23 January 2021

News Flash

वैवाहिक आयुष्य आणि करिअर

या खेळात, चर्चेत साधारणपणे मुलगे पैसे मिळवण्याला जास्त गुण देतात.

|| अनिल भागवत

अभ्यासमंडळात एकदा एक खेळ घेतला होता. कल्पना करा की, तुम्ही वैवाहिक आयुष्य तपासणार आहात नि त्या परीक्षांचे तुम्ही पेपर सेटर आहात. एकूण १०० गुण. त्यात ३ पेपर ठेवायचे. १) पैसे ऊर्फ काम, चरितार्थ. २) शारीरिक आरोग्य-तब्येत, व्यायाम, आहार, सवयी वगैरे. ३) सहजीवनातलं स्वास्थ्य. कुठच्या पेपरला तुम्ही किती गुणांची परीक्षा ठेवाल आणि का ते सांगा.

या खेळात, चर्चेत साधारणपणे मुलगे पैसे मिळवण्याला जास्त गुण देतात. मुली तिन्हीला सारखे गुण ठेवतात. विवाहित स्त्री-पुरुष मात्र जास्त गुण सहजीवनातल्या स्वास्थ्याला, त्याखालोखाल आरोग्याला आणि शेवटी पैशाला देतात. कमाल आहे! लग्नापूर्वीच्या आणि अनुभवी विवाहित लोकांच्या मतांत एवढा फरक असावा?

शिकायचं कशासाठी असं कोणी विचारलं तर एकच उत्तर मिळतं. पैसे मिळवण्यासाठी. प्रत्यक्षात पैसे केवळ शारीरिक श्रमानेही मिळवता येतात, पण शरीर थकल्यावर फक्त शिक्षणाचाच उपयोग होईल, हे माहीत असतं. खरं म्हणजे शरीर आणि बुद्धी यांचा सततच उपयोग हवा. फक्त बुद्धी वापराच्या कामामध्ये भारतात सगळीकडे पैसे जास्त मिळतात. यामुळे जास्त पैसे मिळवण्यासाठी जास्त शिक्षण असाच सर्वसामान्य हिशेब असतो.

शिक्षणाचा मूळ उद्देश कृत्रिम बंधनांमधून मोकळं होणं असा पाहिजे. तसं प्रत्यक्षात होत नाही. सध्याच्या शिक्षणपद्धतीत उगीचच जिथे तिथे स्पर्धा असते. कोणाचा तरी वरचा नंबर असं म्हटलं की बाकीचे खालच्या दर्जाचे असं म्हटल्यासारखंच आहे. शिकण्यातला किंवा शिकवण्यातला मुख्य उद्देश आनंद, समाधान नसून पैसे मिळवणं असल्यामुळे इच्छा असो नसो, सगळ्या शिक्षणसंस्थांना दुकानदार बनावं लागतं. एकेकाळी शाळांमधलं शिक्षण खरंच आनंद देणारं होतं म्हणतात. हे सगळंच हळूहळू बदललं. आपल्या शिष्याने आपल्यापेक्षा जास्त यश मिळवलं तर स्वत:चा गौरव मानणाऱ्या शिक्षकांपासून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मत्सर वाटणारे शिक्षक तयार झाले.

शिक्षणाने माणसात नेमका काय फरक होतो, याचा विचार करताना मला वाटतं की का आणि कसं शिकत राहायचं हे समजतं. आज ७३ आणि ७० या वयात देखील मी आणि शोभा कायम शिकायला तयार असतो. त्यामुळे आम्हाला शिकवण्याचा नैतिक अधिकार पोचतो. जरा वय वाढलं, शिक्षण झालं, हुद्दा मिळाला की अनेकांना वाटतं की, यापुढे आता आपण फक्त शिकवायचं. साहजिकच असे लोक शिकायला तयार नसतात. अभ्यासमंडळ चालवताना ही गोष्ट पदोपदी जाणवते. एक अगदी साधं पण अनादिकालापासूनचं तत्त्व आहे. जी गोष्ट माणसाला आवडते ती त्याला येते आणि अधिक आवडत जाते. या एका वाक्यामध्ये अनेक कोडय़ांचं उत्तर सापडतं. माझ्या दृष्टीने, शिक्षकांचं मुख्य काम प्रत्येक विषयामधले खेळ शोधून काढणं असावं. ते झालं तर गोडी लावण्याचं काम अगदी सोपं होऊन जाईल.

