News Flash

अध्ययन-अक्षम मुलांचा वाटाडय़ा

या स्मार्टपणाच्या अपेक्षांचा ताण सहन करतच ही मुलं शिक्षणाच्या मार्गावर वाटचाल करीत असतात.

‘हल्लीची मुलं खूपच स्मार्ट आहेत. आपल्यापेक्षा एक पाऊल काय, दहा पावलं पुढे आहेत..’ आजच्या मुलांविषयीची मोठय़ांची ही प्रतिक्रिया नेहमीच कानावर पडते. या स्मार्टपणाच्या अपेक्षांचा ताण सहन करतच ही मुलं शिक्षणाच्या मार्गावर वाटचाल करीत असतात. या अपेक्षांच्या ओझ्यातून हुशार मुले सहीसलामत सुटत असतीलही कदाचित; मात्र अध्ययन-अक्षम असलेली मुलं यात पुरती भरडली जातात. या मुलांची मानसिक कोंडी होते. आणि त्याचा विपरित परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो.  एकीकडे आपल्याच मुलाच्या बाबतीत हे असं का होतंय, या प्रश्नाने पुरते गांगरून गेलेले पालक, तर दुसरीकडे ‘आपल्या वर्गातच हे असं मूल का?’ अशी काहीशी वर्गशिक्षकांचीही नकारात्मक भावना असते. ५०-६० मुलांना हाकारताना या शिक्षकांचा जीवही मेटाकुटीला आलेला असतो. अशातच या मुलांसाठी वेगळा वेळ काढणं त्यांना शक्यही नसतं. परिणामी घर आणि शाळा या दोन्ही पातळ्यांवर या मुलांच्या पदरी निराशाच येते. त्यामुळे त्यांची अवस्था अगदी केविलवाणी होते.

प्रत्येक पालकाला आपलं मूल त्याच्यासोबतच्या मुलांपेक्षा एक पाऊल पुढे राहावं, त्याने ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवावेत असंच हल्ली वाटतं. असं वाटणाऱ्या पालकांची संख्या आज विलक्षण वेगाने वाढते आहे. टक्केवारीच्या या जीवघेण्या स्पध्रेत स्मार्ट मुलांचीही पुरती दमछाक होते आहे. अशात अध्ययन-अक्षमता असलेल्या मुलांची परिस्थिती तर आणखीनच गंभीर होत आहे. कारण अभ्यासाच्या चढाओढीत या मुलांकडे ना पालकांचे लक्ष आहे, ना शिक्षकांचे. गमतीचा भाग म्हणजे अध्ययन-अक्षमता म्हणजे नक्की काय, याबद्दल बऱ्याचदा पालक-शिक्षकही अनभिज्ञ असतात. आणि ज्यांच्या लक्षात ही गोष्ट येते असे पालक आपल्या मुलाला फार मोठा आजार असल्याच्या भावनेने आणि आता आपल्या मुलाचं काही खरं नाही, या गंडाने पछाडले जातात. एक प्रकारचा न्यूनगंड त्यांच्या मनात घर करून राहतो. त्यामुळे अध्ययन-अक्षम असलेल्या मुलांवर शैक्षणिक प्रयोग करणं तर दूरच; त्यांना कोणी समजूनही घेत नाही. या पाश्र्वभूमीवर ‘अध्ययन-अक्षमता आणि मुले’ हे पुस्तक फार महत्त्वपूर्ण ठरते. ओनिता नाक्रा यांनी लिहिलेल्या ‘चिल्ड्रन अ‍ॅन्ड लर्निग डिफिकल्टीज्’ या पुस्तकाचे मराठी रूपांतर म्हणजे ‘अध्ययन-अक्षमता आणि मुले’ हे पुस्तक होय. या पुस्तकाचं मराठी रूपांतरण करणाऱ्या शारदा बर्वे यांचे विशेष आभार मानायला हवेत, कारण त्यांनी इतका महत्त्वाचा विषय मराठीत आणला आहे. इतकंच नव्हे, तर अध्ययन-अक्षमता असलेल्या मुलांच्या पालकांना या पुस्तकाद्वारे सजग करून आश्वस्तही केलं आहे. शारदा बर्वे गेली अनेक वष्रे या क्षेत्रात कार्यरत आहेत. तीन दशकांहून अधिक काळ त्या मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या गाठीशी या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. हे अनुभव अस्वस्थ करणारे आहेत. या पुस्तकाच्या मुळाशी ही अस्वस्थताच आहे.

