अरुणा अन्तरकर

कल्पना लाजमी.. चाकोरीबाहेरचे सिनेमे देणारी आणि तसेच आयुष्यही जगणारी एक गुणी दिग्दर्शिका. त्यांच्या निधनाने एक चिंतनशील कलावंत अस्तंगत झाली आहे..

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

बॉलीवूड आणि त्याचा प्रेक्षक- किंबहुना, भारत अन् भारतवासी या दोघांनाही कोणत्याही चांगल्या गोष्टीची ओळख लवकर पटत नाही. स्वतंत्रपणे गुणवत्ता पारखण्याऐवजी ते सवयीच्या आणि सोयीच्या गोष्टींना मान्यता देतात. सत्यजीत रे आणि रविशंकर यांची कदर आधी परदेशात होते अन् त्यानंतर आम्ही त्यांना ‘ग्रेट’ म्हणायला लागतो. गुरुदत्तच्या मृत्यूनंतर तो ‘जीनिअस’ होता असा शोध आम्हाला लागतो.

ज्याला कुठेच मज्जाव नाही, ज्याला कसलीही बंधनं नाहीत त्या गुणी पुरुषाची इथे ही दशा असेल, तर कल्पना लाजमी नावाची एक चांगली स्त्री-दिग्दर्शक आपल्याकडे आहे- नव्हे, होती याची आठवण आम्हाला तिच्या मृत्यूमुळे व्हावी यात आश्चर्य नाही. दीपा मेहता, मीरा नायर, गुरिंदर चढ्ढा, रीमा कागटी, मेघना गुलजार नावाच्या आणखीही काही चांगल्या दिग्दर्शक आपल्याकडे आहेत याचीही कल्पनाच्या निमित्तानं आठवण करायला हवी. ‘तलाश’ आणि ‘राजी’ यांच्या यशामुळे (अनुक्रमे) रीमा अन् मेघना यांनी पुनरागमन केलं असलं तरी त्यांचे पुढचे चित्रपट बघायला किती वर्षे लागतील, हे पट्टीचा ज्योतिषीदेखील सांगू शकणार नाही. फाळके पुरस्कारासाठी जुनेपुराणे, ऐंशीच्या घरात पोचलेले हिरो शोधण्यासाठी आकाशपाताळ एक केलं जातं; पण सई परांजपे यांच्या नावापाशी परीक्षकांची गाडी पोचतच नाही. त्यावेळी त्यांना साठच्या दशकातल्या चित्रपटांच्या हिरोंना यायचा तसा स्मृतिभ्रंशाचा (‘टेम्पररी’) झटका नेमका येतो की काय?

एकंदरीतच स्त्री-दिग्दर्शक आणि स्त्री-क्रिकेटर यांचा स्वीकार करण्याची परिपक्वता भारतीय समाजापाशी कधी येणार, हा बिकट आणि कायम अनुत्तरित राहणारा प्रश्न आहे. उपेक्षा अन् दुर्लक्ष ही एक प्रतिक्रिया मात्र वर्षांनुवर्ष कायम आहे. जगज्जेता म्हणून डोक्यावर घेतलेला भारतीय पुरुषांचा क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये चारी मुंडय़ा चीत होतो; दुबईत अफगाणिस्तानसारखा अननुभवी संघ त्याच्या तोंडाला फेस आणतो, तरी त्याचं पानभर ‘कव्हरेज’ असतं. श्रीलंकेत टी-२० मालिका जिंकणाऱ्या महिला संघाच्या वाटय़ाला मात्र स्पोर्ट्स पेजवर तळातला कोपरा मिळतो. असो. स्त्रीजन्माची ही कहाणी आता नवनव्या क्षेत्रांत बघायला/ वाचायला मिळते, हेच नावीन्य समजायचं.

