News Flash

प्रगती म्हणजे गुणवृद्धी

अनेक जण करिअरमधील विकास अथवा वाढीचा थेट संबंध केवळ पदोन्नती अथवा वेतनवाढीशी जोडतात.

| August 19, 2015 04:08 am

अनेक जण करिअरमधील विकास अथवा वाढीचा थेट संबंध केवळ पदोन्नती अथवा वेतनवाढीशी जोडतात. मुदलात तुमचा विकास हा केवळ मिळकतीच्या स्वरूपात मोजणे साफ चुकीचे आहे. उलटपक्षी, नवी कौशल्ये शिकणे, नव्या जबाबदाऱ्या पेलणे म्हणजे करिअरमधला विकास असे मानायला हवे. नवी कौशल्ये शिकण्याची तुमची क्षमता आणि या कौशल्यांचा तुम्ही कामात केलेला प्रत्यक्ष वापर म्हणजेच तुमचे प्रगतिपथावर असणे! करिअरमधील उन्नती म्हणजे खरे तर काम करताना तुमची बुद्धिमत्ता आणि तुमच्या दृष्टिकोनाची छाप त्या क्षेत्रावर उमटवणे!
प्रगती अर्थात..
काम करताना नवी आव्हानं आणि नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळणं.
व्यक्तिमत्त्व चौफेर विकसित करण्याचा प्रयत्न करणं.
व्यवस्थापकीय कौशल्यं आत्मसात करण्याची क्षमता बाणवणं.

वाढीचे टप्पे
आपल्या करिअरमध्ये प्रगती साधण्यासाठी काय करावं लागेल, याची खरं तर प्रत्येकालाच अचूक कल्पना असते. मात्र, अनेकदा वेळेचा अभाव अथवा इतर कुठल्या कारणापायी अधिकचे प्रयत्न करायचे राहून जातात.

कधी कधी जे काम करतो, त्यात आपण अडकून राहतो किंवा सवयीमुळे करतोय, त्यात सुरक्षितता वाटू लागते. त्यापल्याड झेपावण्यात जोखीम वाटते. मात्र, ही जोखीम स्वीकारणे म्हणजे प्रगतिपथावर वाटचाल करणे.
वर्षांनुर्वष तेच काम केल्याने अनुभव मिळतो खरा, मात्र या कामात आपण काही अधिकच्या मूल्यांची भर घालत आहोत का, याकडेही लक्ष द्यायला हवं.
तुम्ही जे काम करता आणि आपल्या कामाद्वारे तुम्ही जे बदल घडवून आणता, त्याविषयी सातत्याने क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा करीत राहा. त्यांचे दृष्टिकोन समजून घ्या. आवश्यकता भासल्यास तुमच्या कामात सकारात्मक बदल करा.
तुमच्या वरिष्ठांशी तुमच्या करिअरसंदर्भातील आकांक्षा, कामाचे स्वरूप आणि व्यावसायिक उद्दिष्टं यांच्याविषयी चर्चा करा. यशाची गणना कशी करावी, याविषयी सल्लामसलत करा.
प्रत्येक वर्षी तुमच्या कामाचं मोजमाप करणाऱ्या परफॉर्मन्स अप्रेजलमध्ये तुमच्या आवडीनिवडी आणि ध्येय नमूद करण्यास विसरू नका.

विकासाचे मोजमाप

पुढील दोन-तीन वर्षांत कुठली व्यावसायिक नोकरी अथवा पदांची वाढ मिळावी याचा आराखडा तुमच्या मनात निश्चित असायला हवा.
व्यावसायिक कामांत अथवा करिअरमध्ये प्रगती साधण्यासाठी कुठले स्रोत तुमची मदत करतील, हे लक्षात घ्या.
सध्या तुम्ही जे काम करीत आहात, त्या तुमच्या कामगिरीत सुधारणा होण्याकरता तुम्ही काय प्रयत्न करत आहात, हे ध्यानात घ्या.
तुमच्या कामातील प्रगतीबाबत तुमच्या वरिष्ठांशी चर्चा करा. चर्चा करताना त्यातील मुद्दय़ांबाबत लवचीक असा. समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्या. कदाचित त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला नवे दृष्टिकोन समजू शकतील.
करिअरमध्ये प्रगती साधण्यासाठी त्या संबंधातील नवे अभ्यासक्रम शिकणं अथवा प्रशिक्षण पूर्ण करणं आवश्यक आहे.

करिअरसाठी हे कराच!

