News Flash

स्तुती  आणि  कृती

समज-उमज एखादी गोष्ट हातात घेतली आणि ती जमली, की आपल्याला सगळ्यांनाच छान वाटतं. पाठीवर पडलेली कौतुकाची थाप, स्तुतीचे चार शब्द आपल्या सगळ्यांनाच सुखावून जातात, त्यातून

| August 19, 2015 04:11 am

समज-उमज
एखादी गोष्ट हातात घेतली आणि ती जमली, की आपल्याला सगळ्यांनाच छान वाटतं. पाठीवर पडलेली कौतुकाची थाप, स्तुतीचे चार शब्द आपल्या सगळ्यांनाच सुखावून जातात, त्यातून नवा हुरूप येतो. मुलं वाढत असताना तर ही कौतुकाची थाप फारच मोलाची भूमिका बजावत असते. याची खूप वेगवेगळी रूपं मुलं आणि पालकांबरोबर काम करताना पाहायला मिळतात.
काहीतरी छान केलं की गुड बॉय (किंवा गर्ल..) हे शब्द आता अगदी निमशहरी ठिकाणीही स्थिरावले आहेत. अशी शाबासकी ऐकत अनेक मुलं मोठी होत असतात. मात्र मुलं जरा मोठी झाली की अनेक आईबाबांकडून एक तक्रार कायम ऐकू येते, ‘अगदी लहान असताना  ‘‘तू गुड बॉय आहेस ना’’, असं म्हटलं की काहीही सांगितलं तरी मुलं नीट ऐकायची. पण आता काही फरक पडत नाही त्यांना! ‘अगदी ‘‘तू तर आता बॅड बॉय झाला आहेस’’, असं म्हटलं की एकतर दुर्लक्ष करतात, किंवा ‘‘हो, आहेच मी बॅड बॉय!’’, असं म्हणतात.असं का होतं? या कौतुकाच्या शब्दांना दोन पलू असतात, एक म्हणजे ‘बोलणाऱ्याचे’ शब्द, आणि दुसरा पलू म्हणजे ‘मुलाने लावलेला’ त्याचा अर्थ. ‘गुड बॉय’सारखे शब्द ‘व्यक्ती’ म्हणून मुलाला जोखतात, त्याचं मूल्य ठरवतात. ऐकायला काही क्षणांसाठी मुलाला ते चांगलंही वाटतं. पण अमुक एक केलंस म्हणजेच तू चांगली व्यक्ती होतोस, असा काहीसा त्यातला अर्थ मुलाला जाणवतो. आणि त्यातूनही गंभीर बाब म्हणजे ‘हे नाही केलंस तर तू चांगली व्यक्ती नाहीस’ हा त्यातून निघणारा छुपा निष्कर्ष.यातून स्वत:बद्दल चांगलं वाटण्यासाठी दुसऱ्यांकडून सतत मान्यता मिळायची गरज निर्माण होते.  मुळात कुणी सर्वगुणसंपन्न नसतं. त्यामुळे एखादी व्यक्ती पूर्णपणे चांगली किंवा वाईट असं काही नसतं. अयोग्य असतीलच तर त्या आपल्या काही कृती. पण ‘गुड’, ‘बॅड’सारखे शब्द या संकल्पनेलाच धुडकावतात. म्हणूनच एका वयानंतर मुलं या शब्दांना फारशी जुमानत नाहीत. ‘गुड’ असण्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी त्यांना जाचायला लागतात. आपले बरेचसे सामाजिक संकेतही तसे गोंधळवणारे असतात. उदाहरणार्थ वडिलधाऱ्यांचा आदर करणं. पण कुटुंबातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती मुलांशी टाकून बोलणारी, चिडवणारी असेल तर अगदी लहान वयातही मुलांना ते जाणवतं. पण या वयात ‘गुड’ असण्याचं पारडं जड असतं, त्यामुळे नाइलाजाने का होईना, मुलं अशांचा आदर करतात. मात्र मुलं मोठी होऊ लागतात तसं ते आणखीनच बोचायला लागतं. थोडा स्वत: विचार करता यायला लागला की मग ‘स्वत:ला काय वाटतं’ हे जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि घरी ‘गुड’, ‘बॅड’ छापाचं वारंवार बोललं जात असेल तर हे नाणं एव्हाना घासून घासून पार गुळगुळीत झालेलं असतं.