भाजपमधून हकालपट्टी झालेले उत्तर प्रदेशचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंहांच्या अश्लील मुक्ताफळांनी अगोदर भाजपची आणि नंतर दयाशंकर सिंहांच्या पत्नी व मुलीला प्रत्युत्तरादाखल किळसवाण्या पद्धतीने लक्ष्य केल्याने मायावतींची कोंडी झाली आहे.. या एका घटनेने लोकसभेला जवळ आलेले दलित विधानसभेला भाजपपासून दूर जाण्याची आणि लोकसभेला दूर गेलेले; पण विधानसभेला जवळ येऊ पाहणारे उच्चवर्णीय मायावतींपासून दूर जाण्याची प्रक्रिया सुरू झाली! पण या ध्रुवीकरणातून एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते आहे, की खरी लढत बसपा आणि भाजपमध्येच राहील.

सोळाव्या लोकसभेत एकही जागा न मिळण्याची नामुश्की पदरी पडल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती ऊर्फ बहेनजी राज्यसभेत शांत शांत राहत. त्यांचे राज्यसभेतील शिलेदार सतीशचंद्र मिश्रा यांचाही फार आवाज नसायचा. एकूणच मायावतींनी स्वत:वरच ‘वनवास’ लादला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवलाईचे ते दिवस होते. त्यात उत्तर प्रदेशात ८० पकी ७३ जागांचे अभूतपूर्व यश मोदींच्या पारडय़ात; पण काहीच महिन्यांत राजकीय चक्र पुन्हा फिरू लागले आणि वर्षभराच्या आतच झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत बसपाने असे काही यश मिळविले की, असे म्हणतात, स्वत: मायावतींना आश्चर्याचा धक्का बसला! लोकसभेच्या दणक्यातून इतक्या लवकर सावरण्याची अपेक्षा त्यांनीही केली नव्हती आणि आता मोदी सरकारची दोन वष्रे उलटून जाताना मायावतींच्या त्या आश्चर्याचे रूपांतर उत्तर प्रदेशची सत्ता मिळविण्याच्या खात्रीमध्ये झाले आहे. उत्तर प्रदेशची नाडी माहीत असलेल्या कोणाशीही बोला, अगदी भाजपच्या नेत्यांशी खासगीत बोला, बहेनजी सत्तेवर येण्याचा छातीठोक निर्वाळा दिला जाईल.

दोन वर्षांत असे काय घडले आहे? ७३ खासदारांची फौज (की ‘बिनचेहऱ्यांचा कळप’) असलेला भाजप बॅकफूटवर का गेलाय? ‘एम-वाय’ म्हणजे मुस्लीम-यादवांच्या भरभक्कम गणिताचे मेतकूट जमविणारा समाजवादी पक्ष एकदमच फिकट का दिसतो आहे? बिहार चमत्काराचे श्रेय पाठीशी असणाऱ्या प्रशांत किशोरची ‘सेवा’ भलीमोठी रक्कम देऊन घेतली असताना आणि राहुल गांधी हे किशोर यांना पूर्णत: शरण गेलेले असताना, काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची काही ठोस चिन्हे का दिसत नाहीत?

कारण लोकसभेवरून विधानसभेचा अंदाज बांधताच येत नसतो. त्यातही जर लोकसभा २०१४ची असेल तर मग अंदाज आणखीच कठीण ठरतात. मोदी लाटेमध्ये बाजूला पडलेली जातीय गणिते आता विधानसभेसाठी पुन्हा एकदा अस्मितेचे रूप घेऊन पुढे येताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशात तर जातींवरच सर्व काही ठरते. दलित (त्यातही जातव)  मायावतींकडे, यादव (बहुतांश ओबीसींसह) आणि बहुतांश मुस्लीम समाजवाद्यांकडे, बहुतांश ब्राह्मण- ठाकूर भाजपकडे असे काही मतपेढय़ांचे धारदार वाटप गेल्या दीड-दोन दशकांत झाले आहे. एकटय़ा दलितांच्या जिवावर लखनौवर राज्य करणे अवघड असल्याची जाणीव बहेनजींना आहे, मुस्लीम एकगठ्ठा बरोबर असल्याशिवाय सत्तेवर कब्जा करता येणार नसल्याची कल्पना चाणाक्ष मुलायमसिंहांना आहे आणि केवळ उच्चवर्णीयांच्या (१५ ते २० टक्के मते) बळावर राजकीयदृष्टय़ा सर्वात शक्तिशाली असलेले राज्य आपल्या पंखाखाली घेता येणार नसल्याचे कटू वास्तव मोदी-अमित शहांना चांगलेच माहीत आहे. आणि स्वत:ची ‘विकसित’ मतपेढी असल्याशिवाय आपण स्पध्रेतही येऊ शकणार नसल्याचे सत्य काँग्रेसने स्वीकारल्याचे दिसते आहे.

