samajआयुष्यातल्या विविध टप्प्यांवरील यशाचा आणि सुखाचा संबंध नेमका कशाशी असतो, याचा शोध घेण्यासाठी तब्बल ७५ र्वष सुरू असलेल्या संशोधनाविषयी..
दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. काही स्पर्धा परीक्षांचेही निकाल बाहेर आले आहेत, काही जाहीर होण्याच्या उंबरठय़ावर आहेत. परीक्षेत अपेक्षित यश मिळवणारी मुलं, त्यांचे पालक, शिक्षक अर्थातच खूप आनंदात आहेत. त्यांना त्यांच्या पसंतीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो आहे, त्यामुळे बारावीच्या परीक्षेनंतर अभ्यास आणि परीक्षांचं बरचंसं ओझं पालकांच्या खांद्यावरून उतरलंय. आयुष्य मार्गी लागायचा एक टप्पा पार झाला असं त्यांना वाटतंय. त्याच वेळी अपेक्षित यश न मिळवू शकणारी मुलं परिस्थितीशी जुळवून घेताहेत. काही वेगळी महाविद्यालये, काही वेगळे अभ्यासक्रम अजमावून पाहताहेत- असं आताचं दृश्य आहे. निकालांच्या आसपास अपयशाकडे कसं पाहावं याबद्दल शिक्षक, पालक, समुपदेशक, माध्यमं नेहमीच बोलत असतात. एका परीक्षेतलं अपयश म्हणजे ती व्यक्तीच अपयशी असं नाही. तसंच व्यक्ती आणि तिने मिळवलेले मार्क्‍स या दोन काहीशा भिन्न गोष्टी आहेत, हा दृष्टिकोन त्यामागे असतो. आणि तो योग्यच आहे.
परीक्षेत मिळालेले भरपूर मार्क्‍स, अभ्यासातली हुशारी या घटकांचा पुढचं आयुष्य सुखी होण्याशी किती संबंध असतो, यावर आजवर बरंच संशोधन झालं आहे. ‘द ग्रॅन्ट स्टडी’ या नावाने प्रसिद्ध असणारं संशोधन हे या सगळ्याचा शिरोमणी गणलं जावं असं. ‘सुदृढ-समाधानी वार्धक्य’ (हेल्दी एजिंग) कशाकशावर अवलंबून असतं हे शोधणं, हा या अभ्यासाचा उद्देश. ७५ र्वष हा अभ्यास चालला होता. १९३९ ते १९४४ या काळात हार्वर्ड स्कूलमधले २६८ पुरुष विद्यार्थी या अभ्यासाचा भाग होते. हार्वर्ड स्कूलचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांची बौद्धिक क्षमता तर वादातीतच होती, पण शारीरिक, मानसिकदृष्टय़ाही ते सक्षम होते. दोन कारणांसाठी या संशोधनाला खास महत्त्व आहे. एकतर मानवी विकासाच्या अभ्यासातला हा सर्वात दीर्घकाळ चाललेला अभ्यास आहे, आणि या अभ्यासात सहभागी झालेल्यांपकी काही जण नंतर समाजातले मान्यवर म्हणून गणले गेले. त्यातले चौघं जण तर नंतर अमेरिकेत सिनेटचे सदस्य झाले, आणि पुढे राष्ट्राध्यक्ष झालेले जॉन एफ केनेडीही या अभ्यासाचा भाग होते.
७५ र्वष चाललेल्या या शास्त्रशुद्ध अभ्यासात साधारणपणे किमान दर दोन वर्षांनी या मुलांचा फॉलोअप घेतला जायचा. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, कामातील समाधान, समाधानी वैवाहिक आयुष्य, आयुष्यातले एकंदरच चढ-उतार, आनंदी निवृत्ती जीवन या सगळ्या बाबींचा प्रत्येकाच्या बाबतीत ७० र्वष पाठपुरावा करण्यात आला. एवढय़ा प्रदीर्घ काळापकी शेवटची
३० र्वष डॉ. जॉर्ज व्हेलंटनी या अभ्यासाचं नेतृत्व केलं. त्यांचे निष्कर्ष फार इंटरेिस्टग आहेत. या अभ्यासावरची तीन पुस्तकं आतापर्यंत प्रसिद्ध झाली आहेत. त्यातलं तिसरं तर २०१२ मधलं, म्हणजे इतक्या अलीकडचं आहे.
आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर आíथक यशाचं गणित आयक्यू (इंटेलिजन्श कोशंट)वर अवलंबून नसून ते तुम्ही अन्य व्यक्तींशी कशी नाती जोपासता यावर अवलंबून असतं- हा त्यातला एक मोठा निष्कर्ष. किंबहुना, एकंदरच तुमचे इतरांशी नातेसंबंध हा आनंदी राहण्यातला कणा आहे, हे या संशोधनाने फार ठाशीवपणे समोर आणलं आहे आणि नातेसंबंध जपण्यासाठी लागणारी बरीचशी शिदोरी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर लाभलेल्या नात्यांमधल्या उबेमधून (वॉर्मथ्) मिळते. त्यातही आईवडिलांकडून मिळालेली ऊब तर फारच मोठी भूमिका बजावते. डॉ. व्हेलंटनी तर स्वत:च म्हटलं आहे – ‘‘हा अभ्यास काय दाखवतो तर हॅपीनेस इज लव्ह. फुल स्टॉप.’’
पालकत्वाच्या दृष्टिकोनातून या संशोधनाला वेगळं महत्त्व आहे. अभ्यास आणि परीक्षांचं आयुष्यातलं स्थान, आणि अभ्यासापलीकडच्या ताणतणावात ‘मी तुझ्यासोबत आहे’, हा आश्वासक दिलासा – याचा सतत ताळमेळ इथे राखावा लागतो. पालकत्वातल्या तारतम्याबद्दल आपण या सदरातून अनेकदा बोललो आहोत. हाही त्यातलाच भाग आहे. ज्यांचा रिझल्ट छान नाही लागला त्यांच्यासाठी तर हे महत्त्वाचं आहेच, पण ज्यांचा छान लागला त्यांच्यासाठीही ते तितकंच महत्त्वाचं आहे.
एकंदरच पालकत्वावर लिहिलं जातं तेव्हा मुलं वाढवतानाच्या आई-वडिलांच्या सहभागाबद्दल खूप भरभरून लिहिलं जातं. ते रास्तही आहेच.. पण जे तितके भाग्यवान नसतात त्यांचं काय? ज्यांच्याकडे दोन्ही आईवडील नसतात, ज्या घरात आजारपणं चालतात, जिथे आíथक ताण असतात, कौटुंबिक तणाव असतात, जिथे एका पालकाचा मृत्यू झालेला असतो, आईवडील विभक्त झालेले असतात – या सगळ्यासगळ्यातून जाताना दोन्ही आईवडिलांच्या मायेची ऊब मुलांना पुरेशी मिळत नाही. म्हणून अशी मुलं काय यशस्वीच नाही होणार आयुष्यात? ‘ग्रॅण्ट स्टडी’मधला ‘इतरांशी नातेसंबंध आपण कसे जपतो’, हा भाग इथे खूप महत्त्वाचा आहे. कुटुंबाकडून खूप खणखणीत पाठबळ नाही मिळालं तरी आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तो शिकता येतो, वाढवता येतो. एकेरी पालकत्व निभावणाऱ्या पालकांसाठी ही खूप मोठी दिलासादायक गोष्ट आहे. त्याबाबत पुढच्या लेखात..
mithila.dalvi@gmail.com