कणकवली येथील आचरेकर प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी बहुभाषिक प्रायोगिक नाटय़महोत्सवाचा रिपोर्ताज्..

ग्रामीण व निमशहरी भागांत प्रायोगिक किंवा समांतर रंगभूमीची चळवळ रुजावी म्हणून अमेरिकेतील फोर्ड फाऊंडेशन आणि पुण्यातील थिएटर अ‍ॅकॅडमीने २५ वर्षांपूर्वी परस्पर सहकार्याने ‘स्थानिक नाटय़संस्था विकास योजना’ राबविण्याचे ठरविले आणि महाराष्ट्रातील चार ठिकाणी प्रयोगशील नाटकांचे महोत्सव दरवर्षी आयोजित करण्याचा घाट घातला. फोर्ड फाऊंडेशनच्या आर्थिक पाठबळावर उभा राहिलेला हा उपक्रम काही काळाने तेथील स्थानिक संस्थांनी स्वबळावर राबविणे अपेक्षित होते. परंतु कोकणातील कणकवलीवगळता इतर ठिकाणी हा प्रकल्प आर्थिक रसद तुटल्याबरोबर बंद पडला. मात्र, कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने फोर्ड फाऊंडेशनची आर्थिक मदत बंद पडल्यावर प्रायोगिक रंगभूमीचे हितचिंतक, नाटय़रसिक आणि दानशूर मंडळींच्या सहयोगाने तो पुढेही सुरू ठेवला. त्यामागे संस्थेचे अध्वर्यू वामन पंडित, आनंद आळवे, प्रसाद कोरगावकर, शरद सावंत, अ‍ॅड्. एन. आर. देसाई, सुहास तायशेटे, राजेश राजाध्यक्ष, ओम आळवे, राजन राऊळ, अ‍ॅड्. प्रज्ञा खोत, धनराज दळवी, अनिल फराकटे अशा अनेक कार्यकर्त्यांचे भक्कम इरादे कारणीभूत आहेत. यंदाचा रौप्यमहोत्सवी नाटय़-उत्सव नुकताच पार पडला.

JNU Vice Chancellor Santishree Pandit
“नेहरू, इंदिरा गांधी मूर्ख नव्हते, देशाला एका साच्यात बसवणं अशक्य”, जेएनयूच्या कुलगुरूंची स्पष्टोक्ती
Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..
Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..

या महोत्सवाची खासियत म्हणजे या वर्षी बहुभाषिक नाटके त्यात सादर केली गेली. याचा अर्थ यापूर्वी या नाटय़ महोत्सवांतून अन्य भाषिक, अन्य प्रांतीय नाटके झालीच नाहीत असे नाही. हबीब तन्वीर, नासिरुद्दीन शाह आदींची नाटकेही इथे झालेली आहेत. परंतु यंदाचा महोत्सव केवळ बहुभाषिक नाटकांचाच होता. कणकवलीतील या महोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे नाटक सादर झाल्यावर त्यातील रंगकर्मीशी होणारा रसिकांचा थेट संवाद! ज्याकरता रंगकर्मीही आसुसलेले असतात. कारण इथल्या रसिकांकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न हे त्यांच्या कुतूहलाचे द्योतक असतातच;  शिवाय त्यांच्या उच्च अभिरुचीचेही त्यातून दर्शन घडते. म्हणूनच नासिरुद्दीन शाह आणि अमोल पालेकरांसारख्या रंगकर्मीना कणकवलीत पुन:पुन्हा यावेसे वाटते. यंदा मात्र या बाबतीत काहीसा निरुत्साह दिसून आल्याने अमोल पालेकरांनी त्याबद्दलची आपली खंत प्रकटरीत्या व्यक्त केली.