शिक्षण हा विषय निघाला की त्यातली पहिली पायरी म्हणजे शिकावंसं वाटणं. भारतात प्रत्येकाला शिकावंसं वाटेल असं वातावरण नाही. दुसरी पायरी म्हणजे अनेक गोष्टी करून बघून आपल्याला काय शिकायला आवडेल ते ठरवणं. त्याचीदेखील सगळी पंचाईत आहे. तिसरी पायरी म्हणजे जे आवडेल ते शिकणं. या पायरीपर्यंत बहुतेक लोक पोचतच नाहीत. त्यामुळे त्याबद्दलचा प्रश्नच येत नाही. सारांशात, शिक्षणाच्या बाबतीत भारत देश नापास आहे.

स्वत: मेहनत करून, प्रयत्न करून माणूस जे शिकतो तेच शिक्षण खरं. ‘शिक्षण देणं’, ‘शिकवणं’ हे शब्दप्रयोगच निर्थक आहेत. फार तर ‘शिकण्यासाठी सोय करणं, शिकण्यासाठीचं साहित्य उपलब्ध करून देणं’ एवढंच बाकीचे करू शकतात. सध्याच्या नव्या शिक्षणपद्धतीत र्सवकश सातत्यपूर्ण मूल्यमापन ठेवलं आहे ते चांगलं आहे. ज्ञानरचनावादामध्ये मूल बुद्धिमान असलं तर ज्ञान निर्माण होण्याची शक्यता केव्हाही जास्त आहे. या पद्धतीत पाठांतरावर भर नाही. अशी कल्पना करा की तुम्ही म्हणाल, त्या कुठच्याही प्रश्नाचं उत्तर वर्षअखेर विद्यार्थ्यांचं तोंडपाठ नाही, पण तो त्याच्या पुस्तकांमधून योग्य उत्तर १५-२० मिनिटांत काढून देऊ शकतो. आता प्रश्न असा की या विद्यार्थ्यांने अशी उत्तरं देण्याची सगळ्या विषयांची उत्तम तयारी केली तर तुम्हाला आक्षेप घेण्याजोगं आहे काय? पुढच्या आयुष्यात याखेरीज काय हवं असतं?

अनौपचारिक शिक्षण हा शब्द शिक्षणक्षेत्राला नवा नाही. प्रत्यक्ष लोकांना उपयोगी पडेल असं काम लोकांच्यात मिसळून कोणी करायला लागलं तर विद्वान लोक काही बोलत नाहीत, पण अशा माणसाला ते त्यांच्या गटात सामील करून घेत नाहीत. कारण त्यांच्या मते असं काम कमी दर्जाचं असतं. अगदी स्पष्ट सांगायचं तर ‘अ‍ॅकॅडमीशियन्स’ विरुद्ध ‘फील्डवर्कर्स’ असं वातावरण तयार होतं. शिक्षणक्षेत्राच्या दृष्टीने हे फार चुकीचं आणि वाईट आहे.

अभ्यासमंडळामध्ये शिक्षणाविषयीची ही सगळी माहिती जमलेल्यांच्या करिअरशी जोडायची असते. नोकरी आणि करिअर यातल्या फरकाविषयी गटचर्चा होतात. व्यवसाय आणि धंदा याबद्दल तपशीलवार बोलणं होतं. नमुना म्हणून एका चर्चेचा निष्कर्ष सांगतो. व्यवसायात ‘योग्य’ काय ते सांगायचं आणि करायचं असतं. धंद्यात ‘लोकप्रिय’ काय ते करतात. लोकांना आवडेल असं बोलावं लागतं, दिसावं लागतं.

