News Flash

मात उजेडाच्या भीतीवरची..

शिष्यवृत्ती मिळवून रशियात शिकायला गेलेली प्रगल्भ मोनिका जेव्हा मनोरुग्ण होऊन ‘माऊली’ संस्थेमध्ये दाखल झाली, तेव्हा तिलाच जगण्याचं भान नव्हतं. पण डॉक्टर धामणे दाम्पत्याच्या मदतीने ती

मोनिका साळवी

शिष्यवृत्ती मिळवून रशियात शिकायला गेलेली प्रगल्भ मोनिका जेव्हा मनोरुग्ण होऊन ‘माऊली’ संस्थेमध्ये दाखल झाली, तेव्हा तिलाच जगण्याचं भान नव्हतं. पण डॉक्टर धामणे दाम्पत्याच्या मदतीने ती बरी झाली आणि आज तिने मानसिक रुग्णांच्या सेवेचा आदर्श निर्माण केला आहे. अगदी थोरामोठय़ांची माय आणि मुलांची मम्मी झालेल्या आणि ‘माऊली’चा आधार ठरलेल्या या मोनिका साळवी यांना आमचा मानाचा मुजरा!

ती ल‘माऊली’मध्ये आली तेव्हा तिचं वय होतं ३५ आणि वजन होतं फक्त २९ किलो. किरकोळ अंगकाठी, नजर सतत शून्यात.. आपल्याच विश्वात हरवून बसलेली.. आपल्याच माणसापासून तुटलेली. मात्र तीच मोनिका आज संपूर्ण ‘माऊली’ कुटुंबाची माय, मम्मी झाली आहे. ‘माऊली’च्या या निरपेक्ष कामातील ती बिनीची शिलेदार बनली आहे.

प्रगल्भता आणि जन्मजात करुणा हृदयात घेऊन आलेली मोनिका. मोनिका साळवी. शिक्षण बी.ए. डी.एड् .बी.एड्. भारत सरकारच्या शिष्यवृत्तीवर रशियात शिकण्यासाठी गेली.. विषय मेडिसीन! पहिल्या वर्षी तिकडे रशियन भाषा शिकणं बंधनकारक असतं. तशी ती शिकलीही. मग एक वर्षांनंतर काय झालं ते तिला नाही उमजलं. ती उदास राहू लागली आणि तिची ती उदास अवस्था बघून तिच्या आई-वडिलांनी तिला परत भारतात बोलावलं. ती आली, पण कदाचित आपण पुढे काही करू शकत नाही हे शल्य तिला बोचत असावं. ती अधिकच आत्ममग्न झाली.. पण तरीही तिचे दैनंदिन व्यवहार सुरूच असायचे. त्यामुळे तिच्या लग्नाचा विचार सुरू झाला. लग्न झालं खरं पण प्रगल्भ विचारांच्या मोनिकाला समजून घेणारं तिथं कुणी नव्हतं. तिला मारहाण सुरू झाली. आत्ममग्न मोनिका अधिकाधिक कोषात जाऊ लागली. भीती आणि नैराश्य याने ग्रासली. लग्नानंतर दोन-तीन महिन्यांतच ती परत आली. घरी आली खरी पण घरातल्याच अत्यंत जवळच्या व्यक्तीने संपत्तीसाठी छळायला सुरुवात केली. तिच्या आई-वडिलांसह तिलाही. त्याचा मानसिक धक्का इतका होता की वडील ह्रदयविकाराच्या झटक्यानं अचानक गेले आणि आईवरही मानसिक आघात झाला. घरी राहणं धोक्याचं वाटू लागलं. आई आणि मोनिका घरातून बाहेर पडल्या खऱ्या, पण दोघींही मानसिक आघाताने पूर्ण खचून गेलेल्या. मानसिक भान हरवलेल्या. तिच्या आईला कुणी तरी अनाथाश्रमात पोहोचवलं तर हिला आळंदीच्या एका हॉस्टेलवर पाठवण्यात आलं. मनोरुग्ण झालेल्या मोनिकाला ना खाण्याची शुद्ध होती ना जगण्याची. तिला एका छोटय़ाशा खोलीमध्ये बंद करून ठेवलं गेलं. तिची अवस्था दिवसेंदिवस भयानक होत चालली होती. तिची ही स्थिती जवळजवळ चार र्वषे होती. दरम्यान, कुणी तरी डॉ. राजेंद्र धामणे यांना तिची माहिती सांगितली आणि ते तिला तिथून घेऊन आले ते थेट ‘माऊली’ संस्थे मध्ये. दरम्यान, तिनं दोनदा जीवन संपवण्याचाही प्रयत्न केला. पण ते असं सहजासहजी संपणारं नव्हतं कारण तिला ‘माय’ व्हायचं होतं. सेवेच्या, मानवतेच्या पदपथावर चालत, दु:खितांच्या वेदना आणि दु:ख दूर करणारी माय! आज ती म्हणते, हे कदाचित विधिलिखित असावं!