यंदा रौप्य महोत्सवी नाटय़-उत्सव साजरा करत असताना आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित यांचे दीर्घकाळचे रंगभूमीविषयक नियतकालिक सुरू करण्याचे स्वप्नही प्रत्यक्षात अवतरले. हेही या पंचविशीचे वैशिष्टय़ म्हणता येईल. ‘रंगवाचा’ नामे प्रसिद्ध झालेल्या या त्रमासिकाचे प्रकाशन अमोल पालेकर यांच्या हस्ते झाले. नासिरुद्दीन शाह यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या दोघांनीही या नियतकालिकासाठी प्रत्येकी एक लाख रुपयाची देणगी याप्रसंगी संस्थेकडे सुपूर्द केली. त्याचबरोबर नियतकालिकाकडूनच्या आपल्या अपेक्षाही व्यक्त केल्या. ‘‘रंगवाचा’मध्ये केवळ मराठी रंगभूमीवर होणारे ‘रंगप्रयोग’ आणि त्यांच्यासंबंधीचे विवेचन-विश्लेषण अपेक्षित नसून, भारतातील अन्य भाषिक रंगकार्य, तिथल्या नाटय़विषयक घटना-घडामोडी, उपक्रम यांचीही दखल व नोंद घेतली जावी. त्याचबरोबर जागतिक रंगभूमीचे भानही त्यातून प्रकट व्हावे,’ अशी अपेक्षा पालेकर यांनी यावेळी बोलून दाखविली; तर नासिरुद्दीन शाह यांनी ‘रंगवाचा’चे स्वागत करून कणकवलीकरांचा आजवरचा सुखद अनुभव या नियतकालिकातही कसोटीस उतरेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

या नाटय़-उत्सवात नासिरुद्दीन शाह यांच्या मोटले ग्रुपची ‘गधा’ और ‘गड्ढा’ हे प्रख्यात हिंदी साहित्यिक कृष्ण चंदर यांच्या व्यंगात्मक निबंधांवर आणि व्यंगकथेवर आधारित रंगाविष्कार; तसेच गॅब्रिअल इमॅन्युअल लिखित ‘आइनस्टाइन’ हे एकपात्री नाटक सादर केले. नासिरुद्दीन शाह दिग्दर्शित या दोन्ही रंगप्रयोगांनी या नाटय़-उत्सवाची दणकेबाज सुरुवात झाली. पैकी ‘गड्ढा’ या व्यंग-निबंधात रस्त्यावरील खड्डय़ांच्या समस्येकडे नागरिक, व्यवस्था (system), प्रशासन आणि सत्ताधारी कोणत्या दृष्टीने पाहतात, हे तिरकस शैलीत कृष्ण चंदर यांनी चित्रित केले आहे. त्यातला उपहास आजही ताजा वाटावा इतका सच्चा उतरला आहे. जणू वर्तमान परिस्थितीवरचेच हे भाष्य आहे असे हा नाटय़ांश पाहताना वाटत होते. ‘केवल एक कार’ या नाटय़ांशात भाषिक गमतीजमती आणि त्याद्वारे व्यक्ती, परिस्थिती, शब्दांची फोड व त्यातून प्रकटणारा विनोद यांचे विलक्षण रसायन प्रत्ययास आले. ‘एक गधे की आत्मकथा’ या रंगाविष्कारात गाढवाचे रूपक वापरून सर्वसामान्यांना भोवतालचे बेरकी, बनेल लोक कसे मूर्ख बनवतात व त्यांचे शोषण करतात, हे हास्यस्फोटक प्रसंगमालिकेतून दाखविले गेले. बॉलीवूडची पाश्र्वभूमी आणि तेथील फिल्मी लोकांची बनावट, फसवी दुनिया यानिमित्ताने नाटय़रूपात सादर करण्याची संधी नासिरुद्दीन शाह यांनी साधली. कदाचित त्यांना आलेला फिल्म इंडस्ट्रीचा अनुभव कृष्ण चंदर यांच्या या व्यंगकथेतून त्यांना समांतरपणे मांडता आला, हेही हा रंगाविष्कार सादर करण्यामागची प्रेरणा असावी.

नासिरुद्दीन शाह यांनी दिग्दर्शित व अभिनित केलेला ‘आइनस्टाइन’ हा एकपात्री प्रयोग जगद्विख्यात शास्त्रज्ञ आइनस्टाइनचे चरित्ररूप मांडणारा होता. सापेक्षतावादाच्या सिद्धान्तासह अणुबॉम्बसारख्या सर्वसंहारी अस्त्रापर्यंत विज्ञानातील अनेक शोधांचा प्रवास आणि त्यातील गमतीजमती, आइनस्टाइनच्या व्यक्तिमत्त्वातील नानाविध कंगोरे व त्यांचा मिश्कील स्वभाव याचे प्रत्ययकारी दर्शन त्यातून घडले. मानवाच्या कल्याणासाठी शोधलेल्या अणूचा मानवाच्या संहारासाठी केला गेलेला वापर पाहून ‘हेचि फळ काय मम तपाला?’ असा उद्विग्न करणारा प्रश्न आइनस्टाइनला पडतो आणि हसतखेळत आइनस्टाइनचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणारा हा प्रयोग एक उंची गाठतो. अण्वस्त्रप्रसारासंबंधात अप्रत्यक्षरीत्या भाष्य करणारे हे नाटक प्रेक्षकाला शेवटी अंतर्मुख करते. नासिरुद्दीन शाह हा कलावंत आणि दिग्दर्शक म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणूनही किती खोल आहे याचा प्रत्यय देणारे हे दोन रंगाविष्कार रसिकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतील यात शंका नाही.

