‘लोकसत्ता’च्या ‘शोध नवदुर्गेचा’ या उपक्रमाच्या यंदाच्या दुसऱ्या वर्षी या नवदुर्गाच्या सत्काराचा दिमाखदार संगीतमय सोहळा नुकताच रवींद्र नाटय़ मंदिर येथे मोठय़ा उत्साहात पार पडला. या वेळी सत्कारमूर्तीनी आणि त्यांचा सत्कार करणाऱ्या नामवंतांनी मनोगत व्यक्त केले आणि दुर्गाशक्तीची, स्त्रीच्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अफाट कर्तृत्वाची महती पटत गेली..

दुर्गेची अनेक रूपे आहेत. प्रत्येक रूपाची ताकद वेगळी, कार्य वेगळे, अनुभूतीही वेगळी असते. आपल्या ईप्सिताला अनुकूल अशा रूपाचे आपण ध्यान करतो, पूजा करतो. याच दुर्गेचे प्रतीक स्वरूप असलेल्या स्त्रिया जेव्हा समाजासाठी झटताना दिसतात, आपल्या आशाआकांक्षांना बाजूला सारत जिद्दीने, मायेने ‘जो जे वांच्छिल तो ते लाहो’ या विचाराशी एकरूप होऊन वंचितांसाठी भव्य कार्य उभारतात तेव्हा त्यांच्या कोणत्या एका रूपाशी तादात्म्य पावण्याचा विचार मनात उरतच नाही. त्यांच्या त्या शक्तीपुढे, स्वयंप्रेरणेपुढे, जिद्दीपुढे आपण नतमस्तक होऊन जातो.. याच भावनेने ‘शोध नवदुर्गाचा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेले जनमानस भारावून गेले होते.
रोमरोमात चैतन्य फुलवणाऱ्या, सकारात्मक ऊर्जा आणि आशेचा दीप चेतवून जाणाऱ्या नवदुर्गाचा सत्कार ‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमाद्वारे करण्यात आला. ‘लोकसत्ता’ आयोजित, ‘अभ्युदय को-ऑप बँक लिमिटेड’ प्रस्तुत आणि ‘केसरी’ सहप्रायोजित ‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमाच्या यंदाच्या दुसऱ्या वर्षी जिद्द आणि तत्त्वांचा वसा घेऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नऊ कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव करण्यात आला.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणत्या रंगाची साडी नेसावी़, इथपर्यंतच मर्यादित अर्थ उरलेला असताना नऊ विधायक कार्य करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान के ला तर या दुर्गाशक्तीचे पूजन करणाऱ्या या नवरात्रीला खरा अर्थ येईल, या विचाराने गेल्या वर्षीपासून ‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी स्पष्ट केले. पहिल्याच पर्वात या उपक्रमाला लक्षणीय प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे दुसऱ्या पर्वाची सुरुवात करतानाच  तीनशे स्त्रियांची माहिती हाती आली होती, असे सांगत या कार्यक्रमाची संकल्पना ‘चतुरंग’ पुरवणीच्या संपादिका
आरती कदम यांनी मांडली. समाजात अनेक ठिकाणी आज सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काम करणाऱ्या अनेक स्त्रिया दिसतात. एकीकडे आपल्या वृद्ध आईला घराबाहेर काढणारी मुले, मुलीची हत्या करणारी माता, तान्हुल्याला कचऱ्यात फेकून देणारे आई-वडील दिसत असताना दुसरीकडे त्याच मुलांना ह्रदयाशी धरून त्यांना मोठे करणारेही अनेक जण आपल्याला दिसतात. अशाच लोकांमुळेच आपल्या समाजाचा