सोलापूर जिल्ह्य़ातलं तरंगफळ हे तीन हजार लोकवस्तीचं एक अतिसामान्य गाव. इतर गावं असतात तसं आतापर्यंत कुणाच्याही खिजगणतीत नसलेलं. इतकं की सोलापूरच्या बहुसंख्य जनतेलाही त्याचं नाव माहीत नव्हतं. परंतु ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत ज्ञानेश्वर ऊर्फ माउली कांबळे या तृतीयपंथीयाची निवड झाली आणि रातोरात तरंगफळ हे गाव प्रसिद्धीच्या लाटेवर आरूढ झालं. अनेक लोकांच्या वाटा त्यांच्या घराच्या दिशेने वळू लागल्या..

या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून अकलूज, माळशिरस, वेळापूरमधल्या अनेकांच्या मोटारी तरंगफळ गावाच्या शोधात येत आहेत. माळशिरस तालुक्यातील अकलूजपासून २५ किलोमीटर अंतरावरच्या आडवळणावरच्या या छोटय़ाशा गावाकडच्या रस्त्यावर अलीकडे मोटारींची गर्दी वाढली असून या निवडून आलेल्या तृतीयपंथीय सरपंचाला भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची उत्सुकता यामागे असते. या सरपंचाच्या घरासमोर मोटार थांबते तेव्हा प्रथमदर्शनी बंगलावजा टोलेजंग घराचं दर्शन घडतं. घरासमोर बोलेरोसारख्या दोन मोटारी थांबलेल्या असतात. या गाडय़ा सरपंचाच्याच- माउलींच्याच असल्याचं नंतर समजतं. लगतच रेणुकामातेचं देऊळही दिसतं. बंगलावजा घरात प्रवेश करीत असताना ठिकठिकाणच्या गावांतून आलेल्या मंडळींची रेलचेल दिसते. तीन-चार तृतीयपंथीयही येतात,  नूतन सरपंच ‘माउली माय’चा सत्कार करायला. दहा-पंधरा मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर धिप्पाड बांध्याच्या, अंगभर साडी नेसलेल्या व कपाळी ठसठशीत कुंकू लावलेल्या सरपंच माउलींचे आगमन होतं. गळ्यात तब्बल २५-३० तोळे सोन्याचे भरगच्च अलंकार. हसतमुखाने सत्कार स्वीकारत नवख्या पाहुण्यांची ओळख भेट होते आणि त्याच वातावरणातच सरपंच माउलींशी अनौपचारिक संवादाला सुरुवात होते.. गरीब, उपेक्षित मातंग समाजात जन्मलेले ज्ञानेश्वर शंकर कांबळे (वय ३८) हे वरकरणी इतरांचं असतं तसं एक सामान्य नाव. सातवीपर्यंत शिक्षण झालेलं. लहानपणी घरची परिस्थिती हलाखीची. वडील शंकर मुकुंदा कांबळे यांची वडिलोपार्जित दहा एकर जिरायत जमीन. पावसावर अवलंबून शेती करताना जे काही तुटपुंजं उत्पन्न मिळेल. त्यावरच घरात पत्नीसह पाच मुलगे व एका मुलीचं पालनपोषण व्हायचं. पोटाची खळगी भरण्यासाठी शंकर कांबळे मुलांसह आसपासच्या शेतात जाऊन मोलमजुरी करायचे. ज्ञानू थोरला मुलगा. लहानपणी शाळेत असताना त्याचं बोलणं-चालणं अगदी बायकीच असायचं. साहजिकच वर्गात ज्ञानूची ‘गणपत पाटील’ म्हणून छेडछाड व टिंगलटवाळी केली जायची. वयात येता येता ज्ञानूलाही आपण मुलगा नाही तर मुलगीच असल्याचं जाणवू लागलं होतं. घरात रेणुकामातेच्या सेवाभक्तीचं वातावरण असल्यानं छोटय़ा ज्ञानूलाही रेणुकामातेच्या भक्तीची ओढ लागली. त्याची आत्या पारूबाई पूर्वी रेणुकामातेशी लग्न करून देवदासी झाली होती. ती घरातच राहात होती. आपणही आत्याप्रमाणेच लग्नाचा, संसाराचा विचार न करता देवीशी लग्न करून तिची सेवा करावी, या विचारांनी किशोरवयीन ज्ञानूला पछाडलं. त्याचा हट्ट पाहून आई-वडील हतबल झाले. विरोध सुरू झाला. ज्ञानूचं म्हणणं मानणं कुणालाही शक्य नव्हतं. परंतु सर्वाचा विरोध धुडकावून ज्ञानू वयाच्या पंधराव्या वर्षी घराबाहेर पडला आणि थेट कर्नाटकात सौंदत्तीला जाऊन रेणुकामातेशी लग्न करून मोकळा झाला. गुरूदीक्षा घेऊन मोती उजळविले. (गळ्यात गारगोटीसारखी पांढऱ्या रंगांची मोत्यांची माळ घातली.) रीतसर साडी नेसून तृतीयपंथीय असल्याचा शिक्का मारून घेतला. आता ‘तो’चा ‘ती’ झाली. घरच्या मंडळींनी, पै-पाहुण्यांनी ज्ञानूने ‘तीन डोईला कलंक’ (आजोबा, वडील आणि भाऊ) लावल्याचं सांगून टाकलं आणि तो मार्ग मागेच पडला.. आता वेगळी आणि एकटय़ानं चालायची वाट सुरू झाली.. १२ वर्षांचा वनवास पदरी आला..