प्रस्तावनेतील लेखिकेचे अनुभव या समस्येची दाहकता स्पष्ट करतात. अध्ययन-अक्षमता व त्याची कारणे पालक-शिक्षकांच्या वेळीच लक्षात न आल्याने केवळ ‘ढ’ हा शेरा मारून या मुलांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. किंवा मग त्यांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्नच केला जात नाही. अनेकदा ‘अध्ययन- अक्षमता’ या शब्दाशीच अनेक पालकांचा परिचय नसतो. त्यामुळे अध्ययन-अक्षमता म्हणजे नेमके काय, याची त्यांना माहिती असण्याची शक्यताही नसते. हे पुस्तक अचूकपणे या विषयाची माहिती पुरवतं. अध्ययन-अक्षमतेचा सखोल परिचय या पुस्तकाने करून दिला आहे. मुलांमध्ये अध्ययन-अक्षमतेची लक्षणे कशी ओळखावीत, हे सांगताना अवधानातील अडथळे,  स्मरणशक्तीतील अडथळे, ऐकण्याच्या प्रक्रियेत बिघाड, वाचिक अभिव्यक्तीतील अकार्यक्षमता अशा अनेक कारणांची जंत्री देत, या विशिष्ट समस्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. अध्ययन-अक्षमतेची कारणे स्पष्ट करताना मज्जासंस्था, तिची रचना व इतर घटक कसे यास कारणीभूत ठरतात हेही स्पष्ट केले आहे. भाषिक-अक्षमतेमध्ये भाषेचे घटक, विकास, भाषाशिक्षण कसे घडते, भाषा आणि बोलणे यातील फरक, अभिव्यक्तीची भाषा, भाषा शिकवण्यासाठी लागणारे साहित्य याबाबतही पुस्तकात ऊहापोह केलेला आहे. वाचन-अक्षमतेमध्ये याची कारणे, वाचनप्रवास, अनौपचारिक तपासणी, आकलनासाठी वाचन, विशिष्ट प्रकारची वाचन-समस्या आणि त्यावरील उपायही यात दिलेले आहेत.

अनेक मुलांना लिखाणातही काही अडचणी येत असतात. या अडचणींविषयीची माहिती देताना कशा प्रकारे लेखन करावे, अचूक शब्द कसे लिहावेत, लेखनातील अडचणी तपासणे, स्पेलिंग शिकण्याच्या पद्धती याबाबत मार्गदर्शन केले गेले आहे. त्याचबरोबरच ‘गणित विषयातील अक्षमता’ या प्रकरणात आतापर्यंत यासंबंधी झालेल्या संशोधनातील निष्कर्ष, गणितातील समस्यांचे प्रकार, अडचणी आणि गणित शिकवण्याच्या पद्धतींविषयीची सुरेख माहिती या पुस्तकातून मिळते.

मुलांच्या अक्षमतेकडून सक्षमतेच्या दिशेने प्रवास करताना पालकांची भूमिका कशी व काय असावी, त्यांना शिकवण्याच्या उत्तम पद्धती, उपचारात्मक कार्यक्रमांची आखणी याकडेही लक्ष देणे गरजेचे असते. किशोरांबरोबरच प्रौढांमधील अध्ययन- अक्षमतेचा परिचयही या पुस्तकात करून दिलेला आहे.

परिशिष्टामध्ये अध्ययन-अक्षमतेचा आढावा घेताना त्याची व्याख्या स्पष्ट केली आहे. गणित करताना मुलांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुकांच्या विश्लेषणाचा मागोवाही घेण्यात आला आहे- जो खूपच उपयुक्त ठरू शकतो.

शिक्षक हा अक्षम मुलांच्या शिक्षण-साखळीमधला फार महत्त्वाचा दुवा असतो. अशा मुलांना समजून घेणं आणि त्यांच्यातील अक्षमता कमी करण्यासाठी त्यांना मदत करण्याचं अवघड काम शिक्षक करू शकतात. शिक्षकांचे हे काम प्रवाहाविरुद्ध पोहोण्यासारखं आहे. तरीही ते शिक्षकांनी आवर्जून करायला हवं, असं लेखिका कळकळीने सांगते.

हे पुस्तक केवळ अध्ययन-अक्षमता असलेल्या मुलांसाठीच नाही, तर सर्वसाधारण मुलांसाठीही यात अभ्यास करण्याच्या अनेक उत्तम पद्धती सापडतील याबाबत काहीच शंका नाही. अध्ययन-अक्षम मुलांना सामान्य मुलांबरोबर आणण्यासाठी हे पुस्तक म्हणजे सुयोग्य वाटाडय़ा आहे. हे पुस्तक केवळ रूपांतरण नाही, तर एका लेखिकेचा अध्ययन-अक्षम मुलांना समजून घेण्यासाठीचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो नक्कीच यशस्वी झालेला आहे.

अध्ययन-अक्षमता असलेल्या मुलांच्या पालकांनी त्याबद्दल खचून न जाता आपल्या पाल्याला सामान्य पातळीवर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल.

‘अध्ययन-अक्षमता आणि मुले’,

मूळ लेखिका- ओनिता नाक्रा,

अनुवाद- शारदा बर्वे,

ज्योत्स्ना प्रकाशन,

पृष्ठे- १९७, मूल्य-३०० रुपये

लता दाभोळकर -lata.dabholkar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2016 1:17 am

Web Title: adhyayan akshamataa aani mule book by onita nakra
Next Stories
1 ‘युगवाणी’च्या संपादकत्रयीचा वेध
2 दखल : शेतीवास्तवाचा मर्मभेद
3 हृदयंगम नात्याच्या कविता
Just Now!
X