स्मार्टफोनचा वापर वाढू लागल्यानंतर आणि निश्चलनीकरणानंतर डिजिटल किंवा ऑनलाइन आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन मिळू लागल्याने आज जो तो अशा प्रकारच्या व्यवहारांना प्राधान्य देऊ लागला आहे. हे करताना वेळोवेळी तपशील नोंदवण्याची गरज लागू नये, यासाठी अनेक जण आपल्याला विश्वासार्ह वाटणाऱ्या संकेतस्थळांवर बँकांचे तपशील सर्रास ‘सेव्ह’ करून ठेवतात. ऑनलाइन व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय असल्याची त्यांची खात्री असते. मात्र, हा विश्वास अनेकदा त्यांचे आर्थिक नुकसान करून जातो. ग्राहकांच्या सायबर सुरक्षेशी संबंधित क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘नॉर्टन लाइफलॉक’ या कंपनीने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात ऑनलाइन आर्थिक व्यवहारांबाबत भारतीय नागरिक कमालीचे निष्काळजी किंवा बेपर्वा असल्याचे समोर येत आहे.

आर्थिक व्यवहाराशी निगडित सुरक्षितता धोक्यांसंबंधी ग्राहकांमध्ये असलेली जागरूकता आणि त्यामुळे त्यांच्या वर्तणुकीत होणारा बदल यासंदर्भात हे ऑनलाइन सर्वेक्षण तयार करण्यात आले आहे. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणारे १० पैकी ७ प्रतिसादकर्ते ग्राहक (६८ टक्के) विश्वासार्ह वेबसाइटवर त्यांचे व्यक्तिगत बँक तपशील सेव्ह करण्यास तयार असल्याचे यातून दिसून आले. घोटाळा आणि माहिती चोरी हा ऑनलाइन बँकिंगसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८३ टक्के भारतीयांचे मत आहे. मात्र, तब्बल ८० टक्के प्रतिसादकर्त्यांना अ‍ॅप आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून करण्यात येणारे ऑनलाइन व्यवहार सुरक्षित वाटतात. विशेषत: तरुण पिढीमध्ये हे प्रमाण ८६ टक्के इतके आहे. एखाद्या संकेतस्थळावरील ‘कुकीज’च्या माध्यमातून किंवा मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून गोळा केली जाणारी माहिती दलालांना विकून तिचा गैरवापर केला जाऊ शकतो, याची कल्पना असतानाही तरुणवर्गातील ८५ टक्के ग्राहक विश्वासार्ह संकेतस्थळांवर आपल्या बँक खात्याचे तपशील साठवून ठेवण्यात तयार असतात, असेही या सर्वेक्षणातून आढळले आहे.

CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

सॉफ्टवेअर अपडेट करा

सायबर गुन्हेगार बऱ्याचदा तुमच्या यंत्रणेत शिरकाव करण्यासाठी तुमच्या सॉफ्टवेअरमधील प्रचलित त्रुटींचा वापर करतात. या त्रुटी दूर करण्यामुळे तुम्ही सायबर गुन्ह्य़ाचे लक्ष्य ठरण्याची शक्यता कमी होण्यास मदत होते.

बनावट संकेतस्थळांपासून सावधान

तुम्हाला माहिती असलेल्या आणि विश्वासार्ह अथवा तुमच्या परिचितांकडून शिफारस केलेल्या वेबसाइट्सचाच वापर करा. अस्सल संकेतस्थळे आणि संशयास्पद/बोगस संकेतस्थळे यांच्यात फरक करणे अवघड होऊ  शकते आणि अनेकदा अस्सल वेबसाइट्सदेखील हॅक होऊ  शकतात.

