शर्वरी जोशी
भोपाळच्या त्या भीषण विषारी वायुगळतीने अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली. त्यातलीच एक रशिदा. अत्यंत मागास आणि कट्टर मुस्लीम कुटुंबात जन्मलेली, अशिक्षित. पण उठून उभी राहिली आणि सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही पोहोचली, चम्पादेवीसह अमेरिकेचा ‘गोल्डमन एन्व्हायर्नमेंटल प्राइझ’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवला. त्या ५८ लाख रुपयांतून स्थापन केलेल्या ‘चिंगारी’ने अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणला. आजही त्या लढते आहेत.. देशात पुन्हा ‘भोपाळ’ होऊ नये म्हणून..

अत्यंत मागास आणि कट्टर मुस्लीम कुटुंबात जन्मलेली आणि पुढे तशाच कुटुंबात निकाह लावून गेलेली रशिदाबी. शिक्षणाचा गंध नाही, स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव नाही, घरातील मर्द म्हणतील त्याला हो म्हणणारी रशिदा. पण एका रात्रीत तिचे आयुष्य बदलून गेले. भोपाळ वायुगळतीची घटना तिचंही घर उद्ध्वस्त करून गेले आणि ती आमूलाग्र बदलली. तिने लढा उभारला. अमेरिकेत जाऊन ‘गोल्डमन एन्व्हायर्नमेंटल प्राइझ’ घेऊन आली. त्या निधीचा उपयोग ती आजही गरजूंसाठीच करते आहे. रशिदाचे जीवन म्हणजे एका अत्यंत उद्वेगाच्या क्षणी ‘पर्दा’ फेकून देऊन प्रत्यक्ष समाजसेवेत उतरलेल्या धाडसी मुस्लीम स्त्रीचा सातत्याने चाललेला लढा आहे..

मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्य़ात सोहागपूर तहसीलमध्ये १९५६ मध्ये अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेली रशिदा. रशिदाचे अब्बा हातगाडीवर फळे विकून गुजारा करीत असत. सात-आठ वर्षांची असताना रशिदाच्या अब्बाला धंद्यात खोट आली आणि त्यांनी तो धंदा बंद केला. मग पोटापाण्यासाठी त्यांनी विडय़ा वळण्याचे काम सुरू केले. घरातील प्रत्येक जण रोज अंदाजे १२०० ते १५०० विडय़ा वळत. त्यातून प्रत्येकाच्या वाटय़ाला फक्त दोन रुपये रोज इतकीच कमाई होत असे. त्यात दोन वेळचे जेवणही शक्य नसे.

रशिदाबी सांगते, ‘‘आम्ही दुसरं काय करणार होतो? आमच्या घरी सारेच अशिक्षित होते. त्यात आम्हाला ‘परदा’ करावा लागे. म्हणून अब्बांनी आम्हाला शाळेतही जाऊ दिलं नाही. घरी येऊन मौलवी उर्दू शिकवत. तेवढीच तालीम मिळाली.’’
रशिदा १३ वर्षांची झाली आणि तिच्या शादीची चर्चा घरात सुरू झाली. ‘‘आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने बऱ्याच प्रयत्नांनंतर मामूनी भोपाळचा एक रिश्ता आणला. ‘मुलगा दर्जी असून बरा कमावतो, आपली बेटी उपाशी मरणार नाही,’ असे सांगून त्यांनी अब्बांची रजामंदी घेतली. चाचांनी १३०० रुपयांची सोय केली आणि निकाह पार पडला.’’
निकाह लावून रशिदा भोपाळला आली खरी, पण तिचा शौहर कामचुकार असल्याचे तिच्या लक्षात आले. इथेही सासू-सासरे आणि नणंद वगैरे विडय़ा वळूनच उपजीविका चालवत होते. दरम्यान, रशिदाचे अब्बाही आपल्या कुटुंबासमवेत भोपाळला विडी वळायचे काम करून तिथंच राहू लागले होते. नवरा निकम्मा असल्याने रशिदाला देखील १२००-१५०० विडय़ा दररोज वळल्याखेरीज रोटी मिळत नसे. गरिबाच्या घरी सालभरच रोजे असतात, अशी रशिदा स्वत:ची समजूत घालत असे. ‘‘पोर पैदा झालं तर त्याचा खर्च तुझा तुलाच करावा लागेल,’’ असे सासूने आधीच बजावून ठेवलेले. पाच वर्षांनी रशिदाला एक मुलगा झाला, पण त्याला उपचारांची गरज होती. मोठय़ा दवाखान्यात न्यायला पैसा नसल्याने ते मूल त्याच दिवशी दगावले. नवऱ्याचाही काही आधार नव्हताच. अधूनमधून गायब असायचाच तो.