प्रयोगानंतर रसिकांशी झालेल्या संवादात नासिरुद्दीन शाह यांनी समकालीन प्रश्नांना आपल्या नाटकातून भिडण्याचा आपला कसा प्रयत्न राहिला आहे, हे विशद केले. ‘गधा और गड्ढा’मध्ये तर वर्तमान राजकीय परिस्थितीवर त्यांनी तिखट भाष्य केले आहे, हे त्यांनी मान्य केले. कलाकाराने तसे ते करावयासच हवे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

अशीच राजकीय-सामाजिक टीकाटिप्पणी आशुतोष पोतदारलिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘एफ-वन/ वन झीरो फाइव्ह’ या नाटकात अधिक धारदारपणे केली गेली. एका हिंदू आधुनिक विचारांच्या तरुण जोडप्याच्या घरात हिरवा रंग देण्यावरून जे महाभारत घडते, त्याचे टोकदार पोस्टमॉर्टेम या नाटकात करण्यात आले आहे. वर्तमान बहुसांस्कृतिक समाजाचा दांभिकपणा वेशीवर टांगणारे हे नाटक भाषा, संस्कृती, धार्मिक-आर्थिक -सामाजिक व्यवस्थेचा पंचनामा करते. फॉर्मचा एक वेगळा प्रयोगही त्यात आढळतो. त्याचबरोबर अ‍ॅस्थेटिक सेन्ससंबंधातील मूलगामी विचार या नाटकात अधोरेखित करण्यात आला आहे. मात्र, ज्या प्रकारे त्याकडे लक्ष वेधले जायला हवे तितके ते जात नाही. याचे कारण ती तरलता राजकीय-सामाजिकतेवर तोशेरे ओढण्याच्या नाटकाच्या गरजेत झाकोळली जाते.

या महोत्सवातील आणखी एक नाटक रसिकांना अस्वस्थ करून गेले ते म्हणजे ‘अक्षयांबरा’ हे कन्नड नाटक! शरण्य रामप्रकाश लिखित, दिग्दर्शित आणि अभिनित या नाटकात प्रसाद चेरकडी या कलाकारासोबत सादर झालेला हा प्रयोग प्राचीन आणि अर्वाचीन नाटय़तंत्राचा अद्भूत मिलाफ होता. ‘यक्षगान’ या लोककला प्रकारातील पुरुषी वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या एका स्त्रीने कला प्रांतातील स्त्री-पुरुष असमानतेचा मुद्दा याद्वारे ऐरणीवर आणला. एवढेच नव्हे तर पुरुषी मानसिकतेच्या डोळ्यांत झणझणीत अंजनही घातले. यक्षगानात स्त्री-भूमिकाही पुरुषच साकारतात. परंतु एक स्त्री या परंपरेला प्रश्न विचारते आणि आपण यक्षगानात पुरुष-भूमिका साकारण्याचा विडा उचलते, तेव्हा त्यात द्रौपदीची भूमिका करणारा नटच तिला कडाडून विरोध करतो. तेव्हा ती ‘तुम्ही पुरुष जर यक्षगानात स्त्री-पार्ट करू शकता, तर मग मी त्यात पुरुष-भूमिका (दु:शासन) का साकारू शकत नाही?’ असा प्रश्न त्याला करते. त्यावर तो परंपरेचा मुद्दा उपस्थित करतो. तेव्हा त्या परंपरेलाच आपल्याला छेद द्यायचे आहे, असे ती सांगते. तरीही तो आपला हेकेखोरपणा सोडत नाही. तीही मग हट्टाला पेटते. दु:शासनाच्या भूमिकेचे सगळे कंगोरे आत्मसात करते, आणि द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगात द्रौपदीचे वस्त्रहरण करते. त्याक्षणी रजस्वला द्रौपदीच्या असह्य दु:खाचा कडेलोट त्या नटाच्या प्रथमच ध्यानी येतो. कला आणि जगणे यांच्यातील अन्योन्यसंबंध त्यातून त्याला उलगडतो आणि स्त्रीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा चुकीचा आहे याची तीव्रतेने त्याला जाणीव होते. एकीकडे स्त्रीवादाचा पुरस्कार करतानाच स्त्री-पुरुषांकडे ‘माणूस’ म्हणून पाहण्याची निकड ‘अक्षयांबरा’ अधोरेखित करते. यक्षगानाचा आधुनिक दृष्टिकोनातून अन्वय लावणारे हे नाटक म्हणजे एक अस्वस्थ करणारा अनुभव होता. दीड तासाचा हा दीर्घाक ‘जेण्डर पॉलिटिक्स’चा रोकडा प्रत्यय देणारा होता. अविस्मरणीय नाटय़ानुभव!