नव्वदीच्या दशकाच्या शेवटच्या भागापासून नव्या सहस्रकाच्या पहिल्या तीन-चार वर्षांपर्यंत स्त्री-दिग्दर्शकांचे ‘अच्छे दिन’ होते. कल्पना लाजमीचे नाही, तर मेहता, नायर, चड्ढा या तिघींचे चित्रपट सातत्यानं पाहायला मिळत होते. त्यांची संख्या मोठी नव्हती. पण ठरावीक अंतरानं, किमान सातत्यानं ते पाहायला मिळत होते. अचानक भूकंप व्हावा आणि एखादं अख्खं गावच गडप व्हावं तशी स्त्री-दिग्दर्शक हा वर्गच सहस्रकाची पहिली पाच वर्षे पूर्ण होण्याच्या आत नाहीसा झाला.

नव्या पिढीतल्या पुरुष दिग्दर्शकांना (आणि प्रेक्षकांनाही!) तंत्र-चमत्कृतींच्या जोरावर अचाट पराक्रम करणारे काल्पनिक सुपर हिरो किंवा वास्तववाद तोंडी लावायचा असेल तेव्हा कायदा धाब्यावर बसवून थरारक जीवन जगणारे गँगस्टर हिरो आणि त्यांचा त्यांच्याच पद्धतीनं निकाल लावणारे ‘दबंग’ पोलीस इन्स्पेक्टर, तसंच सामाजिक चित्रपट काढण्यासाठी होलसेल भावात भ्रष्टाचार पुरवणारे राजकारणी जवळचे वाटू लागले. जोडीला मानसिक विकृती अथवा समलैंगिकता हे विषय हातचे धरले गेले. त्यामुळे कौटुंबिक आणि स्त्रीप्रधान चित्रपट देशोधडीला लागले. आई- ताई- माई- आक्का- वहिनी या सगळ्यांवर ‘व्हीआरएस’ लादण्यात आली. ज्येष्ठांपैकी फक्त ‘दादी’ वाचली आणि बालिका- बाला वर्गापैकी काही फटाकडय़ा, छबकडय़ा व बऱ्याचशा गँगस्टर-सख्या तेवढय़ा राहिल्या. (अंगभर वस्त्रांची उधळपट्टी करायची नाही, कपडय़ांची शक्य तितकी काटकसर करायची- या अटीवर!)

अशी त्सुनामी आल्यावर लाजमी- नायर- मेहता ही नावं वाळूने बांधलेली घरटी लाटांनी ओढून न्यावी तशी पुसली गेली. स्त्री-दिग्दर्शकांच्या चित्रपटात नावीन्य नसतं, फक्त स्त्रीकेंद्रित विषय असतात; त्या चाकोरीबाहेरचे, अ‍ॅक्शन फिल्म किंवा तीन दिवसांत शंभर कोटींची कमाई करणारे चित्रपट देऊ शकत नाहीत, अशी या वाताहतीची कारणं दिली जातात. पण ती कारणं नाहीत; त्या सबबी आहेत. हिंदी चित्रपटानं स्त्रीबरोबरच स्वत:भोवतीही लक्ष्मणरेषा आखून घेतली आहे. डोळ्यांवर झापडं लावून घेतली आहेत. हिंदी चित्रपटाचे तथाकथित हिरो वर्षांनुवर्ष पहाडी प्रदेशात/ परमुलखात जाऊन नस्ता पुरुषार्थ करायचे आणि त्याला आलेली फळं, फुलं आपल्या अर्धागिनीच्या ओटीत घालण्याची करामत करून दाखवायचे. हे चित्रपट आपल्या प्रेक्षकांनी स्वीकारले. (कारण ते त्यांच्या सोयीचं होतं.) मात्र, कल्पना लाजमीनं ‘एक पल’मध्ये किंवा अरुणा राजेनं ‘रिहाई’मध्ये या भूमिकांची अदलाबदल करून बाईचा भूतकाळ पुरुषाच्या खांद्यावर ठेवला, तेव्हा ‘काळाच्या पुढचे चित्रपट’ एवढंच कौतुक त्यांच्या वाटय़ाला आलं. ‘बॉक्स ऑफिस’नं त्याला दाद दिली नाही. ‘शोले’सारखा ए टू झेड चोरलेला (‘मेरा गाव मेरा देश’वरून), ब्रिटिशकालीन जेलर आणि सुरमा भूपाली यांची हास्यास्पद ठिगळं लावलेला, दिशा, हेतू, आशय नसलेला, दुष्ट माणसाचा गाजावाजा करणारा चित्रपट केवळ अप्रतिम टेक्निकच्या टेकूमुळे ‘कल्ट-मूव्ही’ ठरतो. तर मग ‘एक पल’ किंवा ‘रिहाई’ हे खरोखरीच चांगले, वेगळे, वास्तववादी आणि धीट चित्रपट यशस्वी का होत नाहीत? स्त्रीचा भूतकाळ अन् वास्तववाद पचवणं पुरुषप्रधान संस्कृतीला अजूनही जड जातं का?

