घराची सजावट करताना अनेक जण घराच्या दिवाणखान्यात किंवा शयनगृहात फोटोफ्रेम लावतात. यामध्ये बहुधा कौटुंबिक छायाचित्रे, एखादे निसर्गचित्र, देव-देवतांचे चित्र यांचा समावेश असतो. अनेकदा घरसजावटीसाठी एखादे पेंटिंगही फ्रेम करून लावले जाते. या चित्रफ्रेमची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे.

* सूर्यप्रकाश थेट फ्रेमवर पडेल, अशा पद्धतीने ती घराच्या भिंतीवर लावू नका. ज्या भिंतीवर सूयप्रकाश थेट येत नाही, तीच भिंत फोटोफ्रेम लावण्यासाठी निवडा.

* खिळय़ाला किंवा वॉल हूकला फोटोफ्रेम योग्य पद्धतीने अडकवा. अनेकदा व्यवस्थित न अडकवल्यामुळे ती खाली पडण्याची भीती असते.

* आठवडय़ातून एकदा तरी फोटोफ्रेमची साफसफाई करावी. धूळ, आद्र्रता यांमुळे ती खराब होण्याची शक्यता असते. ओल्या फडक्याने फ्रेम पुसली तरी चालेल. मात्र फडके अधिक ओले करू नका. फ्रेमच्या काचेतून पाणी आतमध्ये जाण्याची शक्यता असते.

* फ्रेमच्या चौकटीत धूळ अडकली असते, ती फडक्याने पुसता येत नाही. अशावेळी टूथब्रश किंवा एखाद्या लहान ब्रशचा वापर करा.

* फ्रेम जर लाकडी असेल तर ती चमकदार होण्यासाठी ऑरेंज ऑइल किंवा फ्रेंच पॉलिशचा वापर करा. फर्निचरच्या दुकानांमध्ये लाकडी फर्निचरसाठीचे पॉलिश मिळते. त्याचा वापर करून लाकडी फ्रेम चमकदार बनवू शकता, त्याशिवाय आद्र्रतेपासून लाकडाचे संरक्षण होते.

* सोनेरी मुलामा असलेली किंवा पेन्टेड फ्रेम असेल तर ती साफ करण्यासाठी कॉटन बॉल किंवा कॉटन बड्सचा वापर करा. आयोप्रोपिल अल्कोलचा वापर सफाई करण्यासाठी करा. त्यामुळे फ्रेमवर असलेली काजळी, धूळ, डाग निघून जातात.

* फ्रेमची काच मायक्रोफायबर कपडय़ाने पुसा. त्यामुळे काचेवर असलेली सूक्ष्म धूळ, चिकटपणा निघून जाईल. ग्लास क्लीनरचा वापरही काच पुसण्यासाठी करू शकता.