12 December 2019

News Flash

वजनात घट

वजन कमी करण्यासाठी अनेक लोक नानाविध औषधे घेतात.

|| डॉ. नीलम रेडकर

वजन कमी करण्यासाठी अनेक लोक नानाविध औषधे घेतात. डाएट न करता किंवा वजन कमी करण्याचे प्रयत्न न करता कधी कधी अचानक वजन कमी होऊ लागते. झटपट वजन वाढणे आणि झटपट वजन कमी होणे या दोन्ही गोष्टी चांगल्या नाहीत. काहीही प्रयत्न न करता वजन कमी होणे आणि थकवा जाणवणे ही लक्षणे गंभीर असू शकतात. अचानक वजन कमी होणे हे एखाद्या आजाराचेही पूर्वलक्षण असू शकते. कोणतेही कारण नसताना ६ ते १२ महिन्यांमध्ये जर वजन चार ते पाच किलोंनी किंवा वजनाच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्तीने कमी झाले तर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

खालील आजारांमध्ये वजन कमी होणे हे महत्त्वाचे लक्षण असू शकते –

मधुमेह – हा एक मेटॉनोचिक विकार आहे. शरीराने इन्सुलिनला योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. शरीराला ऊर्जा ग्लुकोज पुरवत असते. परंतु मधुमेहात इन्सुलिनचा प्रभाव नीट होत नसल्यामुळे ग्लुकोजऐवजी, चरबीची झीज होऊन शरीराला योग्य त्या कॅलरीज पुरवल्या जातात आणि म्हणून वजन कमी होते.

मधुमेहाची इतर लक्षणे – वारंवार लघवीला होणे, सतत भूक लागणे, खूप तहान लागणे, थकवा जाणवणे, हातापायाला मुंग्या येणे, तळपायाची आग होणे, कोणतीही जखम लवकर न भरणे, पायाच्या तळव्यांवर जखमा होणे.

वरील लक्षणे दिसल्यास त्वरित रक्तातील साखरेचे प्रमाण पडताळून घ्या.

नैराश्य – बऱ्याच कारणांमुळे, उतारवयात रुग्णांना नैराश्य येते. हा मनाचा विकार आहे. यामध्ये दु:ख, राग, चिडचिड या भावना वाढत जातात. नैराश्यामुळे भूक लागत नाही आणि त्यामुळे रुग्णांचे वजन खूपच कमी होऊ शकते.

इतर लक्षणे – झोप न येणे, नकारात्मक विचार येणे, उदास वाटणे, आयुष्य निर्थक वाटणे, एकटे वाटणे, स्वत:ला दोष देणे, आत्महत्येचे विचार येणे.

वरील लक्षणे दिसल्यास त्वरित मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्या.

थायरॉइड ग्रंथीचे आजार

थायरॉइड ग्रंथीचे कार्य थायरॉइड हार्मोन्स नियंत्रित करतात. शरीरातील चयापचयाची क्रिया जलद करण्याचे काम थायरॉइड हार्मोन्स करतात. जेव्हा या ग्रंथीतून अति प्रमाणात वैद्यकीय कारणांमुळे थायरॉइड हार्मोन्स स्रवते, तेव्हा चयापचयाची क्रिया (मेटॉबोलिसम) वाढते आणि वजन कमी होते.

इतर लक्षणे – हृदयाची धडधड होणे, घाम येणे, धाप लागणे, अस्वस्थ वाटणे, घबराट होणे, झोप कमी होणे, खूप भूक लागणे.

  कर्करोग – कर्करोग शरीराच्या कोणत्याही अवयवात अन्ननलिका, जठर, यकृत, स्तन, मूत्रपिंड, गर्भाशय यांमध्ये होऊ शकतो.

जसा हा रोग तसा तो शरीराच्या इतर भागांमध्येही पसरतो. भूक न लागणे आणि वजन कमी होणे ही कर्करोगाची महत्त्वाची लक्षणे आहेत.

इतर लक्षणे – कर्करोगाची लक्षणे ही कुठल्या अवयवाचा कर्करोग झाला आहे त्याप्रमाणे दिसून येतात. शरीरात कुठेही गाठ येणे, स्तनांमध्ये गाठ येणे, गर्भाशयातून अनियंत्रित आणि अनियमित रक्तस्राव होणे, आवाज बदलणे, खोकल्यातून रक्त पडणे, अन्न गिळताना त्रास होणे, शौचविसर्जनाच्या सवयी अचानक बदलणे ही काही महत्त्वाची लक्षणे आहेत.

  क्षयरोग – हा एक जिवाणूजन्य आजार आहे. हा ‘मायको बॅक्टेरिया’ या प्रकाराच्या जिवाणूंमुळे होतो. या आजारात भूक अतिशय कमी होते आणि त्यामुळे वजन खूपच घटते. फुप्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये सुद्धा हा रोग होतो. उदा.- आतडय़ांचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग, लसिकाग्रंथीचा क्षयरोग हाडांचा किंवा सांध्याचा क्षयरोग.

इतर लक्षणे –  सतत दोन आठवडय़ांपेक्षा जास्त काळ खोकला असणे, हलकासा संध्याकाळी ताप येणे, छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, मानेला गाठी येणे, शुद्ध हरपणे.

आतडय़ांना सूज येणे (आईबीडी)

या आजारांत विविध कारणांमुळे आतडय़ांना सूज येते. आतडय़ांच्या आजारामुळे शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांचे शोषण नीट न झाल्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही आणि त्यामुळे या आजारात वजन कमी होते.

First Published on July 23, 2019 2:44 am

Web Title: weight loss diet mpg 94
Just Now!
X