06 July 2020

News Flash

देणे समाजाचे

२००८ मध्ये प्रदर्शन अवघ्या पंधरा दिवसांवर आलेलं असताना मला सगळ्यात मोठा धक्का बसला.

‘देणे समाजाचे’ उपक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांची उपस्थिती

भक्ती बिसुरे gokhaleveena@yahoo.co.in

समाजात गरजवंत जसे आहेत तसे दानशूरही आहेत. या दोघांना एकत्र करत गेल्या चौदा वर्षांत कोटय़वधी रुपये समाजोपयोगी कामासाठी मिळवून देणाऱ्या वीणा गोखले  गिरीसहलच्या माध्यमातून कलात्मक पर्यटन घडवत वेगळं करिअरही करत आहेत, हे करत असताना पतीचा मृत्यू त्यांना रोखू शकला नाही की मुलीचा मृत्यू. भावनेपेक्षा कर्तव्य मोठं ठरवणाऱ्या वीणा गोखलेंविषयी..

लहान-मोठी संकटं आणि अडचणी सगळ्यांच्या आयुष्यात येतात. अडचणी आल्या की हातपाय गाळणं, खचून जाणं ही स्वाभाविक प्रतिक्रिया असते. पण संकटांना संधी मानून मार्ग काढणाऱ्या आणि स्वत:बरोबर इतरांच्या उद्धारासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये आवर्जून घ्यावं असं नाव म्हणजे पुण्याच्या वीणा गोखले. ‘देणे समाजाचे’ नावाच्या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनातून गेली चौदा वर्ष वीणा गोखले समाजातल्या दातृत्व लाभलेल्या मंडळींना गरजू मंडळींपर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम करत आहेत. वैयक्तिक जगण्यातला संघर्ष पेलत असतानाच मनात आणलं तर काय उंचीचं काम उभं करता येणं शक्य आहे याचा चालताबोलता, सकारात्मक वस्तुपाठ म्हणजे वीणा गोखले असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये.

