अलीकडेच अभिनेता तुषार कपूरने सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला आणि अविवाहित पुरुषाचे एकल पालकत्व हा विषय ऐरणीवर आला. आजवर जोडप्याने सरोगसीद्वारे अपत्यास जन्म देण्याची उदाहरणे बहुसंख्येने असताना अविवाहित पुरुषाने अपत्यास जन्म देण्याचे कोणते सामाजिक परिणाम संभवतात, यावर चर्चा होऊ लागली आहे. त्याचा ऊहापोह करणारे लेख..
प्रसारमाध्यमे आणि सामान्य लोकांचा बॉलीवूड हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. काही दिवसांपूर्वी बॉलीवूडने एक वेगळाच विषय चर्चेसाठी त्यांना पुरवला. तुषार कपूर या अभिनेत्याने गर्भाशय भाडय़ाने घेऊन (सरोगसी) तंत्रज्ञानाद्वारे एका मुलाचं पितृत्व स्वीकारलं आणि त्यातून ‘पुरुषाचे एकल पालकत्व’ या विषयाची चर्चा पुनश्च एकदा जोरात सुरू झाली.
एकल पालकत्व हा विषय तसा नवीन नाही. पूर्वीसुद्धा अविवाहित व्यक्तीने एखादे मूल दत्तक घ्यावे की घेऊ नये, या विषयावर बऱ्याच चर्चा, वादविवाद झडले आहेत. परंतु पूर्वी अविवाहित व्यक्तीला स्वत:चे जनुकीय अपत्य (जेनेटिक चाइल्ड) मिळण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रचंड प्रगतीमुळे ही शक्यता आता निर्माण झाली आहे.. प्रत्यक्षात आली आहे. तंत्रज्ञान वेगाने विकसित झाले, समाजही काळानुसार बदलत गेला, तसतसा स्वत:चे जनुकीय अपत्य जन्माला घालून त्याचे एकल पालकत्व निभावणे, हा विषय ऐरणीवर येऊ लागला.
मुळात एकल पालकत्व या गोष्टीची गरज का निर्माण होते? समाजामध्ये मान्यता पावलेली आणि परंपरेने प्रदीर्घ काळ चालत आलेली समाजातील विवाहसंस्था ही केवळ भिन्नलिंगी जोडप्यांचाच विचार करते. परंतु समाजात अशाही काही व्यक्ती असतात, की ज्यांना समलिंगी आकर्षण असू शकते. जरी या गोष्टीला भारतीय कायद्यामध्ये मान्यता नसली, तरीही शास्त्रीयदृष्टय़ा हे सिद्ध झाले आहे की, यात अनैसर्गिक असे काहीही नाही. या व्यक्तींचे स्वभाव, प्रकृती बहुसंख्य सर्वसामान्य माणसांपेक्षा काहीशी वेगळी आढळते.. असते. याचा अर्थ या व्यक्ती ‘अ-सामान्य’ (अ‍ॅबनॉर्मल) आहेत असे नाही. अजूनही भारतामध्ये समलिंगी संबंध आणि त्यांच्या विवाहाला मान्यता नाही. अशा व्यक्तींना (अर्थातच त्या समलिंगी असल्याने) स्वत:चे मूल हवे असण्याची जी नैसर्गिक प्रवृत्ती