आपल्यातील अनेकजण सतत बदलत असणाऱ्या स्पर्धात्मक वातावरणात काम करतात. जर आपण संबंधित क्षेत्रातील चालू घडामोडी, कल आणि नवे प्रवाह यांचा सातत्याने मागोवा घेतला नाही तर अनेक संधी आपल्या हातून निसटून जाण्याची शक्यता असते. म्हणूनच आपल्या क्षेत्रात नवं काय घडतंय याबाबत सतत जागरूक असायला हवं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपयुक्तता
’पदाचे संरक्षण- संवर्धन- नोकरी गमावण्याचा धोका टाळण्याकरता तुम्ही जसे कार्यक्षम असणे आवश्यक असते, तसेच तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, त्यात अपडेट असणेही अत्यावश्यक आहे. तुमच्यावर सोपवण्यात आलेले काम पार पडण्यापलीकडे झेपावत, तुमच्या क्षेत्रातील नवे कल जाणून घ्या आणि त्यानुसार आवश्यकता भासल्यास अधिकचे प्रशिक्षण घ्या. हे केल्याने तुम्ही तुमच्या पदाचे संरक्षण, संवर्धन करता. हे अधिकचे प्रशिक्षण म्हणजे तुमच्या क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची जाण असू शकेल किंवा उच्च शिक्षण-प्रशिक्षणही असू शकेल.
’नव्या संधींचा शोध – जुने सहकारी, विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महाविद्यालयीन मित्रमैत्रिणी, व्यावसायिक यांच्याशी संपर्क कायम ठेवल्याने तुम्हाला क्षेत्रातील अपडेट्स माहिती मिळू शकते आणि तुम्ही जे काम करत आहात, त्याच्याशी संबंधित करिअरमधील भविष्यकालीन संधींचा शोध घेणे सोपे ठरू शकते.
’आत्मपरीक्षण- अपडेट्समुळे नव्याने विकसित होत असलेल्या क्षेत्रांविषयी तुम्ही जाणून घेतल्यानंतर तुमच्या क्षमता, अनुभव आणि कौशल्यानुसार नव्या वातावरणात आपण तग धरू शकतो का अथवा नव्या क्षेत्रांमध्ये उडी घेता येईल का, हेही पडताळून पाहता येईल.
’पुनर्मूल्यांकन- क्षेत्रातील नवे बदल जाणून घेतल्याने तुमच्या कौशल्यांचं, मूल्यांचं, गरजांचं, कामाच्या ठिकाणाचं आणि कामाच्या क्षेत्राचं सातत्याने पुनर्मूल्यांकन करणे शक्य होते. करिअरच्या मार्गावरील आपली भूमिका आणि आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवंय, हे पडताळणे शक्य होते.

आवश्यकता
’तुम्ही काम करीत असलेल्या क्षेत्रातील नव्या घडामोडींचा मागोवा सतत घेत राहिल्यास अचूक निर्णय घेणे शक्य होते.
’स्पर्धात्मक वातावरणात कोणत्या
नव्या संधी आहेत आणि कोणते धोके निर्माण होऊ शकतात, याचा अंदाज बांधता येतो.
’जर तुम्ही तुमच्या संस्थेच्या धोरणआखणी व अंमलबजावणीत निर्णयात्मक भूमिका बजावत असाल तर ही गोष्ट अधिक महत्त्वाची ठरते. उदाहरणार्थ, जर तुम्ही विक्री आणि विपणन क्षेत्रात कार्यरत असाल तर विक्री क्षेत्रातील संभाव्य संधी जर तुम्ही लक्षात घेतल्यात, तर तुम्हाला या संधींचा लाभ उठवणे शक्य होईल.
’आपल्या क्षेत्रात अद्ययावत माहिती मिळवणे ही आपल्या विषयात
तज्ज्ञता संपादन करण्यासाठी आवश्यक ठरते. तुमच्या नोकरीत आणि तुमच्या क्षेत्रात तज्ज्ञता मिळवल्याने तुम्ही तुमच्या भोवतालच्या व्यक्तींमध्ये विश्वास आणि आदर संपादन करू शकता. नेतृत्व करण्याकरता ही बाब अमूल्य ठरते.
’तुम्ही अपडेट राहिल्याने जे बदल येऊ घातले आहेत, त्याविषयी विचार करण्याची आणि त्याबरहुकूम पाऊल उचलण्याची संधी तुम्हाला मिळते.