मूळ नाव ज्ञानेश्वरही मागे पडलं आणि नवी ओळख तयार झाली ती ‘माउली माय’ नावाची. आपला ‘तो’ भूतकाळ त्यांच्यासमोर लख्खपणे उभा रहातो.. माउली सांगू लागतात, ‘‘घरातनं बाहेर पडले आणि घरदार विसरून गावागावांत भटकू लागले. सोबत इतर दोन-तीन तृतीयपंथीय जोडले गेले होतेच. घरोघरी रेणुकामातेच्या नावानं जोगवा मागणं सुरू झालं. देवीची विशिष्ट लयीत गाणी गातानाच नृत्यही केलं जायचं. मी नृत्यात आणि गाण्यात पारंगत झाले. यल्लम्माचे गोलाकार ‘जग’ डोईवर घेऊन जोगवा मागताना त्या त्या गावातील भोळ्याभाबडय़ा देवीभक्तांचा आधार वाटायचा. माळशिरस, बारामती, इंदापूर, फलटण अशा वेगवेगळ्या तालुक्यांतील गावे पालथी घालताना म्हातारी माणसे भेटायची. माया लावायची. पण घरची आठवण यायचीच. १२ वर्षे घराबाहेर काढली खरी, पण आई-वडिलांची आठवण काही स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांच्या आठवणीनं काळीज भरून यायचं. शेवटी ती ओढच मला परत घरी घेऊन आली.’’

‘‘आई-वडील काय म्हणतील, याची भीती वाटत होतीच. पण मनाचा हिय्या करून आले. घरात दबकत दबकत पाऊल टाकलं खरं, पण पहिलं आईचंच दर्शन झालं. मला पाहिल्यावर आईनं हंबरडाच फोडला. वडिलांचेही डोळे पाण्याने भरले होते. दोघांना घट्ट बिलगून खूप रडले. माझा वनवास संपला होता. तृतीयपंथीय असून मला घरच्यांनी स्वीकारलं होतं. आता माझं आयुष्य एका ठरावीक दिशेनं, गतीनं सुरू झालं. वयही वाढलं होतंच. मला तृतीयपंथीयांचं गुरुपद मिळू लागलं. त्यातून गुरुदक्षिणा मिळू लागली, तसा घरातच देवीचा दरबार भरू लागला. शिष्य व भाविकांकडून यथाशक्ती दान-दक्षिणा मिळू लागली. इतकी की अंगावर सोन्याचे अलंकार वाढत गेले. पूर्वी राहतं घर सरकारच्या योजनेतून मिळालं होतं. त्याचा छानपैकी विस्तार करून बंगल्याचं रूप देता आलं. घरापुढे दोन मोटारी उभ्या राहिल्या त्यादेखील दानरूपानं. घरात  रेणुकामातेबरोबरच लक्ष्मीचाही वास सुरू झाला.’’ घराच्या समृद्धीबद्दल प्रश्न छेडला असता माउलीनं असा सहजपणे खुलासा केला.

माउलींची रेणुकामातेची सेवा रुजू झाली होती. पण ते करता करता ठरावीक वा मर्यादित समाजासाठी काही करण्यापेक्षा त्यापलीकडे जाऊन गावाचा, समाजाचा विकास करण्याचे वेध माउलींना लागले. त्याचा दुहेरी हेतू होता. माउलींचं तृतीयपंथीय असणं त्यांच्या घरच्यांनी समजून घेतलं, पण इतर लोकांनीही समजून घ्यायला हवं होतं. तृतीयपंथीयही माणूसच आहे, त्याची हेटळणी न करता आपल्यातलाच सामावून घ्यायला पाहिजे, ही भावना वाढणं गरजेचं होतं. हे जर व्हायचं असेल तर समाजासाठी काही तरी विधायक केलं पाहिजे हे माउलींच्या लक्षात आलं आणि त्यांनी गरिबांसाठी काम करायला सुरुवात केली. प्रथम गावातील गोरगरीब स्त्रियांना आधारकार्ड मिळवून देणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ मदत योजना यांसारख्या शासकीय लाभाच्या योजनांच्या माध्यमातून सेवाकार्य सुरू झालं. आणि गावकऱ्यांची मने जिंकण्याची व त्यांचा आपल्याविषयीचा दृष्टिकोन बदलण्याची संधी आपोआपच फलदायी ठरली.

