बहुमताला बहुसंख्याकवाद समजून उत्तर प्रदेशची सूत्रे योगी आदित्यनाथांसारख्या अखंड विद्वेषकारी व्यक्तिमत्त्वाकडे देण्याचा निर्णय नरेंद्र मोदी व अमित शहांनी घेतलाय. त्यावरून गहजब उडणे स्वाभाविक आहे; पण २०१९ वर डोळा ठेवून कमालीच्या थंडपणाने खेळलेला तो पद्धतशीर ‘गेम प्लान’ आहे.. 

उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहांची ‘११, अशोका रोड’ या मुख्यालयात पत्रकार परिषद होती. भाजपच्या अभूतपूर्व यशाचे कोडे सर्वाना सतावत होते. सरकारविरोधी जनमत, धार्मिक ध्रुवीकरण, प्रचारयंत्रणा आदी विजयाचे घटक होतेच; पण मिळालेला कौल यापेक्षा आणखी काही तरी कारण असल्याचे सांगत होता. शहांनी ते कारण सांगितले. देशातील गरीब आणि नरेंद्र मोदी यांच्यामधील अतूट नात्याचा ल्युटेन्स दिल्लीला अंदाज आलेला नसल्याचे विश्लेषण ते करीत होते. मुस्लीमबहुल मतदारसंघांमधील भाजपच्या विजयाकडे बोट दाखवीत ते सांगत होते की, उत्तर प्रदेशातील मतदार हिंदू-मुस्लीम मानसिकतेतून कधीच बाहेर पडलाय. आता या सभागृहातील मंडळींनी (म्हणजे माध्यमांनीही) त्या मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे. त्यांच्या तोंडी कामगिरीआधारित राजकारणाची (पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स) भाषा होती. नवा मुख्यमंत्री ‘योग्यतेच्या आधारा’वर निवडणार असल्याचे ते सांगत होते. दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी ‘न्यू इंडिया’ची भाषा केली. बहुमताने नव्हे, तर सर्वमताने – सहमतीने सरकार चालविण्याचे त्यांचे शब्द होते. विजयानंतर माणूस नम्र होतो, असे म्हणतात. त्या दिवशीचे मोदींचे भाषण त्या पठडीतील होते.

..पण मोदी आणि शहांचे ते शब्द शनिवारी सायंकाळी फसवे बुडबुडे वाटले. पाच वेळा खासदार बनलेल्या योगी आदित्यनाथांच्या हाती उत्तर प्रदेशची सूत्रे देण्याचा त्यांचा धक्कादायक निर्णय सर्वाना कात्रजचा घाट दाखविणारा होता. गोरखपूर मठाचे महंत असलेले आदित्यनाथ कडव्या, विद्वेषी हिंदुत्वाचे ‘पोस्टरबॉय’. त्यांची धगधगती भाषणे ऐकून एक तर चेतविलेल्या भावना चरणसीमेला पोहोचतात किंवा थरकाप तरी उडतो. ‘कैरानाचे काश्मीर होऊ देणार नाही’, ‘एका हिंदूला मुस्लीम केल्यास शंभर मुस्लिमांचे धर्मातर करू’, ‘योगाला विरोध करणाऱ्यांनो पाकिस्तानात जा’.. यांसारख्या भडकावू भाषणांच्या फैरीच ते झाडत असतात. देशातील सर्वात मोठय़ा राज्याचे नेतृत्व सोपविण्याएवढी कोणती ‘योग्यता’ मोदी-शहांनी या व्यक्तीमध्ये शोधली असावी? ‘सॉफ्ट हिंदुत्वा’ची अजिबात अ‍ॅलर्जी नसणाऱ्या मध्यमवर्गीयांनासुद्धा जर योगींबद्दल धाकधूक वाटू शकते, तर सुमारे वीस टक्के मुस्लिमांच्या मनांमध्ये टोकाची भीती निपजणारच. एकपंचमांश समाजघटक भीतीखाली, दडपणाखाली राहणार असेल तर ‘सब का साथ, सब का विकास’ कसा काय साध्य होईल? गुजरात दंगलींचा डाग असणाऱ्या मोदींच्या उदयानंतर राम मंदिरासाठी रथयात्रा काढणारे आणि बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले लालकृष्ण अडवाणी मवाळ वाटत आहेत. पण आता योगींच्या उदयानंतर दस्तुरखुद्द मोदीसुद्धा मवाळ वाटू लागलेत.. अवघ्या ४४ वर्षांच्या योगींचे व्यक्तिमत्त्व इतके तालेवार, दुधारी आणि विभाजनकारी आहे! गोरखपूरमधील त्यांची समांतर सत्ता ही त्यांच्या ‘कर्तृत्वा’ची साक्ष. गोरखपूरला फक्त दोनच गोष्टी थांबवू शकतात. एक म्हणजे आदित्यनाथ किंवा ‘जापनीज इन्सेफालिटीज’ हा संसर्गजन्य रोग.. असे उगीचच नाही म्हटले जात.

