राजकारणातील पुत्रप्रेम सर्वविदित असताना मुलायमसिंह बंधुप्रेमापोटी स्वत:च्याच मुलाविरुद्ध उभे ठाकल्याचे चित्र आहे. मुलायम बेभरवशाचे असल्याने त्यांच्यामधील समेटाबाबतचा अंदाज बांधणे कठीण. पण एक गोष्ट नक्की, की मुलायम भूतकाळ आहेत आणि अखिलेशसिंह भविष्यकाळ. अखिलेशांविना समाजवादी पक्षाचे भवितव्य अंधारलेले राहील.   

समाजवादी, लोहियावादी मुलायमसिंह यांच्या कुटुंबात माजलेल्या ‘यादवी’चा विस्फोट एक ना एक दिवस होणारच होता. दुसरा भाग बनविण्याच्या हेतूने एखादा हुशार दिग्दर्शक पहिल्या चित्रपटाचे शेपूट जसे मोकळे ठेवत असतो, तसे काही मध्यंतरी घडलेल्या ‘यादवी’च्या पहिल्या भागात घडले होते. वरवर टाके घालून फाटलेला समाजवादी सदरा शिवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात फाटाफुटीचीच अधिक बीजे होती. मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेले मुलायमसिंह यांचे बंधू शिवपालसिंह गप्प बसणाऱ्यातले नव्हते आणि मुलायमसिंह यांचे पुत्र व मुख्यमंत्री अखिलेशसिंह हेही काही कमी नाहीत. काकांचा त्यांनी काढलेला काटा आणि स्वत:च्या वडिलांनाच दाखवून दिलेली जागा त्यांच्यातील मुरब्बी आणि कसलेल्या राजकारण्याची झलक दाखविते. खरे तर मुलायम-शिवपाल आणि अखिलेशसिंह एकदम भिन्न व्यक्तिमत्त्वांचे. मुलायम-शिवपाल ही रांगडी जोडगोळी. जातींच्या गणितांवर हुकूमत, धार्मिक ध्रुवीकरणात माहीर आणि पसा-गुंडगिरीचा बिनदिक्कत वापर हे त्यांच्या राजकारणाचे गमक आणि यशाचे रहस्य. याउलट अखिलेश. तरुण. उत्तर प्रदेशातील नव्या पिढीला आपलासा वाटणारा चेहरा. ‘यादवनेता’ या चौकटीत अडकण्याचे कटाक्षाने टाळणारा. ‘मुल्ला मुलायम’ या सारखा धार्मिक शिक्का मारण्याची संधी कौशल्याने न देणारा. गुळगुळीत कागदांवरील चकचकीत जाहिरातींमार्फत स्वत:ची ‘आधुनिक विकासपुरुष’ अशी प्रतिमा घट्ट करण्याची धडपड करणारा. आजवर उत्तर प्रदेशाने अशा पद्धतीचे तोंडदेखले का होईना, विकासाचे राजकारण करणारा तरुण नेता पाहिलेला नाही. मुलायम आणि मायावतींच्या राजकारणाचा पाया जात आणि धर्म आहे. पण अखिलेश स्वत:चा वेगळा बाज असणारे राजकारण करू पाहतोय. म्हणून तर अखिलेशच्या नेतृत्वास पारंपरिक पद्धतीच्या बुरसटलेल्या राजकारणातील बदलाची एक प्रसन्न झुळूक मानल्यास अतिशयोक्ती होऊ नये. यामुळेच बिगरयादवांना न टोचणारा अखिलेश हा उत्तर भारतातील पहिला यादव नेता असावा. वाऱ्याची ही बदललेली दिशा समाजवादी नेत्यांना चांगलीच समजलीय. मुलायम भूतकाळ आणि अखिलेश त्यांना भविष्य वाटतोय. पुन्हा निवडून येण्यासाठी मुलायमांपेक्षा अखिलेशच्या चेहऱ्याची गरज त्यांनी ओळखलीय. म्हणून तर मुलायमसिंह यांच्या धमकीपश्चात २२७ पकी तब्बल दोनशे आमदार अखिलेशकडे गेले. पक्ष आपल्या पाठीशी असल्याचे लक्षात येताच अखिलेशनी पहिल्यांदा आपल्या वडिलांना निलंबन मागे घ्यायला लावून झुकण्यास भाग पाडले आणि नंतर ‘मागदर्शक’ बनवून थेट राजकीय वानप्रस्थाश्रमात पाठविण्याची खेळी ते खेळले. म्हटले तर हा मुलायमयुगाचा अंत आहे. तोही स्वत:च्या मुलानेच घडविलेला. पण अनेकांच्या मते, हीसुद्धा मुलायमांचीच खेळी. मुलाच्या मार्गातील काटे दूर करण्यासाठी टाकलेला धोबीपछाड डाव. बेभरवशाच्या मुलायमांचा पूर्वेतिहास तसाच असल्याने अनेकांना त्यात तथ्यदेखील वाटते. तसे असते तर मुलायमांनी लगेचच अखिलेशच्या राज्याभिषेकाला अवैध घोषित केलेच नसते आणि रामगोपाल यादवांची पुन्हा हकालपट्टी केलीच नसती. मुलायमांना कहय़ात ठेवणारे शिवपाल सहजासहजी हार मानणारे नाहीत. अशा पद्धतीची ‘एक्झिट’ स्वत: मुलायम तरी कसे मान्य करतील? ‘अडवाणी’ होऊन अडगळीत जाण्याचा पर्याय विनासंघर्ष स्वीकारण्याचा त्यांचा पिंड नाही. एकंदरीत समाजवादी पक्षाला ताब्यात ठेवण्यासाठी किंवा घेण्यासाठीची धूळवड चालूच राहील. निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले जातील. कायदेशीर लढाई खेळली जाईल. पुढील दोन-तीन दिवसांत निवडणुकीची घोषणा अपेक्षित आहे. पुढे काय वाढून ठेवलंय, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

