|| सुप्रिया दाबके

नेयमारची ‘बर्थडे पार्टी’ आणि पांढरा रंग

पॅरिस सेंट जर्मेन संघाकडून खेळणारा ब्राझीलचा अव्वल फुटबॉलपटू नेयमारची प्रत्येक गोष्ट ही प्रसारमाध्यमांसाठी चर्चेचा विषय असते. नेयमार मैदानावर तर चमकत असतोच पण मैदानाबाहेरही त्याच्या ‘स्टायलिश’ राहणीसाठी जगप्रसिद्ध आहे. नेयमारने नुकताच त्याचा २८ वा वाढदिवस साजरा केला. मात्र या वाढदिवसाचे वैशिष्टय़ होते ते म्हणजे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याने पांढरा रंग घालून यायचे. स्वत: नेयमारने घातलेला पांढरा सूट लक्ष वेधून घेत होताच. पण त्याच्या विनंतीला मान देऊन पॅरिस सेंट जर्मेन संघातील त्याचे संघ सहकारीदेखील पांढरे कपडे घालून आले होते.

देवाचा धावा

नमस्कार हा देवाकडे पाहून कुठेही करावा. क्रिकेटचे मैदानही त्याला अपवाद नाही. सचिन तेंडुलकर जेव्हा शतक झळकावत असे तेव्हा आकाशाकडे (जणू देवाचेच आभार मानत) पाहात मान उंचावायचा. नेमकी तीच आठवण भारताचा सर्वोत्तम युवा क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालने करून दिली. युवा विश्वचषकाच्या (१९ वर्षांखालील) अंतिम फेरीत भारताचा संघ पराभवाच्या छायेत असताना यशस्वीने असाच मैदानातून देवाचा धावा केला. सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण करण्यासाठी उभा असलेल्या यशस्वीने आकाशाकडे (म्हणजेच देवाकडे) पाहात हात जोडले आणि प्रार्थना केली. नेमके हे दृश्य कॅमेऱ्याने अचूक टिपले.

सिडनी आणि सचिनचे  जिवाभावाचे नाते

सचिन तेंडुलकरने जगभरातील क्रिकेटची मैदाने गाजवली आहेत. मात्र सिडनी क्रिकेटचे मैदान हे सचिनसाठी नेहमीच विशेष राहिले आहे. ऑस्ट्रेलियात सिडनी क्रिकेट मैदानावर सचिन फलंदाजीला आला की ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनाही धाकधूक वाटायची. कारण सिडनीवर मोठी खेळी केल्याशिवाय सचिन तंबूत परतणार नाही हे जणू यजमानांना ठाऊकच असायचे. सचिन या आठवणी विसरणे शक्यच नाही. कारण नुकतीच सिडनी मैदानाला दिलेल्या भेटीत सचिनने खेळाडूंच्या ड्रेसिंगरूममधील त्याचा आवडता ‘कोपरा’ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. सचिन आणि सिडनी हे नाते किती जिवाभावाचे आहे हे त्यावरून कळते.

फेडरर, नदाल एकत्र

स्वित्र्झलडचा रॉजर फेडरर, सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि स्पेनचा राफेल नदाल यांच्यात भले टेनिसच्या मैदानावर सर्वाधिक ग्रॅँडस्लॅम पटकावण्यासाठी चुरस असेल. मात्र जगभरात जिथे मदतनिधी सामने असतात तेव्हा हे त्रिमूर्ती तिथे आवर्जून उपस्थित असतात. नुकतेच दक्षिण आफ्रिकेत एका मदतनिधी सामन्यासाठी फेडरर आणि नदाल पोहचले. त्यावेळेस झालेल्या सामन्याला टेनिस इतिहासातील सर्वाधिक प्रेक्षकसंख्या उपस्थित होती. माणूस म्हणूनही वेळोवेळी आपण किती मोठे आहोत हेच फेडरर, जोकोव्हिच आणि नदाल यांनी सिद्ध केले आहे.

रोनाल्डोला प्रेयसीकडून ‘मर्सिडिझ’

वाढदिवसाची भेट ही मोठय़ा व्यक्तींमध्ये मोठी असते हे वेगळे सांगायला नको. हे नमूद करण्याचे कारण म्हणजे फुटबॉल जगतातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो. रोनाल्डोने नुकताच त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. मात्र हा वाढदिवस त्याच्यासाठी आश्र्चयाचा धक्का देणारा होता. कारण त्याच्या प्रेयसीकडून त्याला चक्क ‘मर्सिडिझ’ ही आलिशान गाडी भेट मिळाली. ‘मर्सिडिझ ब्राबस ८०० वाईडस्टार’ ही सर्वात महागडी गाडी भेट मिळाल्यानंतर झालेला आनंद रोनाल्डोने या गाडीसोबतचा व्हिडीओ समाजमाध्यमावरून प्रसिद्ध करून व्यक्त केला. रोनाल्डोच्या गाडय़ांच्या ताफ्यात आलिशान सेडान गाडय़ा आणि मर्सिडिझ गाडय़ाही आहेत. मात्र प्रेयसीकडून मिळालेली गाडी ही सर्वात महागडी गाडी ठरली आहे.