तोल सांभाळला जातो. समाज घडतो. अशांना लोकांपुढे आणावे म्हणूनच हा उपक्रम आयोजित केला गेल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमाचे दुसरे पर्व सर्वार्थाने वेगळे ठरले. नऊ दुर्गाच्या कार्याला आदिशक्तीच्या नऊ रूपांशी जोडत त्याला गीत-नृत्याची संगीतमय साथ देणाऱ्या कार्यक्रमाची सुंदर गुंफण ‘मिती क्रिएशन्स’च्या उत्तरा मोने यांनी केली. नऊ दुर्गा आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी त्याच ताकदीच्या, स्वत:च्या कामाने समाजात मोठे स्थान मिळवलेल्या नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, सामाजिक कार्यकर्त्यां रेणू गावस्कर, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी, ‘वाईन लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उद्योजिका अचला जोशी, केईएम रुग्णालयाच्या माजी अधिष्ठात्या डॉ. शुभांगी पारकर आणि केईएम रुग्णालयाच्या सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ डॉ. कामाक्षी भाटे या नऊ मान्यवर ‘दुर्गा’ असा अनोखा संगम या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांनी अनुभवला.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हिमालयाची पुत्री दृढनिश्चयी अशा शैलपुत्रीची पूजा केली जाते. अशाच दृढनिश्चयाने अनाथ मुलांवर मायेची पखरण करणाऱ्या, त्यांना दत्तक देऊन आई-वडिलांची माया मिळवून देणाऱ्या ‘पाखर संकुल’ या संस्थेच्या प्रमुख शुभांगी बुवा यांचा पहिला सत्कार करण्यात आला. शेवटच्या श्वासापर्यंत जगण्यासाठी धडपडणाऱ्या अनाथ बाळाचा संघर्ष पाहून अशा ‘स्ट्रगल बेबी’ला जवळ घेणाऱ्या शुभांगी बुवा अनेक अनाथ मुलांना मोठे करतात, त्यांना शिक्षण देतात. आमची मुले जेव्हा दत्तक जातात तेव्हा मुलीला सासरी पाठवताना आईच्या मनात जे मानसिक द्वंद्व सुरू असतं तेच आपल्याही मनात असतं. मात्र, तरीही आपल्या या मुलांना पालक म्हणून नाव, सन्मान मिळवून देणाऱ्या अनेक आई-बाबांची मी ऋणी आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  त्यांचा सत्कार केला तो  नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी.
शुभांगीताईंसारखेच मायेने आणि जिद्दीने मोखाडय़ासारख्या दुर्गम भागात आदिवासी, कर्णबधिर मुलांसाठी शाळा उभारणाऱ्या प्रमिलाताई कोकड यांना दुर्गेच्या दुसऱ्या रूपाची शक्ती, ऊर्जेचे प्रतीक असणाऱ्या ब्रह्मरूपिणी देवीची उपमा देण्यात आली. ‘६६ व्या वर्षीही काम करणाऱ्या प्रमिलाताईंना हे बळ कुठून येतं?’ असं विचारल्यावर, ‘काम करत गेले, समोर प्रश्न आला की तो सोडवताना मग वयाचेही भान राहत नाही,’ असं सहज उत्तर देऊन त्यांनी रसिकांची वाहवा मिळवली आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली त्या आजही समाजसेवेत कार्यरत असणाऱ्या ७७ वर्षीय अचला जोशी यांनी!