कल्पनानं किंवा तिच्या समकालीन दिग्दर्शिकांनी स्त्रीकेंद्रित अथवा स्त्रीवादी चित्रपट बनवले असं म्हणणं म्हणजे त्यांच्या गुणवत्तेला कुंपण घालणं आहे. त्यांचं बाह्य़रूप स्त्रीप्रधान असेल, पण त्यांचा आशय सामाजिकही आहे. ‘रुदाली’ ही इतरांच्या मृत नातलगांकरिता मोबदला घेऊन रडण्याऱ्या स्त्रीची शोकांतिका आहे. इतरांच्या नातलगांकरता रडण्याचा रोजगार करणाऱ्या नायिकेचे अश्रू स्वत:च्या पतीच्या मृत्यूच्या दु:खानं गोठून जातात.. ती रडू शकत नाही. ही शोकांतिका आहेच; पण चित्रपट तिच्यापुरताच मर्यादित नाही. स्वत:च्या आप्तांसाठीसुद्धा ज्यांच्या डोळ्यांत अश्रू येत नाहीत, तिथे ‘मोले घातले रडाया’ हे ढोंग येणारच, याकडेही हा चित्रपट लक्ष वेधतो, हे लक्षात घ्यायला हवं.

‘रुदाली’, ‘एक पल’पेक्षा (आणि मीरा नायरच्या ‘सलाम बॉम्बे’ व ‘कामसूत्र’, दीपा मेहताच्या ‘फायर’ आणि ‘अर्थ’पेक्षा अन् गुरिंगदर चढ्ढाच्या ‘ब्राइड अ‍ॅण्ड प्रेज्युडिस’पेक्षा) किती वेगळे, धीट तरीही वास्तववादी असू शकतात? ‘दमन’ आणि ‘चिंगारी’ हे कल्पनाचे पुढचे चित्रपट गाजले नाहीत. कारण ‘रुदाली’पाशी भूपेन हजारिकांचं संगीत होतं, गुलजारची गीतं होती. बॉक्स ऑफिसचे असे मानक कल्पनाला पुन्हा जमवता आले नाहीत. तिला आणि अन्य दिग्दर्शकांना कलात्मक/ प्रायोगिक विषय व्यावसायिक चित्रपटाच्या चौकटीत खुबीनं घालता आले नाहीत. आज व्यावसायिक व कलात्मक चित्रपटांमधलं अंतर थोडं कमी झालं आहे. त्यामुळे संगीतासकट बॉक्स ऑफिसचे सगळे घटक बाजूला ठेवून मेघना गुलजारला ‘राजी’सारखा चित्रपट करता येतो.

