एखाद्या घरात भांडण झालं असलं तर त्यांच्या भांडणाच्या नकारात्मकतेची वातावरणातली ऊर्जा परक्या व्यक्तीलाही जाणवते. पाच दहा मिनिटांत आपल्यावर इतका परिणाम होतो, मग ज्यांचा त्या भांडणात सहभाग नाही किंवा जी छोटी मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत ज्यांना भांडणात भाग घेता येत नाही, त्यांच्यावर किती नकारात्मक परिणाम होत असेल. खुद्द जे भांडतात त्यांच्यावरही या टेन्शनचा आणि नकारात्मक भावनांचा किती वाईट परिणाम होत असेल?

जवळजवळ टीव्हीच्या सर्वच वाहिन्यांवर एक बातमी दाखवत होते. आत्महत्या करून मरण्याआधी एका उच्चपदस्थ आणि उच्चशिक्षित व्यक्तीने केलेली ती व्हिडीओ सेल्फी होती. या सेल्फीमधला चेहरा शांत, संतुलित आणि ठाम स्वरात बोलत होता. शब्द हतबलतेचे होते, पण स्वरात हतबलता नव्हती! म्हणजे ही व्यक्ती भरपूर त्रास, छळ आणि नकारात्मकता सहन करून आता एक ठाम निर्णयाप्रत आली होती- आत्महत्येच्या! आणि म्हणून स्वरात शांतपणा होता. पत्नी आणि आईवडील यांच्या अत्यंत बिघडलेल्या नातेसंबंधाचा हा बळी होता.

पत्नीचे आणि या व्यक्तीचे पटत नव्हते. सतत भांडणं होत होती. पत्नी आणि या व्यक्तीच्या आईवडिलांचेही बिलकूल पटत नव्हते. प्रचंड तणातणी रोजच होती. ही व्यक्ती एकीकडे पत्नी आणि एकीकडे जन्मदाते यांच्या कात्रीत सापडली होती. पत्नीचा स्वभाव आक्रमक आणि स्वत:ला हवे ते करण्याचा होता. जन्मदात्यांच्या स्वभावाबद्दल मात्र ही व्यक्ती काही सांगत नव्हती. त्या व्यक्तीच्या एका वाक्याकडे माझे लक्ष वेधले. ती व्यक्ती म्हणत होती, ‘‘माझी पत्नी आणि माझे आईवडील यांचे माझ्यावर आत्यंतिक प्रेम आहे. पण कोणत्याही बाबतीतला ‘अती’पणा त्रासदायक, वाईट असतो. समस्या निर्माण करणारा असतो.’’ पार मरणाच्या दारावर टकटक करू इच्छिणारी ही व्यक्ती पुन्हा पुन्हा सांगत होती, ‘‘माझ्या आत्महत्येसाठी माझी पत्नी किंवा माझे आईवडील किंवा अन्य कुणालाही जबाबदार धरू नका.’’ या व्यक्तीने आपल्या निरोपाच्या या संदेशात आपल्या सासू-सासऱ्यांचे नावही सांगितले त्यांचा उल्लेख आदराने केला होता. ज्या प्रकारे ही व्यक्ती स्वत:च्या आत्महत्येचा संदेश देत होती त्यावरून एक हुशार, बुद्धिमान, रॅशनल, जबाबदार, प्रेमळ आणि कर्तबगार, इतरांबद्दल कदर असणारी आणि सुसंस्कृत वाटत होती. तरीही या व्यक्तीला अगदी जवळच्याच व्यक्तींच्या नातेसंबंधांचे असे काही चटके बसले होते की तिने एक आत्मघातकी, विवेकशून्य विचार केला होता.

माणसं आत्महत्या करतात तेव्हा जगण्याची लढाई हरलेली असतात. नैराश्याने पूर्ण ग्रस्त असतात. परिस्थितीने गांजलेली असतात. हताश आणि हतबल असतात. ज्या समस्येमुळे ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेली असतात ती समस्या सोडवता येणार नाही, त्या बाबतीत स्वत:ला काहीच करता येणार नाही याची खात्री असते. इतकी की जीवनेच्छेला दूर सारून मरणाला कवटाळणे त्यांना सोयीचे, सुखाचे आणि सुटकेचेही वाटते.