पण एक गोष्ट नक्की. तांत्रिकदृष्टय़ा समाजवादी पक्ष कोणाकडेही राहील; पण अखिलेश हेच भविष्य असतील. जिथे जातील, तिथे भविष्य असेल. भले मग ते समाजवादी पक्षात राहोत किंवा स्वत:चा नवा पक्ष स्थापन करून आपल्याच वडिलांशी दोन हात करोत. त्यांच्याविना समाजवादी पक्षाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह राहील. उत्तर प्रदेशात त्यांनी स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित केलेय, यात अजिबात दुमत नाही.

अखिलेशच्या हातात पक्षाची सूत्रे राहिली किंवा त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केल्यास त्यांची आणि काँग्रेसची आघाडी पक्की आहे. शिवाय त्यांना अजितसिंह यांचा राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) आणि लालूप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल येऊन मिळू शकतो. मोदींच्या ताकदीचा व लोकप्रियतेचा येत नसलेला अंदाज आणि प्रारंभीच्या काळात मायावतींना मिळालेला प्रतिसाद यामुळे काँग्रेसबरोबरील आघाडीस अखिलेश पहिल्यापासूनच अनुकूल होते. धर्मनिरपेक्ष मतांचे (म्हणजे मुस्लीम) विभाजन टाळण्याचे गणित त्यामागे आहे. तोपर्यंत काँग्रेसलाही आपल्या ताकदीचा अंदाज आला होता. स्वबळाच्या पोकळ घोषणांनी तोंडावर पडू, असे लक्षात येताच काँग्रेसनेही अखिलेशना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. शिवाय राहुल गांधी यांच्याशी अखिलेशचे जुळतेही बऱ्यापकी. मध्यंतरी त्यांनी प्रियांका गांधी-वढेरा यांच्याशी गुफ्तगूही केले होते. पण काँग्रेसला बरोबर घेण्यास मुलायम तयार नाहीत. ‘आपल्या खांद्यावरून काँग्रेस पुन्हा उत्तर प्रदेशात बस्तान बसवेल. काँग्रेसचा उंट आपल्या तंबूत कशाला घ्यायचा?’ असा मुलायमांचा रोकडा सवाल आहे. पिता-पुत्रातील संघर्षांमध्ये हे एक महत्त्वाचे कारण होते. पण पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. समाजवादी पक्षातील संघर्ष कोणते वळण घेणार याचा अंदाज येत नसल्याने सर्वाच्या राजकीय संभ्रमात, विशेषत: मुस्लिमांच्या, आणखीनच भर पडलीय.

मुस्लीम आणि यादव यांचे जमविलेले ‘एम-वाय’ मेतकूट मुलायमांचा आजवरचा आधार. समजा अखिलेशने स्वत:चा पक्ष स्थापन केल्यास मुस्लीम कोणाकडे जातील? ‘मुल्ला मुलायम’ हा हिंदुत्ववाद्यांनी मारलेला शिक्का अभिमानाने मिरविणाऱ्या ‘मसीहा’ मुलायमांकडे की धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणापासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवणाऱ्या आधुनिक अखिलेशसोबत? असाच प्रश्न यादव मतांबाबतही असेल. आजवर ताकद दिलेल्या मुलायमांना वाऱ्यावर सोडून गावोगावची शक्तिशाली यादव मंडळी बिगरयादवांना चुचकारणाऱ्या अखिलेशबरोबर कितपत जातील?

