विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वगुण रुजावा, याकरता शाळा-महाविद्यालयांत जरूर प्रयत्न होताना दिसतात. मात्र, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष दिले जातेच असे नाही. म्हणूनच मुलांमध्ये संवादकौशल्य विकसित करायचे असल्यास सर्वाधिक जबाबदारी ही पालकांची, भोवतालच्या समाजाची आणि प्रसिद्धीमाध्यमे यांची असते. कारण आपण जसं ऐकतो तसंच बोलतो.

खरेतर शाळेच्या प्रवेशापासून या कौशल्याची चाचणी सुरू होते. कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे. प्रश्न, शंका विचारणं, उत्तर देणं, मुलाखत, तोंडीपरीक्षा, प्रकल्प सादर करणं, चर्चा, परिसंवाद, स्पर्धेत भाग घेणं, नवे मित्र जोडणं-जोडलेले टिकवून ठेवणं या सगळ्यांतून मुलाचं संवादकौशल्य अजमावलं जात असतं.. वृद्धिंगत होत असतं.
पालकांनी मुलांसोबत सतत संवाद साधणे हा त्यांना मूलभूत संवादकौशल्य शिकवण्याचा उत्तम मार्ग आहे. मृदू आवाजात मुलांशी जाणीवपूर्वक बोलणं, त्यांना बोलतं करणं हा मुलांना उत्तम संभाषण कौशल्य शिकवण्याचा पाया आहे. मुलांना त्यांचे विचार, त्यांची मतं, त्यांच्या कल्पना आत्मविश्वासाने मांडायला शिकवणं हे पालकांचं ध्येय असायला हवं.
सर्वप्रथम मुलांना समोरच्याशी नजर देत संवाद साधायला शिकवणं आवश्यक आहे. ज्याच्याशी बोलायचंय त्याच्याशी थेट नजर मिळवत बोलण्यातून, त्याच्याशी बोलण्यात तुम्हाला असलेलं स्वारस्य आणि आदर दिसून येतो. समोरच्याकडे न बघता बोललात तर तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधण्यात स्वारस्य नाही हे स्पष्ट होतं आणि हे शिष्टाचारालाही धरून नसतं, हे मुलांना कळायला हवं.
मुलांनी स्पष्ट तसेच व्याकरणशुद्ध बोलण्याचा आग्रह पालकांनी धरायला हवा. मुलं कशी बोलतायंत याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं आणि त्यांच्या चुका मृदू आवाजात सांगून त्यांनी त्या दुरुस्त करायला हव्या. मुलांच्या चुका इतरांसमोर त्यांना सांगू नये, त्यामुळे त्यांना कानकोंडं होऊन त्यांचा बोलण्याचा आत्मविश्वास ढळू शकतो.
मुलं बोलत असताना त्यांना मध्येच तोडू नये, तसेच मुलांना शिकवायला हवं की कुणी बोलत असताना त्यांना वाटलं म्हणून बोलणाऱ्याचं बोलणं अडवत मध्येच बोलू नये. मुलांना स्व-नियंत्रणाचं महत्त्व कळायला हवं. जेव्हा इतरांचं तोडत मुलं मध्येच बोलतात, तेव्हा पालकांनी आपलं बोलणं पूर्णपणे थांबवत तुझी वेळ आली की बोल, असे ठामपणे सांगायला हवे आणि नंतर उर्वरित बोलणे राहिलेल्या मुद्दय़ापासून सुरू करावे.
पालकांनी मुलांचे लक्षपूर्वक ऐकणे आणि त्यांच्या बोलण्यावर त्यांना योग्य प्रतिक्रिया देणे ही मुलांना श्रवणकौशल्ये आणि पर्यायाने संवादकौशल्ये शिकवण्याचे उत्तम पर्याय आहेत. मुलं बोलत असताना त्यांचे लक्षपूर्वक ऐकून त्यांच्या बोलण्यावर त्यांना योग्य प्रश्न विचारणे आणि मुलांना त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची मुभा देणे हे पालकांनी अवश्य करावे.
सुरू असलेल्या संवादात कसा प्रवेश करावा, हे मुलं पालकांच्या बोलण्यातून शिकतात. बोलत असलेल्या ग्रुपचे आधी शांतपणे ऐकावे, आपण बोलण्याऐवजी समोरच्याचे म्हणणे ऐकून घ्यावे, चेहऱ्यावर हास्य ठेवीत तसेच माना डोलावत समोरच्याचे बोलणे ऐकत असल्याचे दर्शवणे आवश्यक असते याबाबत मुलांना कल्पना द्यावी.
संवाद अत्यंत निखळ आनंदाने साधला जायला हवा, हे मुलांना कळले पाहिजे. संभाषणातून काढता पाय घेणे हेही शिष्टाचाराचे लक्षण आहे. या गोष्टी पालकांनी मुलांना शिकवाव्यात.
प्रत्यक्ष संवाद साधताना देहबोलीबाबतही मुलांना प्रशिक्षण मिळायला हवे. समोरची व्यक्ती बोलत असताना चेहऱ्यावर तुसडे हावभाव असणे, मुद्रा त्रासदायक असणे, समोरच्याचं ऐकताना जांभई देणे, समोरच्याकडे पाठ फिरवणे, नखं कुरतडणे या गोष्टी टाळायला हव्या, हे मुलांना कळायला हवे.
आज उत्तम संवाद साधता येणे अत्यावश्यक बनले आहे. मृदूपणे आणि परिणामकारक संवाद कसा साधावा याकरता मुलांना पालकांचे मार्गदर्शन आवश्यक ठरते. उत्तम श्रवणकौशल्य, स्वनियंत्रण, व्याकरणशुद्ध बोलणे आणि संवेदनशीलता या सर्व गोष्टी उत्तम संवादासाठी आवश्यक ठरतात आणि या गोष्टी मुलांना सहज शिकणे शक्य आहे. यामुळे मुलांना संभाषण कौशल्य शिकता येतील जी त्यांना भावी आयुष्यात कायमच उपयोगी ठरेल.

Why is mobbing experienced again and again in universities
विद्यापीठांमध्ये पुन्हा पुन्हा झुंडशाही का अनुभवाला येते आहे?
teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी