News Flash

वनराईतील मंदिरे

बागलाण म्हणजे सह्य़ाद्रीचे उत्तर टोक. महाराष्ट्रातील सर्वात उंच पठार म्हणजे बागलाण.

|| रोहित जाधव

बागलाण म्हणजे सह्य़ाद्रीचे उत्तर टोक. महाराष्ट्रातील सर्वात उंच पठार म्हणजे बागलाण. केवळ ३० किमीच्या डोंगररांगेत तब्बल ११ किल्ले आहेत व चार नद्यांचा उगम होतो. सह्य़ाद्रीतील सर्वोच्च गिरिदुर्ग साल्हेर येथेच आहे. घाटमाथ्यावरून कोकणात उतरणारा सर्वात लहान घाट चिंचली, बाभुळणे घाट येथे आहे. बागलाणातील मंदिरे हा एक वेगळाच विषय आहे. डोंगर-दऱ्यांतील गर्द वनराईत दडलेली ही मंदिरे ही त्या काळातील सत्ताकेंद्रांशी निगडित असायची, त्यामुळे त्यांची काळजी प्रत्येक राजवटीत घेतली गेली.

इतिहासात गोवळकोंडा, पैठण येथे जाणारा व्यापारी मार्ग बागलाणातून होता. शिवकाळात १४०० गावे असलेल्या बागलाण प्रांताची लांबी २०० मैल व रुंदी १६० मैल होती. सध्याच्या बागलाणची दक्षिणोत्तर लांबी ३२ मैल व रुंदी २८ मैल आहे. आजमितीला बागलाण नावाचे स्वतंत्र गाव नाही. तालुक्याचे मुख्य ठिकाण सटाणा येथे आहे, पण तालुका सांगताना बागलाणच सांगितले जाते. त्यावेळी सटाणा हे नाव वापरले जात नाही. सटाणा हे नाशिकपासून ९५ किमीवर आहे. या संपूर्ण प्रदेशाला मोठा इतिहास आहे. आज ही ठिकाणं ठळकपणे पर्यटनाच्या नकाशावर नसल्यामुळे कदाचित येथील स्थापत्य, इतिहास तसा दुर्लक्षित राहिला असावा.

असेच शेकडो वर्षांपासून राजविलास भोगत असलेले एक मंदिर म्हणजे बागलाण तालुक्याच्या ईशान्य भागात सटाणापासून आठ किमी अंतरावर असलेले दोधेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर डोंगररांगेत गर्द वनराईत लपलेले आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार पांडव ज्यावेळी अज्ञातवासात होते त्यावेळी त्यांनी या शिवलिंगाची स्थापना केली. त्यामुळे या लिंगास पांडवेश्वरसुद्धा म्हणतात. या ठिकाणी मानवाच्या मृत्यूनंतर उत्तरक्रिया व पिंडदान आदी क्रियाकर्म केले जाऊ शकतात असे उल्लेख आहेत. पुढे याचा उल्लेख सापडतो तो १३ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुल्हेर नरेश वीरसेन राजाच्या काळात.

या शिवलिंगाबाबत आणखीन एक आख्यायिका सांगितली जाते. एका मोठय़ा वारुळात झाडाच्या मुळात शिवलिंग सापडले त्यामुळे त्यास मुळेश्वर म्हटले गेले. मुळाला वेल आला तेथे एक शिवलिंग सापडले म्हणून वेलेश्वर, वेलाला फुल आले म्हणून फुलेश्वर, फुलाचे फळ झाले म्हणून फळेश्वर व फळातून दुधासारखा रस बाहेर आला म्हणून दुधेश्वर, अशा प्रकारे पाच शिवलिंगांचे शिवपंचायतन तयार झाले. त्याची सुंदर देवालये बांधली गेली. समोरील कऱ्हेगड त्याच काळात बांधला गेला. तिथे मुल्हेर नरेश वीर शहा देव राठोड याने तलाव आणि गोकुंड खोदले व रोजच्या पूजेसाठी जवळील गावात बेलाची झाडं लावली. त्यावरूनच कोटिबेल व कालांतराने कोटबेल हे नाव पडले. आजही कोटबेल गावात बेलाचे जंगल सापडते.

दोधेश्वर महादेव मंदिराच्या मागे एक डोंगर आहे, तिथे एका कपारीत काही नैसर्गिक झरे आहेत. त्यांना चोरझिरे म्हणतात. याच झऱ्यांपासून दोध्याड नदी तयार झाली. नदीचे दोन प्रवाह तयार झाले एक मुख्य पिंडीत येतो व दुसरा गोकुंडातून वाहतो. मंदिराचे स्थापत्य यादवकालीन आहे. सभागृह त्यांनतर नंदीगृह पुन्हा पायऱ्या उतरून एक यज्ञगृह व पुढे गर्भगृह. गर्भगृहात अंधार असून शिवलिंग पंचमुखी आहे. पूर्वीचे मंदिर खूप सुंदर असेल कारण नंदीगृहाचे स्तंभ देवळाणे येथील जोगेश्वरी महादेव मंदिराची आठवण करून देतात.

आज मुख्य मंदिराच्या वर आणखी एक शिवालय आहे. त्यास मागून मार्ग आहे. मंदिरामागे तुकोजी होळकरांनी बारव खोदली आहे. तसेच स्नानासाठी स्त्री व पुरुष अशी दोन कुंड तयार केली आहेत. समोरील टेकडीवर दोन प्राचीन मंदिरे आहेत. त्यातील एका मंदिराच्या भिंतीवर फारशी भाषेतील शिलालेख होता; पण रिकामटेकडय़ा लोकांनी तो खराब केला. त्या बाजूच्या मंदिराच्या जीर्णोद्धारावेळी एक ताम्रपट सापडला होता पण तो तेथेच नंदीखाली बुजवून टाकला. त्यांची नोंद असती तर इतिहासाची काही पानं उलगडता आली असती.

बिबटे, लांडगे, तरस

बिष्टा, कऱ्हा, अजमेरा व दुंधे हे या भागातील किल्ले भटकताना दोधेश्वर मंदिर हा मुक्कामासाठी चांगला पर्याय आहे. म्हणजे येथील निसर्गाची मुक्त उधळण पाहता येते. मंदिराबाहेरील डोंगर राज्य राखीव वन क्षेत्रात असल्यामुळे दाट जंगल आहे. काही वेळा डोंगरातील बारीमध्ये (घाट) १०-१५ बिबटे गप्पा हाकताना दिसतात. इतके रग्गेलपणे बसलेले असतात की कितीही हॉर्न वाजवा जागचे हलतसुद्धा नाहीत. त्याचप्रमाणे तरस, लांडगे, कोल्हे, वानर आणि मोरसुद्धा मोठय़ा प्रमाणावर आहेत. पावसाळ्यात येळधूत, लिंबनळी, दुधलेण्या, बेलनळी, दुसोंडय़ा, देवडोंगऱ्या धबधब्यांचे रूप विलोभनीय असते. बागलाणात अशी अनेक नितांतसुंदर ठिकाणं आहेत. पण त्यासाठी थोडा वेळ काढून वाट वाकडी करावी लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 12:33 am

Web Title: forest temple
Next Stories
1 पेपरवेट
2 सुंदर औषधी वेल
3 अँड्रॉइड की आयफोन?
Just Now!
X