पण अखिलेश यांच्याकडेच पक्षाची सर्व सूत्रे राहिल्यास काँग्रेसबरोबर आघाडी निश्चित आहे. तसे झाल्यास मुस्लीम मनांतील संभ्रम दूर झालाच म्हणून समजा. साधारणत: भाजपला हरविण्याची क्षमता असलेल्यांकडे मुस्लीम मते जातात. पण समाजवाद्यांमधील भाऊबंदकीने मुस्लीम गोंधळात पडलेत. मायावतींचा पर्याय आहे त्यांच्यापुढे आणि स्वत: मायावतीही त्यांच्यामागे धावताहेत. दलित मतपेढीवर राज्य जिंकता येत नसल्याची जाणीव मायावतींना आहे. विजयी समीकरणासाठी दलित मतपेढीला उच्चवर्णीय किंवा मुस्लिमांची जोड अत्यावश्यक आहे. पण उच्चवर्णीय भाजपकडे झुकल्याने मायावतींना मुस्लिमांशिवाय पर्याय नाही. म्हणून तर त्या समाजवादी पक्षातील फाटाफुटीकडे डोळा लावून बसल्या आहेत. पण अखिलेश यांनी पक्ष ताब्यात घेतल्यास मायावतींचे मनसुबे उधळले जाऊ शकतात. त्यातच नोटाबंदीने त्यांचे आíथक कंबरडे अगोदरच मोडलंय. ना ‘माया’, ना मुस्लीम.. अशा दुहेरी अडचणीतून त्या सध्या जात आहेत. पण मुलायमविरुद्ध अखिलेश असा पिता-पुत्रामध्ये अभूतपूर्व संघर्ष रंगल्यास मायावती पुन्हा स्पध्रेत येऊ शकतात किंवा काँग्रेसने अचानकपणे आघाडी केल्यासही मायावतींचे स्थान बळकट होऊ शकते. अखिलेशला प्राधान्य देतानाच काँग्रेसने मायावतींचाही पर्याय खुला ठेवला आहे. मायावतींमुळे काँग्रेसला पंजाबातही फायदा होऊ शकतो.

भाजपचीही स्थिती मायावतींप्रमाणेच आहे. अखिलेशनी स्वत:चा पक्ष स्थापन केल्यास भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटतील. कारण मुस्लीम व यादवांमधील फाटाफुटीचा फायदा फक्त भाजपलाच होईल. पण तसे न घडल्यास भाजपला हात चोळत बसावे लागेल बिहारप्रमाणे. समाजवादी पक्ष व काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्यास यादव, मुस्लीम मतपेढीमध्ये काँग्रेसमुळे काही उच्चवर्णीय व दलित मतांची भर पडू शकते. त्यास्थितीत जिंकण्यासाठी भाजपला बिगरयादव ओबीसी आणि दलितांना आपल्याकडे वळवावे लागेल. म्हणून मायावती जितक्या कमजोर होतील, तितका भाजपला फायदा होईल. नाही तरी त्यांच्याकडील दलित मतपेढीसाठी भाजपने जंगजंग पछाडलेले आहेच. आणखी एक गोष्ट भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे ती म्हणजे नोटाबंदीचा मागे पडणारा विषय. समाजवादी कोलाहलात नोटाबंदीचा मुद्दा जणू काही गडपच झालाय. लांबच लांब रांगांनी भाजपची काही खैर नसल्याचे सांगितले जात होते. स्वत: भाजप खासदारांनाही तीच भीती वाटत होती. पण सध्या परिस्थितीही बरीच सावरलीय आणि समाजवादी नाटय़ात तो विषयही मागे पडला.

चौरंगी लढतीमुळे उत्तर प्रदेशातील चित्र आजतागायत धूसर होतेच. त्यात ‘यादवी-२’ची भर पडल्याने संभ्रमांचे अनेक रंग भरलेत. बाप-लेकातील संघर्ष पेटेल की सर्वानाच धक्का देत पुन्हा सलोख्याचे नाटक केले जाईल, या लाखमोलाच्या प्रश्नाचे उत्तर या घडीला कोणाकडेच नाही. म्हणून तर ‘पिक्चर अभी बाकी है दोस्त..’ हेच खरे.