|| वैद्य विक्रांत जाधव

ऋतूनुसार घडणाऱ्या बदलांमुळे शरीरस्थ अग्नी मंद होऊन अपथ्य पदार्थांचे सेवन झाल्यास व्याधी निश्चितच वाढतो हा अनेकांचा अनुभव. पावसाळा सुरू होत असताना उन्हाळ्यातील आहार-विहार हळूहळू कमी करावा आणि पावसाळ्याच्या ऋतूची लक्षणे स्पष्ट झाल्यानंतर वर्षां ऋतूचा आहार करावा. पावसाळ्याच्या सुरुवातीला थंड पदार्थ, तेलकट, गोड खाणे या उन्हाळ्यातील सवयी कमी करणे अत्यंत आवश्यक ठरते. पाऊस पडल्यानंतर शरीरातील वातदोषाचा प्रकोप होतो, अग्नी मंद होतो. अशावेळी वातवृद्धी करणारे पदार्थ खाल्ल्यास व्याधी निर्माण होतात.

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

विशेष आहार

पावसाळ्यामध्ये केवळ दोन वेळचे जेवण घ्यावे.(सध्या हा प्रकार इंटरमिडेट डाईटिंगमध्ये मोडतो ) सतत खाणे, खाण्यावर खाणे, दोन जेवणाच्या मध्ये खाणे या गोष्टी टाळणे आवश्यक आहे. दोन जेवणांमध्ये काहीही सेवन न केल्यास भूक उत्तम प्रकारे लागते. पावसाळ्यात मध्येच खूप भूक लागल्यास लिंबाचे सरबत आल्याचा रस टाकून घ्यावे. या ऋतूमध्ये तांदळाची पेज धने, जिरे, आलं, कोथिंबीर टाकून सेवन करावी. ज्या व्यक्तींना शरीर जड वाटते, त्यांनी ही पेजच भोजनात घ्यावी. रूची निर्माण होऊन शरीरबळ वाढते. पावसाळ्यात गोड पदार्थ थोडय़ा प्रमाणात सेवन करण्यास हरकत नाही. नारळाच्या वडय़ा, हरिद्रखंड, कोहळा पाक, पेठा या पदार्थाचा अल्प प्रमाणात आस्वाद घ्यावा. तांदळाचे उकडलेले मोदक पावसाळ्यातील रुचीप्रद शक्तीदायक ‘स्वीट डिश’ असून गणपतीच्या दिवसाची वाट न पाहता एरवीही खावे. पावसाळ्यामध्ये गुळाचा उपयोग अती प्रमाणात केल्यास लाभ होतो.

ज्वारीचे उकडलेले पदार्थसुद्धा सेवनात असावे. भाजणीच्या थालीपिठाच्या सेवनाचे योग्य दिवस पावसाळ्याचेच. विविध प्रकारच्या भाजण्या जिरे, आले, कांद्यासह सेवन कराव्यात. कोरडय़ा पदार्थावर भर देताना तात्पुरते चटपटीत असलेले पदार्थ टाळावेत. पावसाळ्यात मुगाचे व उडदाचे कढण तुपासह घ्यावे. मुगाचे व उडदाचे पापड भाजून खावेत. तळलेले पापड किंवा मैद्याचे पदार्थ टाळावे.

