शनिवार

अष्टविनायकातील प्रसिद्ध बल्लाळेश्वराचे गाव म्हणजे पाली हे सुधागड तालुक्याचे मुख्यालय आहे. पुणे किंवा मुंबईमार्गे जाताना खोपोलीजवळ महड येथे अष्टविनायकातील वरदविनायक मंदिर आहे. तिथे दर्शन घेऊन पुढे जावे. पालीला आल्यावर बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यावे. नंतर गावाच्या मागेच असलेल्या सरसगडला जावे. चढायला तासभर पुरतो, पण किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यातल्या कडय़ात कोरलेल्या ९६ पायऱ्या केवळ अप्रतिम आहेत. किल्ल्यावर पिण्याचे पाणी उत्तम आहे. किल्ल्यावरून अंबा नदीचे विहंगम खोरे दिसते. दुसऱ्या बाजूने किल्ला उतरावा. उन्हेरे गावी जावे. तिथे गरम पाण्याची कुंडे आहेत. रिकाम्यापोटी त्यात उतरू नये. गंधक असल्यामुळे चक्कर येण्याचा संभव असतो. तिथून पुन्हा पालीला यावे.

रविवार

पालीवरून पाच्छापूर मार्गे सुधागडला जावे. ट्रेकिंगची सवय असेल तर सुधागड किल्ला पाहावा. किल्ल्याचा कोरा दरवाजा पाहून रायगडच्या महादरवाजाची आठवण येते. तिथे भोराई देवीचे मंदिर आहे. भोर संस्थानची मुहूर्तमेढ याच ठिकाणी रोवली गेली. पूर्वेला तेलबैलाच्या दोन अजस्र भिंती सुंदर दिसतात. ट्रेकिंग करायचे नसल्यास ठाणाळे लेणी पाहावीत. परत मागे येऊन नागशेतला जावे. नागशेतला मोठी रांजणकुंड आहेत. २५ ते ३० फूट खोल आणि २०० मीटरपेक्षा लांब घळईतून नदी वाहते. शेजारीच कोंडाईदेवी आहे. अंधारबनचा रस्ता नागशेतला उतरतो. तिथेच जवळ असलेली खडसांबळे लेणी पाहावीत. पालीपासून जवळच रामवरदायिनी हे नितांत सुंदर ठिकाण आहे. देवीचे छोटेसे मंदिर आणि गर्द झाडी नक्की पाहिली पाहिजे.

ashutosh.treks@gmail.com