सुधा मोघे-सोमणी

मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

मानवाने लावलेला पहिला शोध : अग्नी! हा मानवाने घर्षणाचा केलेला पहिला वापर. पुढे आगपेटीत असलेली काडी काडय़ापेटीच्या तांबडय़ा फॉस्फरस असलेल्या पृष्ठभागावर घासून पेटवली जाई. कोणतेही दोन पृष्ठभाग एकमेकांना घासले असता होणाऱ्या रोधाला घर्षण म्हणतात. गारगोटी एकमेकांवर घासून लागलेल्या अग्नीच्या शोधामुळे मानवी उत्क्रांतीला नवी दिशा व वेग मिळाला.

घर्षण आज आपल्या जीवनाचा अभिन्न घटक आहे. साध्या चालण्याची क्रियासुद्धा आपण घर्षणाशिवाय करू शकत नाही. पटत नाही? मग गुळगुळीत किंवा ओल्या फरशीवर चालून काय होते? आजमावून बघा!

इतकेच कशाला रस्त्यावर दुचाकी, चारचाकी पावसाळ्यात जपून चालवावी लागते याचा प्रत्यय आपल्याला येतो. गाडी चालवताना गाडीचे चाक व रस्ता यांत घर्षण असते व गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी हे आवश्यक आहे. रस्ता ओला असताना पाण्यामुळे घर्षण अतिशय कमी होते व गाडी घसरण्याची संभाव्यता वाढते. असे होऊ  नये म्हणून गाडय़ांचे रबरी टायर हे खाचयुक्त बनवलेले असतात. या खाचा असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे. टायर गुळगुळीत झालेले असल्यास बदलावे. गाडी चालण्यासाठी घर्षण आवश्यक आहे तसेच ती थांबविण्याकरिता ब्रेक लावण्याच्या क्रियेत देखील घर्षणाचाच उपयोग होतो.

अंगणात पावसाळ्यात शेवाळे वाढल्याने फरशी घसरडी होते ती स्वच्छ करण्यासाठी चुन्याचा वापर केला जातो. चुना व पाणी एकत्र येऊन उष्णता उत्सर्जित होते ज्याने शेवाळे नष्ट होते.

इतकेच कशाला घर्षण नसेल तर आपण पेन, पेन्सिल किंवा कोणतीही वस्तू हातात धरू शकणार नाही. कागदावर अक्षर उमटतात तेदेखील पेन/पेन्सिल व कागदामधील घर्षणामुळे. या घर्षणाचा सुयोग्य वापर केल्यास अक्षर छान वळणदार लिहिता येते. फळा व खडू येथेही घर्षणामुळे खडू झिजला जाऊन फळ्यावर अक्षर उमटते. घर्षणामुळेच खडू खूप लवकर झिजतो व त्यावर उपाय म्हणून ‘व्हाइट बोर्ड’ लोकप्रिय झाले. येथे खडूऐवजी मार्करचा वापर असल्याने खडूमुळे होणारा खडूच्या पावडरचा त्रास होत नाही. घर्षण कमी झाल्यामुळे आकृत्या काढताना अधिक काळजी घ्यावी लागते. खडूने फळ्यावर मुक्त हस्ताने अचूक आकृत्या सहज काढता येतात.

बर्फाळ प्रदेशात रस्त्यांवर बर्फ पडल्यावर अपघात घडू नये म्हणून वाळू पसरवण्यात येते. बर्फाळ रस्ते निसरडे असतात. वाळू टाकल्यास घर्षण वाढते व अपघात टाळले जातात. हा घर्षणाचा प्रकार केवळ स्थायी नव्हे तर प्रवाही पदार्थामध्ये देखील कार्यरत असतो. घर्षणामुळे घासल्या जाणाऱ्या वस्तूंची झीज होते. ही झीज टाळण्याकरिता वंगणाचा (ग्रीस) उपयोग होतो. पंखा, सायकलची चाके किंवा इतर मोटर्समध्ये बॉल बेअरिंगचा वापर केला जातो.