महोत्सवात विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या कथेवर आधारित ‘तुलसी की माला’ हा अश्विनी गिरी लिखित व अनिरुद्ध खुटवड दिग्दर्शित प्रयोग सादर झाला. पंढरीच्या वारीत ५५ वर्षांंचे अविवाहित मास्तर आणि ४५ वर्षांची संसारातील तापत्रयांनी पिचली गेलेली गृहिणी यांच्यात निर्माण झालेल्या मुग्ध भावबंधांचे तरल चित्रण या नाटकात गेले आहे. परंतु हा प्रयोग अपेक्षित परिणाम साधण्यात तोकडा पडला.

‘रम्मत, जोधपूर’निर्मित आणि डॉ. अर्जुन देव चारण लिखित-दिग्दर्शित ‘धरमजुद्ध’ हे नाटकही स्त्रीच्या अस्मितेच्या लढय़ाला केंद्रस्थानी आणणारे होते. समाजाला प्रश्न करणाऱ्या स्वाभिमानी व स्वत:चे सत्त्व जपू पाहणाऱ्या एका तरुणीची समाजपुरुष कशी फरफट करतो आणि तिला संपवतो, याचा पट या नाटकात पुराणकालीन कथेद्वारे उलगडण्यात आला आहे. लोककथेच्या फॉर्ममध्ये सादर झालेले हे नाटक ‘व्हिज्युअल ट्रीट’ देणारे असले तरी कलाकारांच्या उंच-सखल अभिनयाने अपेक्षेएवढे लक्षवेधी ठरू शकले नाही. प्रयोगानतंर डॉ. अर्जुन देव चारण यांच्याशी झालेला संवाद मात्र राजस्थानातील नाटय़ परंपरेपुढील समस्यांविषयी रसिकांना अवगत करून गेला.

या महोत्सवानिमित्त कणकवलीत आलेल्या अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्याशी ‘प्रकट संवाद’ साधण्याची संधी कणकवलीकरांना मिळाली. निमित्त होते- त्यांच्या आयत्या वेळी ठरलेल्या मुलाखतीचे! प्रतिष्ठानच्या नाटय़तीर्थावर ही मुलाखत प्रसाद घाणेकर यांनी घेतली. नाटय़सृष्टीतील आपल्या शिरकावासह पुढचा नाटक-चित्रपट मालिका या माध्यमांतील प्रवास त्यांनी यावेळी विशद केला. नटाला देवत्व बहाल करणे चुकीचे आहे, असे सांगून ते म्हणाले की, ‘अभिनेता म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच मी ‘आक्रीत’सारखा सिनेमा केला. मला जे जे विषय भावले, ते ते मी सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न केला. लोकांना काय आवडते, यापेक्षा मला काय मांडायचे आहे तेच मी माझ्या कलाकृतींतून मांडत आलो आहे.’ कलाकाराने राजकीय-सामाजिक विषयांवर भूमिका घेणे आवश्यकच आहे, असे प्रतिपादन करून ते म्हणाले की, ‘कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीविरोधात आवाज उठवणे हे कलावंताचे कर्तव्यच आहे, मग सरकार कोणतेही असो!’ साहित्यकृतींवरील चित्रपटांच्या माध्यमांतरात आपण केलेल्या विशिष्ट बदलांमागील दिग्दर्शक म्हणून आपला काय दृष्टिकोन होता, हे त्यांनी विस्ताराने स्पष्ट केले.

कणकवलीतील आचरेकर प्रतिष्ठानचा हा रौप्यमहोत्सवी नाटय़-उत्सव अशा अर्थपूर्ण चर्चानी संस्मरणीय ठरला. त्यातला वेगळा आशय, विषय,  घाटाची वैविध्यपूर्ण नाटके हे संचित तर रसिकांना बराच काळ पुरेल यात तिळमात्र शंका नाही.
रवींद्र पाथरे ravindra.pathare@@expressindia.com