आपण पाहिलेलीकथा रूपेरी पडद्यावर साकारणारे  दिग्दर्शक हे स्वत: त्या सर्जनशील क्षणांचा इतिहास असतात. ते जिथे नेहमी वावरतात अशा ठिकाणीही त्यांच्या प्रतिभेच्या खुणा आढळतील अशी अपेक्षा बाळगणं अनुचित नाही. पण खरंच तसं असतं का?

‘लाइट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शन..’ या तीन शब्दांनंतर कॅमेरा रोलिंग होतो आणि कॅमेऱ्याच्या तिसऱ्या डोळ्यासमोर एक कल्पनेतले जग जिवंत होत जाते. त्यावर कॅमेऱ्याच्या लेन्समधून बघणारी नजर जशी रोखलेली असते, तशीच आणखी एक नजर त्या सगळ्या भवतालावर रोखलेली असते. ‘डिरेक्टर’ अशी पांढऱ्या रंगातील अक्षरे रंगवलेल्या या खुर्चीला आणि त्यात बसलेल्या व्यक्तीला भलताच मान असतो. त्याच्या कलात्मक दृष्टीने पाहिलेले स्वप्न तो सेल्युलॉइडवर प्रत्यक्षात उतरवत असतो. कोणी म्हणते, चित्रपट दिग्दर्शक हा जणू त्या जहाजाचा कप्तान असतो. तो जिथे बसतो त्याच्या अवतीभोवती त्याचा कारभार सुरू होतो. त्याला कित्येकदा वेगवेगळ्या सेटवर आपण हा कारभार हाकताना पाहिलेले असते. त्यामुळे त्याचे म्हणून स्वत:चे स्वतंत्र कार्यालय असावे अशी खरी तर गरज नसते. आणि तरीही मुंबईच्या चमकदार कॉर्पोरेट गल्ल्यांपासून बोळांपर्यंत ठिकठिकाणी त्यांची कार्यालये असतात. ‘अमुक प्रॉडक्शन हाऊस’, ‘तमुक फिल्म्स’ या नावाने सजलेल्या या जागा कित्येकदा छुप्या असतात. त्यामुळे एरव्ही सेल्युलॉइडवर सर्वसामान्यांसाठी स्वप्ने रंगवून शेकडो कोटींची उलाढाल करणाऱ्या या दिग्दर्शकांचा आपल्याला पत्ताच नसतो.

मुंबईचे दर्शन करवणाऱ्या सहलींमध्ये ‘स्टार्स’ची घरे दाखवली जातात. ‘ये देखो, हमारे दाएं बाजू जो दिख रहा है, वो इस सदी के महानायक अमिताभजी का बंगला है..’ अशा रंगतदार वर्णनात आजही बॉलीवूडच्या बिग स्टार्सची घरे दाखवली जातात. त्यांची घरे हा कौतुकाचा विषय असतो. पण या कलाकारांना आपल्या चित्रपटांतून मोठे करणाऱ्या दिग्दर्शकांच्या घरांचीही जिथे फारशी माहिती नसते, तिथे त्यांची कार्यालये तर दूरच. पण ‘घर बांधल्यावर त्या घरातील लोकांना वाटा फुटतात आणि ते बाहेर पळतात’ या आशयाच्या काव्यपंक्ती दिग्दर्शकांना त्यांच्या तथाकथित ऑफिसांच्या बाबतीत लागू पडतात. त्यांची ऑफिसे कितीही शानदार असली तरी त्यांना त्यांच्या मालकांविना महिनोन् महिने राहायची सवय असते. तिथे बऱ्याचदा वर्चस्व असते ते ऑफिस बॉयपासून रिसेप्शनिस्ट आणि मग साहेबांच्या परोक्ष त्यांचे काम जातीने पाहणाऱ्या खास कर्मचाऱ्यांचे. कुठल्याही दिग्दर्शकाच्या कार्यालयात पाऊल टाकल्यावर तुमची पहिली गाठ पडते ती तिथल्या रिसेप्शनिस्ट किंवा शिपायाशी. तुमच्याकडे अपॉइंटमेंट नसेल किंवा तुम्ही माध्यम प्रतिनिधी असलात तरी तुमची मुलाखत ठरलेली नसेल तर त्या रिसेप्शनिस्टच्या खुर्चीमागचे रंगीबेरंगी विश्व तुम्हाला कितीही खुणावत असले तरी तिथे डोकवायचीही परवानगी तुम्हाला मिळत नाही. चित्रपट दिग्दर्शक व निर्मात्यांच्या कार्यालयाची खरी पहेचान आपल्याला पहिल्यांदा इथेच घडते. दिग्दर्शकागणिक त्यांची कार्यालयेही आपली एक वेगळी ओळख घेऊन येतात. ती सर्वसाधारणपणे कॉर्पोरेट कंपन्यांच्या कार्यालयासारखीच असली तरी आतले विश्व मात्र वेगळेच असते.

