लग्नसोहळा हा आमंत्रितांसाठी जरी त्यानिमित्ताने मेजवानीतील सुग्रास जेवणाचा आनंद घेण्याचा क्षण असला तरी वधुवरांसाठी तो सुंदर आणि आकर्षक दिसण्याचा दिवस. हा दिन खास व्हावा म्हणून अनेक तरुण-तरुणी महिनाभर आधीच विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत. लग्नसोहळ्यासाठी फक्त पार्लरमध्ये जाऊन महागडय़ा ट्रीटमेंट करणं इतकंच पुरेसं नाही. लग्नासाठी खरेदी करण्यात आलेल्या पोशाखात आकर्षक व रुबाबदार दिसण्यासाठी अनेकजण आता व्यायाम व उत्तम आहारावरही लक्ष केंद्रित करत आहेत. यासाठी जिम ट्रेनर आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घेतला जात आहे.

लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत भावुक क्षण असतो. त्यामुळे या काळात आपल्या शारीरिक स्वास्थ्याइतकंच मानसिक स्वास्थ्यही महत्त्वाचं आहे. माझं वजन जास्त नव्हतं तरीही मी आहारातील पथ्यावर भर दिला. मला शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी व्यायामाची आधीपासूनच आवड होती, पण लग्न ठरल्यानंतरच्या काळात मी याबाबत जास्त सजग झाले. याचं कारण विवाहापर्यंतचा काळ मुलीसाठी फार महत्त्वाचा असतो. घरात अनेक कामांमध्ये तुम्ही व्यस्त असता, पाहुणेमंडळी येतात, त्यांच्याकडे तुमचंही येणंजाणं होतं, केळवणासारखे समारंभ असतात, यात प्रचंड गोड, अरबटचरबट खाण होतं. त्यामुळे याबाबत मी विशेष सजग असायचे. लग्नाच्या धावपळीत तुमच्या तब्येतीकडे लक्ष देणं हे तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठीही तितकंच गरजेचं असतं कारण या काळात तुम्ही आणि तुमचं कुटुंब फार भावुक क्षण अनुभवत असतात. त्यामुळे तुम्ही आहार आणि व्यायाम याकडे उत्तम लक्ष दिलं पाहिजे. शरीरात पाण्याचं प्रमाण उत्तम ठेवण्यासाठी कटाक्षाने पाणी पित राहिलं पाहिजे.

लग्नानंतर बंगरूळला स्थायिक झालेल्या विदिशा हेडगेने वजन कमी करण्यासाठीच जिम ट्रेनरची मदत घेतली होती. आहाराइतकाच तिला व्यायामावरही भर द्यायचा होता. लग्नातील आनंदाच्या क्षणी सुंदर दिसण्यासोबतच शारीरिक स्वास्थ्य हा मुद्दाही विदिशाला महत्त्वाचा वाटतो. लग्न झाल्यानंतरही ती चालण्यावर आणि आरोग्यदायी आहारावर भर देते. विदिशा म्हणते, सुरुवातीला मला जेव्हा लग्नासाठी वजन कमी करायचं होतं त्या वेळी मी अनेक संकेतस्थळांवर याबाबत वाचन करायचे. चालण्याचा व्यायामही करायला मी सुरुवात केली होती, पण काही काळानंतर मी तज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरवले आणि याचा मला चांगला फायदा झाला.

याबाबत तज्ज्ञ मंडळींशी संवाद साधल्यावर याबाबत अनेक गैरसमजुती आणि वजन कमी करण्याच्या चुकीच्या पद्धती समोर आल्या. अनेक जण लग्नासाठी वजन कमी करायचे आहे म्हणून उपाशी राहणे किंवा अति व्यायाम करण्याचा पर्याय निवडतात जो चुकीचा असल्याचे तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे आहे. काही तरुणी कमी वेळात वजन कमी करण्याच्या किंवा सुंदर दिसण्याच्या नादात काही चुकीचे सौंदर्यउपचार करतात जे धोक्याचे ठरू शकतात. वजन कमी करण्याचा ट्रेंड हे फॅड आहे की यात शारीरिक स्वास्थ्य आणि पुढेही त्यानिमित्ताने स्वीकारल्या जाणाऱ्या सवयींचे पालन होते हा वादाचा मुद्दा आहे. याबाबत तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत.