म्हणून तर मायावती पुन्हा एकदा ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’चा नारा घेऊन ब्राह्मण आणि मुस्लिमांना चुचकारू लागल्या आहेत. ओबीसी आणि दलितांना भाजप खुणावू लागला आहे. मुस्लीम मतपेढी बसपाने पळवू नये, यासाठी मुलायमसिंह देव पाण्यात घालून बसले आहेत आणि शीला दीक्षितांना पुढे करून स्वत:ची नव्याने ब्राह्मण मतपेढी तयार करण्यासाठी राहुल गांधी-प्रशांत किशोर कामाला लागल्याचे दिसते आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीला अजून आठ-नऊ महिन्यांचा वेळ असला तरी त्याचे पडघम जोरजोरात वाजण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री अखिलेशसिंहांच्या जाहिरातबाजीने दिल्ली व उत्तर प्रदेशातील माध्यमे भरून गेली आहेत, मायावती संसदेमध्ये अतिसक्रिय झाल्या आहेत, मोदी महिन्यातून एकदा, तर अमित शहा आठवडय़ात दोनदा तरी उत्तर प्रदेशात असतातच. काँग्रेस तर सर्वाच्या पुढे आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केल्यापाठोपाठ लगेचच चक्क रथयात्राही काढली आहे. काँग्रेसजनांचा दावा खरा मानला, तर या रथयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला. कानपूर, शहाजहाँपूरसारख्या भागांमध्ये भर पावसात वीस-वीस हजारांच्या सभा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कदाचित त्यामुळे हुरळून गेलेले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर हे स्वबळाचा चमत्कार होण्याची भाषा करीत आहेत. काँग्रेसला आता कोणाशीच स्पर्धा नसल्याची राणा भीमदेवी गर्जना त्यांनी केली. त्यावर काँग्रेस मुख्यालयात एक विनोदही फिरला : राज बब्बर अगदी बरोबर म्हणतायेत. खरोखरच चौथ्या स्थानासाठी काँग्रेसची कोणाशीच स्पर्धा नाही..! गमतीचा भाग सोडून द्या, पण एक गोष्ट नक्की आहे की, ही निवडणूक काँग्रेसने अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे दिसते आहे. पंचवीस वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसचे नेते उत्तर प्रदेश जिंकण्याची भाषा करीत आहेत. प्रशांत किशोर यांच्या आग्रहाप्रमाणे जर ‘अखेरचे ब्रह्मास्त्र’ प्रियांका गांधी खरोखरच रणधुमाळीत उतरल्या तर काँग्रेसला ‘अच्छे दिना’ची स्वप्ने पडू शकतात.