अहमदनगरजवळील शिंगवे या गावामध्ये डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे या दाम्पत्याने चालवलेली ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ ही बिनचेहऱ्याच्या, अनाथ, रस्त्यावर जगणाऱ्या मनोरुग्ण स्त्रियांसाठी व त्यांच्या मुलांसाठी काम करणारी संस्था. मोनिका येथे आली आणि आणि डॉक्टर दाम्पत्याने केलेल्या पराकाष्ठेच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या प्रेमामुळे, विश्वासामुळे हळूहळू मोनिका बरी होऊ लागली. वर्षभरात ती पूर्ववत होऊ झाली. आज तीच मोनिका अनेक मनोरुग्णांची आधार बनली आहे.
सध्या या संस्थेमध्ये ८५ स्त्रिया १२ मुले कायमस्वरूपी राहतात. या स्त्रियांचे विविध प्रश्न असतात. ते समजून घेऊन त्यांना परत ‘उभं’ करण्याचं खूप महत्त्वाचं काम मोनिका डॉक्टरांच्या बरोबरीनं आज करते आहे. ‘माऊली’मध्ये तशा अर्थाने कुणी कर्मचारी नाहीत. येथे येऊन बऱ्या झालेल्या आणि कायमस्वरूपी वास्तव्यास असणाऱ्या स्त्रियाच विविध कामांमध्ये पारंगत झाल्या आहेत. त्यांना सामावून घेणं, त्यांचा कल आणि आवड ओळखून त्यांना तशा कामात पारंगत करण्यापासून त्यांच्या मुलांची काळजी घेण्याचं काम आज मोनिका करते.

‘माऊली’मध्ये अगदी २०-२२ वर्षांपासून तर अगदी ९५ वर्षांच्या स्त्रिया राहतात. रस्त्यावरून आणलेल्या या स्त्रियांपैकी काही स्त्रिया कुणा वासनांधाच्या अत्याचाराच्या शिकार असतात. इथे आल्यावर वैद्यकीय तपासणीत त्यांना दिवस गेलेले आढळले की मग त्यांची वेगळी काळजी घ्यावी लागते. काही वेळा त्यांना अगदी पाचवा-सहावा महिना उलटून गेलेला असतो. यापूर्वी कुठे तरी उकिरडय़ावर, रस्त्यावर, कुणी फेकलेलं, घाणेरडं खाण्यातच दिवस गेलेले असतात. अशा वेळी ‘माऊली’मध्ये आल्यावर त्यांना स्वच्छ करणं हे पहिलं काम असतंच पण त्याबरोबर त्यांच्या आहाराची योग्य काळजी घेऊन उरलेल्या दिवसात तिचं आणि बाळाचं पोषण योग्य रीतीने होण्याच्या दृष्टीने आहाराची योजना करावी लागते.

त्याचबरोबर जीवनसत्त्वे, लोह इत्यादी योग्य मात्रेत देणं गरजेचं असते. यासाठी मोनिकाची खूप धडपड असते. ज्या स्त्रिया खूप कुपोषित आहेत, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून ती बारीकसारीक तपशील ठेवते आणि त्यांना वेळेवर जेवण आणि औषधं देते. इतकंच करून चालत नाही. त्या तशा अवघडलेल्या स्थितीत त्यांना स्वच्छ ठेवणं आणि शांत ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. गर्भारपणात बऱ्याच वेळेस मानसिक आजार उफाळून येतो. अशा वेळी त्यांना नेहमीची औषधंही देता येत नाहीत. त्यांना चुचकारत, समजावत शांत करणं गरजेचं असतं. मोनिका ते काम एखाद्या मायेनं करते. पोटातल्या बाळाची आणि त्या भान हरवलेल्या स्त्रीची काळजी घेणं हे एक दिव्य असतं आणि त्याहीपेक्षा कठीण त्याचं बाळंतपण.. ती बहुधा ‘माऊली’तच होतात. मोनिका डॉक्टर धामणे दाम्पत्याला त्यासाठी साहाय्यक म्हणून मदत करते. बाळाच्या जन्मानंतर त्याला न्हाऊ-माखू घालणं, लसीकरणासाठी घेऊन जाणं, अगणित कामं..

