उत्सवाचे पर्यटन

जगातील सात आश्चर्यापैकी एक असलेल्या ताजमहलच्या प्रांगणात रंगणारा ताज महोत्सव दरवर्षी फेब्रुवारीत रंगतो. महोत्सवाचे यंदाचे हे २९ वे वर्ष आहे. दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात देशभरातील कलाकार आपली कला सादर करतात. ताजमहलच्या पूर्वेकडील बाजूस एक खास शिल्पग्राम यासाठी वसवले जाते. आग्रा विभागाच्या आयुक्तांच्या मार्फत ताज महोत्सव समिती या महोत्सवाचे आयोजन करते. या वर्षी हा महोत्सव १८ ते २७ फेब्रुवारी या काळात होणार आहे.

यंदा या महोत्सवात सुमारे देशभरातील सुमारे ४०० कलाकार सहभागी होणार आहेत. ईशान्य भारतातून आलेले बांबूच्या कलाकृती, दक्षिण भारत आणि काश्मीरमधील पेपरच्या लगद्यापासून तयार केलेल्या वस्तू, तांबे, संगमरवर, हस्तकला, कापडांवरील कलाकुसर अशा अनेक विविध प्रकाराच्या कलाकारी या शिल्पग्राममध्ये उपलब्ध असतात. ब्रजभूमी कलेचे सादरीकरण पाहण्यासारखे असते. शास्त्रीय तसेच लोकप्रिय नृत्य-गायनाचा आनंददेखील येथे घेता येतो. या सर्वासोबत विविध खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येतो.