कल्पनाला बॉक्स ऑफिसच्या युक्त्या जमवता आल्या नाहीत, पण राखी, डिम्पल (रुदाली), रवीना टंडन (दमन), सुश्मिता सेन (चिंगारी) या हिंदी चित्रपटांच्या टिपिकल ग्लॅमरस नायिकांना  तिनं ‘इमेज’ बदलायला आणि धाडस करायला प्रवृत्त केलं, हे श्रेय तिला द्यायलाच हवं. डिम्पल आणि रवीना यांना या धाडसाचं फळ राष्ट्रीय पुरस्कारांच्या रूपानं मिळालं. खुद्द कल्पना मात्र अशा मानसन्मानांना वंचित राहिली. अभिनेत्रींच्या ग्लॅमरचा गाजावाजा होतो, त्याच्या शंभराव्या हिश्शानंसुद्धा दिग्दर्शकांचा होत नाही. ‘पद्म’ पुरस्कारांची खिरापत वाटली जाते; ते जाणकारीने दिले जात नाहीत. कामगिरीची गुणवत्ता, दर्जा यांच्यापेक्षा चित्रपटांच्या संख्येला महत्त्व दिलं जातं. साहजिक कल्पना लाजमी, दीपा मेहता यांची नावं ‘पद्म’ यादीपर्यंत पोचत नाहीत. स्टार पुत्रांचे प्रसिद्धीचे ढोल ते पडद्यावर येण्याआधीच बडवले जातात. पण स्टारची भाची असणं आणि दिग्दर्शक बनणं या गोष्टीला महत्त्व दिलं जात नाही. कल्पना लाजमी गुरुदत्तची भाची किंवा बेनेगलची नातलग व मदतनीस असते याचा तिला काही फायदा मिळत नाही. बॉलीवूडमध्ये घराणेशाहीचा लाभ फक्त स्टारपुत्रांना व कन्यांना होतो.

गुरुदत्तचं भाचीपण कल्पनानं मिरवलं नाही आणि मीडियानं गाजवलं नाही. तिच्या गुणवत्तेच्या मानानं तिला पदव्या, पुरस्कार मिळाले नाहीत की तिला मोठय़ा निर्मात्यांचे, बाहेरच्या संस्थांचे चित्रपटही मिळाले नाहीत. तिच्या स्वभावानं तिचं यशाचं वर्तुळ मोठं होऊ दिलं नाही. तिच्यातल्या स्त्रीनं- प्रेमिकेनं तिचं नुकसान केलं. भूपेन हजारिका यांच्या प्रेमात आणि त्यांच्या कारकिर्दीच्या व्यवस्थापनात ती इतकी अडकून पडली की, स्वत:च्या करिअरचा विचार करायला तिला वेळच मिळाला नाही; नव्हे, तसा विचारच तिनं केला नाही.

..चित्रपटात यशस्वी झालेले बहुतेक पुरूष कलंदर वृत्तीत जगणारे आहेत. तेच काय, बहुसंख्य नामवंत पुरूष तसेच जगतात. प्रपंचाचा गाडा ओढण्याचं काम त्यांच्या अर्धागिनी करत असतात. हजारिकांच्या बाबत हेच काम कल्पनानं केलं. वयाच्या १७ व्या वर्षी ती तिच्याहून २८ वर्षांनी मोठय़ा असलेल्या हजारिकांच्या प्रेमात पडली. त्यांचं पत्नीपद तिला लाभलं नाही. मात्र, बहुसंख्य मोठय़ा पुरुषांच्या पत्नीच्या वाटय़ाला त्यांच्यातला छोटा माणूस येतो, तो तेवढा कल्पनाच्या वाटय़ाला नेमका आला. हजारिका मद्यपी होते, कमालीचे बेबंद व बेशिस्त होते. कल्पनाच्या सहचर्यात असतानाही त्यांची प्रकरणं चालू असायची.

पण कल्पनानं आर्य स्त्रीच्या निष्ठेनं या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. हजारिकांनी तिच्याबरोबरच्या प्रेमसंबंधांना कधी जाहीर स्वीकृती दिली नाही. इतरांशी कल्पनाची ओळख करून देताना ते ‘माझी मॅनेजर’ म्हणून तिचा उल्लेख करायचे. पुढे कित्येक वर्षांनी त्यांनी तिला ‘मॅनेजर’पासून पार्टनरच्या पदावर प्रमोशन दिलं. पण या गोष्टी तिनं कधी मनावर घेतल्या नाहीत. त्यांच्या जीवनाशी, आशा-आकांक्षाशी त ती ‘काया, नाचा, मने’ बरोबर ‘भूगोल’ करून समरस झाली. मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या कल्पनाचे चित्रपट नेहमी आसामच्या पाश्र्वभूमीवर चित्रित झाले. आसाम ही हजारिकांची मायभूमी; त्यांचं प्रेमनिधान! त्यांचं रोमँटिक प्रेमही कल्पनाला मिळालं नाही. तिच्या हातातल्या हिऱ्याच्या अंगठीकडे बघत एका महिला पत्रकारानं तिला विचारलं होतं, ‘‘ही भूपेनदांची स्पेशल गिफ्ट का?’’

