News Flash

बहुउपयोगी मेण

पेट्रोलियम पदार्थापासून मिळविलेला ‘पॅराफिनवॅक्स’पासून मिळवले जाते.

घरातलं विज्ञान : मनीषा बायस-पुरभे, मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

सध्या बाजारात फळांचा बहर आलेला दिसतो. संत्रे, मोसंबी, सफरचंद अशी कितीतरी फळं मन मोहून घेतात. सफरचंद खरेदी करत असताना त्यांची चमक आपले लक्ष वेधून घेते. सफरचंदमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते व ते कमी होऊ  नये म्हणून निसर्गत: त्यावर मेणचट थर असतो. पण ती जास्त काळ टिकावीत व त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ  नये म्हणून त्यावर ‘एडिबल वॅक्स’चा थर दिला जातो. सफरचंदच नाही तर पेर, मोसंबी, संत्री यावरदेखील मेणाचा थर दिला जातो. अशी फळं घरी आणल्यानंतर काही सेकंद गरम पाण्यात ठेवून मग सुक्या सुती कपडय़ाने पुसून घ्यावीत किंवा चमचाभर लिंबाचा रस व त्यात खाण्याचा सोडा मिसळून तो पाण्यात मिसळावा आणि त्यात ही फळं चांगली चोळून धुवावीत. आपण व्हिनेगरदेखील पाण्यात घालून ही फळे स्वच्छ करू शकतो.

अनेक वनस्पतींच्या पाना, फळा, फुलांमध्ये निसर्गत: मेणचट थर असतो. उदा. खारफुटी, कमळाची पाने इत्यादी. या वनस्पती पाण्यात राहून देखील कुजत नाहीत. मेणाचा वापर आपण रोजच्या जीवनात खूप ठिकाणी करतो. जसे मेणबत्ती, मुलांचे रंगीत खडूत (क्रेयॉन्स), फर्निचरला चकाकी देणे, शूपॉलिश आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये लिपस्टिक, आयलायनर, आयब्रोपेन्सिल, सनस्क्रीनमध्ये देखील मेणाचा उपयोग केला जातो. पूर्वापार मेणबत्ती हे (टॅलोवॅक्स) प्राण्यांच्या शरीरातील चरबीपासून मिळालेले मेण किंवा बीवॅक्सपासून बनवले जात असे. पण सध्या पेट्रोलियम पदार्थापासून मिळविलेला ‘पॅराफिनवॅक्स’पासून मिळवले जाते.

मेण हा मेदात विरघळलेल्या (मेदस्नेही), सेंद्रिय हायड्रोकार्बन पदार्थ आहे, जो पाण्यात अद्रावणीय, कक्ष तापमानाला घन असतो व तापविल्यास (द्रवणांक ४० अंश सेल्सियस) वितळतो. मेणाचे विविध स्रोत म्हणजे वनस्पतीपासून, प्राणी, खनिज तसेच कृत्रिमरीत्या देखील मेण तयार केले जाते.

वनस्पतीपासून तयार केलेले मेण हे वनस्पती तेलाचे म्हणजेच सोयाबीन तेल, एरंडेल तेल, राइस ब्रॅन तेल इत्यादींचे हायड्रोजन वायू वापरून हायड्रोजनेशन केले जाते व त्यामुळे द्रवरूप तेलाचे रूपांतर घन संतृप्त पदार्थात केले जाते. तर प्राण्यांपासून मिळणारे मेण म्हणजे बीवॅक्स, टॅलोवॅक्स. बीवॅक्स हे मधमाशांपासून मिळवले जाते. कामकरी माश्यांमध्ये असलेल्या ग्रंथीद्वारे मधातील साखरेचे रूपांतर मेणात केले जाते. हे मेण कामकरी माश्या मऊ  होईस्तोवर चर्वण करतात व मग या मेणाचा उपयोग पोळं बनविण्यासाठी मधमाशी करते. रिकाम्या झालेल्या पोळ्याला उकळत्या पाण्यात वितळवून मेण मिळवले जाते. तर लेवोनीन मेण हे मेंढीसारख्या केसाळ प्राण्यांपासून मिळवले जाते. त्यांच्या शरीरावर असलेल्या ग्रंथीद्वारे त्वचेला तसेच केसांना जलरोधक तसेच ओलसर ठेवण्यासाठी मेद (मेण) स्रवले जाते.

‘पॅराफीन वॅक्स’ म्हणजेच पेट्रोलियम वॅक्स हे खनिजापासून म्हणजेच दगडी कोळसा, शेल ऑइलपासून मिळविले जाते. सध्याच्या वापरातील जास्तीत जास्त मेण हे ‘पॅराफीन वॅक्स’ होय. तर कृत्रिम मेण (सिंथेटिक्स वॅक्स) हे कमी रेणुभार असलेले इथिनचे बहुवारिक होय. अशा या विविध स्रोतांपासून मिळविलेल्या मेणाचे उपयोग देखील विविध आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 2:39 am

Web Title: home science market fruit akp 94
Next Stories
1 पालक- मका सँडविच
2 उत्तेजक सेवनाचा मार्ग बंदीकडे..
3 ‘रोझ’चेच डे
Just Now!
X