आजारांचे कुतूहल : -डॉ. अविनाश भोंडवे

पुरुषांचेही स्त्रियांप्रमाणे काही विशेष आजार असतात. त्यात मोठय़ा प्रमाणात आढळणारा आजार म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीची वाढ. यालाच ‘बीनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लाझिया’ किंवा बी.पी.एच. म्हणतात. वयाच्या पन्नाशीनंतर बहुसंख्य पुरुषांना हा त्रास होतो.

मूत्राशयाची थैली (युरिनरी ब्लॅडर) आणि बाह्यमूत्रमार्ग (युरेथ्रा) यांच्या मध्यभागी ही ग्रंथी असते. अक्रोडाच्या आकाराची पण त्यापेक्षा मऊ अशा या ग्रंथीचे वजन पंचवीस ग्रॅम असते आणि तिला तीन पाळे (लोब्ज) असतात. मूत्राशयाच्या मुखाजवळ वेढा घातलेल्या स्थितीतली ही ग्रंथी वृषणांना दोन नलिकांच्या योगे जोडलेली असते. वृषणांमध्ये तयार होणारे पुरुषांचे शुक्राणू प्रोस्टेट ग्रंथीकडे येतात. प्रोस्टेटमध्ये तयार होणारा एक दाट द्राव शुक्राणूंसोबत मिसळून वीर्य बनते.

स्त्रियांना त्यांची मासिक पाळी बंद झाल्यावर जशी रजोनिवृत्ती (मेनोपॉज) येते, त्याप्रमाणे पुरुषांमधील जननक्षमता कमी होते, त्याला अँड्रोपॉज असं म्हणतात. पुरुषांना साधारणपणे वयाच्या पन्नाशी-साठीच्या दरम्यान अँड्रोपॉज येतो. या काळात प्रोस्टेट ग्रंथीचा आकारमान वाढते, ती कडक बनू लागते. काही व्यक्तींमध्ये २५ ग्रॅम वजनाच्या प्रोस्टेट ग्रंथीचे वजन वाढून ते २५० ते ६५० ग्रॅम होते. आकारमान वाढल्यावर मूत्राशयाचे मुख आवळले जाऊन मूत्रविसर्जन अवघड आणि त्रासदायक होते.

कुणाला होतो?

  •  पन्नाशीतील ५० टक्के आणि वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या ९० टक्के पुरुषांना होतो.
  •  आनुवंशिक (ज्यांच्या वडिलांना, आजोबांना हा त्रास झालेला असतो. अशांना हा विकार होऊ शकतो.)
  •  लठ्ठ व्यक्तींना
  •  हृदयविकार आणि रक्ताभिसरणाचे आजार असलेल्यांना
  •  टाइप-२ मधुमेह असणाऱ्यांना
  • व्यायामाचा अभाव असणाऱ्यांमध्ये
  •  लैंगिक उद्दीपनाचा त्रास असणाऱ्या पुरुषांना

लक्षणे

  •  रात्री वारंवार लघवी होणे.
  •  दिवसभरात सतत लघवीची भावना होणे. थोडय़ा थोडय़ा वेळाने मूत्र विसर्जनासाठी जाणे.
  •  लघवी करताना सुरुवातीला अडथळा येऊन त्रास होणे.
  •  लघवीची क्रिया संपताना थेंब थेंब लघवी होणे.
  •  लघवीची धार कमी रुंदीची असणे आणि त्यात जोर नसणे.
  •  लघवीची भावना झाल्यावर तिच्यावर ताबा ठेवता न येणे आणि वेळप्रसंगी कपडय़ात थेंब थेंब लघवी होणे.

निदान – मूत्रविसर्जन करताना होणाऱ्या त्रासाचे रुग्णाने केलेले विवेचन ऐकून डॉक्टरांना या आजाराचा संशय येतो. त्यानंतर डॉक्टर हातात ग्लोव्हज घालून असा त्रास असलेल्या रुग्णाच्या गुद्द्वारात उजव्या हाताची तर्जनी घालून प्रोस्टेट वाढली असल्याची चाचपणी करतात. अल्ट्रासाऊंड तपासणीत या ग्रंथीची वाढ झाल्याचे कळते आणि तिचे आकारमान किती झाले आहे आणि वजन कितपत आहे याची माहिती मिळते. रुग्णाची मूत्रचिकित्सा करून लघवीत जंतूसंसर्ग झाला आहे का हे पाहिले जाते. रक्ताच्या तपासणीमध्ये पीएसए (प्रोस्टेट स्पेसिफिक अ‍ॅण्टिजेन) कितपत आहे ते पहिले जाते. यातून प्रोस्टेटच्या कर्करोगाचे निदान होते.

उपचार : यात अल्फ्युझोसिन, टॅम्स्युलोसिन अशी अल्फा ब्लॉकर्स गटाची औषधे, फिनेस्टेराइड, डय़ुटेस्टेराइड अशी ५-अल्फा रिडक्टेज इनहिबिटर्स गटातील औषधे, याशिवाय अ‍ॅण्टिकोलीनर्जिक तसेच फॉस्फोडायइस्टरेज-५ अशा गटातील औषधांचा वापर करून मूत्रविसर्जनावर ताबा मिळवता येतो.

काही रुग्णांमध्ये दुर्बिणीच्या साह्याने मूत्रमार्गातून (सिस्टोस्कोप) प्रोस्टेटची शस्त्रक्रिया करून (ट्रान्स युरेथरल रिसेक्शन ऑफ प्रोस्टेट- टीयुआरपी) त्याचे मधले पाळे काढले जाते. त्यामुळे मूत्राशयाच्या तोंडावरील पकड सैल होऊन मूत्रविसर्जन व्यवस्थित होऊ  लागते.

प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग : वाढत्या वयानुसार विशेषत: पन्नाशीनंतर पुरुषांनी प्रोस्टेट कर्करोगाचा धोका जास्त असतो. प्रोस्टेट कर्करोगाचे निदान आणि उपचार वेळीच झाल्यास तो बरा होतो. सत्तरीच्या नंतर ३१ ते ८३ टक्के पुरुषांना प्रोस्टेटचा कर्करोग होतो. प्रोस्टेट ग्रंथीमध्ये पीएसए (प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजेन) हे प्रथिन बनते. याचे प्रमाण रक्तात जास्त होणे हे प्रोस्टेट कर्करोगाचे व्यवच्छेदक लक्षण असते.

प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे- लघवीतून रक्त जाणे, लघवी करताना वेदना, हाडं दुखणे, पाठीचा मणका, मांडीच्या हाडात वेदना होणे, पायांमध्ये अशक्तपणा येणे.

प्रोस्टेट कर्करोगाचे निदान- इतर तपासण्यांसमवेत पीएसए ही कर्करोगाची शक्यता पडताळण्यासाठी रक्ताची चाचणी केली जाते. याशिवाय प्रोस्टेटचा छोटा तुकडा एका साध्या शस्त्रक्रियेतून काढून त्याची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली जाते.