपात होणे
  • रक्तस्राव अतिप्रमाणात होणे किंवा अतिरिक्त रक्तस्राव होणे
  • निरनिराळे जंतुसंसर्ग
  • गर्भधारणेनंतर ५ ते १० वर्षांत टाइप-२ मधुमेह होण्याचा धोका
  • अतिरिक्त वजनवाढ व थकवा

बाळावर होणारे परिणाम

  • जन्मत: च विकृती किंवा व्यंग असणे
  • जन्माचे वेळी बाळाचे वजन ४ किलोग्रॅमपेक्षा अधिक असणे. यामुळे शस्त्रक्रियेद्वारे (सिझेरियन) प्रसुती करावी लागणे
  • जन्मानंतर नवजात बालकाची रक्तातील साखर कमी होणे आणि बाळाच्या मेंदूला इजा पोचणे.
  • बाळाला जन्मानंतर श्वास घेण्यास त्रास होणे.