आत्महत्या करण्यासाठी जी अनेक कारणे आहेत, त्यातले एक महत्त्वाचे कारण म्हणजे परस्पर नात्यांमधला प्रचंड विसंवाद. परस्पर नात्यांमध्ये झालेला प्रचंड कडवटपणा. परस्पर नात्यांमध्ये झालेला प्रचंड बिघाड. या साऱ्यामुळे निर्माण झालेली आणि भोगलेली विषारी नकारात्मकता, द्वेष, मत्सर, क्रोध, आक्रमकता, सूड घेण्याची भावना, दु:ख, हतबलता, नैराश्य, भीती, काळजी, हताश, चिंता या असल्या सगळ्या नकारात्मक भावनांची कारंजी बिघडलेल्या नातेसंबंधामुळे भरपूर वेळा प्रत्यही उडतात. या भावनांची पातळीही मोठी, उच्च असते आणि या भावनांचे प्रकटीकरणही तेवढय़ाच रेटय़ाने आणि उत्कटतेने भरपूर वेळा होत असते. इतके की जिथे ही माणसं वावरतात, राहतात, असतात तिथल्या वातावरणात भरपूर ताण, तणाव तयार होतो. जणू हात लावता येईल इतका गाढ ताण! इतका की त्या ठिकाणी राहणाऱ्या किंवा वावरणाऱ्या इतर माणसांना ते अस होतं. बघा, एखाद्या घरात भांडण झालं असलं आणि नेमकं त्यावेळी आपण तिथे जाऊन दाराची बेल वाजवली तर भांडण तात्पुरतं थांबवून खोटे हसरे मुखवटे धारण करून त्या घरातल्या व्यक्ती आपल्याशी बोलू लागतात. घरात या म्हणतात, आपुलकीने चहा-पाणी विचारतात. पण त्यांच्या भांडणाच्या नकारात्मकतेची वातावरणातली ऊर्जा आपल्याला नकळत जाणवते आणि आपण तिथून लवकरात लवकर काढता पाय घेतो. पाच दहा मिनिटांत आपल्यावर इतका परिणाम होतो. मग ज्यांचा त्या भांडणात सहभाग नाही किंवा जी छोटी मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, ज्यांना भांडणात भाग घेता येत नाही त्यांच्यावर किती नकारात्मक परिणाम होत असेल. खुद्द जे भांडतात त्यांच्यावरही या ताणाचा आणि नकारात्मक भावनांचा किती वाईट परिणाम होत असेल? मानसिकदृष्टय़ा आणि शारीरिकदृष्टय़ाही!

आईवडिलांमध्ये भांडण असतं, एका घरात राहणाऱ्या आजी, आजोबा, काका, काकू, आत्या अशांमध्ये भांडण असलं की त्या घरातल्या लहान मुलांवर भांडणाचे, आक्रमकतेचे अधिकारशाहीचे असे संस्कार होतात की अनेकदा ही मुले मोठेपणी त्यांचे नातेसंबंधी त्यांनी बघितलेल्या, अनुभवलेल्या या नकारात्मक बिघडलेल्या नातेसंबंधांचा आदर्श ठेवून बिघडवतात. नकारात्मक होतात. विशेषत: आईवडिलांमधला नकारात्मक नातेसंबंध मुलांमध्ये प्रचंड असुरक्षितता, भावनांचे असंतुलन आणि आक्रमकता किंवा नैराश्य निर्माण करते. आपण आपल्या मुलांना त्यांच्या भविष्यातील नातेसंबंधांसाठी आणि मानसिक संतुलनासाठी कोणती शिदोरी देतो आहोत, याचे भान प्रत्येक घरातल्या आईबाबांनी आणि मोठय़ा माणसांनी ठेवणे गरजेचे आहे.

खरं तर कोणत्याही नातेसंबंधात मनातले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माया, वात्सल्य, आदर यासारख्या भावना आणि त्यांचे योग्य तऱ्हेने योग्य वेळी केलेले प्रकटीकरण सकारात्मकता वाढवते. परस्पर नातेसंबंध दृढ करते. त्यातला आनंदही द्विगुणित करते; अन्यथा हे ना – ते होऊन जाते.

अंजली पेंडसे manobal_institute@yahoo.co.in