बदलांना सामोरे जाताना..
विश्लेषण करा-
क्षेत्रातील चालू घडामोडींची माहिती मिळाल्यानंतर आपल्या कामाशी संबंधित बाबींचे त्याअनुषंगाने सडेतोड विश्लेषण करणे आवश्यक ठरते. नव्या प्रवाहाद्वारे कामातील समस्या सोडवणे शक्य होईल
का याचीही चाचपणी करता येईल.
एखाद्या संदर्भात आपले स्वतंत्र मत आकाराला येण्यासाठी अपडेट माहिती उपयुक्त ठरते.
’कामात अथवा पद्धतींत बदल-
क्षेत्रासंबंधीचे नवे अपडेट्स हाती आल्यानंतर आपल्या कामासंदर्भात योग्य ते बदल करता येतील तसेच आपल्या कामासंबंधित नवनव्या कल्पना अमलात आणण्याचा प्रयत्न करता येईल.
’स्पष्टपणा व सकारात्मकता-
अद्ययावत माहिती हाती आल्यानंतर ती सहकारी आणि वरिष्ठांपर्यंत स्पष्टपणे, मुद्देसूद मांडणे आवश्यक असते. यातून कामातील तुमचा सक्रिय सहभाग स्पष्ट होतो. मात्र, ते करताना आपल्या कामाविषयी तसेच कंपनीच्या उद्दिष्टांविषयी सकारात्मक राहणे आवश्यक आहे. त्यामुळे तणावाखालीही आपले मत मांडणे सुकर होते. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन, अद्ययावत माहिती आणि स्पष्टपणा याद्वारे अर्थातच तुमच्या कामाचा दर्जाही उंचावतो.
’बदल स्वीकारा-
अद्ययावत माहितीतून प्रतीत होणारे काम, धोरण, विभागीय ध्येय, तंत्रज्ञान अथवा वेगवेगळे उपक्रम यांतील बदल स्वीकारा. ते बदल लवकर स्वीकारण्याबाबत आणि त्यासाठी केलेल्या कठोर मेहनतीबाबत तुमचं कौतुक होईल.
’ उत्पादकता वाढवा-
बाजारपेठीय प्रवाहातून जे बदल ध्वनित होत आहेत, त्यांना सामोरे जाण्याकरता तुमच्या क्षमता, कौशल्ये आणि उपलब्ध वेळ यांचे उत्तम उपयोजन करा.

माहितीचे स्रोत
आपल्या क्षेत्रातील अद्ययावत घटनांची माहिती मिळवण्यासाठी पारंपरिक आणि ऑनलाइन स्रोत उपलब्ध असतात. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करीत आहात, त्यात कुठला स्रोत योग्य ठरेल हे लक्षात घेत माहितीचा स्रोत निवडा.

पारंपरिक स्रोत
मार्गदर्शक- पारंपरिक स्रोतांमध्ये तुमच्या क्षेत्रातील अथवा तुमच्या संस्थेतील अनुभवी, कार्यकुशल व्यक्तीला तुम्ही मार्गदर्शक म्हणून निवडू शकाल. त्यांच्या मदतीने करिअरविषयीच्या बारीकसारीक समस्यांचेच निवारण होते असे नाही तर करिअरविषयीचे ज्ञान वाढवून दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरते.
व्यापार संस्था-संघटना- तुमच्या उद्योग क्षेत्राशी निगडित अनेक संस्था, संघटना कार्यरत असतात. त्यांचे सभासद झाल्यास तुम्हाला नव्या घडामोडी, बाजारपेठीय कल जाणून घेता येतील. त्यांची पत्रके, परिषदांचे आयोजन यांच्यामार्फत तुम्हाला ताज्या घडामोडींची माहिती मिळू शकते.
परिषद, कार्यशाळा- व्यापारविषयक परिषदांमधून आपल्या क्षेत्रातील स्पर्धात्मकतेचा अंदाज बांधता येतो. नवी उत्पादने, उद्योग क्षेत्रातील नवे ट्रेंडस् लक्षात येऊन नेटवर्किंग करण्यासाठी नव्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. प्रत्यक्ष अथवा समोरासमोर होणारे नेटवर्किंग यांमुळे आपल्या उद्योग क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी, बातम्या समजतात. आपल्या क्षेत्रातील पुरवठादार, ग्राहक वर्ग, संबंधित क्षेत्रांतील व्यक्तींशी नियमित स्वरूपात गाठीभेठी होऊन उत्तम नाते तयार होते.