गोंदियातून आलेल्या किडकिडीत बांध्याच्या  उषा मढावी यांना पाहिल्यानंतर, त्यांना ऐकल्यानंतर एका आदिवासी स्त्रीच्या उंच उंच कर्तृत्वाची प्रचीती आली. नवरात्रीतील तिसरी देवी चंद्रघंटा देवीशी साधम्र्य सांगणाऱ्या उषा मढावी यांनी ७०० एकरांचं जंगल वाचवलं आहे हे एरवी ऐकूनही खरं वाटलं नसतं. जंगल तस्करी करणाऱ्यांना अडवायचं असेल तर एकटय़ादुकटय़ा बाईने थांबून काही होणार नाही. आपण सगळ्या जणी एकत्र उभ्या राहिलो तर ते काय ट्रॅक्टर घालतील?, असं समजावत मी सगळ्या बायांना एकत्र केलं, म्हणणाऱ्या उषाताईंनी आपल्या व्यावहारिक शहाणपणाच्या जोरावर जिंकलेली जंगलकथा आपल्या गावरान शब्दांत सांगितली तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. तर अशी  व्यक्तिरेखा पडद्यावर मांडली तर प्रेक्षकांना ती खरी वाटणारच नाही, अशा शब्दांत दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी त्यांचं कौतुक केलं.
अष्टभुजा रूपातील कुष्मांडा देवीच्या पूजनाने रोग दूर होतात. आपल्या डॉक्टरी कौशल्याने माणसांचे नव्हे तर रस्त्यावर भटकणाऱ्या, अपघातग्रस्त अशा प्राण्यांना जीवदान देणाऱ्या मुंबईच्या डॉ.अंकिता पाठक या तरुण दुर्गेचे प्राण्यांवरचे निखळ प्रेम, श्रद्धा या दोन गोष्टी तिच्या कामाचे महत्त्व वाढवत होत्या. प्राण्यांमध्ये जात नसते, त्यांच्यात रंगभेदही नसतो. हे भेद आपण निर्माण केले आहेत, असे सांगणाऱ्या अंकिताला एवढय़ा लहान वयात मुक्या प्राण्यांच्या भावनाही अचूक समजतात, याबद्दल तिचा सन्मान करणाऱ्या अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी आनंदाने तिची पाठ थोपटली.
पांढरेशुभ्र वस्त्र धारण केलेल्या, कमळावर बसलेल्या स्कंधमातेला पाचव्या दुर्गाशक्तीचा मान मिळतो. मात्र, हाच पांढरा रंग जेव्हा वैधव्याचा रंग घेऊन स्त्रियांच्या आयुष्यात येतो तेव्हा त्यांच्या आयुष्यातील सगळे रंग हरवून बसतात, याची जाणीव नगरच्या बेबीताई गायकवाड यांना झाली. विधवांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि त्यांच्या पुनर्विवाहासाठी कार्य करणाऱ्या बेबीताईंनी, तुम्ही जे विचार दिले ते फक्त मी कृतीत उतरवले, असं सांगून कित्येक शिकलेल्या आणि निमूट प्रथा-परंपरा पाळणाऱ्या स्त्रियांना चांगल्या गोष्टी केवळ वैचारिक गप्पांपुरत्या ठेवू नयेत, याची बोचरी जाणीव करून दिली. शास्त्रीय गायिका
श्रुती सडोलीकर यांनी बेबीताईंचा सन्मान केला. त्या वेळी त्यांनी गायलेल्या गाण्याने वेगळेच वातावरण तयार केले.
पेणसारख्या ठिकाणी मतिमंद मुलांसाठी शाळा सुरू करणाऱ्या डॉ. सुरेखा पाटील यांना सहाव्या दुर्गेचे अक्षयदान मिळवून देणाऱ्या कात्यायनी देवीच्या स्वरूपाशी जोडले गेले. मतिमंद मुलांना शिक्षणाच्या जोरावर स्वत:च्या पायावर उभ्या करणाऱ्या डॉ. सुरेखा पाटील. समाजाने नाकारलेली ही मुले जेव्हा स्वकष्टाची कमाई त्यांच्या आई-वडिलांच्या हातावर ठेवतात तेव्हा होणारा आनंद हा शब्दांच्या पलीकडला असतो हे सांगताना भावविवश झाल्या होत्या. मतिमंद मुलांना फसवणारी अनेक माणसे आज आजूबाजूला आहेत. या परिस्थितीत त्यांचा मार्गदर्शक स्तंभ बनलेल्या डॉ. सुरेखा पाटील यांच्यासारख्या दुर्गानी आपल्या कार्यातून अशक्य ते शक्य करून दाखवले आहे, या शब्दांत केईएम रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी प्रशंसेची पावती दिली.