२ डिसेंबर १९८४. रशिदा नेहमीप्रमाणेच रात्री उशिरापर्यंत विडय़ा वळत राहिली. नंतर थकून झोपी गेली. अचानक मोहल्ल्यात कल्ला ऐकू आला आणि रशिदा जागी झाली आणि तिने बाहेर येऊन बघितले तर सारा मोहल्ला ‘भागो भागो’ म्हणत सैरावैरा धावत सुटलेला. ‘‘बाहेर काय चाललंय ते पाहायला माझा भाचा (नणंदेचा मुलगा) बाहेर पडला आणि लगेच परतला. त्याच्या डोळ्यांची आग होत होती आणि डोळ्यांतून पाणी येत होतं. लोकं ‘भागो यहाँ से नहीं तो मरोगे’ असं ओरडत आहेत असं त्यानं सांगितलं आणि आम्हीही काहीही न कळून वेडय़ासारखे घराबाहेर पडून धावू लागलो.. वाट फुटेल तिकडे. आम्ही काही अंतर गेलो असू तो मला श्वास घेता येईना. माझ्याही डोळ्यांत ‘जलन’ सुरू झाली. मला डोळे उघडताच येईनात. तिथेच बसकण मारली. सगळीकडून टाहो ऐकू येत होता. काही वेळाने कसेबसे मी डोळे किलकिले करून बघितले. सगळीकडे मौत का मंजर था. हजारों मुर्दे गिरे हुए थे. जो जिंदा थे, सब मौत की गुहार लगा रहे थे, जिंदगी कोई नहीं चाहता था.’’

‘‘थोडय़ा वेळाने ‘युनियन कार्बाइड’ कंपनीतली वायुगळती आता थांबली आहे, असं जाहीर केलं गेलं, एका गाडीवरचा भोपू शहरभर फिरत होता. युनियन कार्बाइड या सैतानाचे नाव मी त्या वेळेस पहिल्यांदा ऐकलं. माझे रिश्तेदार अडखळून पडत होते त्यांना श्वास घेता येत नव्हता, कोणाचे डोळे जळत होते. थोडय़ा वेळाने एका गाडीत आम्हाला कोंबून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.’’ रशिदा सांगते, ‘‘१३ दिवस त्या नरकयातना भोगत हॉस्पिटलमध्ये काढले, पण नंतर १६ डिसेंबर १८८४ ला भोपाळ शहर खाली करण्यात आलं.’’ रशिदा व तिच्या माहेरचे सर्व जण पुन्हा सोहागपूरला आले. तिचा निखट्टू नवरासुद्धा तिच्यासोबत होता. सहा महिन्यानंतर हे सर्व जण भोपाळला आपल्या घरी परतले. रशिदाच्या अब्बांना त्या ‘जहरिली गॅस’मुळे कर्करोग झाला होता आणि तिच्या नवऱ्याचे पाय सतत सुजून त्यातून रक्त येत राही. शिलाईमशीन चालवणे त्याला आता तर अगदीच अशक्य होते. लहान भावाने पानाच्या दुकानात नोकरी धरली आणि सारे कुटुंब पुन्हा विडय़ा वळून एक भग्न जिंदगी जगू लागले..

विडीच्या कमाईतून तिच्या अब्बांच्या दुधाचा खर्चही निघत नसे. त्यांना कर्करोगामुळे दुसरे अन्न घेता येत नव्हते. आधीच असलेल्या विपन्नावस्थेत आता अपंगत्व, अनेकांगी आजारातल्या असह्य़ वेदना यांचीही भर पडली. ‘जब तक मौत ना आये, तब तक जीना तो था.’ रशिदासारख्या लाखो लोकांची हीच अवस्था होती.याच दरम्यान मध्य प्रदेश सरकारने भोपाळ वायुपीडित लोकांसाठी एक रोजगार योजना चालू केल्याचे जाहीर करण्यात आले. भारत टॉकीजमध्ये यासाठी पीडितांची नावे नोंदवणे सुरू आहे, असे रशिदाला कुठुनसे कळले आणि तिने आपले नाव नोंदवले. सरकारी कार्यालयांत लागणाऱ्या फाइल्स, रजिस्टर्स, नोट बुक्स, फाइल कव्हर्ससारख्या स्टेशनरी उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यासाठी दोन केंद्रे सरकार सुरू करणार होते. ज्या कुटुंबांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, अशा भोपाळ वायुपीडित कुटुंबांपैकी १०० कुटुंबातील स्त्रिया निवडल्या गेल्या. त्यात ५० हिंदू व ५० मुसलमान स्त्रिया होत्या.