आहारतज्ज्ञ डॉ. वैशाली जोशी यांच्या मते हे काही दिवसांचे फॅड आहे. ही तरुण मंडळी बरेचदा कमी वेळात जास्त वजन कमी करण्याच्या नादात चुकीच्या पद्धती अवलंबतात आणि त्याचे वाईट परिणाम संभवतात. लग्नासाठी वजन कमी करायला जेव्हा तरुण-तरुणी आहारतज्ज्ञांकडे जातात तेव्हा फार कमी वेळा त्यातील पथ्ये व व्यायाम याचे भविष्यकाळात पालन केले जाते. बरीचशी पथ्ये लग्नादिवशीच मोडली जातात. राहुल पाटील यांनी लग्नाआधीच्या डाएटमुळे का होईना तरुणांमध्ये शारीरिक स्वास्थाविषयी जागरूकता वाढते आहे आणि हे चांगले लक्षण असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे केवळ तात्पुरती पथ्ये आणि व्यायाम न करता त्याचा भविष्यातही उपयोग करून घेण्यासाठी आणि लग्नकार्यात सुंदर दिसण्यासाठी आहारावर नियंत्रण आणायला काय हरकत आहे. लग्नाआधी हा तुमच्यासाठी शरीरस्वास्थ्याचा मुहूर्त ठरू शकतो!

थोडं खा, पण चांगलं खा..

* आरोग्य प्रशिक्षक आणि ऑबेसिटी एक्सपर्ट राहुल पाटील यांनी काही टिप्स दिल्या आहेत.

* लग्न ठरल्यावर जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा निर्णय घेता तेव्हा सर्वप्रथम तुम्ही एक ध्येय निश्चित केले पाहिजे. ज्यात तुम्हाला किती वजन कमी करायचे आहे, आणि किती दिवसांत कमी करायचे आहे हे ठरवावे लागेल.

* तुमचा निर्धार पक्का असला पाहिजे. कमी वेळात चुकीच्या पद्धतीने वजन कमी करण्याचे प्रयत्न करू नये. त्यामुळे त्रास होण्याची जास्त शक्यता आहे.

* एकदा निर्धार पक्का असला की नातेवाईक व पाहुणे मंडळी यांच्या आग्रहाला बळी पडण्याची वेळ येत नाही तुम्ही स्पष्ट शब्दांत नकार देऊ शकता. तुम्ही त्यामागचे कारण समजवल्यावर तेही आनंदाने तुमच्या निर्णयाचे स्वागत करतील.

* त्यानंतर तुम्ही जेवणातून ज्या पदार्थामुळे वजन वाढते त्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत. ज्यात गोड, दूध व दुग्धजन्य पदार्थ, तळलेले पदार्थ याचा प्रामुख्याने समावेश होतो. गोडपदार्थ बंद करताना फक्त साखरेचे पदार्थ बंद न करता ज्या पदार्थामुळे साखर तयार होते असे पदार्थ उदाहरणार्थ गहू किंवा धान्य जेवणातून हद्दपार केली पाहिजेत.

* हिरव्या भाज्यांचा जेवणात जास्तीतजास्त प्रमाणात समावेश केला पाहिजे. कोशिंबिरी, चणे, शेंगदाणे, कमी साखरयुक्त फळे उदा. सफरचंद यांचा समावेश केला पाहिजे.

* व्यायामावर भर देणे अत्यंत आवश्यक आहे. रोज सकाळी एक ते दोन तास चालणे हा व्यायाम केला पाहिजे.

* तरुणांचा कल हा जास्त वजन कमी करण्यापेक्षा जास्त तंदुरुस्त राहण्याकडे असतो. त्यामुळे त्यांनी विविध रंगांच्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत.

* पाण्याचे प्रमाण शरीरात संतुलित असणं आवश्यक असते. ते किमान एक ते दोन लिटर असावे. शीतपेये, ताक पूर्णपणे टाळावे.

नाजूक कायेशी खेळ नको..

त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. वृषाली सरवदे यांनी टिप्स दिल्या आहेत.

* अनेकदा तरुणी लग्नाआधी त्वचेवर उपचार करायला येतात. या उपाचारांसाठी एक विशिष्ट कालावधी आवश्यक असतो त्यामुळे तो पूर्वकालावधी राखूनच ते उपचार करावेत.

*  ब्युटिपार्लरमध्ये शक्यतो लग्नाच्या दिवसाआधी ‘फेशियल’ अथवा ‘व्ॉक्सिंग’ यासाठी जाऊ नये कारण त्याचे काही दुष्परिणाम झाले तर ते त्रासदायक ठरू शकते. तसेच अशा वेळी नवीन सौंदर्य उपाचार करणंही टाळावं.

*  याबाबतीत अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घेणं कधीही योग्यच आहे.