सर्वसामान्य माणसांमध्ये आढळते, ती त्यांच्यात नसते असे समजून चालणे ही अत्यंत चुकीची कल्पना आहे. त्यांनाही अपत्याचे पालक होण्याची नैसर्गिक ऊर्मी किंवा भूक असू शकते/ असते आणि ती भागवण्यासाठी त्यांना एकल पालकत्वाकडे वळावे लागते. तसेच समाजामध्ये अशाही काही व्यक्ती असतात, की त्या जरी समलिंगी नसल्या तरीही त्यांना काही कारणास्तव विवाहबद्ध होण्याची इच्छा नसते. एखाद्या व्यक्तीने विवाह केला नाही याचा अर्थ त्याने कधीही पालकत्व स्वीकारू नये, किंवा त्या व्यक्तीला तो अधिकारच नाही असे समजणे हेही चूकच आहे. ही झाली सरोगसीद्वारे मूल जन्माला घालण्याची काही प्रमुख कारणे. त्याशिवाय अन्य काही कारणेही- जसे की लग्नानंतर पत्नीचा किंवा पतीचा अकाली मृत्यू होणे- हेही सरोगसीद्वारे अपत्यप्राप्तीचे एक कारण असू शकते. अशा व्यक्तीला दुसरे लग्न करण्याची इच्छा होईलच असे नाही, परंतु त्या व्यक्तीस पालकत्वाचा अधिकार नाकारणे हेही चुकीचे आहे. कधी कधी काही क्षेत्रांतील करीअरच्या निकडीमुळेही काहींना योग्य वयात अपत्यास जन्म देणे शक्य होत नाही. अशा वेळी ‘करीअर की मूल?’ या भावनिक व मानसिक द्वंद्वात सापडलेल्या या व्यक्तींसमोर अपत्यप्राप्तीसाठी मूल दत्तक घेणे किंवा सरोगसीद्वारे स्वत:च्या जनुकीय अपत्यास जन्म देणे हे दोन मार्ग असू शकतात. अशा विविध कारणांमुळे बऱ्याचदा व्यक्ती एकल पालकत्वाकडे वळताना दिसतात.
पूर्वीच्या काळी एकल पालकत्व हे केवळ दत्तक घेण्याच्या प्रक्रियेतूनच शक्य होते. म्हणजे व्यक्तीला मूल मिळाले तरी ते स्वत:चे जनुकीय अपत्य नसे. परंतु जसजसे विज्ञान-तंत्रज्ञान विकसित होत गेले, तसतसे प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन स्वत:चे जनुकीय अपत्य (जेनेटिक चाइल्ड) जन्माला घालणे अशा अपत्येच्छुक व्यक्तींना शक्य होऊ लागले. हे वैद्यक तंत्रज्ञान कोणते? तर- एखाद्या अविवाहित पुरुषाला स्वत:चे मूल हवे असेल तर त्याला सरोगसी आणि स्त्रीबीजदानाचा वापर करावा लागतो. एखाद्या अविवाहित स्त्रीला जर स्वत:चे जनुकीय अपत्य हवे असेल तर ती एकतर सरोगसी तंत्राचा आधार घेऊ शकते, किंवा शुक्रजंतूदात्याकडून अपत्यनिर्मितीकरता आवश्यक शुक्राणू मिळवून तंत्रज्ञानाद्वारे स्वत:च्या गर्भाशयातही ती मूल वाढवू शकते.