याबाबतीत रामगोपाल वर्माच्या ‘कंपनी’चा प्रथम उल्लेख करायला हवा. दिग्दर्शक म्हणून रामगोपाल वर्माने एक काळ बॉलीवूडमध्ये गाजवला. एकापाठोपाठ एक क्राइम ड्रामा आणि हॉररपट देणाऱ्या रामूची किमया आता कमी झाली आहे. आता केवळ ‘रामूच्या फॅक्टरीतील चित्रपट’ असा त्याचा उल्लेख केला जातो. मात्र, रामगोपाल वर्माने स्वत:च्या कार्यालयाला ‘कंपनी’ असे नाव दिले आहे. सर्वसाधारणपणे दिग्दर्शकांची कार्यालये ही त्यांच्या बॅनरच्या नावाने ओळखली जातात. पण नावाच्या बाबतीतच नव्हे, तर आपली जागाही हटके ठेवणारा रामगोपाल वर्मा याला अपवाद ठरला आहे. अंधेरीत एका मॉलच्या खाली चित्रपटात शोभून दिसेल अशा गडाच्या बंद दरवाजांसारखे भव्य दरवाजे असलेली ही जागा आपले लक्ष वेधून घेते. या भव्य दरवाजाच्या वरच्या बाजूला ‘कंपनी’ ही अक्षरे कोरली आहेत. दोन्ही दरवाजांवर बंदुका आणि अन्य शस्त्रांची शिल्पे कोरलेली आहेत. काऊबॉयचा सेट लागलेला असावा आणि कुठून तरी ‘अ‍ॅक्शन’ असे शब्द कानांवर पडतील आणि एकदम गोळ्यांच्या फैरी झडतील की काय, असे आपल्याला  वाटत राहते. दरवाज्यांवर त्याचे सुरक्षारक्षक दार अडवून उभे असतात. त्यांना पाहूनच आत शिरायचे धैर्य होत नाही. समोर असलेल्या थोडय़ाशा मोकळ्या जागेत एक छोटे वेताचे टेबल आणि दोन खुच्र्या ठेवलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या नावाची वर्दी आत दिली गेली असेल तर आतून परवानगी मिळेपर्यंत का होईना, तुम्हाला या खुर्चीवर दोन क्षण टेकून रामूच्या ‘फिल्मी’ कारभाराची गंमत न्याहाळता येते. रामूच्या रोखठोक स्वभावाची प्रचीती त्याच्या प्रवेशद्वारावरच येते. ‘नॉन बिलिव्हर्स विल बी फायर्ड’ असे दारावरच ठणकावून सांगणाऱ्या रामूच्या या गढीत शिरून त्याचे शोले अंगावर घ्यायची तयारी असेल तरच आत प्रवेश करावा.