वीणा गोखले सांगतात, ‘‘संगीत, कला, प्रवास अशा अनेक गोष्टींवर मनापासून प्रेम करणाऱ्या हौशी दिलीपशी लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्ष माझं आयुष्य कुठल्याही सर्वसामान्य लग्न झालेल्या तरुण मुलीचं असतं तसं होतं. भरपूर प्रवास करणं, उत्तम संगीत ऐकणं, चांगल्या कार्यक्रमांना हजेरी लावणं असा सुखाचा संसार होता. सोबतीला आमच्या भटकंतीच्या आवडीला साजेसा ट्रॅव्हल बिझनेसही आम्ही सुरू केला होता. कोकण या त्या काळात तुलनेने अनवट असलेल्या जागी शहरातील पर्यटकांच्या सहली नेणं, त्या सहलींमध्ये संगीत, नृत्य, वादन क्षेत्रांतल्या कलाकारांना सहभागी करून घेण्यातून आमच्या पर्यटकांना सहलीचाच एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयोग आम्ही सर्वात आधी केला आणि तो यशस्वीही झाला. यथावकाश म्हणजे माझ्या वयाच्या तिशीत आमच्या जुळ्या मुलींचा, सावनी आणि पूर्वीचा जन्म झाला. कुटुंब परिपूर्ण झालं असं वाटत असतानाच पूर्वीला मेनिंजायटीसचं निदान झालं, पुढे ती मतिमंद असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि संपूर्ण जागेवर असलेलं, फीट्स येणारं हे बाळ कसं सांभाळायचं या विचारांनी मी अस्वस्थ झाले. एका बाजूला तिला सांभाळणं आणि दुसऱ्या बाजूला सावनीसारख्या अत्यंत हुशार मुलीला वाढवणं अशी दुहेरी जबाबदारी पडल्यामुळे मी गांगरले होते, पण त्या परिस्थितीत दिलीपचं बरोबर असणं हा मोठा आधार होता. पूर्वीसारखी मुलं ज्या समाजसेवी संस्थांमध्ये सांभाळली जातात त्या संस्थांमधून काही मार्गदर्शन झालं तर पहावं म्हणून त्या काळात आम्ही काही संस्थांना भेटी दिल्या. त्या भेटींमधून किती उत्तम काम वेगवेगळ्या स्तरांमध्ये सुरू आहे ते पाहून आम्ही चकित झालो. हे काम लोकांसमोर यायला हवं असं मनापासून वाटलं; पण काय आणि कसं या विचारात बराच काळ गेला. त्यावरचं उत्तर दिलीपने शोधलं. घरगुती वस्तूंच्या प्रदर्शनासाठी गेलो असताना दिलीपने समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांचं काम प्रदर्शन रूपात लोकांसमोर आणायची कल्पना मांडली आणि माझ्या स्वभावाबरहुकूम मी त्याला विरोधच केला. तेव्हा शांतपणे विचार कर या दिलीपच्या शब्दांनी मी खरंच विचारात पडले. समाजातल्या दुर्लक्षित घटकांसाठी चांगलं काम करणाऱ्या संस्था आहेत. समाजात सुरू असलेल्या चांगल्या कामाला सढळ हस्ते मदत करण्याची तयारी असलेले लोकही आहेत, पण हे दोन्ही घटक समोरासमोर येत नाहीत ही मुख्य अडचण हेरून दिलीपने सुचवलेल्या पर्यायावर आम्ही काम सुरू केलं. २००५ मध्ये ‘देणे समाजाचे’ या नावासह पहिलं प्रदर्शन आम्ही भरवलं. आमचे निकष ठरले होते- कुठल्याही संस्थेला पैसे घेऊन स्टॉल द्यायचा नाही. संस्थेचं काम प्रत्यक्ष पाहून ते जोखून मगच तिला प्रदर्शनात प्रवेश द्यायचा आणि प्रदर्शनाच्या ठिकाणी कसलीही खरेदी विक्री करायची नाही. त्यामुळे खरोखरंच विधायक काम करणाऱ्या १५० संस्था आतापर्यंत प्रदर्शनातून लोकांसमोर आल्या. मिळालेला प्रतिसाद भारावून टाकणारा होता.

२००८ मध्ये प्रदर्शन अवघ्या पंधरा दिवसांवर आलेलं असताना मला सगळ्यात मोठा धक्का बसला. दिलीप एकाएकी हे जग सोडून गेला. त्याच्या शिवाय हे प्रदर्शन पुढे नेणं ही कल्पनाही शक्य नसताना केवळ हा उपक्रम बंद पडू नये यासाठी मी कुठून आणि कसा धीर गोळा केला हे आता माझं मलाही समजत नाही. त्याच्या जाण्यानंतर अनेक जवळच्या नातेवाईकांनी पाठ फिरवली. प्रदर्शनाला केलेली आर्थिक मदत अचानक काढून घेतली. संकटांची मालिका समोर उभी राहिली; पण हे संकट ही संधी मानून ‘देणे समाजाचे’ पार पडलं.

खरे प्रश्न इथून पुढेच होते. दिलीप असताना घर चालवण्यासाठी पैसे मिळवायची वेळच माझ्यावर आली नव्हती. इथून पुढे संसार, सावनीचं शिक्षण, पूर्वीसारख्या अंथरुणाला खिळलेल्या मुलीचे औषधोपचार बघणं हे सगळं मला एकटीला पेलायचं होतं. काही काळ नोकरी केली, पण नोकरी करण्याचा माझा स्वभाव नव्हता. शेवटी ‘गिरीसागर’च्या निमित्ताने गाठीशी असलेला टूर्सचा व्यवसाय नव्या जोमाने सुरू करायचा निर्णय मी घेतला. दिलीप गेल्यानंतरची पहिली सहल मी घेऊन निघणार आणि दोन दिवस आधी पूर्वी हे जग सोडून गेली. हा आघात मोठा होता, पण दु:ख कुरवाळत बसण्याएवढा वेळ हाताशी नव्हता. त्या परिस्थितीत मी ती सहल पूर्ण केली.