सातवी दुर्गा काळरात्री.. वयाने २५ वर्षांची पण, मनाने अवघ्या १०-१२ वर्षांच्या मनालीच्या आयुष्यात अपंगत्व आणि मतिमंद या दोन्ही गोष्टी काळरात्रीच्या रूपाने बरसल्या. आपल्या आजारपणावर मात करणाऱ्या दुर्दम्य जिद्दीच्या मनाली कुलकर्णीला कौतुकाची थाप मिळाली ती संवेदनशील, असंख्य मुलांची आई असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां रेणू गावस्कर यांची!
मेळघाटात बांबू या नैसर्गिक साधनाचा वापर करून तिथल्या आदिवासींना स्वयंरोजगार मिळवून देणाऱ्या निरुपमा देशपांडे यांना आठवी दुर्गा महागौरीच्या रूपात पाहिले गेले. लग्न केल्यावर स्वेच्छेने आपल्या शिक्षणाचा वापर खेडय़ातील लोकांच्या आयुष्यासाठी करायचा, या हेतूने मेळघाटात पाऊल टाकणाऱ्या निरुपमा देशपांडे यांनी हळूहळू पण सातत्याने होणाऱ्या या कार्याने समाजात बदल घडतो हे त्यांनी खात्रीने सांगितले आणि मेळघाटात येऊन हे बदल पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांचा सत्कार केला अभिनेत्री आणि आदिवासींची कला जोपासणाऱ्या ‘तारपा’ संस्थेच्या कार्यकर्त्यां गीतांजली कुलकर्णी यांनी!
नवव्या दुर्गेचा पारलौकिक कामना पूर्ण करणाऱ्या सिद्धीदात्री देवीचा मान मिळाला तो पंढरपूरच्या मीनाक्षी देशपांडे यांना.  स्वत: अपंग असूनही आपल्या बँके तील नोकरीतून मिळणाऱ्या मानधनाचा उपयोग अपंग खेळाडूंना घडवणाऱ्या
मीनाक्षी देशपांडेंचे उदाहरण हे अपंग मुलांना त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मार्ग मिळवून देणाऱ्या सिद्धीदात्रीचेच खरे रूप आहे हे उपस्थितांनाही मान्य करावेच लागले. त्यांचा सत्कार केला डॉ. कामाक्षी भाटे यांनी. त्या वेळी डॉ. भाटे यांनी अवयवदानावर समयोचित भाष्य करून उपस्थितांना त्याचे महत्त्व पटवून दिले.
‘लोकसत्ता’ने गेल्या वर्षीपासून सुरू केलेल्या ‘शोध नवदुर्गा’चा या उपक्रमाशी प्रायोजक म्हणून जोडल्या गेलेल्या ‘अभ्युदय को-ऑप. बँक लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक विजय मौर्ये यांनीही या नवदुर्गा म्हणजे समाजाला मिळालेली देणगी असल्याचा उल्लेख करत या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार मानले. तसेच ‘केसरी’च्या केसरीभाऊ पाटील यांनीही या नवदुर्गाचे कौतुक केले.
या नवदुर्गाच्या कार्याची महती गायिका अमृता काळे, अद्वैता लोणकर आणि गायक नचिकेत देसाई यांनीही रसिकांपर्यंत सूररूपात पोहोचवली. नीला सोवनी, उमा देवराज, मुक्ता रास्ते, प्रेशिता मोरे आणि विनिता जाधव या वादक स्त्रियांनीही त्यांना तितकीच मोलाची साथ दिली. आपले गाणे आपणच गावे, त्या गाण्यावर प्रेम करत गावे तरच तुमचे जीवनगाणे सुंदर होऊन जाते, हा संदेश देणाऱ्या या नऊ दुर्गाना ‘लोकसत्ता’चा सलाम!