मुख्यमंत्रिपदासाठी घेतल्या जात असलेल्या दहा-बारा नावांमध्ये योगींचेही नाव होतेच. त्यासाठी त्यांच्या समर्थकांचा जोरदार दबाव होता. पण त्यांची निवड खचितच दबावापोटी झालेली नाही. त्यांच्यासारख्या अक्राळविक्राळ चेहऱ्याचा मतांपुरता वापर करून घेणे वेगळे आणि अभूतपूर्व यश मिळाल्यानंतरसुद्धा त्यांनाच उत्तर प्रदेशचा चेहरा बनविणे वेगळे. त्यामुळे त्यांचे नाव चघळायला चांगले; पण प्रत्यक्षात त्यांची निवड होणार नसल्याचा सर्वाचाच होरा होता. पण मोदी आणि शहांनी सर्वानाच पुन्हा चकवा दिला.

मोदींच्या खेळींचा अंदाज बांधणे खरोखरच अवघड. भाजपच्या ‘डीएनए’त हिंदुत्व आहे. सौम्य वाजपेयींमुळे त्याला एक प्रकारची मध्यममार्गी झालर लागायची. पण सध्याचा भाजप मोदी आणि शहांचा. मोदी काही वाजपेयी नाहीत. एक तर माझ्या बाजूने, नाही तर थेट विरोधात असा त्यांचा खाक्या. ठरावीक साच्याच्या ‘मळलेल्या वाटे’वरून जातीलच किंवा ‘पोलिटिकली करेक्ट’ वागतीलच, याचा भरवसा नाही. पण सर्व निर्णय कमालीच्या थंड डोक्याने.  विरोधकांना अंदाज येण्यापूर्वीच चार पावले पुढे. प्रचाराचा अजेंडा स्वत: ठरविणारे आणि इतरांना प्रतिक्रियावादी बनविणारे. योगींची निवड त्या कमावलेल्या प्रचारकौशल्याचा सर्वोच्च आविष्कार. लक्ष्यभेदी कारवाई आणि नोटाबंदीचा निर्णय ही त्याची यापूर्वीची उदाहरणे.

स्वाभाविकपणे योगींच्या निवडीने एकच गहजब माजला आहे, पण त्याची फिकीर मोदी-शहा कशाला करतील? कारण सोपे. योगींवरून आता अरण्यरुदन करतील, अशांनी भाजपला मते दिलेली नाहीत. ज्यांनी मते दिलीत, ते एक तर खूश आहेत किंवा निष्कर्षांवर उडी मारण्यापूर्वी योगींना काही वेळ देण्याची त्यांची तयारी असल्याचे भाजपचे समीकरण आहे. म्हणूनच ज्यांची मते नाहीत, त्यांची फिकीर मोदी-शहांना नाही. एकदम रोकडा व्यवहार. ही टिपिकल व्यापारी मानसिकता. सहमतीची भाषा पोपटासारखी बोलायला ठीक; पण व्यवहारात पक्का हिशेबीपणा. म्हणून तर होणाऱ्या टीकेची पूर्ण कल्पना असतानाही मोदींनी योगींना राजयोगी बनविले आणि एकाच दगडात अनेक पक्षी मारले. वय योगींच्या बाजूने आहे, संन्यासी असल्याने व्यक्तिगत स्वार्थाची शक्यता कमी. परिणामी तुलनेने भ्रष्टाचारमुक्त शासन देण्याची शक्यता वाढते. जोडीला २४ तास झोकून देण्याचा स्वभाव आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची लोकप्रियता या सगळ्या योगींच्या जमेच्या बाजू. याउपर त्यांच्या निवडीमधील सणसणीत संदेशाने संघ परिवारातील कडवे घटक एकदम खूश. उत्तर प्रदेशातील कौल सकारात्मक असल्याचे अनेकांना वाटत असले तरी प्रत्यक्षात ही गेल्या दोन-तीन दशकांतील मुस्लीम तुष्टीकरणाविरोधातील टोकदार प्रतिक्रिया आहे, असा निष्कर्ष भाजपने काढला. त्यामुळे योगींची निवड तात्कालिक नाही. ती हिंदू बहुसंख्याकवादाला जाणीवपूर्वक खतपाणी घालणारी आहे. २०१९ वर डोळा ठेवून केलेला तो पद्धतशीर ‘गेम प्लान’ आहे. एकाही मुस्लिमाला उमेदवारी न देऊन या ‘गेम प्लान’ची चुणूक दाखविली होती. पण तेव्हा त्यामागचा ‘व्यापक अर्थ’ कोणाच्या लक्षात आला नव्हता.

