खूप जुनी गोष्ट आहे. नुकतेच आम्ही नवीन घरात रहायला गेलो होतो. त्यावेळी टय़ुबलाइटचा विशेष प्रसार झाला नव्हता. घरोघरी पिवळे बल्बच असायचे. आमच्याही घरात तसेच पिवळे बल्ब होते. नवीन घरात गेल्यानंतर पहिल्या दहा दिवसांच्या अवधीत तिसऱ्यांदा बल्ब गेला.  बल्ब गेला म्हटल्यावर आई आणि त्यामुळे मी व संध्याही कावऱ्याबावऱ्या झालो. कारण दहा दिवसांत तीन बल्ब जाणं आश्चर्याचं होतं.

बंद दरवाजांचा जमाना तोपर्यंत आला नसल्याने शेजारी पाजारीही जमा झाले. मग नवीन बल्ब आणून लावण्याचे सोपस्कार झाल्यानंतरही गप्पा चालूच होत्या.  ‘‘आई, संध्या वरचेवर बल्ब जातो म्हणजे वायरिंगचा प्रॉब्लेम असणार.’’

‘‘हो, हो. इलेक्ट्रिशियनला बोलवून चेक करून घ्या.’’

तेवढय़ात आईला आठवलं, ‘‘वर राहतात ना ते ठोकत असतात अधूनमधून.’’

‘‘बरोबर. मग त्यामुळेच हादरे बसून बल्ब जात असणार.’’

‘‘तुम्ही जाऊन सांगा त्यांना. म्हणावं, नवीन बल्बचे पैसे द्या.’’

‘‘हो हो. जा तुम्ही, संध्याच्या आई.’’

‘‘आता ‘यांची’ यायची वेळ झाली. स्वयंपाक व्हायचा बाकी आहे. उद्या सकाळी बघू या.’’मग शेजारणींनाही आपल्या घरच्या स्वयंपाकाची आठवण झाली.

आजचं मरण उद्यावर गेलं, या आनंदात आई रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. बाबा आल्यावर त्यांनीही शेजारणींना दुजोरा दिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा- अकराच्या सुमाराला पुन्हा वरून ठोकठोक सुरू झाली. ‘‘संध्याच्या आई, आत्ता जा आणि रेडहँडेड पकडा त्यांना.’’

‘‘पण त्या भांडायला लागल्या तर?’’

‘‘घाबरू नका तुम्ही. त्या भांडायला लागल्या, तर खाली आवाज येईलच. मग मी येईन वर.’’

‘‘मी ही येईन,’’ म्हणत सगळ्याच तयार झाल्या.

जीव मुठीत धरून आई वर गेली.

दहा- पंधरा मिनिटं झाली, तरी सारं कसं शांत शांत म्हटल्यावर कुमक गोंधळून गेली. मग एका दूताला वर पाठवण्यात आलं.

‘‘संध्याच्या आई त्यांच्या घरात बसून चहा पित होत्या.’’

पाच- दहा मिनिटांत आई खाली आलीच. एकदम शांत दिसत होती.

‘‘काय झालं?’’, ‘‘काय झालं?’’ सगळ्यांनी कल्ला केला.

मग आईने सुरुवात केली : ‘‘अहो, मी जरा भितभितच गेले वर. म्हटलं, त्या बाईंनी तोंड सोडलं तर मी काय करणार? पण त्या चक्क म्हणाल्या, ‘अहो  बाहेरसून कित्याक, घरात येवन बसा आणि बोला.’ त्याबरोबर माझ्या जिवात जीव आला. त्या खलात काहीतरी घेऊन बत्त्याने कुटत होत्या. मग मी सांगितलं बल्बचं. तर म्हणाल्या, ‘अरे द्येवा! धा दिसांत तीन बल्ब गेल्यो? माका ठावक न्हाय गे, असा काय जाइत म्हणान. आता काळजी घेयीन मिया.’ मग सुनेकडून त्यांनी एक गोधडी मागून घेतली. तिची जाडशी घडी केली आणि तिच्यावर खल ठेऊन त्यांनी आपलं कुटण्याचं काम सुरू केलं.

‘माजो हातपण वाईच जोरात चलता. दोघांची शक्ती येकाच हातात इली हा मा! आता हळूहळू मारतय्.’’ तेव्हा कुठे माझ्या लक्षात आलं की त्या डाव्या हाताने बत्ता मारत होत्या. उजवा हात फक्त अध्र्या दंडापर्यंतच होता.

‘म्हणजे? तुमचा हात?’

‘अगे, धाकटो चार वर्साचो होतो, त्यायेळा त्येचो बापूस ग्येलो. माज्या पदरात चार पोरा. मगे घोवाच्या मिलमध्ये माका नोकरी दिल्यानी. द्येव तेंचा भला करो. एक दिस मशनीत हात गावलो अणि कापान टाकाचो लागलो. माका दिसला – संपला सगळा. पण पोरांकडे बघून पुन्ना उभ्या ऱ्हवलंय. मिया डाव्या हाताक सांगलंय- इतकी वर्सा उजव्याच्या जिवावर तू आराम क्येलंस. आता तुज्यार दोघांच्या वाटय़ाचा काम करूची पाळी इली हा. मग तो लागलो कामाक.  मिया, पोरांची आइस आणि बापूस झालंला. – अरे, मिया बोलत काय बसलंय? पयल्यांदाच इलात घरी. चा घेवा.’

मग त्यांच्या सुनेने मला चहा करून दिला.

‘अगो, थोडी कोकमां दी गो त्येंका.

कालच पाव्हण्यान हाडली गावसून,’ म्हणून आमसुलांची पुडीही हातात ठेवली.

‘थोरलो इलो का त्येका सांगतंय तुमका बल्ब हाडून देवक.’

‘अहो, नको. राहू दे. आता लावला आम्ही. यापुढे जरा काळजी घ्या, एवढंच सांगायला आले होते.’’

बल्बची भरपाई मागायला गेलेली आई आयुष्यभर पुरेल एवढा सकारात्मकतेचा प्रकाश घेऊन आली होती.

गौरी गोडकर

gadekar@gmail.com