हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गीतकार शैलेंद्र हे केवळ गीतकार नव्हते, तर ‘इप्टा’, ‘प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन’ यांसारख्या डाव्या चळवळीशी संबंधित संस्थांमध्येही ते सक्रीय होते. सुरुवातीला मुंबईत कामगार म्हणून रोजीरोटी कमावलेल्या कवी शैलेंद्र यांनी कामगारवर्गाच्या वेदनेला उद्गार देणाऱ्या कविताही प्रारंभीच्या काळात लिहिल्या. परंतु त्यांची ही ओळख नंतर  लोकप्रिय गीतकार झाल्यावर साफ पुसली गेली. १४ डिसेंबर रोजी त्यांच्या मृत्यूस  ५० वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या या अनोळखी पैलूवर प्रकाश टाकणारा लेख.. 

शैलेंद्र हा हिंदी चित्रपटगीतांचा अनभिषिक्त बादशहा म्हणून ओळखला जातो. त्याच्या मृत्यूला ५० वष्रे झाली तरी अजूनही त्याच्या चित्रपटगीतांची मोहिनी रसिकांच्या मनावर कायम आहे. मात्र, चित्रपटांव्यतिरिक्त शैलेंद्रने उत्तम कविताही लिहिलेल्या आहेत, ही गोष्ट फारच थोडय़ा जाणकारांना ठाऊक आहे.

Ranajagjitsinha Patil - Om Rajenimbalkar
“…तर राजकारण सोडून देईन”, ओमराजेंनी तेरणा महाविद्यालयावरून केलेल्या आरोपांवर राणा पाटलाचं उत्तर
Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
mira road, Young college going girl, Dies, Tragic Two Wheeler Accident, accident in mira road, dies student in accident, two wheelar accident mira road, accident news,
दुचाकी अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू, मिरा रोड येथील घटना; दुचाकीस्वार मित्रावर गुन्हा दाखल
What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत

शैलेंद्रचा जन्म १९२३ साली रावळिपडी येथे झाला. कॉलेजमध्ये असतानाच तो कविता करू लागला होता. १९४१ साली त्याची पहिली कविता ‘साधना’मध्ये प्रकाशित झाली. लवकरच ‘हंस’, ‘धर्मयुग’, ‘माधुरी’ अशा प्रतिष्ठित नियतकालिकांतून त्याच्या कविता प्रकाशित होऊ लागल्या. भारतीय स्वातंत्र्यलढय़ात त्याने हिरीरीने भाग घेतला व त्यासाठी त्याला तुरुंगातही जावे लागले. या काळातील त्याच्या बहुसंख्य कविता देशाविषयीचा अभिमान आणि इंग्रजी सत्तेविषयीची चीड व्यक्त करणाऱ्या होत्या.

पुढे योगायोगाने त्याला मुंबईला नोकरी लागली आणि या महानगरीत तो येऊन दाखल झाला. येथे आल्यावर त्याला प्रथम कामगारांच्या विशाल समुदायाचे दर्शन झाले. या विश्वाचा आपण एक लहानसा भाग आहोत हे ज्ञानही त्याला येथे आल्यावर झाले. आत्मभान आणि समाजभान यांचे अप्रतिम मिश्रण त्याच्या काव्यातून नंतर जाणवले ते यामुळेच. कामगारांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांची दु:खे यांचे त्याला केवळ जवळून दर्शन घडले असे नव्हे, तर ही दु:खे त्याने स्वत: भोगली. राहण्यासाठी एक लहानसे घर असावे- या स्वप्नापासून ते ‘जगातील सारे कामगार एक व्हावेत आणि सुखी व्हावेत’ या स्वप्नापर्यंत प्रत्येक स्वप्न त्याने स्वत: पाहिले. कामगारांचे शोषण कसे होते, त्यासाठी जिम्मेदार कोण आहे, ते थांबावे यासाठी काही उपाय आहे का, या प्रश्नांनी त्याला छळण्यास सुरुवात केली.

