News Flash

‘त्या’ गोळ्यांपासून सावधान!

इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्हच्या या गोळीतील संप्रेरकांचे (होर्मोन्स) प्रमाण तुलनेने अधिक असते.

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी (स्त्री रोगतज्ज्ञ, पुणे)

गर्भधारणा टाळण्यासाठी ऐनवेळी घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांच्या, म्हणजेच ‘इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स’च्या जाहिराती अतिशय फसव्या असतात. त्यातील संदेशांमुळे संतती नियमनाचा सुरक्षित मार्ग म्हणूनच याकडे पाहिले जाऊ लागले आहे. कॅल्शियमच्या, रक्तवाढीच्या गोळ्यांचे काही दुष्परिणाम आहेत का, हे विचारणारी पिढी तुलनेने अधिक हानिकारक असलेल्या या गोळ्या मात्र कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय सर्रास घेते. या विरोधाभासाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

‘डॉक्टर, गेल्या २ ते ३ महिन्यांपासून पाळी अजिबात नियमित येत नाही. महिन्यातून कधीतरीच रक्तस्राव होतो. सारखी मळमळ, अशक्तपणा जाणवतो. खूप भीती वाटतेय. काय करू?’ पूर्वी रुग्णाने अशी तक्रार केली की आम्ही स्त्री-रोगतज्ज्ञ एकदम सावध व्हायचो. वेगवेगळ्या तपासण्या भराभर करायचो. हल्ली गेल्या काही वर्षांपासून मी रुग्णाला शांतपणे विचारते ‘इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स’ घेतल्या होत्या का? अपेक्षेप्रमाणे होकार येतोच. या गोळ्या सहा महिने किंवा वर्षांतून कधीतरी एखाद्या वेळी घेण्यासाठी असतात, पण रुग्णांना विचारलं की ते हमखास सांगतात, ३ ते ४ गोळ्या घेतल्या एक महिन्यात! अशा वेळी ‘कोणत्या डॉक्टरांना विचारून हा डोस घेतलात?’ असं विचारलं तर कोणालाही नाही विचारलं, असं उत्तर मिळतं.

इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह हे संतती नियमनासाठीचं औषध मुळीच नाही. नियमित शरीरसंबंध असलेल्या जोडप्यांसाठीही ते योग्य नाही. नेहमी निरोध वापरणाऱ्या जोडप्यांमध्ये कधीतरी सहा महिने ते एक वर्षांच्या काळात निरोध फाटल्याचे लक्षात आल्यानंतर अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये गर्भधारणा होऊ नये म्हणून ही गोळी असते. परंतु जाहिरातींमुळे दिशाभूल होऊन असुरक्षित शरीरसंबंधानंतर संभाव्य गर्भधारणा रोखण्यासाठी याचा हल्ली सर्रास वापर केला जातो.

एरव्ही डोक दुखतंय, पेन किलर घेऊ  का? म्हणून फोन करणारे रुग्ण या गोळ्या कोणत्याही वैद्यकीय सल्लय़ाशिवाय घेतात त्यावेळी आश्चर्य वाटते. नुकतेच लग्न झालेली जोडपी जेव्हा कुटुंबनियोजनाच्या बाबतीत सल्ला घ्यायला येतात तेव्हा तुलनेने सुरक्षित आणि कमी जोखमीचा मार्ग म्हणून गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा सल्ला आम्ही देतो. तेव्हा यातील बरीचशी जोडपी ‘त्या गोळ्या’ सोडून काहीही द्या असा आग्रह धरतात. परंतु हीच जोडपी कोणत्याही सल्ल्याशिवाय इमर्जन्सी गोळ्यांचा मुक्तहस्ते वापर केल्यानंतर होणाऱ्या त्रासाच्या तक्रारी घेऊन येतात. हे चित्र आता नवीन राहिलेले नाही.

दुसरा एक वर्ग अविवाहित जोडप्यांचा आहे. ही वस्तुस्थिती मान्य करायलाच हवी. या वर्गातील मुलींना ‘असुरक्षित संभोगानंतर फक्त एक गोळी तोंडात टाकायची’ हा फारच सुरक्षित उपाय वाटतो. पण याचे त्यांच्या मासिक पाळी आणि प्रजनन संस्थेवर होणारे दुष्परिणाम यांचा विचार करायची त्यांची तयारी दिसत नाही. अविवाहित पुरुषही अशा संबंधानंतर आपल्या जोडीदाराला या गोळ्या घेण्याचा सल्ला देतात. यातूनच एका महिन्यात तीन-चार, कधीकधी आठ गोळ्या घेतलेले रुग्णही दवाखान्यात येतात. यातील काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. काही रुग्णांमध्ये तरीही गर्भधारणा होऊन पुढे गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

दुष्परिणाम

इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्हच्या या गोळीतील संप्रेरकांचे (होर्मोन्स) प्रमाण तुलनेने अधिक असते. वैद्यकीय सल्लय़ाशिवाय कितीही प्रमाणात या गोळ्या घेतल्यास संप्रेरकांच्या प्रमाणात असंतुलन निर्माण होते. त्याचे अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. गर्भनिरोधक गोळ्यांच्या तुलनेने या गोळ्या दहा पट अधिक हानिकारक असतात.

गर्भनिरोधक गोळ्या सुरक्षित

* ऐनवेळी घेण्याच्या असुरक्षित गोळ्यांपेक्षा गर्भनिरोधक गोळ्या तुलनेने नक्कीच सुरक्षित आहेत. फक्त अल्पवयातील मधुमेह, अतिरक्तदाब, अतिलठ्ठपणा असे त्रास असलेल्या रुग्णांना या गोळ्या देता येत नाहीत. पाळी अनियमित असेल तर तीही नियमित होते. चुकून गर्भधारणा होण्याची शक्यता जवळपास नसते. जोडप्याचे लैंगिक आयुष्यही अधिक निकोप राहते. पाळी नियमित येत असल्यामुळे गोळ्या थांबवल्यावर गर्भधारणाही लगेच होते.

* या गोळ्या सुरू करण्यापूर्वी स्त्री रोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आम्ही खूप जास्त वर्षे या गोळ्या घेण्याचा सल्ला देत नाही. आजकालच्या तरुण पिढीचे करियरचे, परदेशी जाण्याचे बरेच बेत असतात. वडिलधाऱ्यांकडून गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापराबाबत योग्य सल्ला मिळत नाही. त्यामुळे अनेक तरुण जोडपी नको त्या गोळ्या घेतात आणि मग आगीतून फुफाटय़ात पडल्यासारखी त्यांची अवस्था होते. या गोळ्यांच्या वापराबाबत योग्य सल्ला देणे आवश्यक आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 2:03 am

Web Title: the side effects of emergency contraceptive pills
Next Stories
1 आजारांचे कुतूहल : थॅलेसेमिया
2 आरोग्यदायी आहार : बीट-नारळ बर्फी
3 योगस्नेह : अर्धचक्रासन
Just Now!
X