थंडी जरा कमी होत असली तरी बाजारातली स्ट्रॉबेरीची लाली ओसरली नाही. स्ट्रॉबेरी नुसती खायला तर झक्कास लागतेच पण तिचं सॅलडही एकदम झक्कास लागतं. या सॅलडमध्ये मी वापरलं आहे, थोडं पनीर. तुम्ही त्याऐवजी केळी, सफरचंद काहीही वापरू शकता. अक्रोडाशिवायही तुम्ही आपल्या आवडीचा सुकामेवा वापरू शकता. या सॅलडमध्ये वापरले जाणारे ड्रेसिंगही निराळे आहे. बाल्सामिक व्हिनेगर हे इटालियन व्हिनेगर आहे. स्ट्रॉबेरीसोबत त्याची चव फार खुलून येते. हे व्हिनेगर बाजारात मिळेलच पण ते नाही मिळाले तर तुम्ही फक्त ब्राऊन व्हिनेगर आणि एक चमचा ब्राऊन शुगर वापरा. संत्र्याचा रसही या सॅलडला एक छान चव देईल.

  • साहित्य : १२५ ग्रॅम अक्रोड, २०० ग्रॅम मिक्स सॅलड ग्रीन्स, २५० ग्रॅम पनीर, १५० ग्रॅम स्ट्रॉबेरी, सॅलड ड्रेसिंग- २ काडय़ा कांद्याची पात, २ टीस्पून स्पायसी मस्टर्ड पेस्ट, २ टेबलस्पून स्ट्रॉबेरी व्हिनेगर, १ टेबलस्पून बलसेमिक व्हिनेगर, २ टेबलस्पून मध, २ टेबलस्पून ताजा संत्र्याचा रस, १२५ मिली एक्स्ट्रा वरजीन ऑलिव्ह ऑइल (४ व्यक्तींसाठी)

कृती : प्रथम ओव्हन १८० डि.से.ला प्रिहिट करून घ्यावे. बेकिंग शीटवर अक्रोड ठेवून ते छान कुरकुरीत होईस्तोवर ५ मिनिटांकरिता बेक करून घ्यावेत. थंड झाल्यावर त्याचे तुकडे करावेत.

ड्रेसिंग तयार करण्याकरिता  कांद्याची पात बारीक चिरून घ्यावी. एका बाऊलमध्ये कांद्याची पात, स्पायसी मस्टर्ड पेस्ट, स्ट्रॉबेरी व्हिनेगर व बल्सेमिक व्हिनेगर एकत्र करून घ्यावेत. त्यात मध, संत्र्याचा रस व ऑलिव्ह ऑइल घालून सॅलड एकत्र करून घ्यावे. पनीरचे तुकडे करून घ्यावेत, स्ट्रॉबेरी नीट धुऊन एका स्ट्रॉबेरीचे दोन असे प्रत्येकी काप करावेत. एका सॅलड बाऊलमध्ये मिक्स सॅलड ग्रीन्स व अर्धे ड्रेसिंग एकत्र करून घ्यावे. त्यात पनीर, स्ट्रॉबेरी व वॉलनटस घालावेत. त्यावर उरलेले ड्रेसिंग घालून एकत्र करून घ्यावे व सॅलड सव्‍‌र्ह करावे.

पोषणमूल्ये

  • कॅलरी : ४५३
  • प्रोटीन : ११ ग्रॅम
  • फॅट : ४२ ग्रॅम
  • फायबर : २ ग्रॅम कार्ब्स : १० ग्रॅम

 

शेफ नीलेश लिमये

nilesh@chefneel.com