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

नवदुर्गा म्हणतात,

आयुष्यात जगण्यासाठी ऊर्जा मिळतील असे क्षण कमीच असतात त्यामुळे या कार्यक्रमाचा भाग झाल्याबद्दल अतिशय आनंद वाटतो. या नवदुर्गाचे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांना त्याची जाण असणे आवश्यक असते. हे सत्कार्य ‘लोकसत्ता’ने हाती घेतल्यामुळे त्यांचे आभार.
ज्योती सुभाष, अभिनेत्री

‘वाचशील तर वाचशील’ याचा स्वानुभव आहे. संगीताबरोबरच वाचन, परिशीलन, चिंतन याचा वारसा मिळाल्यामुळे वाचन संगीताइतकेच मला प्रिय आहे. त्यामुळे वाचनाच्या मार्गावर अविरतपणे चालणाऱ्या बेबीताई गायकवाड यांचे कौतुक आहे.
श्रुती सडोलीकर, शास्त्रीय गायिका

अविरत समाजासाठी काम करणाऱ्या या ‘झपाटलेल्या वेडय़ां’चीच आज समाजाला गरज आहे. या नवदुर्गा न विझणाऱ्या जीवन ज्योती आहेत. त्यांना बघून म्हणावेसे वाटते, ‘ऐसा कुछ काम करो दोनो भी चलते रहे, यहाँसे आँधी आती रहै वहाँसे दीप जलते रहे.’
डॉ. शुभांगी पारकर, माजी अधिष्ठाता केईएम रुग्णालय

एका कार्यक्रमात महिला सरपंचाने महिला दिनाला ‘बैलपोळ्या’ची उपमा दिली होती, कारण त्यादिवशी बैलांप्रमाणे स्त्रियांनासुद्धा खाऊपिऊ घालून वर्षभर राबवले जाते. या परंपरेला ‘लोकसत्ता’ने बगल देऊन स्त्रियांच्या विकासाचा मार्ग निवडला याबद्दल आनंद आहे.
मनीषा म्हैसकर, सचिव – नगरविकास खाते

इंटरनेटच्या युगात जन्माला आलेली आजची पिढी हुशार आहे. त्यांच्याकडे माहितीचा मोठा स्रोत उपलब्ध असल्यामुळे मुलांनी विचारलेल्या प्रश्नांवर योग्य अभ्यास करून उत्तरे दिली पाहिजेत. जव्हारसारख्या भागात ‘चाईल्ड हेल्पलाइन’ द्वारे मुलांवर योग्य संस्कार करणाऱ्या प्रमिला कोकड यांच्यासारख्या शिक्षकांची गरज आहे.
अचला जोशी, उद्योजिका

सत्य हे कल्पनेपेक्षा थरारक असते याची प्रचीती या नवदुर्गाची कर्तृत्वगाथा पाहिल्यावर येते. अशा व्यक्ती वास्तवात नसतात, ही समाजाची कल्पना माध्यमांनी या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे मोडून पडेल आणि कानाकोपऱ्यात अशा अनेक नवदुर्गाची समाजाला ओळख होईल.
प्रतिमा कुलकर्णी, निर्माती-दिग्दर्शिका

या नवदुर्गाचे कार्य पाहताना खिळल्यासारखी झाले होते. ‘लोकसत्ता’च्या संपादकीय पानावर सहमती व असहमती यामध्ये वाचकाचे मन हेलकावण्याचे सामथ्र्य आहे. दीपावली नुकतीच झाली, परंतु किती तरी मुलांच्या घरात अंधार होता. या कार्यकमातून बाहेर पडताना एका तरी मुलाच्या अंत:करणाशी नाते जुळेल असा निश्चय आपण स्वत:शी केला तर कार्यक्रमाचे फलित होईल.
रेणू गावस्कर, सामाजिक कार्यकर्त्यां

या नवदुर्गा समाजाशी बांधिलकी ठेवून काम करत आहेत याबद्दल त्यांना सलाम. आम्ही आदिवासी भागातील प्राथमिक शाळांसाठी काम करताना मुलांना अनुभवातून शिक्षण कसे देता येईल यावर भर देतो. थिएटरच्या उपकरणांचा वापर करून आम्ही त्या मुलांना सर्जनशील पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतो.
गीतांजली कुलकर्णी, अभिनेत्री

अवयवदानासाठी मी गेली कित्येक वर्षे काम करीत आहे, परंतु आपल्या देशाचे अवयवदानात कुठेच स्थान नाही. देशात अशा किती तरी अंध व्यक्ती आहेत त्यांची दृष्टी पुन्हा येऊ शकते. आपल्या १२५ कोटी लोकसंख्येच्या देशात दर दिवसाला ६२ हजार मृत्यू होतात. जर काही टक्के लोकांनी जरी अवयवदान केले तर किती तरी जिवंत व्यक्तींना त्याचा फायदा मिळेल.
डॉ. कामाक्षी भाटे, केईएम रुग्णालय

नवदुर्गाच्या उपक्रमामुळे दुर्गम भागात काम करणाऱ्या आणि प्रसिद्धीपासून दूर असलेल्या स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ‘लोकसत्ता’ने केले. महाराष्ट्राच्या विविध भागांत समाजाचा वसा घेऊन काम करणाऱ्या स्त्रियांना नवरात्रीच्या निमित्ताने सन्मानित करून खरी भगवंताची पूजा ‘शोध नवदुर्गे’च्या उपक्रमातून घडली.     – शुभांगी बुवा