मुंबईला आल्यावर शैलेंद्रची भेट साहित्य व नाटय़ क्षेत्रातील अनेक कलावंतांशी झाली. तो ‘इप्टा’ या सांस्कृतिक संस्थेचा आणि पुढे प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचा (‘पीडब्ल्यूए’) सदस्य बनला. ‘इप्टा’च्या मंचावरून तरुण कवी आपली गीतेही गात. या कवींत शैलेंद्र सामील झाला. त्याची गीते कामगारवर्गात लोकप्रिय होऊ लागली आणि बुद्धिवादी कलावंतांनाही त्यांचे आकर्षण वाटू लागले.

मार्क्‍स आणि त्याच्या विचारधारेची ओळख शैलेंद्रला ‘इप्टा’च्या काही सदस्यांकडून झाली. आणि या नव्या विचारसरणीने त्याला झपाटून टाकले. कामगारांत राहून शैलेंद्र लवकरच कामगारांचा पुढारी केव्हा बनला, हे त्याचे त्यालाच समजले नाही. त्या काळात ब्रिटिश सरकारने कामगारांवर अनेक जाचक र्निबध लादले होते. हरताळ करण्याचा त्यांचा हक्क काढून घेतला गेला होता. सरकार कामगारांचे दमन करण्यासाठी सारी शक्ती एकवटत होते. याचे आणखीन एक कारण तत्कालीन राजकारणात दडले होते. मजुरांच्या बहुतेक चळवळी या डाव्या विचारांच्या नेत्यांच्या हातात होत्या. आणि हा विचार भांडवलशाहीला आपला एक नंबरचा शत्रू मानत होता. याची प्रतिक्रिया म्हणून सरकार त्यांना संपवू पाहत होती. दडपले गेले तरी कामगार लहानसहान लढे उभारीतच होते. आणि अशा लढय़ांत शैलेंद्र हिरीरीने भाग घेत असे. या लढय़ासाठी त्याने कवने लिहिली.. गायिली. झेंडा घेऊन तो पुढे चालू लागला आणि त्याच्या सुरात सूर मिसळून असंख्य कामगार गाऊ लागले..

‘जो रोकेगा बह जायेगा, यह वह तुफानी धारा है     हर जोर-जुलम की टक्कर में हडताल हमारा नारा है’

आजही हरताळ करणाऱ्यांच्या मोर्चात ‘हर जोर- जुलम की टक्कर में हडताल हमारा नारा है!’ अशी घोषणा दिली जाते. मात्र, या ओळीचा जनक कवी शैलेंद्र आहे, हे लोक विसरून गेले आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या आनंदाबरोबरच फाळणीच्या वेदनाही भारतीयांना भोगाव्या लागल्या. मुंबईत निर्वासितांचे लोंढे येणे सुरू झाले. त्यांच्या अपार दु:खाने शैलेंद्रचे अंत:करण पिळवटून टाकले. याच काळात त्याने ‘मोरी बगिया में आग लगा गयो रे, गोरा परदेसी’ आणि ‘जलता है पंजाब साथियो’ अशा अप्रतिम कविता लिहिल्या. (या कविता ऐकूनच राज कपूरने शैलेंद्रची भेट घेतली.. आणि पुढला इतिहास सर्वज्ञात आहे.)

मात्र, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशातील जनता सुखी होईल अशी जी स्वप्ने सामान्य माणसाने पाहिली होती, ती अगदी अल्पकाळातच कोमेजली. बाहेरचा शत्रू निघून गेला, पण घरातच भांडवलशाही नावाचा एक नवा, बलाढय़ शत्रू उभा राहिला. हा नवा शत्रू आपल्यातच होता. आणि म्हणूनच अधिक धोकादायक होता. कामगारांचा लढा संपलेला नाही, पुन्हा एकदा एल्गार करण्याची वेळ आली आहे, असे सांगून ‘अंदर की यह आग’ या कवितेत शैलेंद्रने लिहिले-

‘वही नवाब, वही राजे, कुहराम वही है

पदवी बदल गयी है, किंतु निजाम वही है,

थका-पिसा मजदूर वही है, दहकान वही है

कहने को भारत, पर हिंदुस्तॉं वही है’

स्वातंत्र्यानंतर काय बदलले? काहीच नाही. ‘नेताओं को न्योता’ या कवितेत शैलेंद्रने लिहिले-