ओळख चोरीपासून स्वरक्षण करा

ऑनलाइन खरेदी करत असताना अस्सल वेबसाइट्सचा वापर, सुरक्षित नेटवर्कचा वापर, कार्ड रीडर्स किंवा एटीएमशी जोडलेल्या उपकरणांबाबत खबरदारी आणि क्रेडिट कार्ड स्टेटमेंट्स आणि क्रेडट अहवालांचे काळजीपूर्वक वाचन हे ओळख चोरीपासून बचाव करण्याचे महत्त्वाचे मार्ग आहेत.

ऑनलाइन खरेदीचे व्यवहार सर्वाधिक

या अहवालातील निष्कर्षांनुसार, सुलभता आणि वेळेची बचत हे ऑनलाइन व्यवहार करण्यामागील दोन प्रमुख प्रेरक घटक असून सर्वाधिक ऑनलाइन आर्थिक व्यवहार हे खरेदीसाठी (९१ टक्के) आणि त्यापाठोपाठ बिल भरण्यासाठी (८८ टक्के) होतात. सर्वेक्षणातील अन्य कुठल्याही पिढय़ांमधील लोकांपेक्षा शहरांतील आजची पिढी सर्वाधिक संख्येने (९८ टक्के) ऑनलाइन आर्थिक व्यवहार करते. दुय्यम पातळीवरील शहरांमधील ग्राहक ऑनलाइन व्यवहारांचा सर्वाधिक लाभ घेताना आढळून आले असून खरेदी, वॉलेट ट्रान्स्फर आणि तिकीट बुकिंगच्या संदर्भात मेट्रो आणि पहिल्या पातळीवरील शहरांमधील ग्राहकांच्या तुलनेत ते आघाडीवर आहेत. डिजिटल वॉलेट्सच्या वापरात वाढ होताना दिसत असली तरी आजघडीला केवळ ६९ टक्के भारतीय प्रतिसादकर्ते वॉलेट ट्रान्स्फरचा वापर करत आहेत.

क्लिक करण्यापूर्वी विचार करा

फसवणुकीचे प्रयत्न अथवा संशयास्पद ऑफर्सबाबत काळजी बाळगा. अनोळखी स्रोताकडून आलेले ईमेल किंवा एसएमएसद्वारे आलेल्या लिंक किंवा अ‍ॅटेचमेंटवर लगेच क्लिक करू नका. या क्लिकद्वारे कदाचित तुम्ही अशा साइटवर पोहोचाल जिथे तुम्हाला व्यक्तिगत माहिती विचारली जाईल किंवा त्या साइटच्या माध्यमातून तुमच्या उपकरणात व्हायरस सोडला जाऊ शकतो.

सुरक्षित संकेतस्थळांचा वापर

तुम्ही ज्यावरून खरेदी करत आहात, त्या संकेतस्थळाचे यूआरएल ‘एचटीटीपीएस’ने सुरू होत आहे किंवा ब्राऊझरच्या पट्टीवर कुलूपबंद पॅडलॉक चिन्ह आहे अथवा हिरवा रंग आहे, याची खातरजमा करा. या चिन्हांचा अर्थ तुमची माहिती सुरक्षित (एनक्रिप्टेड) असून हॅकरला ती माहिती प्राप्त करणे अधिक कठीण आहे, असा असतो. तुम्ही बँकिंग व्यवहारांसाठी मोबाइल अ‍ॅपचा वापर करत असाल तर संबंधित अर्थसंस्थेच्या अधिकृत अ‍ॅप्सचाच वापर करण्याची काळजी घ्या.

सुरक्षित व्यवहारांसाठी हे करा मजबूत पासवर्ड ठेवा

सर्व संकेतस्थळे आणि अ‍ॅपवर सारख्याच पासवर्डचा वापर करू नका. पासवर्ड क्लिष्ट ठेवा. अक्षरे, क्रमांक आणि चिन्हांचा वापर करून संमिश्र पासवर्ड बनवा. क्लिष्ट पासवर्ड तयार करण्यासाठी ‘पासवर्ड मॅनेजर’चा वापर करा.