05 August 2020

News Flash

मौजेसोबत शिकणंही..

विद्यार्थी स्वत: सहलींचे नियोजन करून मौजमजेसह शिक्षणाच्या कक्षा रुंदावत आहेत.

| January 15, 2020 01:00 am

देवेश गोंडाणे

बालपण आठवले की, आपल्याला आठवते ती शालेय सहल. लहानपणी शाळा मुलांना डबे घेऊ न जवळचा एखादा डोंगर, नदी, तलाव या ठिकाणी एका दिवसाची सहल घेऊ न जायचे. त्यावेळी मुले खेळून, बागडून, सहभोजनाचा आस्वाद घेऊन आनंदाने घरी परतायची. मात्र, काळाच्या ओघात सहलींचा ट्रेंड बदलत चालला आहे. महाविद्यालयांनी शैक्षणिक सहलींवर काही प्रमाणात बंदी लादली असली तरी विद्यार्थी स्वत: सहलींचे नियोजन करून मौजमजेसह शिक्षणाच्या कक्षा रुंदावत आहेत.

शाळा, महाविद्यालयांच्या सहली या केवळ सहली नसून त्या शैक्षणिक सहली आहेत. मात्र, या संकल्पनेला फाटा देत शाळा आणि महाविद्यालयांचा कल हा वॉटर पार्क आणि समुद्रकिनारे पाहण्याकडेच वळला आहे. यामुळे आता या सहली विद्यर्थ्यांच्या मौजमजेच्या होत चालल्या आहेत. त्यातून शैक्षणिक हा विषय दूर गेला असा आरोपही अनेकदा होताना दिसतो. मात्र, तरुणाईने मौजमजेसह शिक्षणाच्या कक्षा रुंदावण्यावर भर दिला आहे. एकविसाव्या शतकात शिक्षणाची अनेक द्वारं उघडली आहेत. यात मुक्त शिक्षणालाही महत्त्व वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थीही पुस्तकी किंवा शिक्षकांकडून मिळणाऱ्या ज्ञानावर अवलंबून न राहता स्वत: नवनवीन गोष्टी शोधण्यावर भर देताना दिसून येतात. याचेच प्रतीक म्हणजे महाविद्यालयांमधील शैक्षणिक सहलींच बदलते स्वरूप होय. मुळातच शैक्षणिक सहली पूर्वीपासून विविध ऐतिहासिक स्थळे, शैक्षणिक किंवा औद्योगिक संकुले, कारखाने, वस्तुसंग्रहालये, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे आदी ठिकाणी नेल्या जात होत्या. याबाबत विद्यार्थ्यांनाही उत्सुकता निर्माण होत असे. पुस्तकात वाचत असलेले स्थळ समोर पाहताना विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आपोआपच जागी होते. महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तर ऐतिहासिक स्थळांमधून प्रेरणा मिळायची. तर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना कारखान्यात कोणती वस्तू कशी बनते, हे पाहताना उत्सुकता निर्माण होत असे. अशा शैक्षणिक सहलींमधून मुलांच्या अभ्यासात आणि बुद्धीत अवांतर भर पडते. मात्र, यातही अनेक अडचणी निर्माण होत असत. सहलीमध्ये शिक्षकांची कमी असणारी संख्या. त्यात सगळया विद्यार्थ्यांना आवश्यक त्या प्रमाणात माहिती देण्यात असमर्थता राहायची. त्यातही शालेय सहलीमध्ये विद्यार्थ्यांवर शाळा, महाविद्यालयांच्या मर्यादा राहायच्या. मात्र, आज शाळा, महाविद्यालयांचा हा कल पूर्णपणे बदलला असून मौजमजा करण्यासह स्वत:ही ग्रुप तयार करून सहलींचे नियोजन करण्यावर भर राहिला आहे.

महाराष्ट्र ही ऐतिहासिक, सांस्कृतिक भूूमी आहे. या भूमीमध्ये अनेक राजे, संत, विचारवंत, वैज्ञानिक, लेखक घडले आहेत. अशा महाराष्ट्रात गडकिल्ले, पुरातन मंदिरे, तलाव, लेणी, ब्रिटिशकालीन वास्तू आदी मोठय़ा प्रमाणात आहेत. ऐतिहासिक स्थळांमधून प्रेरणा मिळते, इतिहास माहिती होतो किंबहुना ऐतिहासिक घटना विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोरून जातात. अशा शैक्षणिक सहलींमधून मुलांच्या अभ्यासात आणि बुद्धीत आणखी भर पडते. सहलींद्वारे  सवंगडय़ांसह पर्यटनाचा आनंद लुटता येतो. त्यामुळे सहल म्हटल्यावर मुलांमध्ये जास्तच आनंद असतो. सहलीतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव मिळतो. मुक्कामाच्या ठिकाणी सांस्कृतिक सादरीकरण केले जाते. त्यातून मुलांना आनंद मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये एकोपा वाढतो, जवळीक वाढते व त्यांच्या कलागुणांना सादरीकरणासाठी एक व्यासपीठही मिळते. यामुळे आता या सहली विद्यार्थ्यांच्या मौजमजेसह कलागुणांना वाव देणाऱ्या ठरत आहेत हे विशेष.