आतापर्यंत पर्दा करीत असलेल्या आणि बाह्य़ जगाशी कुठलाच संपर्क नसलेल्या अशिक्षित, अडाणी, रशिदाचे पहिले पाऊल ‘स्टेशनरी कर्मचारी संघात’ पडले आणि तिच्या नव्या संघर्षांच्या वणव्याची सुरुवात असलेली ‘चिंगारी’ इथेच भडकली. त्या दिवसांबद्दल रशिदा सांगते, ‘‘माझं दु:ख किती छोटं आहे हे इथे आल्यावर मला दिसलं. आपलं सबकुछ गमावलेल्या, निराधार, अपंग आणि रोगग्रस्त अशा दयनीय परिस्थितीतील स्त्रिया मला भेटल्या आणि आमचं सर्वाचं दु:ख एक झालं. आमचा लढा एक झाला..’’

इथे तिची भेट चम्पादेवी शुक्ल या तिच्यासारखेच गमावण्यासारखेही काहीही न उरलेल्या स्त्रीशी झाली. त्यांचेही अनुभव रशिदापेक्षा वेगळे नव्हते. सरकारी अनास्थेने परिसीमा गाठली होती. रशिदा आपले अनुभव सांगते, ‘‘आमच्यापैकी अनेकींना त्वचेच्या रोगानं त्रस्त केलं होतं. सरकारी डॉक्टर्सही संसर्गामुळे दूरच राहत. सरकारी दवाखान्यात औषध मिळणं कठीण झालं होतं.’’ आता मात्र लढल्याशिवाय आपल्याला काहीही तरणोपाय नाही हे या सर्वच स्त्रियांना जाणवू लागले होते. या केंद्राबाहेरील अनेक वायू दुर्घटनापीडित स्त्रिया मग सोबत आल्या.
ch09

रशिदा म्हणतात, ‘‘जगभरात जिथं कुठे असे पर्यावरणविरोधी व ‘जगण्याचा हक्क’विरोधी उद्योग उभारले जातील त्या सर्वाना आमचा प्रखर विरोध असेल. जगात कुठेही पुन्हा एकदा ‘भोपाळ’ होऊ नये यासाठी आणि भोपाळ वायुपीडितांसाठी आम्ही सतत लढत राहणार आहोत.’’

रशिदाच्या बोलण्यात चीड, संताप उघडपणे दिसतो. ती सांगते, ‘‘प्रशिक्षणाच्या नावाखाली आम्हाला नुसतंच बसवून ठेवलं जाई. त्या काळात एकाही कागदाला आमचा स्पर्श झाला नाही. तीन महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर कलेक्टरने आता आमचे काम आटोपले. तुम्ही स्वत: काम शोधा असं सांगितलं. आम्हाला काम कोण देणार, असे विचारल्यावर याबाबत मुख्यमंत्रीच काही तरी करू शकतील, असं सांगून त्यानं हात वर केले.’’ त्यांच्यासमोर रोजच्या जगण्याचा प्रश्न आ वासून होता. साहजिकच त्यांनी ठरवले मोर्चा काढायचा तोही थेट मुख्यमंत्री कार्यालयावर.

‘‘तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयावर आम्ही मोर्चा नेला. दोन तास पायपीट करीत आम्ही तिथे पोहोचलो होतो कारण बससाठीसुद्धा कोणाजवळच पैसे नव्हते.’’ बराच तास धरणे दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि ‘राज उद्योग निगम’मध्ये तुम्हाला काम दिले जाईल, असे सांगितले.
‘‘आम्हाला त्यांनी काम दिले, पण त्याचे दिवसाला फक्त पाच रुपये मिळत. त्या वेळी बटाटय़ाचा भावसुद्धा आठ रुपये किलो होता. हे आमचं शोषण होतं. आमच्यापैकी काही कुटुंबातील कर्ते पुरुष त्या भयंकर वायुगळतीत मृत्युमुखी पडले होते. तर काही अपंग झाले होते. ते कमाई करू शकत नव्हते. एवढासा मेहनताना आम्हाला जगण्यासाठीही पुरत नव्हता. आमचं शोषण शिस्तबद्ध पद्धतीनं सुरू होतं.’’