भाजपचे यश पाहून विरोधक हेवेदावे विसरून एकत्र येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने तर बिहारच्या धर्तीवर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षाला घेऊन महाआघाडीचे प्रयत्न चालू केलेत. मोदींच्या धसक्याने अखिलेशसिंह यादव व मायावती ही ‘बबुआ’ आणि ‘बुआ’ची जोडी एकत्र आलीच तर उत्तर प्रदेश कदाचित बिहारच्या मार्गाने जाऊ  शकतो. ही शक्यता एकदम ठाशीव आहे. म्हणून तर तिला प्रत्युत्तर देण्यासाठी योगींची नियुक्ती असावी. कारण त्यांच्या नुसत्या व्यक्तिमत्त्वाने, नुसत्या उपस्थितीनेसुद्धा धार्मिक ध्रुवीकरणाची शक्यता कैकपटींनी वाढते. नेमके हेच भाजपला अपेक्षित असावे. कारण महाआघाडीशी दोन हात करताना नुसता विकासाचा अजेंडा सत्तेपर्यंत पोहोचण्यास पुरेसा नसल्याचे भाजपने चाणाक्षपणे हेरले आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील जनतेच्या मोठय़ा अपेक्षांचे ओझे २०१९ पर्यंत पेलता येणे अशक्य असल्याची कबुलीही आहे. म्हणून मग विकासकामांपेक्षा भावनिक व धार्मिक राजकारणाचा मार्ग सोपा. योगींची निवड तीच रणनीती अधोरेखित करते. याशिवाय मोदी कदाचित उत्तर प्रदेशच्या आणखी विभाजनाचा ‘मास्टरस्ट्रोक’ही खेळू शकतात. उत्तर प्रदेशचे चार भाग केले की अखिलेशसिंह फक्त अवधपुरतेच मर्यादित राहतील, मायावतींचे अस्तित्व फक्त पश्चिम उत्तर प्रदेशापुरतेच राहू शकते. मग योगी पूर्वाचलचे, उमा भारती बुंदेलखंडच्या, केशवप्रसाद मौर्य किंवा दिनेश शर्मा अवधचे आणि संजीव बालियान पश्चिम उत्तर प्रदेशचा चेहरा असू शकतात. मोदी हा डाव जरूर खेळू शकतात.

मोदींनी आपल्या ‘ब्रँड’मध्ये विकास आणि ‘सॉफ्ट’ हिंदुत्वाचे बेमालूमपणे मिश्रण केले होते; पण योगींच्या निवडीने तो मुखवटा गळून पडला. म्हणून तर योगींच्या निवडीमध्ये ‘मेथड इन मॅडनेस’ असली तरी तो विस्तवाशी खेळ आहे. लोकसभेत ८० सदस्य पाठविणाऱ्या राज्यात खेळलेला जुगार आहे. नोटाबंदीचा जुगार निवडणुकीत यशस्वी ठरल्याने वाढलेल्या धारिष्टय़ातून योगींना आणले गेले, पण जुगाराचा डाव प्रत्येक वेळी यशस्वी होतोच, असे नाही. बोटे भाजू शकतात. योगींच्या प्रत्येक गोष्टींवर माध्यमांचे बारीक लक्ष असेल. विरोधक टपून बसलेले असतील. आतापर्यंत त्यांच्या जहाल भाषेकडे दुर्लक्ष केले गेले. पण मुख्यमंत्रिपदी असताना प्रत्येक शब्द तोलूनमापून बोलावा लागेल. सत्ता स्थापनेनंतर त्यांच्या तोंडी ‘सब का साथ, सब का विकास’ हे शब्द आले. पण त्यांच्यासारख्या बेफाम व्यक्तीला संयमाचे हे ढोंग कितपत जमेल? त्याकामी  मोदींसारखे कौशल्य मिळविण्यास त्यांना बराच वेळ लागेल. तोपर्यंत ढोंगाचा मुखवटा टराटरा फाटण्याची शक्यता अधिक. जुगार खेळला आहे खरा, पण त्याची एक किंमत आहे आणि ती चुकविण्याची तयारी मोदी, भाजपला ठेवावी लागेल. बहुमताला बहुसंख्याकवाद समजण्याचा हा काळ आहे. पंतप्रधानांच्या स्वप्नातील ‘न्यू इंडिया’ची संकल्पना अद्याप स्पष्ट व्हायची आहे; पण योगींच्या निवडीने ‘न्यू भाजप’चे रंगरूप ठाशीवपणे समोर आले आहे..

 

संतोष कुलकर्णी

santosh.kulkarni@expressindia.com