रामगोपालच्या कार्यालयाइतका फिल्मी माहोल अन्य कोणाकडे पाहायला मिळत नाही. चित्रपट माध्यमावर पकड ठेवून असणारे आणि त्यात कलात्मकताही जपणारे काही दिग्दर्शक आहेत. ज्यात प्रकाश झा हे नाव आवर्जून घ्यावे लागेल. झा यांचे कार्यालय अंधेरीत यशराज स्टुडिओच्या परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये तळमजल्याला आहे. ‘पीजेपी- प्रकाश झा प्रॉडक्शन्स’ या ब्रॅण्डचा सर्वेसर्वा असलेला हा माणूस आठ राष्ट्रीय पुरस्कारांचा विजेता आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगी बाणवलेला हा माणूस कामाच्या बाबतीत मात्र अजिबात साधा नाही. ‘सिनेमा विथ पॉवर’ हे त्यांचे घोषवाक्य ते अभिमानाने मिरवतात. कलात्मकता आणि साधेपणा या दोन्हीचे मिश्रण त्यांच्या कार्यालयात दिसते. दरवाज्यातून प्रवेश केला की समोरच त्यांच्या ‘राजनीती’ चित्रपटाचे मोठेच्या मोठे पोस्टर लक्ष वेधून घेते. प्रकाश झांच्या जवळपास सर्वच चित्रपटांना प्रेक्षक-समीक्षकांनी डोक्यावर उचलून धरलेले आहे. पण बडे कलाकार आणि ताकदीचा विषय असलेला चित्रपट म्हणून त्यांच्या ‘राजनीती’चे नाव पहिले ओठावर येते. इथेही ‘राजनीती’चे पोस्टर आणि ‘सत्याग्रह’चे पोस्टर एका विशिष्ट पद्धतीने एकत्र करून ‘सिनेमा विथ पॉवर’चा उल्लेख केला गेला आहे. तिथे छतावरचा छोटेखानी, वेगळ्याच पद्धतीचा वेताचा पंखा आपले लक्ष वेधून घेतो. आतली रचनाही काहीशी साधी आणि मोकळेपणा राखून असणारी आहे. एका बाजूला झा यांची केबिन, मधोमध गप्पा मारण्यासाठी ठेवलेली मोकळी जागा आणि पुढे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे एकामागोमाग एक टेबले असे मोकळेढाकळे वातावरण असलेल्या या जागेत झा यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली तर ‘सोने पे सुहागा’ अशीच स्थिती असते.

असाच साधेपणा संजय लीला भन्साळींच्या कार्यालयात अनुभवायला मिळतो तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. जुहूच्या निवासी भागातील शांत परिसरात एका अपार्टमेंटमध्ये भन्साळी यांचे कार्यालय आहे. ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांमध्ये रूपेरी पडद्यावर भव्यदिव्य सेट्स, दिव्यांची रोषणाई, रंगांची मुक्त उधळण आणि डोळे दिपवणारा माहोल उभा करणाऱ्या या दिग्दर्शकाचे कार्यालय मात्र रंगांपासून थोडेसे फटकूनच आहे. सेट आणि कलाकृतींतून दिसणारी भव्यता इथे फक्त जागेच्या लांबी-रुंदीपुरतीच आढळते. फ्लॅट्स एकत्र करून उभारलेले हे कार्यालय भलेमोठे आहे याची जाणीव आत शिरल्यानंतरच येते. आत शिरल्यावर एका बाजूला बसण्यासाठी असलेल्या सोफ्यावर विराजमान झाल्यावर तुमची पहिली गाठ पडते ती डाव्या बाजूला लांब जाळीमागे असलेल्या त्यांच्या श्वानाशी. त्याच्यासाठीच ती खास जागा तयार करण्यात आली आहे. त्याच्या दिमतीला भन्साळींकडे काम करणारी तीन-चार माणसे कायम असतात. इथे रिसेप्शनिस्ट हा प्रकार नाही. मुळात कॉर्पोरेट स्ट्रक्चर वगैरे भानगडही नाही. दिग्दर्शक म्हणून संजय लीला भन्साळींचा दृष्टी कमालीची कलात्मक आहे. रंगांचे अचूक भान, रंग-प्रकाशाशी लीलया खेळणारा हा प्रतिभावान दिग्दर्शक चित्रपटासाठीचे पेहेराव, दागिने आणि अन्य कलात्मक वस्तू स्वत: देशभर फिरून निवडतो. विकत घेतो. प्रसंगी बनवूनही घेतो. त्यामुळे त्यांच्या चित्रपटातील एखाद्या हवेलीत वापरलेले लाकडी नक्षीकामाचे टेबल वा तत्सम वस्तू तुम्हाला इथे आजूबाजूला विसावलेल्या दिसतात. त्यांनी जातीने लक्ष घालून खरेदी केलेली प्रॉपर्टीज् (कपडे, दागिने इ.) असलेल्या मोठ्ठाल्या ट्रंका एकावर एक चढवलेल्या इथे पाहायला मिळतात. त्यावर ‘रामलीला’, ‘गुजारिश’ अशी लेबल्स लावलेली आहेत. आत शिरून उजव्या बाजूने थोडे पुढे गेल्यावर आणखी एक दरवाजा उघडतो. बाहेरचा गंधही या आतल्या खुफिया जागेला नाही. इथे खरे भन्साळी तुम्हाला भेटतात. त्यांच्या आवडीची पुस्तके, कमालीचा देखणा दिवाणखाना, लॅम्प्स अशी त्यांच्या सौंदर्यदृष्टीची पुरेपूर प्रचीती देणारी ही जागा. इथे गप्पा मारताना भन्साळी दिलखुलासपणे आपल्या चित्रपटांविषयी बोलतात. त्यांना आवडणारी मराठी संस्कृती, राहण्यापासून खाण्यापिण्यापर्यंतच्या त्यांच्या साध्याच आवडीनिवडी याबद्दल ते भरभरून बोलतात.