परत आल्यावर पुन्हा जोमाने कामाला लागले. तोपर्यंत आम्ही केवळ कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात सहली नेत होतो, पण जगण्यासाठी पैसे मिळवायचे तर पसारा वाढवणं भाग होतं. माझे पर्यटक माझ्याबरोबर उभे राहिले आणि मी श्रीलंका, मॉरिशस

अशा ठिकाणी सहली न्यायला सुरुवात केली. टूर कंपन्या आणि परदेशातल्या सहली ही

आता कितीही नॉर्मल गोष्ट असली तरी तेव्हा ते नवीन होतं. सहसा पर्यटक टूर लीडरचं बोट धरून सहल करतात, मी माझा पहिला परदेश प्रवास माझ्या पर्यटकांचं बोट धरून केला.

त्या एका यशस्वी सहलीने माझा आत्मविश्वास वाढवला. त्यानंतर मी आजपर्यंत व्यावसायिक आणि सामाजिक कामात मागे वळून

पाहिलं नाही.

‘देणे समाजाचे’ या प्रदर्शनाने मला विश्वास दिला, माणसं जोडून दिली. मी प्रदर्शनासाठी निवडलेली संस्था कधीच वावगं काम करत नसणार या एका विश्वासातून लोकांनी संस्थांना कोटय़वधी रुपयांची मदत केली. कुणी फ्रीज, कुणी वॉशिंग मशिन, कुणी अन्नधान्य असा जमेल तसा मदतीचा हात देऊ  केला. अनेक सधन नागरिकांनी चक्क आपल्या वृद्धापकाळामध्ये लाखो रुपयांची रक्कम डिपॉजिट करून त्यातून मिळणारं व्याज थेट संस्थांच्या खात्यात जमा होईल याची तरतूद केली. दर महिन्याला संस्थांना भरभक्कम आर्थिक मदत करणारे अनेक दाते आहेत. कॉलेजमध्ये जाणारा एखादा तरुण मुलगा चालत जातो आणि बसच्या तिकिटाचे तीस रुपये संस्थेला मदत म्हणून देतो, सावनीची मैत्रीण एक महिना ब्युटी पार्लरमध्ये जाणार नाही असं ठरवून पार्लरवर खर्च होणारे आठशे रुपये समाजासाठी देते तेव्हा मला ती मोठी गोष्ट वाटते. घरकाम करणाऱ्या एका स्त्रीने आपल्या पगारातले पाचशे रुपये माझ्या कामाला मदत म्हणून देणं ही भावना लाखमोलाची आहे. सोलापूरच्या एका सधन व्यक्तीने त्यांच्या एकसष्ठीनिमित्त एकसष्ठ संस्थांना मदत करण्याचा निर्णय घेतला आणि त्या एकसष्ठ संस्था ठरवण्याचं स्वातंत्र्य मला दिलं. हा विश्वास ही माझी सर्वात मोठी कमाई असं मी मानते.

प्रत्येक स्त्रीकडे सगळ्यात कठीण परिस्थितीला तोंड देऊन स्वत:चं भविष्य घडवण्याची ताकद असते. पण अनेकदा नवरा, भाऊ, वडील असे भरभक्कम पुरुष अवतीभवती असल्यामुळे त्या स्वत:ची कुवत आजमावायलाच जात नाहीत, असं माझं निरीक्षण आहे. हे बदलायला हवं. त्यासाठी संकटं येण्याची वाट बघत बसू नका, उंबरा ओलांडा आणि प्रतिकूल परिस्थितीतले लोक कसे जगतात बघा, आपली दु:ख आणि अडचणी त्यांच्या डोंगराएवढय़ा अडचणींकडे बघता ती छोटी वाटायला लागतील, हे नक्की.

chaturang@expressindia.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2018 1:52 am

Web Title: motivational story of social activist veena gokhale
Next Stories
1 नादिया
2 अंधश्रद्धेच्या जटेतून सुटका
3 वैयक्तिक परिघांतली सदसद्विवेकबुद्धी
Just Now!
X