आशुतोष बापट

शनिवार

सासवडला संतश्रेष्ठ सोपानदेवांचे समाधी मंदिर पाहावे. मंदिराच्या आवारात असलेल्या एका दगडी शिळेवर निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई यांची शिल्पे कोरलेली आहेत. सासवडजवळ कऱ्हेला चांबळी नदी येऊन मिळते तिथे संगमेश्वर हे पेशवेकालीन देखणे शिवालय आहे. दगडी पायऱ्या, प्रशस्त प्राकार, देखणी दीपमाळ, पाषाणात कोरलेली नंदीची मूर्ती, रंगशिळा पाहण्यासारखी आहे. सासवडला कऱ्हेच्याच काठावर असेच चांगावटेश्वर मंदिर आहे. जवळच सोनोरी गावी जावे. पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख भीवराव पानसे यांचे हे गाव. इथे किल्ला आहे.

रविवार

सासवडवरून २० कि.मी.वर असलेल्या पांडेश्वरला जावे. शिवालयाबाहेरचे भव्य द्वारपाल पाहावेत. गजपृष्ठाकृती गाभारा पाहावा. गिलाव्यावर काही चित्रे रंगवलेली आहेत. मंदिराच्या ओवऱ्यांतही रंगीत चित्रे आहेत. पांडेश्वर मंदिरासमोरची दीपमाळ विटांनी बांधलेली आहे. रचना अगदी मिनारांसारखी आहे. आतून पोकळ असलेल्या या दीपमाळेत वर जाण्यासाठी जिना आहे. या दीपमाळांवर बाहेरच्या बाजूने चुन्यात अंकित केलेली काही शिल्पे आहेत. पुढे मोरगावमार्गे लोणीभापकरला जावे. देवळासमोर मोठी पुष्करिणी आहे. वाहन मंडप रिकामा आहे. तिथेच बाहेर यज्ञवराहाची मूर्ती अतिशय देखणी आहे. मंदिरावर सगळी वैष्णव शिल्पे आहेत.

ashutosh.treks@gmail.com