उत्तर प्रदेश असे तापू लागले असतानाच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी बहेनजींबद्दल अत्यंत अश्लील शेरेबाजी केली. पशांसाठी विधानसभेची तिकिटे विकण्याचे आरोप करण्याच्या नादात त्यांनी मायावतींची तुलना थेट वारांगनेशी केली. या व्यक्तिगत किळसवाण्या आरोपाने मायावती दुखावल्या; पण त्यांनी लगेचच राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. अगोदरच उना, कथित गौरक्षकांचे बेफाम धांगडिधगे, मुंबईतील आंबेडकर भवन पाडण्याची घटना यामुळे दलितविरोधी असल्याच्या आरोपांना तोंड देत असतानाच दयाशंकर सिंहांमुळे भाजपवर तोंडघशी पडण्याची वेळ आली. अरुण जेटलींनी संसदेत नि:संदिग्धपणे माफी मागितली, दयाशंकर सिंहांची तातडीने हकालपट्टी केली; पण व्हायचे ते नुकसान झालेच. मात्र, अशीच वेळ मायावतींवरही आली आहे. दयाशंकर सिंहांच्या अश्लील शेरेबाजीचे भांडवल करण्याच्या नादामध्ये मायावतींचा मुस्लीम चेहरा समजले जाणारे नसिमुद्दीन सिद्दिकी यांनी दयाशंकर सिंहांची पत्नी स्वाती आणि चौदा वर्षांच्या लहान मुलीला ज्या किळसवाण्या पद्धतीने लक्ष्य केले, त्याने उच्चवर्णीयांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. दयाशंकरांमुळे जर सारे दलित मायावतींकडे झुकले, तर सिद्दिकी यांच्या कारवायांनी ब्राह्मण आणि ठाकूर वेगाने भाजपच्या पंखाखाली एकजुटले. आता तर भाजप लखनौ विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या स्वाती सिंहांचा पद्धतशीर उपयोग करून घेण्याच्या मार्गावर आहे. दुसरीकडे मायावतींनाही या उच्चवर्णीयांमधील ध्रुवीकरणाची कल्पना आली. म्हणून त्यांनी ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ संमेलने घेऊन ‘जखमे’वर हळुवार फुंकर मारण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडींनंतर दिल्लीतील मायावतींच्या विश्वासातील एका घनिष्ठ नेत्याचा चेहरा अत्यंत पडला होता. तो संसदेच्या ‘सेंट्रल हॉल’मध्ये काही हितचिंतकांशी मोकळेपणाने बोलत होता. ‘‘दयाशंकर सिंहांप्रकरणी आमचे गणित चुकल्यासारखे वाटते आहे. आमच्याकडे येऊ पाहत असलेल्या उच्चवर्णीयांना आम्ही विनाकारण भाजपच्या जबडय़ात ढकलले आहे. हे सारे प्रकरण आमच्यावर बूमरँग होऊ नये, म्हणजे झाले,’’ असे त्याचे म्हणणे होते. हा नेता मायावतींचा ब्राह्मण चेहरा आहे.

दयाशंकर सिंहांच्या मुक्ताफळांनी अगोदर भाजपची आणि नंतर मायावतींची अशी कोंडी केली आहे. लोकसभेला जवळ आलेले दलित विधानसभेला भाजपपासून दूर जाण्याची आणि लोकसभेला दूर गेलेले, पण विधानसभेला जवळ येऊ पाहणारे उच्चवर्णीय मायावतींपासून दूर जाण्याची प्रक्रिया सुरू झाली! पण त्यातून एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते आहे, की खरी लढत बसपा आणि भाजपमध्येच राहील. तूर्त तरी समाजवाद्यांची सायकल ‘अँटी इन्कम्बन्सी’च्या दलदलीत रुतल्याचे चित्र आहे. समाजवादी पक्ष आपल्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेससारखाच आहे. एकखांबी नेता आणि एका जातीवर मुख्य भिस्त! इकडे शरद पवार आणि तिकडे मुलायमसिंह. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांवर कोणी, कधीच फुली मारत नाही, तसाच दरारा मुलायमसिंहांचा आहे. इतक्या स्वस्तात आणि इतक्या घाईघाईने त्यांच्या नावावर काट मारण्यात शहाणपणा नाही. म्हणून तर एके काळच्या या पलवानाच्या चालींकडे लक्ष ठेवावे लागेल. मोदी आणि मुलायमसिंहांच्या मत्रीने तर कोडे आणखीच वाढते, जसे मोदी-पवार यांच्यातील कथित मत्रीने!

एखाद्या महामार्गावरून गाडी वेगाने चालली असताना अचानकपणे टोकदार वळण आल्यास चालकाचे कौशल्य पणाला लागते तसे काही विजयपथाकडे ऐटीत चाललेल्या मायावतींबाबत घडताना दिसत आहे. त्या अर्थाने त्या टोकदार वळणावर उभ्या आहेत. लखनौत पोहोचण्यासाठी त्यांना हे ‘दयाशंकर’ वळण कौशल्याने पार पाडावे लागेल.

 

 

– संतोष कुलकर्णी
santosh.kulkarni@expressindia.com