असा मेहनताना घेण्यापेक्षा त्यांनी ठरवले की फुकट काम करायचे. पुढचे तीन महिने त्यांनी अजिबात पैसे घेतले नाहीत. हा उपाय जालीम ठरला आणि त्यांना १५० रुपये प्रति काम यानुसार वेतन मिळू लागले. एकीचे बळ काय असते, हे या स्त्रियांच्या लक्षात आले. आपला धर्म, जात-पात विसरून या सर्व स्त्रिया आपल्या जगण्याच्या हक्कासाठी लढा द्यायला एकत्र आल्या.
भोपाळ वायुपीडितांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी १७ मार्च १०८७ रोजी रशिदा आणि चम्पादेवी यांनी मग नेतृत्वाची धुरा आपल्याकडे घेत ‘भोपाल वायुपीडित स्त्रिया स्टेशनरी कर्मचारी संघ’ या संघटनेची स्थापना केली. आतापर्यंत चम्पादेवी आणि रशिदा दोघीही इतर स्त्रियांप्रमाणेच पुरुषी वर्चस्वाने परिपूर्ण समाजरचनेचाच भाग होत्या, परंतु या आंदोलनात मात्र सर्व पुरुषांनी या संघटित शक्तीपुढे मान तुकवत या स्त्रियांना पाठिंबा दिला.

आणि सगळ्यांमधली एक म्हणून राहण्यासाठी रशिदाने ‘पर्दा’ झुगारून दिला..
सर्व स्त्रियांना फॅक्टरीप्रमाणे समान वेतन मिळावे यासाठी संघटनेने पहिले आंदोलन छेडले. यात त्यांना यश आले खरे, पण पीडित लोकांकडून उत्पादनाचे प्रमाण खूपच कमी असल्याचे कारण पुढे करीत त्यांचे वेतन २,५५५ रुपयांवरून ५३५ रुपयांपर्यंत खाली आणण्यात आले. यासाठी दिल्लीपर्यंत धडक मारणे आवश्यक होते. मग रशिदा व चम्पादेवीच्या नेतृत्वाखाली या संघटनेने भोपाळ ते दिल्ली अशी पदयात्रा काढली. त्या अनुभवांबद्दल रशिदा सांगते, ‘‘आम्हाला दिल्ली किती दूर आहे हेही माहिती नव्हतं. दोन जोडी कपडे घेऊन आम्ही निघालो होतो. कित्येकीच्या चपलाही तुटल्या. झाडपाला पायांना बांधून आम्ही वाटचाल सुरू ठेवली. वाटेत लागणाऱ्या गावांचे सरपंच आम्हाला खाना देत. आमच्या कामाबद्दल सर्वानाच विश्वास वाटू लागल्याची ती निशाणी होती.’’

एक महिना आणि तीन दिवस अशी पदयात्रा पूर्ण करून दिल्लीला पोहोचल्यावर मात्र आमच्या पदरी निराशाच पडली. पंतप्रधानांचा पॅरिस दौरा होता, त्यामुळे भेट होऊ शकली नाही. आम्ही निराश मनाने भोपाळला माघारी आलो.
दरम्यान, भारत सरकारने १९८५ च्या फेब्रुवारीत अमेरिकी न्यायालयात ‘युनियन कार्बाइड’ वर ३.३ बिलिअन डॉलर नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला. हा खटला नंतर भारतीय न्यायालयात हलवण्यात आला. अनेक तऱ्हेची भवति न भवति होत युनियन कार्बाइडने केवळ ४७० दशलक्ष रुपयांवर पीडितांची बोळवण केली आणि त्यांच्याविषयीची कुठलीच जबाबदारी ‘युनियन कार्बाइड’कडे राहणार नाही हे स्पष्ट केले. जेमतेम २०,००० ते २५,००० रुपये प्रति पीडित इतकी कमी नुकसानभरपाई म्हणजे पीडितांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे होते.

याच दरम्यान ‘युनियन कार्बाइड’ कारखान्याच्या पंचक्रोशीत राहणाऱ्या स्त्रियांच्या समस्या पुढे येत होत्या. अनेकांना अत्यंत दूषित पाणीपुरवठा होत होता. कित्येक स्त्रियांचे बाळ जन्मत: व्यंग असलेले होते. कित्येक अर्भकांना कान, नाक, हात आदी अवयवच नव्हते तर काही सेरिब्रल पाल्सीने ग्रस्त होते. वायुगळतीच्या दुर्घटनेच्या परिणामांची गंभीरता अशी हळूहळू भीषण रूप घेत पुढे येत होती. आता या सर्वासाठीच न्यायालयीन लढाई लढणे गरजेचे होते.
याही स्त्रिया स्टेशनरी कर्मचारी स्त्रिया संघाला येऊन मिळाल्या. राज्य व केंद्र सरकार या दोहोंकडूनही आपली फसवणूक होते आहे, अशी भावना पीडितांच्या मनात व्यापून राहिली. रशिदाबी व चम्पादेवी यांनी आपल्या संघटनेमार्फत सुयोग्य वैद्यकीय सेवा, आर्थिक व सामाजिक पुनर्वसन, मनुष्य व पर्यावरणाचे संरक्षण हे मुद्दे घेऊन धरणे, पदयात्रा, विरोध प्रदर्शन या मार्गाने लढा उग्र करीत नेला. लेबर कोर्ट ते उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयातही ही संघटना पीडितांच्या हक्कांसाठी भांडत राहिली.

२००१ मध्ये ‘डाऊ केमिकल्स’ने ‘युनियन कार्बाइड’चा ताबा घेतला, पण पीडितांची कुठलीही जबाबदारी घेण्यास नकार दिला. ‘डाऊ केमिकल्स’चा पवित्रा अनुभवला असल्याने त्यांच्या अशा पर्यावरणविरोधी प्रकल्पांना जगभर विरोध करण्याचे संघटनेने ठरवले. २००२ मध्ये जोहान्सबर्ग येथे ‘डाऊ केमिकल्स’च्या विरोधात निदर्शने करण्यात या संघटनेने पुढाकार घेतला.. एक अशिक्षित, सर्वसामान्य स्त्री आपल्यावरच्या आणि सहवेदनाग्रस्तांचा वेदनांच्या विरोधात पाय रोवून उभी राहते तेव्हा तिच्यात अवतरते अशी शक्ती ज्याच्या बळावर ती मिळवून देते न्याय. रशिदाबीनेही ठरवले होते, आता माघार नाही.
त्याचीच पावती म्हणून २००४ मध्ये रशिदा आणि चम्पादेवी यांना अमेरिकेचा ‘गोल्डमन एन्व्हायर्नमेंटल प्राइझ’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांच्या लढय़ासाठी प्रदान करण्यात आला. अत्यंत कौतुकाची गोष्ट म्हणजे ५८ लाख रुपये एवढय़ा पुरस्काराच्या स्वरूपात मिळालेल्या निधीतून या दोघींनी ‘चिंगारी’ ट्रस्ट स्थापन केला. वायुगळती पीडितांसाठीच त्याचा वापर केला जातोय. पीडितांच्या (बहुतांशी अपंग) मुलांसाठी शाळा, रुग्णालय, स्त्रियांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण असे कार्यक्रम ‘चिंगारी’ मार्फत राबवले जातात. अजूनही या दोघी सेन्ट्रल गव्हर्नमेंट प्रेसमध्ये ज्युनियर बाइंडर म्हणून काम करताहेत. रशिदाच्या अब्बांचा कर्करोगाने मृत्यू झाला आणि ही मुलाखत घेतली जात होती त्या दिवशी तिचा शौहर मृत्यूशी झुंज देत असल्याचे तिने सांगितले.

रशिदा म्हणते, ‘‘जगभरात जिथं कुठे असे पर्यावरणविरोधी व ‘जगण्याचा हक्क’विरोधी उद्योग उभारले जातील त्या सर्वाना आमचा प्रखर विरोध असेल. जगात कुठेही पुन्हा एकदा ‘भोपाळ’ होऊ नये यासाठी आणि भोपाळ वायुपीडितांसाठी आम्ही सतत लढत राहणार आहोत.’’ पुन्हा ‘भोपाल’ होऊ नये यासाठीचा रशिदाचा लढा तर चालूच राहील पण अशा ‘युनियन कार्बाइड्स’ आणि असे अ‍ॅण्डरसन्स पुन्हा भारतात पाय ठेवणार नाहीत एवढी ग्वाही सर्वच भारतीयांना हवी आहे.. ल्ल
(संपर्क : ०९४२५६८८२१५)
चिंगारी ट्रस्ट ब्लॉग ईमेल – http://chingaritrustbhopal.blogspot.in
sharvarijoshi10@gmail.com
===