अर्थातच हे करत असताना कायदेशीर बाबी काटेकोरपणे पाळणे खूप महत्त्वाचे आहे. कारण काही झाले तरी त्या मुलाला कोणाचे तरी पालकत्व मिळणे अत्यंत गरजेचे असते. पाश्चात्त्य देशांमध्ये, विशेषत: अमेरिकेसारख्या देशांमध्ये या गोष्टीला कायदेशीर मान्यता आहे. परंतु अनेक देशांमध्ये याला कायदेशीर मान्यता नाही. ब्रिटन, कॅनडासारख्या देशांमध्ये सरोगसीला मान्यता असली तरी व्यावसायिक सरोगसीला मान्यता नाही. त्यामुळे अशा इच्छुक व्यक्ती जरी सरोगसीचा वापर करू शकल्या तरी त्यावर खूप मर्यादा आहेत. भारतामध्ये सध्या ‘नॅशनल गाइडलाइन्स फॉर अ‍ॅक्रिडेशन, सुपरविजन अँड रेग्युलेशन ऑफ एआरटी क्लिनिक्स इन् इंडिया’ (National Guidelines For Acreditation, Supervision And Regulation of ART Clinics), मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर (Ministry of Health and Family Welfare) यांनी २००५ साली यासंबंधात जी मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत त्यांना जवळजवळ कायदेशीर स्वरूप आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे सरोगसी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या डॉक्टरांवर आणि सरोगसीद्वारे अपत्य प्राप्त करू इच्छिणाऱ्या व्यक्तींवर बंधनकारक असते. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एखादी व्यक्ती- मग ती अविवाहित पुरुष असेल किंवा अविवाहित स्त्री असेल; सरोगसी तंत्रज्ञानाद्वारे स्त्री-बीजदान (Donor Eggs) किंवा शुक्रजंतूदान (Donor Sperm) यांचे साहाय्य घेऊन आणि सरोगेट मदरच्या साहाय्याने अपत्यप्राप्ती करू शकते. परंतु भारतीय अविवाहित स्त्रीला केवळ शुक्रजंतूदान (डोनर इनसेमिनेशन) तंत्रज्ञानाने अपत्यप्राप्ती करून घेण्यास या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परवानगी नाही. अर्थातच भारतात सामाजिकदृष्टय़ाही अविवाहित स्त्री शुक्रजंतूदान तंत्रज्ञानाद्वारे स्वत:च्या गर्भाशयामध्ये मूल वाढवण्याची शक्यता तशी कमीच आहे. अर्थात ही झाली कायदेशीर बाब. परंतु त्याचवेळी सरोगसी तंत्रज्ञानाच्या यशस्वीतेचे एकूण प्रमाण आणि या तंत्रज्ञानाद्वारे अपत्यजन्माकरता येणारा खर्च हेही हे तंत्रज्ञान वापरू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. सरोगसी ही तशी खर्चिक बाब आहे. त्यामुळे सध्या तरी ती श्रीमंतवर्गालाच परवडू शकते. याचा विचारही सरोगसी तंत्रज्ञानाचा वापर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला करणे आवश्यक ठरते.
त्याचबरोबर सरोगसी तंत्रज्ञानाने जन्माला येणाऱ्या मुलावर आणि एकूण समाजावर याचे काय संभाव्य परिणाम होऊ शकतात याबद्दलही विचारमंथन होत असते. अशा प्रकारे सरोगसीद्वारे जन्माला येणाऱ्या मुलांवर त्याचा भविष्यात काय परिणाम संभवतो, याची चर्चाही मोठय़ा प्रमाणात केली जात आहे. बऱ्याच वेळा अशी शंका व्यक्त केली जाते की, या मुलांचा सांभाळ नीट केला जाईल की नाही. त्यांची मानसिक आणि भावनिक वाढ योग्य प्रकारे होईल की नाही. ही शंका अतिशय रास्त आहे. यासाठी दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे. या तंत्रज्ञानाचा वापर करून पाश्चात्त्य देशांमध्ये गेली १५-२० वर्षे अनेक अपत्ये जन्माला आलेली आहेत. त्यांच्या अभ्यासावरून असे लक्षात आले आहे की, या मुलांची शारीरिक, मानसिक आणि भावनिक वाढ ही इतर सर्वसाधारण मुलांच्या तुलनेत वेगळी असत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे बऱ्याच वेळेला त्यांचा जो एकमेव पालक असतो त्याचे त्या मुलाच्या संगोपनावर खूपच बारकाईने लक्ष असते. अशा मुलांचा सांभाळ चांगल्या प्रकारे केला जातो. इथे दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, ही परिस्थिती नक्कीच आदर्शवत नाही. परंतु एखादी परिस्थिती आदर्श नाही याचा अर्थ स्वीकृत आदर्शापेक्षा थोडी कमी अशी परिस्थिती स्वीकारणे कितपत योग्य आहे? जसे घटस्फोट झालेल्या जोडप्यांच्या बाबतीत त्यांच्या घटस्फोटाचे मुलांवर जसे शारीरिक, भावनिक आणि मानसिक परिणाम होत असतातच. परंतु त्या जोडप्याने घटस्फोट न घेणे हे त्यापेक्षाही कधी कधी भयानक ठरू शकते. म्हणूनच मग ‘लेस दॅन परफेक्ट’ अशी व्यवस्था स्वीकारावी लागते. त्यादृष्टीने विचार करता सरोगसीद्वारे जन्माला आलेल्या मुलांवर होणारे संभाव्य भावनिक वा मानसिक परिणाम हे फार भयंकर ठरतील असे मानायचे कारण नाही.
