मानेच्या गाठीत पसरलेल्या स्तनाच्या कर्करोगासाठी शस्त्रकर्म, केमोथेरपी व रेडीयोथेरपी घेऊन १९९६ मध्ये अलकाताई आमच्या कॅन्सर सेंटरमध्ये आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी आल्या. अलकाताईंचा कर्करोग मुळातच गंभीर स्वरूपाचा असल्याने १९९८ आणि १९९९ मध्ये पुन्हा खांद्यावरील व मानेवरील गाठींमध्ये कर्करोगचा पुनरुद्भव झाला व त्यासाठी पुन्हा केमोथेरपी व रेडीयोथेरपी घ्यावी लागली. यावेळी मात्र रेडीयोथेरपी व केमोथेरपीबरोबर आयुर्वेदीय औषधे चालू असल्याने अलकाताईंना त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागले नाहीतच याशिवाय आजतागायत म्हणजे वयाच्या ८२ वर्षांपर्यंत कर्करोगाचा पुनरुद्भव झालेला नाही. नियमित आयुर्वेदिक औषधे, पथ्यपालन, व्यायाम व सकारात्मक दृष्टिकोन ही आपल्या सुदृढ आयुष्याची चतु:सूत्री असल्याचे सांगत त्या इतर रुग्णांचे मनोधर्य वाढवत आहेत.

सरकारी नोकरीत जबाबदारीचा पदभार तत्परतेने व सचोटीने सांभाळणाऱ्या उमाताई बेंद्रेंची नोकरी आणि संसार यांचे संतुलन राखण्याची तारेवरची कसरत गेली २५ वर्ष चालू होती. आहारात मीठयुक्त लोणी व शिकरण असा विरुद्धाहार, ब्रेड-टोस्ट असे बेकरीचे पदार्थ आणि मांसाहार यांचा अतिरेक ही वात-पित्त-कफ हे त्रिदोष व रसदुष्टी करणारी कारणे होतीच. मासिक पाळी बंद झाल्यावर चार वर्षांनी म्हणजे २००६ मध्ये उमाताईंना मासिक पाळीसारखा रक्तस्राव होऊ लागला. सी.टी. स्कॅन व एंडोमेट्रीयल बायॉफ्सी केली असता गर्भाशयाच्या अंतत्वचेचा मॉडरेटली डिफरंशियेटेड एंडोमेट्रीयल एडिनोकार्सनिोमा असल्याचे निदान झाले. वैद्यकीय सल्ल्यानंतर बेंद्रेकाकूंनी २००६ मध्ये आयुर्वेदिक चिकित्सा सुरू केली.

आहार-विहारातील पथ्यपालन, शमन-रसायन व बस्ति ही पंचकर्म चिकित्सा यांचे पालन करून गेली ११ वर्ष बेंद्रेकाकू नोकरी व कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे व सशक्तपणे पार पाडत आहेत. स्त्रीविशिष्ट अवयवांचा कर्करोग झालेल्या रुग्णांची अशी अनेक बोलकी उदाहरणे कर्करोग चिकित्सेत अ‍ॅलोपॅथी चिकित्सेइतकेच आयुर्वेदिक चिकित्सेचे महत्त्व स्पष्ट करतात.

आपल्या भारतीय समाजात पूर्वापार स्त्री हा कुटुंबाला आधार देणारा, कुटुंबाचा सर्वागीण विकास करणारा कणा आहे. आज तर भारतीय स्त्रिया आपल्या कौंटुबिक जबाबदाऱ्यांसह बौद्धिक, वैज्ञानिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. त्यामुळे अशा बहुश्रुत स्त्रियांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखणे ही आता केवळ कुटुंबाचीच जबाबदारी राहिली नसून ती आता सामाजिक बांधिलकी झाली आहे. अगदी लहान बालिकेपासून वयस्कर स्त्रियांपर्यंत सर्व स्त्रियांना अनेक स्त्रीसुलभ आजार भेडसावत असतात. मासिक पाळीच्या तक्रारी, पाण्डू (रक्तक्षय, अशक्तपणा), तारुण्यपीटिका, वारंवार होणारे गर्भपात, वंधत्व, हाडांचे व सांध्यांचे विकार, रजोनिवृत्ती काळातील तक्रारी यापासून ते अगदी स्तनांचा-गर्भाशयाचा-गर्भाशयमुखाचा- बीजांडाचा कर्करोग यासारख्या गंभीर आजारांनी विविध वयोगटांतील स्त्रिया त्रस्त असतात.