संशोधन व अभ्यासपूर्ण मांडणीचा प्रभाव जसा भन्साळींच्या कार्यालयावर आहे तसाच तो आशुतोष गोवारीकरांच्या कार्यालयावरही आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांच्यातील शिस्त इथेही जाणवते. शिस्त आणि व्यासंग ही श्याम बेनेगल यांच्या कार्यालयाचीही ओळख आहे. मधुर भांडारकरचे कार्यालय त्याच्या ‘पेज थ्री’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘कॉर्पोरेट’ या त्याच्या चित्रपटांच्या पोस्टर्सने सजलेले आहे. तर आर. बल्कीच्या होप प्रॉडक्शनची रचना कॉर्पोरेटला साजेशी असली तरी तिथल्या भिंतीवरील कलात्मक तसबिरी, मूर्ती व अन्य वस्तूंची निवड ही त्यांच्या दिग्दर्शक पत्नीची- गौरी शिंदेची आहे.

दिग्दर्शकांची कार्यालये म्हटली की त्यांच्या चित्रपटांची- त्यातही यशस्वी चित्रपटांची पोस्टर्स आणि पुरस्कारांच्या ट्रॉफीज् काचेच्या कपाटांतून दिमाखाने मिरवताना दिसणारच. ट्रॉफीज् आणि पोस्टर्सची अशी भाऊगर्दी अजय देवगण फिल्म्सच्या कार्यालयातही आढळते. ‘देवगणस्’ अशी पाटी मिरवणारे हे जुहूतले कार्यालय अजयचे वडील वीरू देवगण यांच्या चित्रपटांच्या ट्रॉफीज्नीसुद्धा गजबजलेले आहे.

कित्येक वर्षे एखादा दिग्दर्शक आपल्या बाजूला कार्यालय थाटून आहे याचा सुगावाही लागू नये इतके अलिप्त आणि सहजतेचा वावर असणारे कार्यालय म्हणून राकेश ओमप्रकाश मेहरांच्या कार्यालयाचा उल्लेख करावा लागेल. पाली हिल परिसरात एकमेकांना खेटून असणाऱ्या छोटय़ा बंगल्यांच्या बोळात त्यांचे ऑफिस आहे. बाहेरून निळा रंग असलेला, आतले जग दडवून ठेवणाऱ्या काचा असलेला हा छोटेखानी बंगला कुठलेही नाव-गाव न घेता उभा आहे. बंगल्याचा क्रमांक हीच त्याची ओळख. पण आत शिरल्यावर तिथली मंद दिव्यांच्या प्रकाशाची रंगसंगती, सगळीक डे काचांच्या दरवाजांची मांडणी यामुळे पारदर्शकता हीच त्याची खरी ओळख. खालच्या बाजूला एकीकडे कॉन्फरन्स रूम व दुसऱ्या बाजूला त्यांच्या कर्मचाऱ्यांचा विभाग आहे.  उजव्या बाजूने जाणारा एक लाकडी जिना वर राकेश मेहरांच्या खऱ्या विश्वात घेऊन जातो. हा वरचा भाग उंचीला छोटा आहे. जेमतेम एक माणूस उभा राहील इतकी छोटी असलेली ही जागा कमालीची सुंदर सजवली आहे.