ऑनलाइन स्रोत
ब्लॉग- ब्लॉग हे केवळ व्यक्तिगत भावभावना व्यक्त करण्याचं साधन नाही तर अनेक ब्लॉगर्सचा त्यांच्या उत्तम, दर्जेदार कामासाठी आणि मांडल्या जाणाऱ्या प्रामाणिक मतांकरता आदरपूर्वक उल्लेख केला जातो. उत्तम ब्लॉगवरील माहिती व मते तुम्हाला कल जाणून घेण्यात उपयुक्त ठरू शकतात.
वेबसर्च- तुमच्या उद्योग क्षेत्रात जे कीवर्डस् वरचेवर उपयोगात आणले जातात, त्यांचा वेबसर्च करा. हे काम कदाचित वेळखाऊ होईल, मात्र त्यातून तुमच्या क्षेत्राशी संबंधित दर्जेदार ब्लॉग्जचा तुम्हाला परिचय होऊ शकेल आणि मग नंतर त्यांचे नियमित स्वरूपातील अपडेट्स मिळवण्याकरिता तुम्हाला पावलं उचलता येतील.
ट्विटर- ट्विटरवर संबंधित कीवर्डसच्या साहाय्याने तुम्हाला उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्ती आणि संस्थांना गाठता येईल. त्यांना फॉलो केलेत तर त्यांच्याशी तुमचा संवाद सुरू
होऊ शकतो.
लिंकडिन- सहकारी, व्यापार समूह आणि उद्योग क्षेत्रातील मातब्बर व्यक्ती यांच्याशी संपर्क करण्याकरता लिंकडिन हा उत्तम मार्ग आहे. उद्योग क्षेत्राशी संबंधित ग्रुप जॉइन करून तुम्हाला त्या व्यक्ती अथवा संस्थांकडून अद्ययावत माहिती प्राप्त होऊ शकते.
ई-मेल न्यूजलेटर्स- तुमच्या क्षेत्राशी संबंधित ई-मेल न्यूजलेटर्सचे सभासद झालात की तुम्हाला तुमच्या आवडत्या वेबसाइटद्वारे दर महिन्याला अपडेट्स, टिपा आणि सल्ला पुरवणारी
ई-न्यूजलेटर्स उपलब्ध होऊ शकतात. ही माहिती प्रत्येक वेळेस त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध असतेच असे नाही. तुम्हाला जेव्हा ती माहिती नकोशी वाटेल तेव्हा तुम्ही ‘अनसब्स्क्राइब’ केलीत की ती माहिती मिळणे थांबते.
गुगल अ‍ॅलर्ट्स सेवा – गुगल सर्च इंजिनद्वारे जेव्हा काही वैशिष्टय़पूर्ण शब्दांवरून तुम्हाला संबंधित अपडेट्स उपलब्ध होऊ शकतात.
ई-मेलमधील लिंक्सद्वारे किंवा आरएसएस (रीच साइट समरी) फीडद्वारे हे अपडेट उपलब्ध होतील. गुगल अ‍ॅलर्ट्सची चांगली बाजू ही की, तुमच्या उद्योग क्षेत्राशी संबंधित विविध वेबसाइट शोधत बसण्याची तुम्हाला गरज उरत नाही. मात्र कदाचित तुम्हाला या मार्गाने, हवी आहे त्यापेक्षा अधिकच माहितीचा मारा होतो. पण हेही कमी करण्याकरिता सेटिंगमध्ये बदल करून अथवा अधिक सविस्तर की-वर्ड टाकून हवा तोच आशय मिळवता येणे शक्य होते.
फोरम- एखाद्या क्षेत्राशी संबंधित चर्चा करणारे अनेक विचारमंच कार्यरत असतात. ज्यात एखाद्या
विषयाला धरून त्या क्षेत्रातील व्यावसायिकांची खोलवर चर्चा त्या मंचावर होते. याद्वारे तुमची त्या विषयातील समज, कौशल्ये आणि नेटवर्किंग वाढण्यास मदत होते.

मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about new career opportunities
First published on: 09-09-2015 at 06:19 IST