भल्या सकाळी पाचला घडय़ाळाचा गजर होतो. ती उठते. अर्थात रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी तिचा हा नियम काही चुकत नाही. रात्री ‘माऊली’मधील बाळं कितीही वाजता उठतात. मग जे मूल अंगावर पिते, त्यांच्या आयांना उठवून बाळांना पाजणं, जी बाळं पावडरच्या दुधावर आहेत त्यांना दूध तयार करून पाजणं, अशी एक ना दोन अनेक कामं तिला असतात. त्यातच एखाद-दुसरी मनोरुग्ण स्त्री झोपत नाही. अस्वस्थ होते. तिला चार गोष्टी समजावून सांग, डॉक्टरांना विचारून औषध ch10दे, एखादी अंथरुणाला खिळलेली आजी कमरेला लावलेला डायपर काढून फेकते. मग तो बदल आणि तिला स्वच्छ कर. अशीही तिची धावपळ चाललेली असते. अगदी महिलांच्या मासिक पाळीत त्यांना स्वच्छ करण्यापासून त्यांचे सर्व शारीरिक विधी काढण्यासही ती मदत करते.


दोन वर्षांपूर्वी ९३ व्या वर्षी बलात्कार झालेल्या एक आजी ‘माऊली’त आणल्या होत्या. मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या त्यांना धड उभंही राहता येत नव्हतं.  त्यातच त्यांना उलटय़ा जुलाब सुरू झाले. डायपर लावला रे लावला की भिजायचा.  दोन दिवस त्या सलाईनवर होत्या.  त्याची सुई त्यांनी काढू नये म्हणून मोनिका त्यांच्या उशाशी बसून राहिली. तिच्या मेहनतीला फळ आलं आणि त्या त्यातून बऱ्या झाल्या. ९५ वर्षांच्या आजी आजही ‘माऊली’त आहेत.

इतकं सगळं करून सकाळी लवकर उठून आणि सर्वात आधी नव्याने दाखल झालेल्या स्त्रियांना उठवून त्यांना सकाळच्या प्रातर्विधीला पाठवणं, त्यांना ब्रशवर टूथ पेस्ट देऊन दात घासायला लावणं. मोठं जिकिरीचं आणि सहनशीलतेचा अंत बघणारं काम. हे झाल्यावर मग बऱ्याच भान नसलेल्या, अंथरुणाला खिळलेल्या स्त्रियांना अंघोळ घालणं हा एक मोठा कार्यक्रम असतो. त्यानंतर वेळ होते ती मग मानसिकदृष्टय़ा स्थिर झालेल्या स्त्रियांची योगासनं करण्याची. त्यानंतर त्यांचा चहा आणि नाष्टा.
मग ज्या स्थिर आहेत आणि काम करू शकतात, त्यांना वेगवेगळ्या उद्योगांत मग्न ठेवणं त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी गरजेचं असतं. त्यानुसार कुणी अगरबत्ती तयार करतं तर कुणी गोधडय़ा शिवतं. एकीकडे हे काम सुरू असतं आणि दुसरीकडे स्वयंपाक. तिला स्वयंपाक मात्र करता येत नाही आणि हे ती मनमोकळेपणानं, हसत, हसत मान्यही करते. कधी कधी काही नवीन पाककृतीचे प्रयोगही ती करून पाहते..

‘माऊली’ला भेट देण्यासाठी सतत कुणी तरी येत असतं. त्या पाहुण्यांचं स्वागत करणं, त्यांना चहापाणी देणं आणि ‘माऊली’चा सध्याचा प्रवास आणि नव्यानं होणाऱ्या ‘मनगाव’ या ६०० रुग्ण क्षमतेच्या भव्य प्रकल्पाची माहिती अस्खलित इंग्रजीमध्ये देता देता मोनिका भविष्याचा सहजच वेध घेऊन जाते..

ती सारखी कार्यमग्न असते. इतकं करूनही कधी थकत मात्र नाही. तीच तिची उर्जा असावी बहुधा. तिची वैचारिक प्रगल्भता इतकी दांडगी आहे की कितीही प्रतिकूल वातावरणात ती सतत सकारात्मक विचारच करते.
‘माऊली’मध्ये राहणाऱ्या वयस्क, खूप गंभीर आजारी स्त्रियांचा मृत्यू होत असतो. त्यानंतर भरपूर कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. मृतदेहाचा पंचनामा, पोस्टमार्टेम आणि त्यानंतर अंत्यसंस्कार. या सगळ्या कामांत तिचा सहभाग असतो. असंच काही दिवसांपूर्वी ‘माऊली’मधील एका वयस्क स्त्रीचं निधन झालं. तिचा मृतदेह घेऊन मोनिका डॉक्टर दाम्पत्याबरोबर शासकीय रुग्णालयात पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी गेली. डॉक्टर बराच तास आले नव्हते. त्या दरम्यान, तिथे भिंतीवरची ‘नेत्रदाना’ची माहिती तिनं वाचली. तिच्या लक्षात आलं की ‘माऊली’तील स्त्रियांचे मृत्यू होत असतात, आपण त्यांचं नेत्रदान केलं तर किती तरी लोकांना दृष्टी मिळेल. विचार आला आणि तिने तत्काळ नेत्रदान कक्षाशी संपर्क साधून या प्रक्रियेची माहिती घेतली. याचा परिणाम म्हणून ‘माऊली’ परिवार आता अशा पद्धतीच्या नेत्रदानाचा पायंडा पाडणार आहे.