अभ्यासमंडळात काही विधानं समोर ठेवून त्यावर गटचर्चा असते. काही विधानं सांगतो.

१) प्रसिद्ध किंवा श्रीमंत माणूस म्हणून जगण्यापेक्षा सामान्य राहण्यात आनंद आहे.

२) श्रीमंत लोक कनिष्ठ वर्गाबद्दल संवेदनाहीन असतात.

३) खूप पैसे घेतले तरच लोकांना ज्ञानाची किंमत वाटते.

संपूर्ण करिअरबद्दल तत्त्वज्ञानातलं एक वाक्य लक्षात ठेवावं लागतं – ‘फारच क्वचित यश म्हणजे समाधान असं असतं.’ थोडक्यात या दोन्ही गोष्टी एकाच वेळी क्वचित मिळतात. ‘एरवी यश किंवा समाधान यापैकी एक निवडावं लागतं.’ तत्त्वचिंतनातलं आणखी एक वाक्य तेवढंच महत्त्वाचं आहे. ‘शिखराच्या टोकावर पोचणाऱ्याला एकटेपणा मान्य करावाच लागतो.’

करिअरमध्ये आणखी एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो. ‘माझं ते मी ठेवणार आणि दुसऱ्याचंही घेणार’ ही वृत्ती एकदा तयार झाली की रोखणं फार कठीण असतं. काहीही करायचं असलं की. ‘त्यात मला काय मिळणार’, हा प्रश्न मनात यायला लागला की भ्रष्टाचाराच्या वाटेवरचा प्रवास सुरू होतो.

पैसे खाण्याची सुरुवात खर्चाला पैसे कमी पडतात म्हणून होते. पण वाईट भाग असा आहे की, किती पैसे मिळाले की लाच खाणं सोडून देणार याबद्दलचे सगळे विचार पुढे विरून जातात. त्याचं मानसिक व्यसनात रूपांतर होतं. कधी कधी घेतलेल्या खेळासारख्या वाटणाऱ्या एका कार्यक्रमाविषयी जरा सांगतो. कार्यक्रमाचं नाव ‘तीन मिनिटांत आपल्या कामाविषयी सांगणं.’

या कार्यक्रमात काही जोडीदाराच्या शोधात असलेले अविवाहित लोक असतात. त्यांना हा कार्यक्रम कसा उपयोगी पडेल ते प्रथम समजावतो.

जे मुलगा-मुलगी जोडीदार निवडीच्या उद्देशाने प्रथम भेटतील त्यांना ती व्यक्ती चरितार्थासाठी काय करते, हे विचारण्याएवढाच रस असतो. फार लांबण कोणी लावली तरी त्या व्यक्तीविषयी वाईट मत होतं. नुसता पगार सांगणं हे अगदी चुकीचं आहे. प्रत्येक काम करणाऱ्या माणसाच्या आयुष्यातला जागेपणाचा सर्वात जास्त वेळ कामाच्या ठिकाणी जात असतो. त्याविषयी काही न बोलणं हे बरोबर नाही. स्वत:च्या कामाकडे बघण्याची वृत्ती ही आयुष्याकडे, संसाराकडे बघण्याच्या वृत्तीचा महत्त्वाचा भाग आहे. या सगळ्याचा अर्थ असा की आपल्या कामाविषयी सांगायचं, पण ते अगदी मुद्देसूद थोडक्यात सांगता आलं पाहिजे.

जमलेल्यांपैकी बरेच लोक विवाहित असतात. स्वत:च्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या भागाविषयी प्रत्येकाला बारकाव्याने माहिती होते. ते स्वत:च स्वत:च्या केलेल्या समुपदेशनासारखंच ठरतं.

hianildada@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 12:04 am

Web Title: marital life and careers
Next Stories
1 पैशांबद्दलची मानसिकता
2 उद्याचे पालक घडवताना
3 पालकांचे शिक्षण
Just Now!
X