भारतात कर्करोगच्या सर्व प्रकारांत सर्वात जास्त प्रमाण स्तनांच्या कर्करोगाचे आहे. भारतातील १: २६ स्त्रिया स्तनांच्या कर्करोगाने त्रस्त आहेत. सामन्यत: ४० वर्षांवरील स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक असले तरी आजकाल २० ते ४० या वयोगटातील स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढू लागले आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रात या प्रकारच्या कर्करोगसाठी शस्त्रकर्म, रेडियोथेरपी, केमोथेरपी यासारख्या चिकित्सापद्धती उपलब्ध आहेत. आयुर्वेदानुसार या स्त्रीविशिष्ट अवयवांतील कर्करोगचा विचार करताना वात-पित्त-कफ हे तीन दोष, रस-रक्त-मांस- मेद-अस्थि-मज्जा-शुक्र या ७ धातूंपैकी रस, शुक्र, मांस व मेद धातू, आर्तववह व स्तनवह स्त्रोतस, स्तन व गर्भाशय (त्र्यावर्ता योनी) हे अवयव यांच्या विकृतीचा विचार अनिवार्य आहे. या सर्व घटकांमध्ये विकृती निर्माण करणारा अपथ्यकर आहार-विहार-मानसिक हेतू ही स्तन, गर्भाशयमुख, गर्भाशय, स्त्री बीजांड या स्त्रीविशिष्ट अवयवांच्या कर्करोगची संभाव्य कारणे आहेत असे आमच्या आजवरच्या संशोधनात आढळून आले आहे.

आजकाल अधिक प्रमाणात आढळणारे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृद्रोग, कर्करोग यांसारख्या व्याधी ज्या आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार ‘लाइफ स्टाइल डिसॉर्डर्स’ या गटात मोडतात, त्यांच्यात स्वस्थ्यवृत्ताचे पालन हीच प्रतिबंधात्मक चिकित्सा आहे. कारण या आजारांनी एकदा का शरीरात शिरकाव केला की त्यांना आटोक्यात ठेवणे कठीण आहे. त्यामुळे ‘प्रीव्हेशन इज बेटर दॅन क्युअर’  हेच हितावह आहे.

आयुर्वेद हा शरीर व मनाचे स्वास्थ्य राखून आयुष्य कसं जगायचं हे सांगणारा वेद असल्याने या वैद्यकशास्त्रात व्याधींच्या चिकित्सेपेक्षाही आजार होऊच नयेत म्हणून दैनंदिन जीवनात काय, काय करावे यावर अधिक भर दिला आहे. यात प्रत्येक दिवशी पाळायचे नियम म्हणजे दिनचर्या, ऋतुबदलाचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून आचरायची ऋतुचर्या, भूक-तहान-मल-मूत्र अशा नैसर्गिक संवेदनांचे योग्य वेळी पालन करणे म्हणजे वेगोत्सर्ग, आपली प्रकृती-ऋतू-वय-बल-अग्नी यांचा विचार करून आहारीय पदार्थाची निवड करणे व आहाराबाबतचे नियम पाळणे म्हणजे आहारविहार, झोप-चालणे-फिरणे-व्यायाम अशा विहाराचे विधिवत् पालन, मनाच्या शुचितेसाठी सात्विक आचरण, ऋतुसापेक्ष पंचकर्म करून शरीराशुद्धी करणे व नियमित प्रकृती-वयानुसार रसायन औषधांचे सेवन करणे या सर्व उपक्रमांचा समावेश होतो.