त्यामुळे मुळात कौतुक करताना आपण काय शब्द वापरतो याचं भान असणं खूप महत्त्वाचं असतं. अशा वेळी त्या प्रसंगाचं किंवा गोष्टीचं वैशिष्टय़ सांगणं, किंवा मुलांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल बोलणं, स्वत: पालकांना काय वाटतं आहे हे सांगणं, त्यातून आपल्याला मदत होणार असेल तर त्याबद्दल काही सांगणं – अशा प्रकारे बोललं, तर यातून कौतुकाचा रोख त्या गोष्टीवर / कृतीवर राहतो, व्यक्तीवर नाही. कसं ते पाहूया.आपण बाहेरुन थकून आल्यावर मुलाने न सांगता पाणी आणून दिलं, तर ‘खूप दमले होते, पण लगेच पाणी दिलंस, छान वाटलं’, असं सांगता येईल. यात आपल्यासाठी मुलाच्या ‘कृतीचं’ महत्त्व काय आहे हे आपोआपच अधोरेखित होतं.मुलानं एखादं चित्रं छान काढलं की ‘मस्त! सही आलंय चित्र’ (हे कृतीचं कौतुक आहे.), असं म्हणता येईल. किंवा या मोराचे रंग खूप छान निवडले आहेस, ही मोरपंखी शेड तर मला खासच आवडली आहे, ती अगदी हवी तेवढीच आली आहे, नाहीतर चित्र भडक झालं असतं – अशा प्रकारे त्यातलं आपल्याला आवडलेलं वैशिष्टय़ सांगता येऊ शकतं. ‘वा छान’पेक्षा अशा सविस्तर सांगण्यातून मुलांच्या त्यामागे असलेल्या विचाराला दाद दिली जाते. मोठय़ांनी ते चित्र बारकाईने पाहिलं आहे हेही मुलांपर्यंत पोहोचतं.
‘तू तर काय मस्तच चित्र काढतोस’, म्हटलं तर त्या मुलावर कायमच चांगलं चित्र काढण्याचं वजन येऊ शकतं, किंवा मग असं ऐकत मोठं होणाऱ्या मुलांची कायमची कौतुकाची अपेक्षा बनून बसते. आणि नियमित कौतुकाचा डोस जर काही कारणाने कमी झाला, तर मुलाला आपल्या स्वत:बद्दल चांगलं वाटणं कमी व्हायला लागतं. अशा वेळी मग मुलांची चिडचिड, त्रागा, इतरांशी असहकार, मत्सर – अशा अनेक स्वरूपांमधून ते व्यक्त होऊ लागतं. आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मुलांच्या वागण्यात अशी लक्षणं दिसायला लागली, की त्याचं सगळं खापर लगेचच मुलांच्या डोक्यावर फुटतं. आजूबाजूच्या व्यक्तींचा त्याला काही हातभार लागलेला असू शकतो, ही गोष्ट सोयीस्करपणे नजरेआड केली जाते.खूपदा बराच प्रयत्न करून एखादी गोष्ट मुलाला जमते, तेव्हा ‘बघ, म्हणजे ठरवलंस तर तू करू शकतोस’, हा खास ठेवणीतला डायलॉग मुलांना ऐकवला जातो. यातून दुसरा अर्थ निघू शकतो म्हणजे ‘एरवी गोष्टी जमत नाहीत ना, तेव्हा अनेकदा तुझेच प्रयत्न कमी पडतात!’. त्यामुळे हे खरंतर कौतुक नाहीच. त्याऐवजी ‘तुला ही गोष्ट जमलेली पाहून मला फार बरं वाटलं! इतक्यांदा अडखळायला झालं तरी तू प्रयत्न सोडले नाहीस याचं खूप समाधान वाटलं.’ ही प्रयत्नांना दिलेली दाद मुलांपर्यंत अगदी नीट पोहोचते!
तर मग व्यक्तीपेक्षा कृतीची स्तुती करून पाहायची का?

mithila.dalvi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 4:11 am

Web Title: praise and action
Next Stories
1 प्रगती म्हणजे गुणवृद्धी
2 अभ्यास करावा नेटका
3 नावीन्याचा विकास
Just Now!
X