ज्योती चौधरी-मलिक

साहित्य :

पाव कप मूगडाळ, पाव कप चणाडाळ, पाव कप तूरडाळ, पाव कप मसूरडाळ, पाव कप उडीदडाळ, बारीक चिरलेला कांदा दोन कप, बारीक चिरलेला टोमॅटो दोन कप, ७/८ लसूण पाकळ्या, १ इंच आलं, , ४-५ हिरव्या मिरच्या (लहान तुकडे केलेल्या), बारीक किसलेलं ओलं खोबरं पाव कप , १ टीस्पून मोहरी, २ टीस्पून जिरे, २ टीस्पून हिंग, २ टीस्पून लाल मिरची पूड, ७-८ मेथी दाणे, २ टीस्पून सांबार मसाला,  मीठ चवीपुरते, १ चमचा चाट मसाला, पाव कप तेल, १ चमचा गरम मसाला पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप, कढीपत्त्याची ८-१० पाने.

कृती :

पाचही डाळी एकत्र करून धुऊन घ्या आणि किमान अर्धा तास तरी पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर डाळी शिजवून घ्या. डाळी शिजल्यावर घोटून घ्या आणि फोडणीची तयारी करा.

तेल चांगले तापले की त्यात मोहरी टाका. एकीकडे आलं-लसूण भरडसर कुटून घ्या. मोहरी तडतडल्यावर हिरवी मिरची, जिरे, मेथी दाणे, कढीपत्ता, वाटलेलं आलं-लसूण घाला. शेवटी हिंग घाला. आता कांदा टाकून चांगला परतून घ्या. त्यानंतर टोमॅटो टाकून पुन्हा परतून घ्या.

कांदा टोमॅटो नीट परतून झाले की त्यात हळद, लाल मिरची पूड, मीठ आणि चाट आणि सांबार मसाला घाला. आता त्यात घोटलेलं डाळीचं मिश्रण घाला. सगळं नीट ढवळून घ्या. गरम पाणी थोडं थोडं घाला. आपल्या आवडीनुसार किती घट्ट किंवा पातळ डाळ हवी आहे त्यानुसार पाणी घालावे. यानंतर ओलं खोबरं घालून नीट हलवून घ्या. एक उकळी फुटली की, आमटीत गरम मसाला घाला. झाकण ठेवून थोडं उकळू द्या. शेवटी कोथिंबीर घाला. पौष्टिक पंचमेळी डाळ तयार झाली. ही डाळ भातासोबत छान लागतेच, पण भाकरी-चपातीसोबतही तितकीच छान लागते.