‘‘नाही!’’ कल्पना उत्तरादाखल म्हणाली होती, ‘‘तिचे पैसे त्यांनी दिले हे खरं आहे, पण अंगठीची निवड त्यांनी केली नाही. मग हिला गिफ्ट कसं म्हणू?’’

कल्पनाच्या या दु:खात आणखी किती तरी स्त्रिया सहभागी होतील! असो. कल्पनानं अशा गोष्टी मनामागे टाकणंही ‘मॅनेज’ केलं. ती वयानं हजारिकांपेक्षा लहान होती, पण मनानं व समजुतीनं ती खूप मोठी होती. हजारिकांच्या बेशिस्त आयुष्याला तिनं आकार दिला, स्थैर्य दिलं. हजारिकांच्या मृत्यूच्या धक्क्यातून ती शेवटपर्यंत सावरली नाही. हजारिकांच्या हयातीत त्यांची अवाक्षरानं विचारपूस न करणाऱ्या नातलगांनी त्यांच्या मृत्यूनंतर मात्र ट्रस्टचा ताबा मिळवण्याकरिता तिला खूप त्रास दिला. पण या मन:स्तापासह कल्पना हजारिकांची स्मृती व ट्रस्ट जपत राहिली. तिच्या चित्रपटांवर ‘स्त्रीवादा’चा शिक्का मारणाऱ्यांनी तिच्या स्वभावाची ही समर्पित बाजू लक्षात घ्यायला हवी. तिच्या चित्रपटांत नारेबाजी करणारा कर्कश स्त्रीवाद नव्हता. न्याय्य हक्काची व अधिकाराची मागणी होती; हक्काची वा अधिकाराची वसुली नव्हती. तिच्या नायिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्याबाबत मात्र ती आग्रही होती.

हा आग्रह, हा जागरूकपणा कल्पनानं तिच्या चित्रपटांबाबत दाखवला असता तर? तिचा पहिला चित्रपट- ‘एक पल’ १९८६ साली आला, तर पुढचा ‘रुदाली’ तब्बल सात वर्षांनी १९९३ साली. त्यानंतरचा ‘दरमियां’ (पुन्हा वेगळा.. तृतीयपंथीयांची व्यथा सांगणारा) चार वर्षांनी (१९९७), तर ‘दमन’ आणखी चार वर्षांनी (२००१) आणि शेवटचा ‘चिंगारी’ २००६ साली. दृष्टीआड सृष्टी हा रोखठोक न्याय असलेल्या चित्रपटसृष्टीत सातत्याचा असा अभाव

चालत नाही. प्रसिद्धीत राहणं, नजरेसमोर असणं हे तिथे अत्यावश्यक असतं. पण फक्त चाकोरीबाहेरचे चित्रपट काढण्यावर कल्पनाचा विश्वास नव्हता. ती आयुष्यही चाकोरीबाहेर जाऊन जगत होती. ज्या प्रेमाकरिता, सन्मानाकरिता तिच्या (चित्रपटांतल्या) नायिका लढत होत्या, त्याचकरिता- तिनं दाखवलं नाही तरी- ती झुरत होती. तिनं नायिकांना तो हक मिळवून दिला; पण तिला स्वत:ला तो मिळवता आला नाही. मात्र, तरीही तिनं प्रेम करणंथांबवलं नाही. हे तिचं सर्वात मोठं यश म्हटलं पाहिजे.