या सर्व कामांत प्रचंड दमवणूक आहे, तणाव आहेत, ज्यांची मन लावून सेवा केली त्यांचे मृत्यू बघताना होणारी जिवाची तगमग आहे. रस्त्यावर राहताना स्त्रियांनी सोसलेल्या वेदना आणि चटके दाहक असतात. कुणी या अत्याचारातून एचआयव्हीची शिकार झालेली असते, कुणाला गंभीर गुप्तरोग असतो तर कुणाला रस्त्यावर जगताना पोट भरण्यासाठी भटक्या कुत्र्याप्रमाणे कुठलंही घाणेरडं अन्न खाल्ल्याने आणि गटाराचं पाणी प्यायल्याने खूप गंभीर आजार झालेले असतात. त्यांची सेवाशुश्रूषा करताना मनात कुठलीही किळस किंवा लाज न बाळगता हे काम करावं लागतं. डॉक्टर दाम्पत्याच्या खांद्याला खांदा लावून मोनिका हे काम करते.

लहान मुलांना भरवणं हे तर तिचं आवडीचं काम. तिला ‘माऊली’तील सगळी मुलं ‘मम्मी’ का म्हणतात याचा उलगडा होतो. तिने कुठे नर्सिगचं, सामाजिक कामाचं किंवा वैदय़कीय प्रशिक्षण घेतले नाही, पण हृदयातली अपार करुणा आणि समाजाप्रति काही कृतिशील काम करण्याची वृत्ती असेल तर काहीही करता येते ही तिची धारणा. हे सगळं आपल्याला करायलाच हवं. दुसरं कुणी येईल आणि आपल्या सामाजिक प्रश्नात काम करील ही वृत्ती चुकीची. त्यांना सगळ्या जगानं जरी नाकारलं तरी ‘माऊली’ कधीच दूर करणार नाही, असं ती अभिमानाने म्हणते. या सगळ्या कामात तिची डॉक्टर दाम्पत्यावर अफाट श्रद्धा आणि प्रेम. त्यांनी आपल्याला उभं केलं आणि म्हणून आपण हे काम करू शकतो हा तिचा सततचा नम्र भाव.
‘माऊली’च्या वतीने ‘माइंड रेडिओ’ हा मन या विषयाला वाहिलेला इंटरनेट रेडिओ चालवला जातो. त्याचं संचालन, निवेदन आणि ध्वनिमुद्रणही ती करते. हा रेडिओ  msp.org.in या वेबसाइटवर ऐकता येतो.
तिने जीवनच या कार्यात समर्पित केलं आहे. अशा समर्पित कार्यकर्त्यांचा वानवा असणाऱ्या या समाजात तिचा आदर्श खूप मोठा आहे. सेवेचं असिधाराव्रत घेतलेली मोनिका मनाने हळवी आहे. ती इंग्रजीत लिखाण करते. कविताही करते.
तिच्या एका इंग्रजी कवितेचं डॉ. राजेंद्र धामणे यांनी केलेलं मराठी भाषांतर,
अंधारयुगाच्या दिशेनं जाताना
एक गोष्ट लक्षात असू द्या
आपापला उजेड जरा जपून ठेवा.
अंधाराची भीती नाही वाटत आता,
तो तर सर्वव्यापी आणि सवयीचा,
भीती आहे ती उजेडाची..
ज्यांना तो मिळाला त्यांनी मुठीत घट्ट ठेवलाय.
आमची लढाई या मुठीतल्या उजेडासाठी.. ल्ल
(संपर्क – माऊली प्रतिष्ठान
०२४१-२७६५०६०, २७६५०५०)
wagalesampada@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2015 1:59 am

Web Title: monica salvi working for mental patient
Next Stories
1 अंधारवाट तुडवूनि तेवला आशादीप एक..
2 यश संघर्षांच्या वाटेवरचं..
3 विषारी आयुष्याचं झालं अमृत
Just Now!
X