दिग्दर्शक आणि निर्मात्यांची ही कार्यालये तशी नावालाच- त्यांचे इतर व्याप सांभाळायला असतात. संहितेच्या निवडीपासून ते कलाकारांची निवड असेल, प्रत्यक्ष चित्रीकरण असेल किंवा कलाकारांना करारबद्ध करणे असेल; या गोष्टी बहुधा कार्यालयाबाहेरच केल्या जातात. यापूर्वी अनेक निर्माते-वितरकांची कार्यालये नाझ वा नटराज स्टुडिओतच होती. एकाच स्टुडिओत चार-पाच जणांची कार्यालये असत. एफ. सी. मेहरा, रामानंद सागर यांची कार्यालये नटराज स्टुडिओत होती. राज कपूर यांचे कार्यालय पॉश होते तरी चित्रपटाशी निगडित अनेक गोष्टींसाठी संबंधितांना थेट आर. के. कॉटेजवरचेच निमंत्रण असे. पटकथालेखन वा त्यावरील चर्चेसाठी खंडाळा, लोणावळा ही ठिकाणे गाठली जात. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांची पोस्टर्स लावून त्यांच्या कर्तृत्चाची ओळख करून देणारी काचबंद कपाटे, टेबल-खुच्र्या आणि तिथे काम करणारी नेहमीची मंडळी वगळता खुद्द निर्माता-दिग्दर्शक कार्यालयात सापडणे ही अंमळ कठीणच गोष्ट होती.

यशराज स्टुडिओ आज दिमाखात अंधेरीत उभा आहे. यशराजच्या चित्रपटांची झलक दाखवणारी पोस्टर्स तिथे भिंतींवर आढळतात. पण यश चोप्रा सुरुवातीच्या काळात बी. आर. चोप्रांपासून वेगळे झाले आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपली वेगळी चूल थाटली तेव्हा त्यांच्याकडे कार्यालयासाठी जागा नव्हती. त्यावेळी व्ही. शांताराम यांनी आपल्या राजकमल स्टुडिओत यश चोप्रांना जागा दिली आणि ‘यशराज’चा कारभार तिथून सुरू झाला. त्यानंतर खूप वर्षांनी आदित्य चोप्राने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ केला तेव्हा त्याने हे कार्यालय अंधेरीत हलवले आणि नंतर सध्याची यशराज स्टुडिओची मोठी वास्तू निर्माण झाली. पण या भव्य वास्तूत दिग्दर्शक आदित्य चोप्राचे दर्शन त्याचे कर्मचारी आणि कलाकार वगळता अन्य कोणालाही शक्य होत नाही. ‘मर्दानी’च्या मुलाखतीच्या वेळी यशराजच्या याच कार्यालयात मोकळेपणाने गप्पा मारणाऱ्या राणी मुखर्जीनेही आपल्या नवऱ्याच्या या अजब स्वभावाविषयी लाडिक तक्रार केली होती : ‘आपण जिथे बसलोय तिथे अगदी डोक्यावर माझा नवरा काम करत बसला आहे. पण तो मला इथे भेटणार नाही. त्याचे दर्शन मला तो घरी आल्यावरच होऊ शकते.’ खुद्द मिसेस चोप्रांची ही तक्रार असेल तर इतरांबद्दल काय सांगावे?

लेखक, तंत्रज्ञ, संगीतकार, कलाकार अशा अनेकांची मोट बांधून त्यांना आपण ‘पाहिलेली’ कथा हजारो लोकांना आपलीशी वाटेल अशा रीतीने रूपेरी पडद्यावर साकारणारे हे किमयागार खरे तर स्वत:च या सर्जनशील क्षणांचे चालते-बोलते इतिहास असतात. त्यामुळे ते जिथे जिथे वावरतात- मग ती त्यांची कार्यालये का असेनात- तिथे तिथे त्यांच्या प्रतिभेचे कण अनुभवता येतील, अशी भाबडी आशा मनात घर करून असते. आणि साहजिकच या जागा आपल्या मनातही घर करतात.

reshma.raikwar@expressindia.com