डॉ. सोनल आयक

मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ

जेवायला बसताय? भाजी थंड झाली? पटकन मायक्रोवेव उघडा — आत ठेवा ३० सेकंद — ‘बीप्’.. गरमागरम भाजी तयार! खरचं मायक्रोवेवमुळे जेवण  गरम करणंच नव्हे तर शिजवणंही सोपं आणि झटपट झालं आहे. पर्सी स्पेसर याने दुसऱ्या महायुद्धानंतर रडार तंत्रज्ञानाचा वापर करून रडाररेंज नावाचा पहिला मायक्रोवेव ओव्हन १९४६ मध्ये विकसित केला.

विद्युतवर चालणारे हे खोक्याच्या आकाराचे उपकरण कसे बरे काम करते हे आपण ह्या भागात समजून घेऊ. चुलीची जागा गॅस शेगडीने घेतली आणि आता ती जागा मायक्रोवेव्ह ओवन घेतयं. त्याचे मूळ कारण म्हणजे उष्णता अन्नापर्यंत पोहोचवण्याची पद्धत. चूल आणि गॅस ह्यात अन्न किंवा अन्नाचे भांडे आगीच्या संपर्कात येते. आगीतील उष्णता भांडे आणि अन्न गरम करते आणि अन्न शिजते. यात उष्णतेचे वहन कमी होऊन गरम भांडय़ाकडून भाजीच्या घन फोडींकडे आणि convection गरम भांडय़ांडकून द्रव पाण्याकडे ह्या दोन प्रमुख कारणांमूळे होते. ही उष्णता अन्नातील प्रत्येक अणू वा रेणूंना मिळते आणि ते शिजते. ह्या उलट मायक्रोवेव म्हणजे तरंग किंवा किरणे. ह्यातून होणाऱ्या उष्णता हस्तांतरणासाठी घन किंवा द्रव पदार्थाच्या माध्यमाची गरज नाही. ते हवेमार्फतही होते. अगदी जशी सूर्याची किरणे आपली त्वचा तप्त करतात तसेच ह्या प्रकाराला प्रारण (radiation) म्हणतात. आणि उष्णता हस्तांतरणाचा हा सर्वात प्रभावी प्रकार आहे. ह्या उलट गॅसवर भांडय़ात पाणी गरम करताना पहिल्यांदा उष्णता भांडं गरम करते, नंतर गरम भांडे पाणी उष्ण करते. ह्या प्रकारात उष्णता फुकट जाते आणि वेळही जास्त लागतो. परंतु मायक्रोवेव्हच्या  लहरी थेट पाण्यालाच गरम करतात ज्यामुळे ते प्रभावी ठरते आणि कमी वेळेत, कमी ऊर्जेत गरम होते. मायक्रोवेव्हची किरणे ही एका ठराविक वारंवारतेची (frequency 2.45 GHz) असतात. ही किरणे पाण्यासारखे ध्रुवीय रेणूंना ऊर्जा प्रदान करून उष्ण बनवितात आणि अन्न शिजते. मायक्रोवेव्हमुळे अन्नातील जीवनसत्त्वे किंवा पौष्टिकता कमी होत नाही. ह्या उलट गॅसपेक्षा कमी ऊर्जेच्या वापरामुळे वेळ कमी लागून जास्तीत जास्त जीवनसत्त्वे अन्नात राहण्यास मदत करतात. अन्न व्यवस्थित शिजवले तर मायक्रोवेव्ह हे फायदेशीरच आहे. आता आपण ह्यात वापरण्यात येणाऱ्या भांडय़ांविषयी चर्चा करू. मायक्रोवेव्हची ऊर्जा ध्रुवीय रेणूंना प्रभावित करते, त्यामुळे भांडी ही अध्रुवीय पदार्थाची वापरतात. म्हणून धातूची भांडी ह्यासाठी अपात्र ठरतात. विशिष्ट गुणवत्तेची काच, सिरॅमिक आणि काही प्रकारचे प्लॅस्टिक यांनी ही भांडी बनवितात. प्लॅस्टिकच्या अनेक प्रकारांपैकी पाचव्या वर्गातील पोलिप्रोपिलीन (polypropylene, pp) प्लॅस्टिक हे गुणधर्माने अधिक तापमान स्थिर आहे. त्यामुळे बरीच microwave – safe भांडी आणि डब्बे ह्या प्लॅस्टिकने बनवतात. परंतु इतर वर्गातील प्लॅस्टिकमध्ये जसे वर्ग दोन आणि चारचे पोलिइथिलीन(polyethylene, PE) आणि वर्ग तीनचे पोलिविनाईल क्लोराईड (polyvinyl chloride, PVC) उच्च तापमानावर स्थिर राहण्यासाठी थॅलेट (phthalate) किंवा बिसाफिनोल ए (bisphenol A, BPA) ही स्टेबिलाईझर (stabilizer) रसायने टाकण्यात येतात. त्यानुसार ते एका आणि अनेकदा वापरासाठी योग्य (microwave – safe) ठरतात. परंतु यापैकी इढअ रसायन स्वास्थ्यासाठी हानिकारक असून अशा भांडय़ांमध्ये ते नाही याची खात्री करून घ्या. तसेच असे डब्बे अनेक वापराने खरखरीत होतात वा रंग बदलू लागतात, वेळीच जागरूक होऊन त्यांचा वापर मायक्रोवेवसाठी बंद करणेच योग्य. म्हणूनच काच आणि सिरॅमिक हे मायक्रोवेव्ह मदाील वापरासाठी अतिउत्तम आहेत. मायक्रोवेव्ह मधील ही किरणे चुंबकाच्या मदतीने बनतात. ज्या वारंवारतेवर हे उपकरण चालते ते कमी प्रभावी असल्याने तसेच उपकरणात सर्व काळजी घेतली गेल्यामुळे ही किरणे आतच बंद राहतात. उपकरणाबाहेरील वातावरणावर त्याचा परिणाम होत नाही. अशा प्रकारे अनेक फायदे असणाऱ्या मायक्रोवेव्हने स्वयंपाकघरात एक नवे युगच आणले आहे.