मधुरिका पाटकर, टेबल टेनिसपटू

अलीकडे लहान मुलांपासून मोठय़ा व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात ताण जाणवतो. लहान मुलांना परीक्षा, शिकवण्या, स्पर्धा यांचा ताण जाणवत असतो. मोठय़ा व्यक्तींना एखादे ध्येय गाठण्याचे विचार येत असल्याने ताण येत असतो. माझ्या दृष्टीने प्रत्येकाच्या आयुष्यात काही प्रमाणात ताणाला स्थान असणे महत्त्वाचे ठरते. आयुष्यात ताण असल्याशिवाय जबाबदारीची जाणीव होणार नाही. मात्र हा ताण मध्यम स्वरूपाचा असल्यास सकारात्मक दृष्टिकोनातून ताणाचा विचार करता येतो. ताणाची तीव्रता जास्त असल्यास नकारात्मकता येण्याची शक्यता असते. कोणत्याही सामन्याच्या पूर्वी मला ताण जाणवत असतोच. निकालाची चिंता, खेळ कसा होईल याविषयी धास्ती असतेच. सामन्यांपूर्वी माध्यमात चर्चा असते. कुणीतरी खेळावर अपेक्षेने लक्ष ठेवून आहे. या सगळ्याचे दडपण जाणवते. या ताणावर मात करणे महत्त्वाचे असते. अशा वेळी ध्यानधारणा माझ्यासाठी ताणमुक्तीचे विशेष माध्यम आहे. ध्यानधारणेमुळे नकारात्मक विचारांपासून स्वत:ला परावृत्त करता येते. कोणत्याही व्यक्तीसाठी संवाद हा महत्त्वाचा घटक असतो. संवादामुळे विचारांची देवाणघेवाण होत असते. ताणमुक्तीसाठी मला संवाद महत्त्वाचा वाटतो. ताण जाणवत असल्यास मी कुटुंबीयांशी संवाद साधते. माझ्या नवऱ्याशी संपर्क साधून बोलते. एखाद्या सामन्याचे दडपण आल्यावर कुटुंबीयांशी केलेल्या संवादामुळे सकारात्मकता जाणवते. मला निसर्गात फेरफटका मारायला आवडतो. मात्र प्रत्येक वेळी ते शक्य नसल्याने ध्यानधारणा आणि संवाद हे ताणमुक्तीचे पर्याय मला आपलेसे वाटतात. सध्याच्या धावपळीच्या काळात ध्यानधारणा आणि योगा हेच ताणमुक्तीचे उत्तम पर्याय आहेत. या पर्यायांमुळे आपण स्वत:शी वैयक्तिरीत्या जोडले जातो. संवाद जसा इतरांशी महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे स्वत:शी संवादही फार महत्त्वाचा असतो. हा संवाद ताणमुक्तीसाठी साहाय्यक ठरू शकतो. मला सामन्यांच्यापूर्वी ताण असल्यावर या ताणावर मात करण्यासाठी अनेकदा कार्टून्स पाहात असते.