lr07आता या सगळ्याचा समाजावर काय परिणाम होतो, या गोष्टीचा विचार केला पाहिजे. यातला पहिला मुद्दा असा की, असे सरसकट झाले तर समाजातील विवाहसंस्था मोडीत निघेल, माणसे लग्न करणारच नाहीत. परंतु हेसुद्धा अनुभवाअंती खोटे ठरले आहे. कारण केवळ अपत्यप्राप्ती हा विवाहामागचा एकमेव हेतू नसतो. त्यामुळे या गोष्टीमुळे विवाहसंस्था मोडीत निघेल असे समजायचे काही कारण नाही. याबाबतीत दुसरा एक मुद्दा नेहमी मांडला जातो तो म्हणजे- एकल पालकत्वासाठी वैद्यकीय तंत्रज्ञान वापरून स्वत:चे जनुकीय अपत्य जन्माला घालण्याचा आग्रह का धरावा? अशा व्यक्तींनी अनाथ मूल दत्तक का घेऊ नये? हा मुद्दा रास्तच आहे. परंतु या गोष्टीकडेही दोन्ही बाजूने पाहिले पाहिजे. एकतर सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याप्रमाणे एकल पालकत्व घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला मूल दत्तक घेणेसुद्धा तितकेसे सोपे नाही. त्यावरसुद्धा सरकारचे र्निबध आहेत. दुसरी गोष्ट : व्यक्तीला स्वत:चे जनुकीय अपत्य हवेसे वाटणे ही एक नैसर्गिक ऊर्मी आहे. समाजातल्या बहुतांश व्यक्तींना स्वत:चे जनुकीय मूल नैसर्गिकरीत्या मिळते. अशा वेळेला समाजातल्या या बहुसंख्यांनी अशा अल्पसंख्य व्यक्तींना ‘तुमची नैसर्गिक ऊर्मी नष्ट करा किंवा दाबून टाका,’ असे सांगणे हे कितपत नैसर्गिक न्यायाला धरून होईल याचाही विचार व्हायला हवा.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे- जनुकीय अपत्य जन्माला घालणारे वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध असताना आणि समाजातल्या काही व्यक्तींना अशा तऱ्हेने आपले जनुकीय मूल हवे असताना त्यासंदर्भात कठोर कायदे करून त्यांचा अपत्यप्राप्तीचा नैसर्गिक हक्क नाकारणे आणि तो बेकायदेशीर ठरवून दडपून टाकणे कितपत योग्य आहे? अर्थातच हे सर्व करत असताना ‘कमर्शिअल सरोगसी’ योग्य की अयोग्य, हा वादाचा मुद्दा आहेच. योग्य ते कायदेकानू करून त्याचे नियमन करता येऊ शकेल. परंतु समाजातील काही व्यक्तींना सरोगसीद्वारे स्वत:चे मूल हवे असण्याची नैसर्गिक इच्छा असणे आणि त्यांनी ते तंत्रज्ञानाधारे प्राप्त करणे, हा त्यांचा हक्क आपण नाकारू शकत नाही.
डॉ. श्रीराम खाडिलकर – shriramk27@yahoo.in