‘..यह कैसी आझादी है

वही ढाकके तीन पात है, बरबादी है

हमें न छल पायेगी ये कोरी आझादी

उठ री उठ, मजदूर किसानों की आबादी’

भारतीय राज्यकत्रेही ‘भांडवलदारांचे हस्तक’ बनले आहेत, असे अनेक मार्क्‍सवादी लेखकांप्रमाणे शैलेंद्रचेही मत बनले होते. त्यामुळे आपल्यातच नवे शत्रू निर्माण झाले आहेत असा त्याचा दावा होता. या शत्रूबरोबरही लढा देणे गरजेचे आहे, हे कवी पटवून देऊ पाहत होता..

‘बहुत सहा अब नहीं सहेंगे

कहां गये वे वादे? अब हम

भूखे नंगे नहीं रहेंगे’

कामगार नवे लढे लढत होता, नवी गीते गात होता. या नव्या गीतांत शैलेंद्रचीही गीते होती. पुन्हा एकदा एक नवा विश्वास कामगारांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न शैलेंद्र करीत होता..

‘तय है जय मजूर की किसान की

देश की जहान की, अवाम की

खून से रंगे हुए निशान की

लिख गयी है मार्क्‍स की कलम..’

हाच आशावाद शैलेंद्रच्या ‘मेहनतकशों के लिये’ या कवितेतूनदेखील व्यक्त होताना दिसतो. जिवंत असण्याचा एकच मापदंड आहे.. ‘जिंकण्यावर विश्वास ठेवणे!’ हा विश्वास संपला की जीवन संपले.

‘तू जिंदा है तो जिंदगी की जीत में यकीन कर

अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर’

स्वर्ग वगरे गोष्टींवर शैलेंद्रचा विश्वास नसला तरी आपल्या सहकाऱ्यांना, सामान्य श्रमिकांना हीच भाषा कळते हे त्याला ठाऊक आहे. शेवटी तो जनकवी आहे! तो लिहितो-

‘ये गम के और चार दिन, सितम के और चार दिन

ये दिन भी जायेंगे गुजर, गुजर गये हजार दिन..

 

न दब सकेंगे एक दिन बनेंगे इन्किलाब ये

गिरेंगे जुल्म के महल, बनेंगे फिर नवीन घर..’

शैलेंद्र केवळ आशा व्यक्त करीत नाही; तर स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्यासही तो तयार आहे. तो लिहितो-

‘सुनसान अंधेरी रातों में, जो घाव दिखाती है दुनिया

उन घावों को सहला जाउं, दुखते दिल को बहला जाउं

सुनसान मचलती रातों में, जो स्वप्न सजाती है दुनिया

निज गीतों में छलका जाउं, फिर मं चाहे जो कहलाउं

बस मेरी यही अभिलाषा है..’

शैलेंद्रच्या गीतांत जसा रोखठोकपणा आहे तसेच अत्यंत तीव्र असे व्यंग आणि उपहासदेखील आहे. ‘भगतसिंग से’, ‘आझादी हो तो ऐसी हो’ किंवा ‘मुझको भी इंग्लंड  ले चलो’, ‘नेताओं को न्योता’ अशा कवितांतून हा उपहास जहालपणे प्रकट झाला आहे. ‘भगतसिंग से’ या कवितेत शैलेंद्र लिहितो-

‘भगतसिंग इस बार न लेना काया भारत बासी की

देशभक्ती के लिये आज भी सजा मिलेगी फांसी की’

‘नेताओं को न्योता’ ही एक विलक्षण व्यंगकविता आहे. या कवितेत कवी पंडित नेहरूंना कामगार वस्तीत येण्यासाठी विनंती करतो आहे. अतिशय शांतपणे, सौम्य भाषेत. कसला राग नाही, संताप नाही. एक विनंती. पण तिच्यामागे मनात कशी आग दडलेली आहे ते या कवितेच्या ओळी-ओळीतून जाणवत राहते..

‘दर्शन के हित होगी भीड न घबरा जाना

अपने अनुगामी लोगों पर मत झुंझला जाना

हां, इस बार उतर गाडी से बठ कार पर

चले न जाना छोड हमे, बिडलाजी के घर’

धनवानांच्या घरची नेत्यांची उठबस तेव्हापासूनच होती! तिच्यावरचा कवीचा हा तिखा प्रहार.

