|| सुहास जोशी

मुंबईच्या पर्यटनात काही ठरावीक ठिकाणीच फिरणं होतं. त्यामुळे भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड येथे जाण्याचा प्रसंग येत नाही. पण जुन्या मुंबईच्या अनेक खुणा या ठिकाणी अजूनही जिवंत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे भेंडी बाजार. रमजानच नव्हे, तर एरव्ही देखील काही नावीन्यपूर्ण पदार्थाचा आस्वाद तिथे घेता येतो. याच भेंडी बाजारात मुंबईतलं सर्वात जुनं आइसक्रीमचं दुकान आहे. १८८७ साली सुरू झालेलं ‘ताज आइसक्रीम’ आजही आपली जुनी ओळख टिकवून आहे.

भेंडी बाजारात सध्या जोरदार पुनर्विकास सुरू आहे. त्याच ठिकाणी हे ताज आहे. याचं वैशिष्टय़ म्हणजे आजही हे आइसक्रीम पॉटमध्येच केलं जातं.

लिची, सीताफळ, पेरू, अननस, स्ट्रॉबेरी अशा फळांच्या स्वादाची तसेच चॉकलेटचा वापर असणारी मोजकीच अशी यादी यांच्याकडे आहे. तुम्ही आइसक्रीमप्रेमी असाल तर केवळ एकच कप खाऊन समाधान होणार नाही. त्याची चव भन्नाट आहे. साधे छोटेसे असे हे दुकान आजही गजबजलेले असते.