महेश सरलष्कर

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य जितके शरद पवार यांच्या हाती आहे, तितकेच ते शिवसेना नेतृत्वाच्या मध्यममार्गी प्रवासाच्या दृढनिश्चयावरही असू शकेल. गेल्या आठवडय़ातील राजधानी दिल्लीतील घडामोडींवरून हेच चित्र दिसते..

महाराष्ट्रातील राजकारणात रुची असलेल्या दिल्लीकरांचा एकच प्रश्न असतो : शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे कसे चालले आहे? ‘सरकार टिकून आहे’ हे खरे तर साचेबद्ध उत्तर असते; पण किती दिवस टिकणार, या प्रश्नाचे नेमके उत्तर कोणाला कसे देता येईल? यापेक्षा शिवसेनेचा मध्यममार्गी प्रवास कसा सुरू आहे, असे विचारता येऊ  शकेल आणि त्यावर- ‘तसा प्रयत्न तर केला जात आहे,’ असे म्हणता येईल. कुठल्याही आघाडीत मध्यममार्गी प्रवास हेच यशाचे गमक असते. शिवसेना हा प्रवास किती नेटाने करते, त्यावर महाविकास आघाडीचे यशही अवलंबून आहे.

गेल्या आठवडय़ात महाविकास आघाडीशी संबंधित तीन घटना झाल्या. (१) पूर्वी शिवसेनेशी संबंधित आणि आता भाजपमध्ये असलेल्या जय भगवान गोयल यांनी आपल्या पुस्तकात नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. (२) काँग्रेसने विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती; या बैठकीत शिवसेनेचा एकही नेता आलेला नव्हता. (३) शिवसेनेचे युवा नेते आणि राज्यातील मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्ली दौरा केला. या तीन घटनांचा एकमेकांशी संबंध नसला, तरी त्या शिवसेनेशी जोडलेल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्रात करीमलाला, इंदिरा गांधी यांची आठवण काढली गेली. नाहक वाद निर्माण केला गेला. काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांची तीव्र, पण अपेक्षित विरोधी प्रतिक्रिया उमटली.

राजकारणात उठवळ आणि नाठाळ लोक प्रत्येक पक्षात असतात. ते वाद निर्माण करतात. मग अचानक राजकीय वातावरण ढवळून निघते. जय भगवान गोयल हे अशा नाठाळांपैकी एक आहेत. या नाठाळांना सत्तेची ऊब घेत स्वत:चे अस्तित्व टिकवायचे असते. बिनबुडाच्या लोकांना राजा लागतो. त्याची स्तुती करणे, त्याची मर्जी सांभाळणे आणि पुढे पुढे जात राहणे या एकमेव उद्देशाने हे लोक ‘प्रेरित’ असतात. मोदी-शहांचा भाजप हा नेतृत्वाची मर्जी सांभाळणाऱ्या अशा लोकांचा समूह झालेला आहे. मोदी-शहा यांना खूश ठेवा- मग हातात काहीतरी पडेल, असा अशा लोकांचा समज आहे. या दोघांची मर्जी नसेल तर पक्षात आपल्याला काही भवितव्य नाही, हे जाणून गोयल यांच्यासारखे लोक मोदी-शहांवर स्तुतिसुमने वाहण्याची एकही संधी सोडत नाहीत. मोदींची थेट छत्रपतींशी तुलना करण्याएवढी दुसरी स्तुती कोणती, असा विचार गोयल यांनी केला असावा!

गोयल यांच्या पुस्तकामुळे महाराष्ट्रात वाद होणार, हे दिल्ली भाजपची जबाबदारी असणाऱ्या श्याम जाजू वा प्रकाश जावडेकर यांच्यासारख्या मराठी भाजप नेत्यांना ठाऊक नव्हते का? त्यांना त्याची जाणीव असेलही; पण मोदींवरच्या पुस्तकाला विरोध कोण करणार, हा मुद्दा होता. दिल्ली भाजपच्या कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी श्याम जाजू उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली होती. महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे वाद निर्माण झाला. गोयल यांचे पुस्तक मागे घेण्याची संतप्त मागणी दोन्ही काँग्रेसप्रमाणे शिवसेनेनेही केली. या विषयावर राज्यात गदारोळ होत असताना दिल्लीत सलग दोन दिवस भाजपचे मावळते राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी दिल्ली निवडणुकीच्या उमेदवार निश्चितीबाबत मॅरेथॉन बैठका होत होत्या. त्यात जाजू तसेच जावडेकर दोघेही उपस्थित असल्याचे सांगितले गेले. शहा यांच्याशी बोलून गोयल यांच्या पुस्तकाबाबत निर्णय घेतला गेला असावा. त्यानंतर रात्री उशिरा प्रकाश जावडेकर यांनी हे पुस्तक लेखक मागे घेत असल्याची घोषणा केली. हा निर्णय घेण्यासाठी भाजपने दोन दिवस उशीर केला होता. त्यामागे शिवसेनेला डिवचण्याचा हेतू असावा. शिवसैनिकांकडून अपेक्षित प्रतिक्रिया उमटली; मात्र शिवसेनेच्या नेतृत्वाकडून संयम बाळगला गेला होता. राज्यातील सत्तेची जबाबदारी ओळखून कोणताही आक्रस्ताळी उलटवार भाजपवर केला गेला नाही. सत्ता टिकवण्याचे आणि ती राबवण्याचे महत्त्व नीट समजल्याचे हे लक्षण असावे.

राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे तीन चाकी गाडी असल्याची टीका भाजप सातत्याने करत आहे. मात्र, या गाडीची तीन चाके निराळ्या दिशांकडे तोंड करून नाहीत, हे हळूहळू का होईना, लोकांना जाणवू लागले आहे. राज्यात सरकार चालवले जात आहे आणि निर्णय घेतले जात आहेत, हेही लोकांना दिसू लागले आहे. रिक्षाला तीन चाके असतात. रिक्षाने वेगाची मर्यादा ओलांडली नाही, तर ती सुरक्षितपणे इष्टस्थळी पोहोचू शकते. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात इतकेच! तशी काळजी घेण्याकडे शिवसेनेच्या नेतृत्वाचा कल दिसतो. नेत्यांनी वादविवाद केले. दाऊद, करीमलाला, इंदिरा गांधी यांचा उल्लेख केल्यामुळे वादंग माजला असला, तरी त्याचा सत्तेच्या गणितावर परिणाम होऊ  द्यायचा नाही, हे कटाक्षाने पाळले गेले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सद्य:घडीला राजकीय महत्त्व कशाला आहे, हे दाखवून दिले आहे. त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनीही त्यांच्यामध्ये प्रगल्भ नेत्याचे गुण असू शकतात याची चुणूक दाखवलेली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला महाविकास आघाडीचे ‘समन्वयक’ शरद पवार उपस्थित होते, पण शिवसेनेचे कुणीही नव्हते. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकांसाठी सख्ख्या भावासारखे आहेत. काँग्रेस-शिवसेनेला आपण एकमेकांचे निदान सावत्र भाऊ  म्हणवून घ्यायला हरकत नाही, असे नाइलाजाने वाटू लागले आहे. त्यांच्यात समन्वयाचा अभाव असणार हे उघडच होते. काँग्रेसकडून निरोप पोहोचला नाही वा दिला गेला नाही; त्यामुळे शिवसेना बैठकीला आली नाही. दुसरा मुद्दा राहुल गांधी यांच्या शिवसेनेबाबतच्या धोरणाचाही असू शकतो. दक्षिणेकडील काँग्रेस नेते पहिल्यापासून शिवसेनेशी आघाडी करण्याच्या विरोधात होते. त्यांनी आपले म्हणणे सोनिया गांधी यांना पटवून देण्यासाठी राहुल गांधी यांना मधे घातले होते. शिवसेना नको म्हणणाऱ्या नेत्यांनी समन्वय करण्याचे टाळलेले असू शकते. पण त्यावरही शिवसेनेच्या नेतृत्वाने सबुरीने धोरण स्वीकारलेले आहे. त्यानंतर लगेचच आदित्य ठाकरे दिल्लीला आले होते. तरुण पिढीला माहिती-तंत्रज्ञानावर आधारित समाजमाध्यमांमध्ये रुची असते. आदित्य ठाकरे यांनाही आहे. त्यांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या दिल्ली कार्यालयांना भेट दिली. त्याच दौऱ्यात त्यांनी राहुल गांधी यांचीही भेट घेतली. पण या राजकीय भेटीचा त्यांनी कुठेही गवगवा केला नाही. राज्यातील महाविकास आघाडी टिकवायची असेल, तर काँग्रेसशी मोडकातोडका का होईना, पूल बांधण्याची गरज होती. राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा येऊ  शकते. असे झाले तर महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडण्याचाही धोका असू शकतो. त्याआधीच तरुण पिढीतील नेत्यांनी संवाद साधला, तर हा धोका कमी होऊ  शकतो. हे काम प्रसारमाध्यमांमध्ये स्वत:हून चर्चा घडवून आणण्याचे टाळूनच करता येऊ शकते. दिल्ली दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी हे शहाणपण दाखवले आहे, असे म्हणावे लागते. शिवसेनेची ही संवादाची प्रक्रिया जाणीवपूर्वक केली असेल, तर राजकारणातील हा मध्यममार्गी प्रवास महाविकास आघाडीसाठी हितकारक ठरू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात महाविकास आघाडीची सूत्रे आहेत. त्यांना जितके दिवस समन्वयकाची भूमिका बजावायची असेल तितके दिवस महाविकास आघाडी राज्य करेल, असे म्हटले जाते. पण त्याहूनही महत्त्वाचा असेल, तो शिवसेनेच्या नेतृत्वाचा संवाद आणि मध्यममार्गी प्रवासाचा निश्चय!

mahesh.sarlashkar@expressindia.com