शैक्षणिक सहलींवर मर्यादा

शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांना विरंगुळा म्हणून वर्षांतून एकदा शैक्षणिक सहल काढण्यात येत असते. काळानुरूप शैक्षणिक सहलींचे बदलत जाणारे स्वरूप, त्यासाठी पालकांना सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड, विद्यार्थी सुरक्षितता अशा अनेक कारणांमुळे विद्यापीठांनी शैक्षणिक सहलीवर काही निर्बंध घातले आहेत. त्याचा फटका म्हणून महाविद्यालयांमधील सहलींचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर कमी झाले आहे. महाविद्यालयांमधील शैक्षणिक सहलींचे आपले एक वेगळे महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यलयांमध्ये शिक्षण घेताना केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर त्यासह प्रात्यक्षिक करता यावे हाही एक सहलींचा उद्देश. मात्र, गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचा कलही मौजमजेकडे वाढत गेल्याने सहलींमध्ये काही दुर्घटना घडत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. यामुळे विद्यापीठांनी सहलींवर बरेच निर्बंध लादले. त्याचा फटका म्हणून शैक्षणिक सहल हा प्रकारच आता महाविद्यालयांमधून लुप्त होत चालला आहे.शैक्षणिक सहलीला जायचे म्हटले विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सांभाळणे ही सोपी गोष्टी नाही. त्यामुळे छोटय़ाशा गोष्टींमुळे दुर्घटना घडतात. आज सहलींचे स्वरूप बदलत असले तरी ते अधिक जबाबदारीच्या वळणावर येऊन पोहोचले आहे.

परस्पर सहलींना विद्यार्थ्यांची पसंती

महाविद्यालयांनी सहलींवर निर्बंध लादले असले तरी विद्यार्थ्यांनी यावर उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे अनेक महाविद्यालयीन ग्रुप परस्पर सहली काढण्यावर विशेष भर देताना दिसतात. महाविद्यालयांकडून सहलींना परवानगी मिळत नसल्याने आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी या विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. हल्ली पालक वर्गानींही विद्यार्थ्यांना मोकळीक दिली आहे. त्यामुळे घरून सहलीची परवानगी मिळविणे सहज सोपे झाले आहे. यामुळेच विद्यार्थी डिसेंबर, जानेवारी महिन्यांमध्ये आपले वयक्तिक प्लॅन बनवून सहल काढण्याला अधिक महत्त्व देताना दिसून येतात.

प्रात्यक्षिक ज्ञानावर अधिक भर राहायला हवा. मात्र, तशा सहलीच आजकाल निघताना दिसत नाही. आम्हाला मजामौज करायची असते हे खरे आहे. मात्र, त्यासह ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यावर भर असतो. फक्त शैक्षणिक सहलींचा ट्रेड बदलला हे खरे.    – शुभम कोचे

शाळेमधील सहलींमध्ये अनेक मर्यादा राहायच्या. आता आम्हाला बंधन नकोत असे मुळीच नाही. मात्र, प्रत्येकाला स्वत:ची जबाबदारी ही असतेच. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी सहलीला जातात म्हणजे स्वतंत्र सुटतात असे मुळीच नाही. सहलीच्या माध्यमातून मनोरंजनासह विविध स्थळांना भेटी देण्यावरही आजच्या तरुणाईचा भर असतो हे विसरून चालणार नाही. – पूजा सूर्यवंशी

सहल हा महाविद्यालयीन जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. यातून एकमेकांना ओळखण्याची संधी मिळते. आचारविचारांची देवाणघेवाण होते. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यर्थ्यांसाठी या महत्त्वाच्या गोष्टी असतात.  – ईश्वर मुंडले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 1:00 am

Web Title: students picnic filled with games education and information zws 70
Next Stories
1 पेटटॉक : श्वानालाच पसंती, पण कोणत्या?
2 आम्ही बदललो : निव्वळ चेहऱ्यानं नाही, विचारांनी बदललो!
3 पूर्णब्रह्म : व्हेगन व्होल व्हीट बिस्कीट
Just Now!
X