हा उपक्रम इतर कार्यक्रमांपेक्षा वेगळा जाणवला. या कार्यक्रमात अध्यक्ष-उपाध्यक्ष नव्हते, पाहुण्यांची मोठमोठी भाषणे नव्हती, कुठलाही बडेजाव नव्हता. त्यामुळे कार्यक्रम जास्त भावला. समाजासाठी काम करणाऱ्या स्त्रिया एकत्र आणण्याचे काम ‘शोध नवदुर्गेचा’ या कार्यक्रमातून घडले.
– मीनाक्षी देशपांडे

‘शोध नवदुर्गाचा’च्या सन्मानामुळे आर्थिकपेक्षा मानसिक मदत मिळाली व ती मोलाची होती. या कार्यक्र मानंतर असंख्य पत्रे आली. ज्या दिग्गजांचे ‘लोकसत्ता’मधील लेख वाचून मी प्रेरणा घेत होते त्यांच्या हातून आम्हा नवदुर्गाच्या कामाचा सन्मान केला गेला हे आमच्यासाठी प्रेरणादायी होते. हा माझ्या आयुष्यातील मोठा पुरस्कार असून यामुळे मला काम करायला बळ मिळाले. – बेबीताई गायकवाड

प्राण्यांसाठी काम करणाऱ्यांची दखल सहसा घेतली जात नाही ती ‘लोकसत्ता’ने घेतली याबद्दल अत्यानंद आहे. यानिमित्ताने ग्रामीण भागातही विधवांची लग्न लावण्याइतके आधुनिक विचार करणारे लोक आहेत हे जाणून खूप कौतुकही वाटले.   – डॉ. अंकिता पाठक

नवदुर्गा म्हणून निवड झाल्यावर मला खूप पत्रे आली, खूप लोक भेटायला आले. ‘लोकसत्ता’च्या उपक्रमामुळे ‘तिची कहाणीच वेगळी’ या माझ्या पुस्तकाचा खप वाढला आणि माझ्यासारख्या मुलीचा इतर स्त्रियांबरोबर समावेश करून घेतल्यामुळे खूप आश्वासक वाटले आणि भविष्यात आपणही काहीतरी अद्भुत करू शकतो यावरचा विश्वास वाढला. – मनाली कुलकर्णी

‘लोकसत्ता’च्या ‘शोध नवदुर्गाचा’ हा उपक्रम स्तुत्य व स्त्री-शक्तीसाठी प्रेरणादायी होता. समाजातील माठभर स्त्रियांनी आपल्या मनाशी समाज बदलाचा व जनजागृतीचा निर्धार पक्का केला तर काय किमया घडू शकते याची प्रचिती ‘लोकसत्ता’ने महाराष्ट्राला घडवून दिली.- डॉ. सुरेखा पाटील

या कार्यक्रमामुळे नवीन माणसे जोडली गेली. ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्धी झाल्यामुळे देणग्यांचा ओघही वाढला. चांगली माणसे अशी भेटत राहिली तर नक्कीच समाजाभिमुख निर्मिती होईल ज्यातून समाजाचा उद्धार होईल. – प्रमिला कोकड

या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील विविध भागांत काम करणाऱ्या स्त्रियांच्या भेटी झाल्या. आमच्या कार्याला प्रसिद्धी मिळाल्यामुळे संस्थेत येणाऱ्या लोकांची संख्या वाढली. या कार्यक्रमामुळे चांगल्या माणसांची साखळी निर्माण होते ज्यातून नवनिर्मिती होते. – निरुपमा देशपांडे

यानिमित्ताने समाजकार्यात आवड असलेली बरीच माणसे आमच्यासोबत जोडली गेली ज्यामुळे आमच्या मदतीसाठी दोनाचे चार हात झाले. प्रसिद्धी द्यावी अशी अपेक्षा नसताना आम्ही नवदुर्गा काम करीत असतो, पण मदतीचा हात मिळाला तर कामाचा उत्साह द्विगुणित होतो.  – उषा मढावी

संकलन – मीनल गांगुर्डे