‘लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपदा मिळे।’ या उक्तीचे आचरण करावे. उठल्यावर कोमट पाण्याने गुळण्या, कडू-तुरट चवीच्या बकुळ, खदिर (कात), कडुनिंब अशा औषधांच्या वस्त्रगाळ चूर्णाने किंवा या वनस्पतींच्या कोवळ्या देठाने दात घासणे, डोळ्यात काजळ घालणे, तेलाचे किंवा तुपाचे २ ते ३ थेंब दोनही नाकपुडय़ांत घालणे म्हणजे प्रतिमर्श नस्य, कोमट पाणी, अथवा औषधी काढय़ांच्या गुळण्या करणे या उपक्रमांनी मुखाचे व इंद्रियांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. शरीर सुडौल राहण्यासाठी रक्ताचे संवाहन सुधारण्यासाठी, भूक व पचन सुधारण्यासाठी व्यायाम आवश्यकच! आठवडय़ातून कमीत कमी एक दिवस अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीरास तीळतेलाने मसाज करावा. आहार सेवनाचे सर्व नियम पाळून व प्रकृती-वय-ऋतु यांचा विचार करून भोजन करावे. अशा प्रकारे दिनचर्येचे पालन केल्यास सर्वागीण आरोग्य सुधारण्यास व पर्यायाने कर्करोगासारख्या व्याधिप्रतिबंधास मदत होते. त्याचप्रमाणे ऋतुबदलाचा शरीरावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी ऋतूचय्रेचे पालन करणे हा स्वस्थवृत्तातील महत्त्वाचा भाग.

आयुर्वेदाने उन्हाळा-हिवाळा-पावसाळा यांनुसार संपूर्ण वर्षांचे विभाजन वसंत, ग्रीष्म, वर्षां, शरद, हेमंत, शिशिर या ६ ऋतूंत केले आहे. या ६ ऋतूंतील विशिष्ट हवामानानुसार शरीरात होणाऱ्या बदलांमुळे व्याधी निर्माण होऊ नयेत म्हणून विशिष्ट आहार, विहार, पंचकर्म यांचे आचरण हितकारक ठरते. आयुर्वेदाने अधोवात, मल, मूत्र, भूक, तहान, शिंक, झोप, खोकला, श्रमश्वास, जांभई, अश्रू, उलटी या  शरीराच्या नैसर्गिक क्रियांना अधारणीय वेग अशी संज्ञा दिली आहे. या वेगांची संवेदना झाल्यास लगेचच त्यांची पूर्ती करणे यामुळे शरीरातील वातदोषाचे व त्या त्या संबंधित अवयवांचे स्वास्थ्य राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे या वेगांची संवेदना झाली नसतानाच बळेबळेच त्यांचे उदीरण करणे हेही शरीरास तितकेच घातक आहे.

स्वस्थवृत्ताच्या या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले तरी आजच्या ताणतणावयुक्त व स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्तीने आपले शारीरिक व मानसिक संतुलन राखण्यासाठी नित्यनियमाने काही टॉनिक्स ज्याला आयुर्वेदाने नित्यसेवनीय रसायन अशी संज्ञा दिली आहे त्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. वैद्यांच्या सल्ल्याने प्रत्येक व्यक्तीने  प्रकृतीनुसार व ऋतुनुसार यासाठी शतावरी कल्प, च्यवनप्राश, अगस्तिप्राश, सुवर्णयुक्त कल्प अशी रसायन औषधे नियमित सेवन केल्यास कर्करोगच नव्हे तर इतरही व्याधींना प्रतिबंध होऊ शकतो.

सर्वात शेवटचा परंतु स्वस्थवृत्तातील महत्त्वाचा नियम म्हणजे आचार रसायन! व्यक्तीपासून समष्टीपर्यंत सर्वानीच धर्मसम्मत सदाचाराचे पालन करणे म्हणजेच आपल्या जीवनातील चतुर्विध आश्रमांतील कर्तव्ये प्रामाणिकपणे व सद्भावनेने पार पाडणे ही तर सर्वागीण आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

वैद्य स. प्र. सरदेशमुख

वैद्या विनिता व. देशमुख

ictrcpune@gmail.com

chaturang@expressindia.com