04 July 2020

News Flash

संधिवात

संधिवाताचा उपचार करताना वातदोषांचा विचार सर्वप्रथम करावा लागतो.

घरचा आयुर्वेद : वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक

ayurvijay7@gmail.com

कोणत्याही रोगाची चिकित्सा जाणून घेण्यापूर्वी त्या रोगाचे नीट निदान होणे आवश्यक ठरते. संधिवात आणि आमवात या दोन्ही रोगांमध्ये चिकित्सा भिन्न असते. त्यामुळे सांधेदुखी या दोनपैकी कशामुळे आहे हे जाणून घ्यावे लागते. त्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक ठरतो. वैद्य आपल्या अनुभवाने हा भेद जाणून त्यावर योग्य ती चिकित्सा करतात.

संधिवाताचा उपचार करताना वातदोषांचा विचार सर्वप्रथम करावा लागतो. तेल हे वातदोषावरील (म्हणजेच वातदोषामुळे शरीरात होणाऱ्या विविध विकृतीवरील) परम म्हणजेच श्रेष्ठ औषध आहे, असे वाग्भट या विद्वान आयुर्वेदीय ग्रंथकाराने सांगितले आहे. (आपण खूप थकल्यामुळे आपले पाय दुखत असतील तर पायांना तेलाने मालिश केल्यास पाय दुखणे थांबते असा आपणापैकी अनेकांचा अनुभव असेल.) तेव्हा संधिवातावरील सांधेदुखीवर बाहेरून तेल लावणे हा एक प्रमुख उपचार होय. यासाठी तिळाचे तेल अतिशय उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे तीळ तेलाचा बेस म्हणून उपयोग करून नारायण तेल, महानारायण तेल, वातनाशक तेल, अभ्यंग तेल, अश्वगंधादी तेल, निर्गुडी तेल अशा विविध तेलाचा उपयोग वेगवेगळ्या अवस्थांनुसार वैद्यकीय सल्लय़ाने करता येतो.

‘आमवात’ या व्याधीमध्ये ज्यामध्ये सांध्याच्या ठिकाणी सूज असते, गरमपणा असतो, विंचू चावल्यासारख्या वेदना असतात, थोडा ताप असतो, सांधे जखडून जातात. मात्र अशा तेलांचा उपयोग होत नाही, उलट त्रास वाढून वेदना वाढण्याची शक्यता असते. म्हणून सांधेदुखी ही संधीवातामुळे आहे की आमवतामुळे आहे हे समजणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच सांधेदुखी सुरू झाली की तेल लावा, असा सर्वसाधारण समज आढळतो, तो तितकासा बरोबर नाही हे वरच्या वर्णनावरून लक्षात आले असेलच. सांधेदुखीवर दुसरा महत्त्वाचा उपचार म्हणजे ‘शेक घेणे’ हा होय. यालाच स्वेदन असे म्हणतात. या स्वेदनामुळे म्हणजे शेकामुळे सांधेदुखीवर बराच आराम पडतो. हा शेक घेण्यासाठी गरम पाण्याची पिशवी, गरम कपडा, गरम पाणी, गरम वाळूची पुरचुंडी, विटेचा गरम केलेला तुकडा अशी विविध साधने वापरता येतात.

संधिवातात आणि आमवातात वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये फरक असतो. संधिवातात घ्यावयाचा शेक हा स्निग्ध शेक असतो. म्हणजे यामध्ये सांध्याच्या ठिकाणी तेल लावून त्यावर गरम पाणी ओतणे, गरम पाण्याच्या पिशवीने किंवा गरम कपडयाने शेकणे हे अभिप्रेत असते. आमवातात मात्र रुक्ष शेक अपेक्षित असतो. म्हणजे यामध्ये तेल न लावता शेक घ्यावा लागतो. शेकण्यासाठी वाळू गरम करून तिची पुरुचुंडी करून त्याचा शेक घ्यावा लागतो. विटेचा तुकडा गरम करून त्याचा शेक घ्यावा लागतो. बाहेरून तेल लावणे किंवा न लावणे, तसेच शेक घेणे हे सांधेदुखीवर बाह्य़ोपचार झाले. सांधेदुखीवर शरीरांतर्गतही काही उपचार करणे आवश्यक ठरते. यामध्ये ‘पंचकर्म’ या वैशिष्टय़पूर्ण आयुर्वेदीय चिकित्सेचा खूप उपयोग होतो. या पंचकर्मांपैकी ‘बस्ती’ हा उपक्रम या सांधेदुखीवर फायदेशीर ठरतो. या उपक्रमामध्ये गुद्द्वारावाटे काही औषधी तेल किंवा काढा आतल्या आतडय़ापर्यंत पोहोचवले जातात. वातदोषांच्या नियंत्रणासाठी याचा अप्रतिम उपयोग होतो असे आढळते. शरीराच्या कोणत्याही भागात मधूनमधून होणाऱ्या वेदना या बस्तीचिकित्सेमुळे कमी होतात. बस्तीप्रमाणेच ‘सौम्य विरेचन’ हे देखील बऱ्याचदा वातदोषामुळे होणाऱ्या व्याधींवर उपयुक्त ठरते. बस्ती, विरेचन हे चिकित्सा उपक्रम अर्थातच वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच करून घ्यावे.

पोटात घ्यावयाची औषधे

सांधेदुखीवर पोटामध्ये काही आयुर्वेदीय औषधांची अंमलबजावणी केल्यास त्याचाही फायदा दिसतो. ‘गुग्गुळ’ हा पदार्थ या संदर्भात अतिशय औषधी आहे. सांधेदुखी म्हटली की गुग्गुळाच्या गोळया घ्या, असे बरेच जण सांगतात. गुग्गुळ म्हणजे एका वनस्पतीचा निर्यास असून या गुग्गुळाची शुद्धी करून मगच तो औषधांमध्ये वापरावा लागतो. या गुग्गुळामध्ये इतर वेगवेगळी औषधी द्रव्ये घालून त्यांची विविध मिश्रणे बनवली जातात. या प्रत्येक मिश्रणाला वेगवेगळी नावे आहेत. योगराज गुग्गुळ, कैशोर गुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ इत्यादी. या प्रत्येक गुग्गुळाचा उपयोग सांधेदुखीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये नीट विचारपूर्वक करावा लागतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 1:38 am

Web Title: home ayurveda akp 94
Next Stories
1 ब्रोकोली बदाम सूप
2 शतकापूर्वीचे शिक्षण केंद्र सिडनी विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया
3 सजली दिवाळी घरोघरी
Just Now!
X