करिअरमध्ये तुम्ही प्राप्त करीत असलेल्या नवनव्या गोष्टी इतरांशी शेअर करा. तुमचे नवनवे प्रकल्प, उद्दिष्टे आणि कमावलेलं यश याद्वारे तुमच्या करिअरमधील वाटचाल आणि प्रगती यांचं मोजमाप होतं.
तुम्ही बजावलेल्या कामगिरीचा तुमच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना लाभ होईल याकडे लक्ष द्या. तुमच्या योगदानामुळे जर त्या क्षेत्रात काम करणाऱ्या इतरांना मदत होत असेल तर ते दखलपात्र ठरतं. उदा. जुन्या समस्येवर नव्या तंत्राचा उतारा तुम्ही शोधणं, खर्च कमी करणारी तुमची योजना.
तुम्हांला भोवतालचं जग बदलवणं शक्य नसतं. मात्र, भोवतालच्या वातावरणाला प्रतिसाद कसा द्यायचा ते मात्र सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असतं. तुमचा प्रतिसाद म्हणजे तुमच्या व्यक्तिगत उन्नतीची संधी असते, हे लक्षात घ्या.
जेव्हा तुम्हाला असुरक्षित वाटेल तेव्हा ती परिस्थिती म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य जपण्याची संधी आहे असे माना.
तुमच्या उत्पादनक्षमतेत वाढ करा. तुम्हाला जेव्हा खूप काही मिळवायचं असतं तेव्हा तुमच्या उत्पादनक्षमतेत आपोआप वाढ होते.
सलग काम केल्याने उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. लहान ब्रेक तुमच्या शरीराला आणि मनाला ताजंतवानं करतात.
अहंकाराला थारा न देता तुमच्या मनात डोकावणाऱ्या शंका, प्रश्न हे वरिष्ठांना, जाणकारांना विचारा.
प्रत्येक गोष्टीवर तुमच्याकडे उत्तर तयार असणं अपेक्षित नाही, तर ते कसं शोधता येईल हे माहीत असणं आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं हे तुमच्याकडून अपेक्षित असतं.
नव्या नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.
वाढणं अथवा विकसित होणं हे केवळ तुमच्या व्यावसायिक कारकीर्दीशी संबंधित नाही तर ही प्रगती एकुणातच म्हणजेच तुमचा शारीरिक-मानसिक फिटनेस, तुमचे व्यक्तिगत छंद, नातेसंबंध याविषयीही असू शकते.
नवनव्या गोष्टी शिकणं, नवी आव्हानं पेलणं आणि बदलांशी वेगाने जुळवून घेणं हीदेखील प्रगतीचीच लक्षणं आहेत.
अनुभवातून शिका.
दिवसाअखेरीस काही मिनिटं आपण दिवसभरात काय उत्पादनक्षम काम केलं,याविषयी विचार करा. जे उत्तर मिळेल त्यातून तुम्ही कृतियोजना नक्की करा.
तुमच्या व्यक्तिगत उन्नतीसाठी प्रत्येक दिवस हा नव्या संधी घेऊन येतो,यावर विश्वास ठेवा.

करिअरविषयक योजना हवी
बरीच वर्षे काम करूनही आपण करिअरमध्ये कुठेच पोहोचलेलो नाही अथवा आपलं करिअरमधील स्थानच डळमळीत झालंय, असं एके दिवशी लक्षात येणं ही गोष्ट कुणासाठीही निश्चितच आनंददायक नाही. कधी कधी तर साधेसोपे भासणारे टप्पे पार करणेही कठीण जातं. यामागचं कारण म्हणजे करिअरच्या वाटचालीमध्ये पूर्वविचार आणि प्रयत्न आवश्यक असतात. म्हणूनच करिअरविषयी ठोस योजना तुमच्यापाशी तयार हवी. त्या बळावर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप काही साध्य करू शकता..

कुठे पोहोचायचं आहे? –
करिअरमधील अल्पावधीचे अथवा दीर्घ उद्दिष्ट निश्चित करा. वर्षभरात तुम्हाला किती प्रगती करायची आहे, पुढच्या पाच ते दहा वर्षांत तुम्हाला कुठवर पोहोचणे अपेक्षित आहे, याबाबत तुमचा विचार सुस्पष्ट हवा.

उद्दिष्ट प्रेरणादायी हवे-
केवळ काहीतरी ध्येय ठरवायचं, म्हणून ध्येय ठरवू नका किंवा इतरांना तसं वाटतं म्हणून ते स्वीकारू नका. निश्चित केलेल्या उद्दिष्टाप्रती पोहोचण्याकरता तुम्ही सातत्याने प्रयत्नशील असायला हवं. कुठल्या दिशेने जायचे आहे, याबाबत स्पष्टता असली की प्रवास सोपा होतो.
क्षमता बाणवा-
तुम्ही आता जे काम करत आहात आणि दोन वर्षांनी तुम्हाला जिथे पोहोचायचे आहे, त्यामधील तुमच्या क्षमतेविषयीची जी दरी आहे, ती भरून काढण्यासाठी काय करावे लागेल, याचा विचार तुम्ही करायला हवा आणि ती क्षमता जोपासण्यासाठी प्रयत्नही करायला हवा.
स्वविकासाची योजना-
एकदा का उद्दिष्ट ठरवलं की कुठल्या क्षमतांचा विकास करायचा आहे,  त्या कौशल्यांविषयी सखोल माहिती मिळवा. त्याकरता तुमच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढा.
योजनेचा पाठपुरावा-
योजनेनुसार गोष्टी नीट घडत आहेत ना, याचा मागोवा वर्षांतून दोनदा तरी घ्यायला हवा.यामुळे आपल्या योजनांवर लक्ष केंद्रित करणं सुलभ होतं.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 4:08 am

Web Title: for your career growth
Next Stories
1 अभ्यास करावा नेटका
2 नावीन्याचा विकास
3 सृजनशिलतेची सुरुवात
Just Now!
X