त्याचबरोबरीने तृतीयपंथीयांना नागरिक म्हणून शासनाकडून मिळणाऱ्या हक्क व अधिकाराबाबत सजगतेनं काही करावं या दिशेनं प्रयत्न सुरू झाले. तृतीयपंथीय असूनही अनोखं मातृत्व स्वीकारणाऱ्या गौरी सावंत यांच्यापासून स्वाभिमानानं जगण्याची प्रेरणा घेतल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. अशी  कामं करता करता माणसंही गोळा होत होतीच. त्यातूनच पुढे गावात समाजकारणाबरोबर राजकारणात का भाग घेऊ नये, याचा विचार करीत त्या दिशेनं त्यांचं पाऊल पडलं. पाच वर्षांपूर्वी त्यांच्याच घरातील सखुबाई कांबळे यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढविली होती. त्यानंतर आता ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची थेट निवडणूक होणार असताना तरंगफळ गावचं सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याचं कळलं. गावकऱ्यांनीही पुन्हा माउलींच्या घरातील व्यक्तीला सरपंचपदासाठी उभं करण्याचा प्रस्ताव पुढे आणला. सुरेश तरंगे, जयवंत तरंगे, तानाजी तरंगे, भानुदास तरंगे, आप्पा पाटील, सर्जेराव लेगरे आदी जाणत्या गावकऱ्यांनी माउलींचा भाऊ लाला कांबळे यांनी या पदासाठी उभं राहावं म्हणून लकडा लावला होता. तोपर्यंत माउलींकडून उमेदवारी मागितली जाईल, हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. अचानकपणे त्यांनी सरपंचपदाची निवडणूक आपण लढविणार असल्याची इच्छा जाहीर केली आणि सारे जण अवाक झाले.

सुरुवातीला एक तृतीयपंथीय सरपंचपदाची निवडणूक लढवणार ही कल्पनाच अनेकांना सहन झाली नाही. चर्चा-वाद सुरू झाला, मात्र माउली आपल्या निर्णयावर ठाम होत्या. कोणी मदत करो वा न करो, आपण सरपंच होण्यासाठी निवडणूक लढविणारच, असा आग्रही सूर त्यांनी आळवलाच. एव्हाना, सरपंचपदासाठी इतर १४ उमेदवार समोर आले. काही काळातच त्यातल्या सात उमेदवारांनी माघार घेतली. दरम्यान, माउलीच्या कामाची ओळख असल्याने गावकऱ्यांनी माउलींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

निवडणूक प्रचार सुरू झाला आणि खरे आव्हान उभे राहिले. विरोधकांनी तृतीयपंथी म्हणून माउली व त्यांच्या ‘सिद्धनाथ ग्रामीण विकास पॅनेल’ची खिल्ली उडवायला सुरुवात केली. मात्र पॅनेलच्या प्रमुखांनी परिणामाची पर्वा न करता माउलींचा तेवढय़ाच ताकदीनं आणि विश्वासानं प्रचार सुरू केला. तृतीयपंथीय आहे म्हणून काय झालं, त्यांच्याच नेतृत्वाखाली दोन वर्षांत गावाचा सर्वागीण विकास करू, संपूर्ण गाव आदर्श करू, असा विश्वास पॅनेलप्रमुख सुरेश तरंगे यांनी दिला. सरपंचपदासाठी एक तृतीयपंथीय निवडणुकीस उभा आहे, ही गोष्ट आसपासच्या गावांतच नव्हे तर माळशिरस व लगतच्या तालुक्यांपर्यंत पोहोचली, तशी तरंगफळची निवडणूक चर्चेचा विषय होत गेली. इकडे गावात प्रचाराच्या रणधुमाळीत स्त्रियांच्या मनात माउलींविषयी सहानुभूती वाढत गेली.  ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याची ग्वाही देत ‘ना आगे, ना पिछे’ अशा घोषवाक्यानं गाव दुमदुमू लागलं. वातावरण तापायला लागलं. या घोषवाक्याचा जोर जसजसा वाढत गेला, तसतशी विरोधातील उमेदवारांच्या तंबूत चिंतेचं सावट पसरू लागले. सरपंचपदाची निवडणूक हरली तर एका तृतीयपंथीयाकडून पराभूत झालो, याची बोच मनाला टोचत राहील, असं इतर उमेदवारांना वाटत असतानाच घडलंही तसंच. एका तृतीयपंथीयानं चोखपणे उत्तर देत पराभूत केल्यानं विरोधकांच्या माना खाली गेल्या. एक तृतीयपंथीय सरपंचपदावर निवडून आला. समाजाच्या मानसिक बदलाचं हे जिवंत उदाहरण ठरलं आहे.

एक काळ असा होता, जेव्हा माउली स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी एखाद्या गावच्या बाजारात जाऊन विशिष्ट पद्धतीनं टाळ्या वाजवून पैसे मागायची, आता परिस्थिती पालटली आहे. माउली सरपंच झाल्यानंतर तिचा विजयोत्सव साजरा करताना गावकऱ्यांनीच टाळ्या वाजवून व नाचून त्यांचे कौतुक केले. हा बदल सामाजिकदृष्टय़ा महत्त्वाचाच..काव्यात्मक न्यायच जणू..

– एजाज हुसेन मुजावर

aejajhusain.mujawar@expressindia.com