नेताजी येतील, मग जनता त्यांचे जंगी स्वागत करेल, पण त्यांना खायला काय देणार?

‘एक चिंता यह भी है के क्या खिलायेंगे

तुम तो गेहू ही गेहू खाते आये हो

बडे बाप के बेटे सब पाते आये हो..’

कवी पुढे म्हणतो, ‘तुम्हाला आज तर खायला आम्ही गहू देऊ शकणार नाही. मग असे करा..

‘ऐसा करना तुम पगार के दिन आ जाना

उस दिन तुम भी हम सब के संग मौज उडाना’

मजुरांचे शोषण करणारे कोण आहेत हे सत्य लपून राहिलेले नाही, असे सांगून या माणसांना उद्देशून शैलेंद्र लिहितो-

‘यही है वो लोग जिनसे उभरा है नेशन

इनके ही दम से चलता है कार्पोरेशन

यही है बिरलाजी सेठ के खरीदार

यही है टाटा और बाटा के तलबगार’

या कवितेतील इंग्रजी शब्दांचा जाणूनबुजून केलेला उपयोग लक्ष वेधून घेतो.

शैलेंद्रने भाषेचा वेगवेगळ्या प्रकारे केलेला उपयोग अभ्यासण्यासारखा आहे. अनेक कवितांत बोलीभाषेत वापरले जाणारे शब्द घेऊन तो त्या कविता सामान्य माणसाच्या मनातील भावना व्यक्त करीत आहेत, हे स्पष्ट करतो..

‘पेट सेठ का कहां भरा है

और खिलाओ और ठुसाओ’

किंवा-

‘टुकुर मुकुर ताकेंगे तुम को बच्चे सारे’

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाच वर्षांतच पुन्हा नवी गुलामगिरी कशी आली आहे याचे विदारक दर्शन शैलेंद्रने अनेक कवितांतून घडविले आहे. यानंतर ६० वष्रे लोटली आहेत. आजही परिस्थिती तीच आहे. किंबहुना, अधिकच बिघडली आहे.

शैलेंद्र हा उत्कट कवी असला तरी हिंदी साहित्यातील कवी म्हणून त्याची कामगिरी आज जवळजवळ विस्मरणात गेलेली आहे. एक तर त्याचा एकच लहानसा ‘न्योता और चुनौती’ हा कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या गरफिल्मी कवितांकडे त्यानेच गंभीरपणे लक्ष दिले नाही. चित्रपटगीतांच्या क्षेत्रात त्याने उत्तुंग यश मिळवले व तेथेच तो रमला. त्याने कविता लिहिणे बंद केले. एका दृष्टीने जे झाले ते चांगलेच झाले. शैलेंद्र सिनेमात आला नसता तर त्याचे नावदेखील आम्हाला कधी ऐकायला मिळाले नसते. कारण हिंदी कवितेच्या इतिहासात हे नाव कधी घेतले जात नाही. खरे तर चित्रपटात कवीवर बंधने पडतात असे मानले जाते व मोठय़ा प्रमाणात ते खरेही आहे. पण वर्गसंघर्ष आणि सामाजिक वास्तवाच्या वर्तुळात फिरणारी शैलेंद्रची कविता चित्रपटाच्या क्षेत्रात मुक्त झाली. त्याच्यातील भावकवीला तेथे मुक्त संचार करता आला, वेगवेगळी आव्हाने घेता आली, वेगवेगळी क्षितिजे शोधता आली. आणि तो खऱ्या अर्थाने जनतेचा कवी बनला. ‘न्योता और चुनौती’मधील कवी फक्त श्रमिकांचा कवी होता. कामगार आणि सहकारी यांच्यापुरती मर्यादित त्याची कविता सिनेमात येऊन लाखो-करोडो रसिकांच्या भावजीवनाचा भाग बनून गेली. तिच्यात त्यांनी आपले रूप पाहिले, आपली स्वप्ने पाहिली. तिच्या नादलहरीवर ते डोलत राहिले.. अजूनही डोलत आहेत..

विजय पाडळकर vvpadalkar@gmail.com