पचनशक्ती उत्तम राहण्यासाठी मध व चांगले उकळलेले पाणी सेवन करायला काही शास्त्रकारांनी सांगितले आहे. मध चाटून त्यावर उकळून थंड केलेले पाणी किंवा मध व पाणी यांचा काढा करून सेवन करावे. कुळथाचं लसूण घातलेलं पिठलं कोकणात प्रसिद्ध असलं तरी महाराष्ट्रातील इतर ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींनाही आवडते आणि शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. विशेषत: लघवीच्या सर्व प्रकारच्या तक्रारींवर हे औषधी उत्तर आहे. कुळीथ व उडदाचे सूप किंवा त्यांचा इतर भाज्यांमध्ये उपयोग पावसाळ्यात लाभदायक ठरतो. साठवलेले तांदूळ प्रत्येक घरात असावेत. पचनाचे त्रास तसेच इतर त्रास झाल्यास त्या रुग्णाला तांदळाचे सैंधव जीरेयुक्त सूप (पेज) हा उत्तम आहार ठरतो. त्याच तांदळाचे नियमित सेवन केले तर खूपच फायदा होतो. पथ्यकर भाज्यांचे सूप, तसेच टोमॅटोचे जिरे, आले टाकून तुपाची फोडणी दिलेले सूप उपयुक्त ठरते. बीटाचा उपयोग गर्भिणी, रक्त कमी असणाऱ्या व्यक्तींनी नियमित करावा. आवळ्याचा व कैरीचा मुरंबा भूक असताना घ्यावा. विशेषकरून मुलांना चपातीला लावून, रोल करून आग्रहाने खाण्यास द्यावा. लिंबू-चिंचेचा वापर योग्य प्रमाणात करावा. सुके खोबरे व तीळाची चटणी सर्व संधीवाताच्या रुग्णांसाठी, तसेच मधुमेहींसाठी उत्तम आहे. भोजनामध्ये लसूण, आल्याचं प्रमाण जास्त ठेवल्यास विकार कमी होण्यास सहाय्यक ठरते. पावसाळ्यातील पचनाच्या तक्रारी कमी करण्यासाठी पुदिना आणि हिंगाचा वापर पदार्थाचा वापर करावा.

कोथिंबीर, जिरे यांचा वापरही आहारात असावा. आयुर्वेद शास्त्रकारांनी पावसाळ्यात मिठाऐवजी सैंधवचा वापर करण्याचा आग्रह केला आहे. हिंग व काळी मिरी जास्त वापरल्याने पोटाच्या तक्रारी निर्माण होत नाही. सुक्या खोबऱ्याचा वापरही आहारात ठेवावा. फळांमध्ये द्राक्ष, फालसा, बोरं, कैरी यांचा उपयोग करावा.

दुग्धजन्य पदार्थाचा वापर करताना सुंठ किंवा आले आणि आल्याचा रस टाकून त्यात काळी मिरी, सैंधव घालून जेवणाच्या अगोदर सेवन केल्यास शरीरास्थ वात कमी होतो. ताक दुपारी सेवन करावे, तसेच ताकामध्ये काळी मिरी, आले, कोथिंबीर टाकून घ्यावे. दुधामुळे काहींचा कफ वाढत असल्याने दुधात लेंडी पिंपळी व सुंठ टाकून सेवन करावे. दुधाचे नासवलेले पदार्थ मात्र खाऊ  नयेत. दुधाबरोबर लोणी लावून भाजलेला पाव सेवन केल्यास हरकत नाही.

भाज्यांमध्ये पडवळ, भेंडी, वांगी, दोडके, गिलके यांचे सेवन अधिक करावे. दोन्ही प्रकारचे भोपळे आवश्य खावेत. कडधान्या मध्ये मुगाचा उपयोग जास्त प्रमाणात करावा. कडवे वाल,जुने वाल यांची उसळ, गहू, ज्वारी या धान्यांचा वापर जास्त असावा. लाल माठाची भाजी या ऋतूमध्ये सर्वोत्तम मानतात. त्यात क्षार अधिक असल्याने पावसाळ्यात भाजीचा उपयोग आयुर्वेदीयदृष्टय़ा उत्तम मानला आहे.  लसूणयुक्त लाल माठाची भाजी खाण्यास उत्तम. पडवळाची भाजी, तीळ व खोबऱ्याच्या वाटणाने भरलेली वांगी सेवन करण्यास लाभप्रद मानावी.

या ऋतूमध्ये संसर्गजन्य व्याधींची उत्पत्ती अधिक प्रमाणात होत असल्याने बाहेरचे अन्न खाऊ  नये. पावसाळ्यात शक्यतो मांसाहार पूर्णत: टाळावा.

Vikrantayur@gmail.com