कुंडी म्हणजे झाडाचे घर. आपण जसे घर घेताना ते ऐसपैस, हवेशीर असल्याची खात्री करून घेतो, तशीच काळजी कुंडी घेतानाही घेतली पाहिजे. कारण पुढील काही वर्ष ते झाड त्यात राहणार, वाढणार आहे.

  • कुंडी शक्यतो मातीची असावी, पर्यावरणपूरक असावी. आपण ज्या माध्यमात झाडे वाढविणार आहोत त्या माध्यमात असंख्य प्रकारचे व अनंत सूक्ष्मजीव असतात. त्यांना इंग्रजीत मायक्रो-फ्लोरा असा शब्द आहे. यात जिवाणू (बॅक्टेरिया) ९०%, अ‍ॅक्टिनोमायटीस ९% व बुरशी १% प्रमाणात असते.
  • दोन प्रकारची कामे करतात. एक म्हणजे अन्नाचे स्थिरीकरण आणि दुसरे म्हणजे स्थिर अन्नसाठय़ामधून वनस्पतींच्या गरजेनुरूप पुरवठा करता येईल, अशा स्वरूपात त्याचे रूपांतर. अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण व रूपांतरण या दोन्ही गोष्टी आपल्याला मातीत सांभाळायच्या व वाढवायच्या आहेत.
  • आपण जी जैविक खते वनस्पतींना देतो ती खरेतर सूक्ष्म जिवाणूंसाठी असतात. हे जिवाणूच या खतांचे रूपांतर झाडांना खाता/शोषता येईल अशा स्वरूपात करतात. या जिवाणूंचा श्वासोच्छ्वास चालू असतो. त्यातील बहुतेक सर्व प्राणवायूवर जगतात. त्यांना ‘अ‍ॅरोबिक बॅक्टेरिया’ म्हणतात.
  • वातावरणाच्या दाबाने मातीच्या पृष्ठभागावरून त्यांना प्राणवायू जसा मिळतो तसाच तो मातीच्या कुंडीच्या सच्छिद्रतेमुळे सर्व बाजूंनी मिळतो. या जिवाणूंसाठी जास्त पाणी हानिकारक असते. या अतिरिक्त पाण्याचा निचरा मातीच्या सच्छिद्र कुंडीतून चांगला होतो. मातीमुळे योग्य ओलावा धरून ठेवला जातो. त्यामुळे आतील झाड लावण्याच्या माध्यमाचे तापमानही योग्य राहते.
  • झाडे लावण्याकरिता मातीच्या कुंडय़ा वापरणे शक्य नसल्यास प्लॅस्टिकच्या कुंडय़ा/बाटल्या/ डबे/ बरण्या इ. आपण वापरू शकतो, पण त्यांना अधिकाधिक भोके पाडून सच्छिद्रता आणणे आवश्यक आहे.
  • जाळीला कुंडीचा आकार देऊन त्याचाही वापर करता येईल. अगदी जुनी पोती, जीन्सच्या पँट्सही कापून आपण त्यांचा वापर कुंडीप्रमाणे करू शकतो.
  • पुढील भागात आपण कुंडय़ा कशा भराव्यात याची थोडक्यात माहिती घेऊ.