13 July 2020

News Flash

आयफोनचा नवा अवतार

दरवर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या वार्षिक परिषदेत ‘अ‍ॅपल’कडून कोणता नवा तंत्राविष्कार सादर होतोय, याकडे लक्ष लागलेले असतेच.

अमेरिकेसह जगभरातील तंत्रस्नेही आणि मोबाइलग्राहकांचे आकर्षण असलेल्या ‘अ‍ॅपल’ कंपनीची वार्षिक परिषद मंगळवारी रात्री पार पडली. दरवर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या वार्षिक परिषदेत ‘अ‍ॅपल’कडून कोणता नवा तंत्राविष्कार सादर होतोय, याकडे लक्ष लागलेले असतेच. पण त्याचबरोबर ‘आयफोन’ या अ‍ॅपलच्या सर्वात लोकप्रिय स्मार्टफोनची नवी आवृत्ती हेदेखील या परिषदेचे प्रमुख वैशिष्टय़ असते. त्यानुसार यंदाही ‘अ‍ॅपल’ने ‘आयफोन ११’ची घोषणा केली असून त्याच श्रेणीतील आणखी दोन स्मार्टफोनचीही घोषणा केली आहे. यापैकी ‘आयफोन ११’हा स्वस्त स्मार्टफोन असून तो भारतात अंदाजे ६४,९०० ते ७९,९०० रुपये या श्रेणीत उपलब्ध होणार आहे.

‘आयफोन ११’ची वैशिष्टय़े

  • ‘आयफोन ११’मध्ये ‘ए१३ बायोनिक’ हा प्रोसेसर असून त्यामध्ये एकूण सहा ‘कोअर’ आहेत. यापैकी चार ‘कोअर’ ऊर्जाबचतीसाठी असून दोन उच्च कामगिरीसाठी कार्यरत असतील. या प्रोसेसरचा एकूण वेग जाहीर करण्यात आला नसला तरी तो साधारण २.६ गिगाहार्ट्झ असण्याची शक्यता आहे.
  • या फोनची अंतर्गत स्टोअरेज क्षमता ६४,१२८ आणि २५६ जीबी अशा तीन श्रेणीत उपलब्ध आहे. आयफोन ११च्या रॅमबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी तो तीन जीबी रॅमने सुसज्ज असण्याची शक्यता आहे.
  • यातील ६.१ इंची एलसीडी स्क्रीन ‘फ्लूइड डिस्प्ले’ने समृद्ध आहे. फोनची बांधणी अ‍ॅल्युमिनियम चौकट आणि काच यांनी बनलेली असून ‘आयफोन ११’चे वजन १९४ ग्रॅम इतके असणार आहे.
  • आयफोन ११मध्ये मागील बाजूस प्रत्येकी १२ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे असून पुढील बाजूसही १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यांमध्ये ‘नाइट मोड’ विकसित करण्यात आला असल्याने रात्रीच्या अंधुक प्रकाशातही सुस्पष्ट छायाचित्रे काढता येऊ शकतात.
  • हा आयफोन अ‍ॅपलच्या ‘आयओएस १३’ या ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असेल.
  • ‘आयफोन ११’मध्ये डय़ुअल सिमची सुविधा असणार आहे. मात्र, यात पारंपरिक हेडफोन जॅक काढून ‘यूएसबी सी’ प्रकारच्या हेडफोन जॅकची सुविधा अ‍ॅपलने करून दिली आहे.
  • ‘आयफोन ११’ची बॅटरी आधीच्या आयफोनच्या तुलनेत एक तास अधिक कार्यरत राहू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. मात्र, त्यासोबत येणारा चार्जर आधीच्या फोनच्या तुलनेत संथ असणार आहे.

कुठे मिळणार?

भारतात ‘आयफोन ११’ २७ सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. अर्थात त्याची पूर्वनोंदणी काही दिवस आधीपासून सुरू केली जाईल. हा आयफोन तीन श्रेणींमध्ये उपलब्ध असून त्यापैकी ६४ जीबी अंतर्गत स्टोअरेज असलेला आयफोन ६४ हजार ९०० रुपयांना उपलब्ध असेल. तर १२८ आणि २५६ जीबी अंतर्गत स्टोअरेज असलेले आयफोन अनुक्रमे ६९,९०० व ७९,९०० रुपयांना उपलब्ध असतील.

‘आयपॅड’ २९ हजारांत

‘अ‍ॅपल’ने मंगळवारच्या परिषदेत ‘आयपॅड’ची नवी आवृत्तीही सादर केली. १०.२ इंचाचा रेटिना डिस्प्ले, अ‍ॅपल पेन्सिल आणि स्मार्ट कीबोर्ड सपोर्ट ही या आयपॅडची वैशिष्टय़े आहेत. अ‍ॅपलने आयपॅडचा डिस्प्ले वाढवल्यामुळे कलाक्षेत्रातील मंडळींना हे उपकरण अधिक उपयुक्त ठरणार आहे. हा आयपॅड भारतात २९,९०० रुपयांना उपलब्ध असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 3:10 am

Web Title: new version iphone akp 94
Next Stories
1 नवलाई
2 कबड्डीतील बंधुभाव!
3 चिकन डोनट
Just Now!
X